#FamilyDoctor आईपणाचा ताण घेताय?

#FamilyDoctor आईपणाचा ताण घेताय?

बाळाला जन्म देणें हे आईसाठी वेगवेगळ्या प्रकारे आव्हानात्मक घटना ठरते. तुम्हाला एकाच वेळेस दमल्यासारखें वाटतें, उत्साहीही वाटतें. शिवाय अत्यंत काळजीही वाटत असते आणि याचाच आई म्हणून स्त्रीवर ताण येतो. अशावेळी बाळाच्या अतिकाळजीमुळे, अतिभावुकतेमुळे आईचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि हेच चुकते. बाळाइतकीच तुमची स्वतःची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. विशेषतः प्रसुतिनंतर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये एक आई म्हणून संगोपनाचे काम खूप ताण देणारे असते. नवीन मातांचा हा ताण कमी करण्यासाठी काही सोपे मार्ग उपयुक्त ठरतील. बाळाबरोबरीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, याचे भान आईने राखायला हवे. आपल्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आईचे आरोग्य नीट असणे गरजेचे आहे. 

काय कराल आपल्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी? खरे तर काही गोष्टींचे भान ठेवले की ते साध्य होईल.

पुरेशी झोप
संतुलित आहार
स्वतःसाठी वेळ
अनपेक्षित गोष्टींसाठी तयार  
सहाय्यक घेणे
बाळासोबत खेळणे

खरे तर एवढेच करायचे असते आणि काहीसे केलेही जाते. पण ताणामुळे यातील आनंद घेणे विसरतो. प्रत्येक गोष्टीतील आनंद मिळवा. जे कराल ते जाणीवपूर्वक करा. 

पुरेशी विश्रांती आणि झोप : जेव्हा शक्‍य असेल तेव्हा झोपा, कारण पुरेशा झोपेमुळे तुमच्या शरीराची हानी भरून निघते. तुमचे बाळ रात्री जागवत असेल, तर ते दिवसा झोपल्यावर तुम्हीही झोपलें पाहिजे. तुम्हाला झोप लागत नसेल, तरी डोळे बंद करून आणि लांब श्वास घेऊन विश्रांती घ्यायला हवी. असे केल्याने तुम्हाला आराम पडेल. यामुळे तुमच्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालू ठेवण्यासाठी मदत होते.

सकस आणि संतुलित आहार घ्या : तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकस आहार वेळेवर घ्या. गव्हाचा ब्रेड, पास्ता आणि ब्राउन राइसमधून योग्य प्रमाणात कर्बोदके घ्या, यामुळे पूर्ण दिवस काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल. लोणी, तयार मिळणारे अन्न आणि चीज यासारखे संपृक्त मेद असलेले पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी ऑलिव्ह ऑइल सारखे असंपृक्त मेद खा. तसेच प्रोटीन्ससाठी खूप चरबी नसलेले आणि चिकन, मासे, अंडी, डाळी भरपूर खा. फळे आणि भाज्यांचेही प्रमाण आहारात भरपूर असू द्या, यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला स्वास्थ्यपूर्ण वाटण्यासाठी मदत होईल. बाळाच्या जन्मानंतर होणारी बद्धकोष्ठता रोखण्यासाठी मदत होईल.

स्वतःसाठी वेळ काढा: भावनिक स्वास्थ्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत आवश्‍यक आहे. संध्याकाळी छान गरम पाण्याने आंघोळ करा किंवा तासभर एखादे चांगले पुस्तक वाचा, दिवसभरात एखादा चित्रपट पाहा किंवा तुमच्या नखांची काळजी घ्या. जे तुम्हाला करावेंसें वाटेल ते करा, परंतु स्वतःला प्राधान्य द्या. तुम्हाला करायच्या अशा गोष्टींची यादी करा आणि ती करायचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला छान वाटेल. 

अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहा: एखादा दिवस तुम्हाला भरपूर उत्साही वाटेल आणि एखाद्या दिवशी बाळाची काळजी घेण्याव्यतिरिक्त तुम्ही काहीही करत नाही ही भावना त्रास देईल, परंतु असें वाटणें ठीक आहे. काही नवीन पालक यातून बाहेर पडण्यासाठी दैनंदिन कामांची ‘टू डू’ यादी बनवतात, परंतु या भावना आहेत तशा जाऊ देणेही ठीक आहे, हे समजून घ्या.

स्वतःसाठी इतरांची मदत घ्या : बाळाची काळजी घेण्यासाठी नवीन पालक आपल्या कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊ शकतात. प्रत्येक वेळी ते शक्‍य होतेच असे नाही, पण अशावेळी तुम्ही मदत करू शकणारी माणसे शोधली पाहिजेत. तुमच्या मित्र-मैत्रिणींना फोन करण्यासाठी संकोच करू नका किंवा बाळाला सांभाळणारी एखादी व्यक्ती नेमा (आर्थिकदृष्ट्या शक्‍य असल्यास) एखादी आया ठेवणें हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या जवळपास मदत करू शकतील असे नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी राहात असतील तर त्यांना घरी बोलवा आणि तुम्ही तुमचे काम करेपर्यंत किंवा थोडा आराम करेपर्यंत बाळाकडे बघायला सांगा.

मनाची जादू : हो, हे खरें आहे. आपलें मनच जादूगार असतें! थोडसें चिंतन, थोडें आत्मपरीक्षण केल्याने आपल्या मनातील कोडी सोडवायला फार मोठी मदत होते. यात आणखी थोडी भर घालायची, स्वतःला सकारात्मक ठेवायचें, जसें की ‘मी करू शकते, मी करेन, मला केलेंच पाहिजे’ ही स्वयंसूचनेची कला आहे, यामुळे आपला ताण कमी होण्यास चांगली मदत होते.

व्यायाम कराः  बाळंतपणानंतर काही दिवसातच व्यायाम सुरू करणे आवश्‍यक आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने कधीपासून व कोणत्या प्रकारचा व्यायाम घ्यायचा ते ठरवा. त्यामुळे शरीर स्थूल होणार नाही. ते सुडौल राहील. स्नायूंना बळकटी येईल. चयापचय क्रिया सुधारेल. रक्ताभिसरण चांगले राहील. त्यामुळे उत्साह वाढेल. 

मेंदूच्या व्यायामामुळे चालना : शरीराचा व्यायाम करणें कधीही चांगलेच, परंतु आपल्या मेंदूचा व्यायामही आवश्‍यक आहे. आपल्या डोक्‍याला शब्दकोडी, कोडी, सुडोकू, बुद्धिबळ यासारख्या खेळांनी चालना द्यायला हवी, मेंदूला आव्हान द्यायला हवे, यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती दोन्ही वाढण्यास मदत होते.

खेळा-बागडा पद्धत : तुमच्या मुलांबरोबर खेळा, मूल आणि पालक अशा दोघांसाठी हा उत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमच्यातले बॉण्डिंगही सुधारते, ही कृती तुमची सक्रियता, ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता वाढण्यासाठी महत्त्वाची आहे.

उत्साही झुम्बा : एखाद्या झुम्बा क्‍लासला जायला सुरुवात करा किंवा इंटरनेटवरून स्टेप्स आणि स्टाइल कॉपी करा. संगीत, डान्स आणि व्यायाम यामुळे तुम्हाला किती छान आणि ताजंतवाने वाटते त्याचा अनुभव घ्या. तुम्हाला डान्स करता येत नसला तरीही हे कराच

यू ट्यूब युटोपिया: यू ट्यूबवरचे व्हिडिओ तणाव दूर करण्यासाठीचा उत्तम पर्याय ठरतो. कारण तुम्हाला काय हवेय त्याबद्दलचेच व्हिडिओ तुम्ही शोधत असता, यात प्रेरणादायी टेडटॉक्‍स असतील, आवडती गाणी असतील किंवा काही वर्षांपूर्वीचे छान सीन असतील, काही खूप हसवणारे क्रेझी व्हिडिओ असतील, तर काही दैनंदिन मालिका किंवा रिॲलिटी शो असतील. एकूणच नवीन जग तुमच्यापुढे खुलें असतें. त्याची सवय लावून घेऊ नका, पण नियंत्रणात त्याचा वापर करा.

सृजनशील उपक्रम: कला, हस्तकला, स्वयंपाक इत्यादीसारख्या सृजनशील उपक्रमांमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवणें खूप चांगले आहे. तुमच्या मेंदूवरील ताण कमी करण्यासाठी या क्रिया उपयुक्त ठरतात. खरें तर सृजनशील गोष्टींना उत्तम उपचारमूल्य आहे.

अद्भुतता अनुभवणे : काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल आणि ॲडनालाईनची उच्चतम पातळी गाठली जाईल. यामुळे तुमच्या स्वभावातील लहरी आणि मन सुन्न होण्यापासून रोखता येईल. दैनंदिन कामातील तोच तोचपणा टाळा, एकसुरी गोष्टी करू नका आणि बघा तुमच्या आयुष्यात ताजेपणा पुन्हा येईल.

नवीन मातांनी प्रसुतीनंतर आवश्‍यकता पडल्यास आपल्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी त्यांच्या डॉक्‍टरांना जरूर भेटावे, मग हे प्रश्न मातांचे किंवा बाळाचे कुणाचेही असोत. कुटुंबातील ज्येष्ठ महिलेशी बोलणेही लाभदायक ठरते, तुमच्या आईपण निभवण्याच्या काळात त्यांची मदत होते आणि पाठिंबाही मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com