esakal | उत्साही जीवनाचे रहस्य शरीर व तोल यांचे संतुलन
sakal

बोलून बातमी शोधा

Health

उत्साही जीवनाचे रहस्य शरीर व तोल यांचे संतुलन

sakal_logo
By
डॉ. विनया चितळे

आपल्या चारचाकी गाडीचे आपण ''बॅलेन्सिंग'' करून घेतो, तसेच आपल्या शरीराच्या तोलाकडे पण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकाला ''सेन्स ऑफ बॅलेन्स'' म्हणजेच शरीराचा तोल संतुलित राखण्याची जाणीव असणे अतिशय महत्वाचे आहे.

दिवसेंदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ आणि दमणूक वाढतच चालली आहे. मग अशा स्थितीत अधिक एनर्जी मिळवायची कोठून? तर, ती आपल्या शरीराच्या तोलाच्या संतुलनाने! प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील खाण्याचा, मनाचा, कामाचा व बँकेतील बॅलेन्सचा विचार करते, पण शरीराच्या बॅलेन्सचा कुणीही विचार करत नाही. आपण रोजच्या हालचाली करताना, आपले शरीर हाकताना आपल्या शरीरावर किती ताण पडत असेल याचा विचारच करत नाही. शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये पाठीच्या कण्याची फार महत्वाची भूमिका आहे आणि शरीराचा तोल ( बॅलन्स ) जर उत्तम असेल तर शारीरिक आणि मानसिक शक्ती आपोआपच वाढेल यात शंका नाही. शरीरामध्ये ''नॅच्युरल ऑटोपायलट'' सिद्ध असतो, ज्यामुळे शरीराची ''अलाईनमेंट'' होते. तेव्हा हा विषय समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. पाठीचा मणका ३३ मणक्यांनी बनलेला आहे, ह्यामध्ये मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) बसलेला आहे; ज्यामार्फत मेंदू सर्व अवयवांशी संवाद करत असतो. आपल्या सतत बदलत राहणाऱ्या हालचालींची माहिती प्रति सेंकदाला मज्जारज्जू मेंदूला पोहचवतो व शरीराची बदललेली स्थिती समजून मेंदू स्नायूंना संदेश पाठवतो. नंतर स्नायू आकुंचतात व शरीराचा तोल सांभाळतात.

संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, मणक्याच्या स्थिरतेसाठी आपल्या पाठीच्या कण्याच्या बाजूचे स्नायू सगळ्या हालचाली करताना चांगल्या स्थितीत असणे सर्वात गरजेचे आहे. पण हे स्नायू थकल्यास किंवा दुखावल्यास, मणका शरीराचे वजन झेलायला लागतो. मणक्यामधून आपल्या हाता-पायांना संवेदना पोहचवणाऱ्या नसा बाहेर पडतात. मणक्यावर ताण आला की मणक्यामधील अंतर कमी होते व मणक्यामध्ये ''डिस्क प्रोलॅप्स'' होतात. ह्यालाच ''स्पाँडिलॉसिस'' म्हणतात. ह्यामुळे मणक्यामधून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब येतो; व हाता-पायाला मुंग्या येणे; थकवा वाटणे, पाठ दुखणे, मानेवर ताण येणे हे सर्व प्रकार सुरू होतात. शरीराचा तोल सांभाळण्याकरिता मेंदूबरोबर मुख्यतः तीन अवयव काम करतात. ते म्हणजे डोळे, अंतरकर्ण (इनर ईअर) व पायातील संवेदना. अंतरकर्ण शरीर स्थितीबद्दल ९० ते १०० इतक्या संवेदना प्रत्येक मिली सेकंदाला मेंदूला पाठवत असतो. डोळे व पाय थकल्यास अंतरकर्णामधल्या ''बॅलेन्स सिस्टिम'' वर सगळा भार पडतो आणि तो सुदृढ नसल्यास तोल जायला लागतो किंवा चक्कर यायला लागते. मधुमेहामध्ये तोल सांभाळण्याकरिता विशेष काळजी घ्यायला हवी कारण ''न्यूरोपॅथी''मुळे पायातील संवेदन काम करत नाहीत, त्याचबरोबर ''रेटिनोपॅथी'' झाल्यास डोळ्याकडून येणाऱ्या संवेदना थकतात व सगळा भार अंतरकर्णांवर येतो आणि तोल जाण्यास सुरूवात होते. शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये अंतरकर्णांमधील ''बॅलेन्स सिस्टिम ऑर व्हेस्टिब्युलर सिस्टिम'' चा फार मोठा वाटा आहे.

मेंदूजवळ वसलेल्या ''बॅलेन्स सिस्टिम''ची आपली आपण तपासणी कशी करावी ? प्रथम दोन्ही पाय जुळवून डोळे मिटावे व तोल जात आहे का ते बघावे. हे सोपे वाटल्यास एका पायावर उभे राहून डोळे मिटून परत तोल जात आहे का ते बघावे. तो जात असल्यास आपल्या शरीराचा तोल सुधारायला हवा असे समजावे ! मणक्याच्या स्थिरतेमुळे, अंतरकर्णामधल्या बॅलेन्स सिस्टिमच्या ऍक्टिव्हेशनमुळे इजा होणे टळेल, पडायला होणार नाही; किंवा अगदी पडायला झाले तर जास्त दुखापत होणार नाही, कारण शरीर सावरेल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हालचाली थांबणार नाहीत व दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ''मुव्हमेंट इज लाईफ'' ही संकल्पना महत्त्वाची आहे. आपण सकाळी उठल्यावर डोळे मिटून मणक्यांच्या स्थिरतेचा विचार करावा. शरीर दुखत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी ह्याचा भरपूर उपयोग होईल. साधारणतः अशी समजूत असते की घरकाम म्हणजे सर्वात सोपे. खरंतर घरकामामध्ये सर्व सांधे, स्नायू वापरलेले जातात. अलीकडे भारतीय स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्नायूंमध्ये ताकद नसल्यामुळे हाडे, मणके सगळा भार घेतात आणि कालांतरानी ह्या हाडाची झीज होऊ लागते. आता ही क्रिया ४० व्या वर्षी सुरू होताना दिसते तेव्हा ह्याचे वेळीच उपाय करणे अतिशय आवश्यक आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे तोल जात असल्यास, चक्कर येत असेल तर त्रास खूप होत असताना १ - २ आठवडे औषधे घ्यावी, परंतु नंतर मात्र ह्याचे मूळ कारण शोधणे अतिशय गरजेचे आहे. औषधांमुळे चक्कर दबली जाते, ती काही बरी होत नाही. औषधे थांबवली की पुन्हा त्रास सुरू होतो. फक्त व्यायामानेच चक्कर व तोल कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. दैनंदिन आयुष्यामध्ये संगणकावर अनेक तास काम करणे, तासन्‌तास एकाजागी कामासाठी बसणे, खराब रस्त्यावरून गाडी चालवणे, तासन्‌तास फोनवर बोलणे ह्या सगळ्यामुळे नैसर्गिक शरीरस्थिती बिघडते. पाठीच्या कण्याचे स्नायू नीट काम करत नाहीत व त्यामुळे अधिक थकवा येऊ लागतो. आपण दिवसाच्या शेवटी गळून जातो. अशा स्थितीत व्यायाम होत नाही, कामामुळे वेळेवर जेवण होत नाही आणि असे आपले शरीर हाकताना मणक्यावर किती ताण येत असेल ह्याचा आपण विचारच करत नाही. ह्या चक्रव्युहातून बाहेर पडायचे असेल तर शरीराचे संतुलन झालेच पाहिजे. अंतरकर्णामध्ये अस्थिरता निर्माण झाली की, शरीराची तोल जाण्याची संभावना, दगदग, चक्कर येणे, वयस्कर लोकांमध्ये नव्हे तर आता तरूणांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. वयस्कर लोकांमध्ये फ्रॅक्चर नेक फिमर; मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर होते. हे सगळे काही संतुलित शरीर झाले तर टळू शकते. त्याची जनजागृती भारतामध्ये होणे आवश्यक आहे.

loading image
go to top