अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष करू नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sickness

आपला श्वास हा आत जातो आणि बाहेर येतो, ही क्रिया घडताना आपण फारसा विचार करत नाही आणि हे अतिशय चुकीचे आहे.

अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष करू नका!

हा रेस्पिरेटरी इन्फेक्शनचा जमाना आहे. आपली श्वासनलिका सुदृढ असायला पाहिजे, म्हणजे कुठलाही व्हायरस किंवा बॅक्टेरिया हवेतून जरी आला तरी तुमच्या श्वासनलिकेमधून शरीरात जाऊ शकणार नाही. मग श्वासनलिकेला कशामुळे सूज येते? तर ती अ‍ॅलर्जीमुळे येऊ शकते. आपली श्वासनलिका नाकात सुरू होते. आपण श्वास घेताना श्वास हा नाकाच्या पाठीमागे जातो. त्यानंतर घशातून तो स्वरतारांमधून ट्रेकियामध्ये (‘ट्रेकिया’ म्हणजे श्वासासाठी असलेली नलिका) जातो. त्यानंतर श्वास फुप्फुसांमध्ये उजवीकडे व डावीकडे त्याचे वर्गीकरण होते. अशाप्रकारे आपला श्वास फुप्फुसांपर्यंत जातो. श्वास घेतांना कुठेही अडथळा आला तर फुप्फुसांना प्राणवायू मिळत नाही. प्राणवायू म्हणजे संजीवन! प्राणवायू म्हणजे निरोगी तब्येत राखण्यासाठीचे साधन! असा हा प्राणवायू तुमच्या फुप्फुसांपर्यंत पोहचायलाच पाहिजे. कारण फुप्फुसांमध्ये श्वासनलिकेला कुठलीही सूज नसताना प्राणवायू १०० टक्के पोहोचला तर तुम्ही निरोगी राहता. कुठलाही व्हायरस आला, अगदी कोविडसुद्धा आला तरी तुमच्या फुप्फुसांमध्ये त्या व्हायरसला तोंड देण्याची क्षमता असेल तर काही काळजी करण्याचे कारण नाही. आपली श्वासनलिका सुदृढ ठेवण्यासाठी सर्वात उत्तम साधन म्हणजे ‘प्राणायाम’ आहे, हे आपल्याला माहीत आहे. रोज सकाळी आपली फुप्फुसे एखाद्या फुग्यासारखी पूर्ण फुगलीच पाहिजे.

आपला श्वास हा आत जातो आणि बाहेर येतो, ही क्रिया घडताना आपण फारसा विचार करत नाही आणि हे अतिशय चुकीचे आहे. जेव्हा आपला श्वास आत जातो तेव्हा श्वास बाहेर येण्याची जी क्रिया आहे ती जास्त महत्त्वाची आहे. दररोज पाच मिनिटे तुम्ही प्रत्येकाने ‘कॉन्शिअस ब्रिदिंग’ केले पाहिजे. म्हणजे पूर्ण सखोल श्वास घेतल्यानंतर थोडे सेकंद धरून ठेवायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जितका वेळ श्वास आत घेतला असेल त्याच्या दुपटीपेक्षा जास्त सेकंदाने तो सोडला पाहिजे. समजा तुम्ही ४ सेकंद श्वास आत घेतला तर ८-१० सेकंद हळू हळू तो सोडला पाहिजे आणि हे दिवसातून फक्त पाच मिनिटे जरी केले तर तुमचे शरीर निरोगी राहील आणि फुप्फुसांना पूर्ण प्राणवायू मिळेल.

अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष करू नका असे मी का म्हणते? अ‍ॅलर्जीमुळे श्वासनलिकेला सूज येऊ शकते. जेव्हा अ‍ॅलर्जीमुळे नाकात सूज येते. तेव्हा आपण म्हणतो की, माझे नाक चोंदत आहे, मला नाकाने श्वास घेता येत नाही. कधी कधी हा अडथळा नाकातले हाड वाढल्यामुळे असू शकतो. पण जास्त करून अ‍ॅलर्जीमुळे नाकाच्या आतल्या आवरणांना सूज येते, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. अ‍ॅलर्जीमुळे तुमच्या फुप्फुसांमधील ब्राँकसमध्ये - ब्राँकिअल ट्रीमध्ये (श्वासनलिकेचे छोटे पाईप) सूज आली की, त्याला ‘अ‍ॅलर्जिक ब्रॉन्कायटिस’ किंवा ‘अस्थमा’ असे म्हणतात. अ‍ॅलर्जीमुळेच अस्थमा होऊ शकतो म्हणून मी म्हणते की, अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष करू नका.

अ‍ॅलर्जी होऊ नये किंवा जर झालेली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे? तर त्यासाठी तीन सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप १- जलनेती - जलनेती केल्यामुळे जे नाकात अ‍ॅलर्जन आत जाऊन दिवसभर श्वास घेतल्यामुळे वायूप्रदूषणात, अनैसर्गिक पर्यावरणामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जिथे धूळ जास्त आहे तिथे असे अ‍ॅलर्जन्स नाकाच्या आत जाऊन चिकटून बसलेले असतात ते रात्री धुऊन काढले पाहिजेत. जसे आपण तोंड धुतो तसे नाक धुऊन काढायला पाहिजे. ही स्टेप केल्यानंतर ५० टक्के फरक तुम्हाला लगेच पडेल. नाक चोक होणे, नाकाच्या अ‍ॅलर्जीमुळे वारंवार सर्दी होणे, नाक गळणे, नाकाच्या मागून सर्दी घशात गळणे इत्यादि समस्या ५० टक्क्यांपर्यंत ताबडतोब कमी होतील. दिवसातून एकदा तरी आपल्याला जमेल तेव्हा जलनेती करावी. जलनेती करताना पावडर वापरणे आवश्यक आहे. जेणेकरून जलनेतीचे पाणी थोडेसे समुद्रासारखे होईल. हे पाणी नाकातील सूज शोषून घेण्यास मदत करते. जलनेती केल्यानंतर नाकात नेझल स्टेरॉईड स्प्रे वापरायला हवा. नेझल स्टेरॉईड स्प्रे वापरताना हनुवटी वर घ्यावी, उजवा हात डाव्या नाकपुडीला वापरावा तसेच डावा हात उजवा नाकपुडीला वापरावा. त्यामुळे हा नेझल स्टेरॉईड स्प्रे नाकात खोलवर जाईल जेणेकरून नाकातल्या आतील त्वचेची नाजूकता कमी होईल, सूज कमी होईल आणि अ‍ॅलर्जी कमी होण्यास याची नक्कीच मदत होईल. अ‍ॅलर्जीच्या गोळ्या सतत घ्याव्यात का? अ‍ॅलर्जीच्या गोळीचा इफेक्ट तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. तो १२-२४ तास राहतो आणि मग हळू हळू अ‍ॅलर्जी परत वाढते.

स्टेप २- पोट सुदृढ करणे - आपल्या पोटात जंतू असतात. ते दोन प्रकारचे असतात- १. गुड बॅक्टेरिया २. बॅड बॅक्टेरिया. पोटाच्या जंतूंचा बॅलेन्स बिघडला की, तुमची अ‍ॅलर्जी वाढेल. त्यासाठी चांगल्या जंतूंची आवश्यकता असते. घरी केलेली इडली, ढोकळा, केशर, दही इत्यादी पदार्थांमध्ये चांगले जंतू असतात. चांगले जंतू पोटात वाढवण्याबरोबरच आपण लिव्हरचे क्लिन्झिंग केले पाहिजे. ‘लिव्ह ५२’ ही भारतामध्ये एक सुंदर गोळी आहे. या गोळीमुळे लिव्हर क्लिन्झिंग होऊ शकते. आता हे सर्व करून सुद्धा अ‍ॅलर्जीचा त्रास कमी झाला नाही तर मात्र आपण समजून जावं की, आपली प्रतिकारशक्ती थोडी कमी आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता मग टॉनिक्स, व्हिटामिन्स, व्हिटामिन डी किंवा सूर्यप्रकाश अॅलर्जी पेशंट्ससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सकाळचे कोवळे ऊन किंवा दुपारी सूर्य जरा मावळतीला असेल तेव्हाचे ऊन गच्चीत जाऊन अथवा तुमच्या बागेत जाऊन सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर पडला पाहिजे. नाहीतर ‘व्हिटामिन डी’ची एक गोळी दररोज घेण्यास काही हरकत नाही. कारण शरीरात ‘व्हिटामिन डी’चे प्रमाण वाढले की, तुमचे शरीर ह्या सर्व अ‍ॅलर्जिअन्सला रिअ‍ॅक्ट होणार नाही. ज्यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होईल.

या सर्व गोष्टी करूनदेखील फरक पडला नाही तर शेवटचा उपाय म्हणजे स्टेप ३- अ‍ॅलर्जी टेस्टिंग आणि इम्युनोथेरपी : लहान मुलांमध्ये खाद्य पदार्थांचा अतिशय परिणाम होतो. लहान मुलांना जर अ‍ॅलर्जी असेल तर त्यांना मात्र दूध बंद केले पाहिजे म्हणजे नक्की फरक पडेल. पण मोठ्या माणसांमध्ये मात्र वातावरणाच्या अ‍ॅलर्जन्सचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे वरील उपायांनी फरक पडला नाही तर नेमक्या कुठल्या अ‍ॅलर्जनने त्रास होतो हे शोधून त्याच्यावर व्हॅक्सीन केले पाहिजे.

अ‍ॅलर्जी टेस्ट कधी करावी? अ‍ॅलर्जी जर वरील उपाय करून देखील कमी झाली नाही तरच किंवा आता इम्युनोथेरपी घ्यावी, असे वाटले तरच अ‍ॅलर्जी टेस्ट करावी. फॅशन म्हणून अ‍ॅलर्जी टेस्ट करू नये. अ‍ॅलर्जी टेस्टमध्ये वातावरणात जे एन्व्हायर्नमेंटल अ‍ॅलर्जन्स आहेत ते तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण प्रौढ व्यक्तींमध्ये एन्व्हायर्नमेंटल अ‍ॅलर्जन्स किंवा वातावरणातले अ‍ॅलर्जन्स म्हणजे प्रोटिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हवेमध्ये अनेक प्रकारचे फंगस आढळतात.

अमेरिकेच्या माहितीनुसार प्रत्येक जण दररोज सुमारे सहा मिलियन फंगसचे बिजाणू आपल्या श्वासाद्वारे आत घेतो. भारतात आपण उष्ण कटीबंधीय वातावरणात किंवा दमट हवामानात राहत असल्यामुळे आपण सर्वात जास्त फंगसचे बीजाणू आपल्या फुप्फुसांमध्ये श्वासाद्वारे आत घेत असतो. आता यात हे पाहावे लागेल की, तुमचे शरीर या फंगल अ‍ॅलर्जनना कसे रिअ‍ॅक्ट होते. बाकीचे जे अ‍ॅलर्जन्स आहेत ज्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो ते म्हणजे धूळ. धुळीमध्ये डीपी आणि डीएफ नावाचे डस्टमाईट असतात. त्याचबरोबर प्राण्यांचे केस, त्वचेचे कण हे त्रास देऊ शकतात. एखाद्याचे शरीर संवेदनशील असेल तर डस्टला शरीर रिअ‍ॅक्ट होऊ शकते. तसेच झाडाला व गवताला जे परागकण येतात यामुळे सुद्धा शरीर रिअ‍ॅक्ट होत असते. शरीर रिअ‍ॅक्ट होते म्हणजे नेमके शरीरात काय होते? अ‍ॅलर्जन्सचे शरीराला संक्रमण झाल्यानंतर शरीर अ‍ॅन्टिबॉडी तयार करते. अ‍ॅन्टिजन व अ‍ॅन्टिबॉडी रिअ‍ॅक्शन झाली की, हिस्टॅमिन नावाचे द्रव्य तयार होते. हे हिस्टॅमिन दाबण्यासाठी आपण अ‍ॅन्टिहिस्टॅमिन म्हणजे अ‍ॅलर्जीची गोळी घेतो. हिस्टॅमिन वाढल्यामुळे नाकाला सूज येणे, सर्दी होणे, शिंका येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांतून पाणी येणे इत्यादी अ‍ॅलर्जीची लक्षणं दिसतात, तसेच श्वासनलिकेला सूज येणे, अस्थमा होणे इत्यादी.

अ‍ॅन्टिजन आणि अ‍ॅन्टिबॉडी यांची रिअ‍ॅक्शनच झाली नाही तर हिस्टॅमिन तयारच होणार नाही. थोडक्यात, गोळीच घ्यावी लागणार नाही. इम्युनोथेरपीमुळे सहा महिने ते वर्षभरामध्ये ब्लॉकिंग अ‍ॅन्टिबॉडी तयार होते. आणि ते तयार झाल्यानंतर अ‍ॅन्टिजन आणि अ‍ॅन्टिबॉडी रिअ‍ॅक्शन होत नाही.

इम्युनोथेरपी म्हणजे काय? त्याचे प्रकार किती?

इम्युनोथेरपीचे दोन प्रकार आहेत. १. इंजेक्टेबल इम्युनोथेरपी २. सबलिंग्वल इम्युनोथेरपी (SLIT) : सबलिंग्वल इम्युनोथेरपी म्हणजे जिभेच्या खाली जे ड्रॉप्स दिले जातात ज्याला आम्ही ‘स्लिट’ म्हणतो. ही इम्युनोथेरपी साधी, सोपी असून हे व्हॅक्सिन एकदा तयार केल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवायला लागते. हे व्हॅक्सिन रोज एक ड्रॉप पहिल्या आठवड्यात, दोन ड्रॉप्स दुसऱ्या आठवड्यात, तीन ड्रॉप्स तिसऱ्या आठवड्यात, चार ड्रॉप्स चौथ्या आठवड्यात, पाच ड्रॉप्स पाचव्या आठवड्यात असे बाटली संपेपर्यंत रोज न चुकता घ्यावे लागते. यानंतर आम्ही पुढच्या वेळेस आणखी जास्त स्ट्राँग म्हणजे आधीच्या पाचपट स्ट्राँग असे व्हॅक्सिन तयार करतो. हे व्हॅक्सिन ज्याच्या त्याच्या अ‍ॅलर्जी टेस्टप्रमाणे व्यक्तीनुसार बनवलेले असते. हे व्हॅक्सिन रोज ३-५ वर्षांपर्यंत घ्यावे लागते. यामुळे आपल्याला आयुष्यभर इम्युनिटी मिळते. ब्लॉकिंग अ‍ॅन्टिबॉडीज तयार होऊन सर्दीचा त्रास नाहीसा होतो आणि अॅलर्जी दूर होऊ शकते.

स्लिटचा रिअ‍ॅक्शन रेट हा ०.०३ टक्के एवढा कमी आहे. म्हणून हे व्हॅक्सिन खूप सुरक्षित आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पेशंटमध्ये मात्र इम्युनोथेरपीदेखील काम करत नाही. या व्हॅक्सिनचा फरक कसा होतो ते आपण आता पाहू या. समजा आपले शरीर एक कॉफी कप आहे. या कॉफी कपमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींची सेन्सिटिव्हीटी डेव्हलप झालेली आहे. कॉफी कपमध्ये धूळ, प्राण्यांचे केस, त्वचा, ट्री पोलन, वीड पोलन, फंगस, काही खाण्याचे पदार्थ अशी सेन्सिटिव्हीटी डेव्हलप होऊन शरीराला होत नाही आणि अ‍ॅलर्जन्स ऊतू जायला लागतात. तेव्हा काहीतरी करायला हवे. वरील सांगितलेल्या ट्रिटमेंटस्चा उपयोग करून अ‍ॅलर्जीमुळे होणारा सायनसचा त्रास, कानाचा त्रास, वारंवार इन्फेक्शन होऊन कान वाहणे, अस्थमा होणे इत्यादी सर्व त्रास तुम्ही थांबवू शकता. तसेच पुढे होणारे व्हायरल इन्फेक्शन किंवा श्वासनलिकेतून जाणाऱ्या जंतूंचे इन्फेक्शनची शक्यता पण कमी करू शकता. त्याचबरोबर वातावरणात बदल झाल्यामुळे वारंवार होणारा सर्दी, खोकला थांबवू शकता. त्यामुळे मी परत एकदा सांगते की, अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष करू नका. धन्यवाद!

Web Title: Dr Vinaya Chitale Writes Dont Ignore Alergy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..