तातडीचे उपचार

तातडीचे उपचार

टॅ-टू ऽ टॅ-टू ऽ टॅ-टू असा आवाज करत गाडी जाऊ लागली की कोणीतरी सीरिअस आहे, काही तरी इमर्जन्सी आहे हे लक्षात येते. रस्ता मोकळा मिळावा म्हणून अशा तऱ्हेचा सायरन वाजविला जाणे योग्य असले तरी त्यामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाइकाच्या मनात भीती निर्माण होते हेही खरे. शिवाय ॲम्बुलन्समध्ये असलेला रुग्ण बेशुद्ध नसला तर त्याला या आवाजाने नसलेला आजार होऊ शकतो. पण त्यावर इलाज तरी काय? 

पुणे सोडून कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज येथे संतुलन आयुर्वेद हे केंद्र जेव्हा सुरू केले त्या वेळी सुरवातीला ‘एमटीडीसी’मध्ये बंगले भाड्याने घेऊन तेथे रुग्ण राहत असत. नंतर हलके हलके आत्मसंतुलनच्या परिसरात काही घरे बांधून रुग्णांची राहण्याची सोय करण्यात आली. सुरवातीची बरीच वर्षे एक प्रश्‍न विचारला जात असे, की इमर्जन्सी आली तर काय? तेव्हा इमर्जन्सी म्हणजे काय असे मी म्हणत असे. रात्री-अपरात्री हार्ट ॲटॅक आला तर काय करायचे असा लोकांचा प्रश्‍न असे. त्या वेळी सुमारे ८० टक्के रुग्ण हृदयासंबंधी त्रास असलेले असत. त्यांना संतुलन पंचकर्म उपचारामुळे बरे वाटत असे. संतुलन पंचकर्म उपचारानंतर काही लोकांनी पुन्हा तपासणी केल्यावर हृदयवाहिन्यांमध्ये तयार झालेले ब्लॉक्‍स निघून गेल्याचे लक्षात आलेले होते. काही लोकांचा इन्फार्क्‍ट बरे झाल्याचे त्यांनी नंतर केलेल्या रिपोर्टस्‌मध्ये दिसत होते. अनेक रुग्णांमध्ये इजेक्‍शन फ्रॅक्‍शन वाढल्याचे दिसून येत असे. उपचाराआधी दहा पावलेसुद्धा न चालू शकणारा रोगी संतुलन उपचारांनंतर मैलभर चालू शकत असे, त्याची धाप कमी झालेली असे. 

अनेकांना उपचारांचा उत्तम गुण आल्यामुळे विश्वासाने येथे आलेल्या व आपण नक्की बरे होणार असे गृहीत धरलेल्या रुग्णाला काही त्रास झाला तर त्याला भीती वाटणे साहजिक आहे. म्हणून लोकांचा प्रश्‍न असे, ‘‘इमर्जन्सी  आली तर काय करायचे? काही इमर्जन्सी आली तर आयुर्वेदात काही उपचार आहे का? हृदयासारख्या आजारात काही इमर्जन्सी आली तर ताबडतोब सुसज्ज हॉस्पिटलमध्ये भरती होणे आवश्‍यक असते. कार्ल्यापासून पुणे ५० किमी, तर मुंबई १५० किमी आहे तेव्हा इमर्जन्सी आली तर काय करायचे?’’ परंतु मावळात भर पावसाळ्यात खेड्यातील हार्ट ॲटॅक एका रुग्णाला खांद्यावरून बैलगाडीपर्यंत, बैलगाडीतून वाटेत आलेला ओढा पार करून बसपर्यंत नेऊन, पुढे बसने मुंबईला नेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तो बरा होण्याची उदाहरणे असतात. तर काही वेळा सुसज्ज हॉस्पिटलमध्ये ताबडतोब दाखल करून उपचार केले तरी उपयोग न झाल्याचे दिसते. 

आयुर्वेदात काही तातडीचे उपचार आहेत का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात असतो. तर आयुर्वेदातही तातडीचे उपचार असतात. २००-१०० पर्यंत वाढलेला रक्‍तदाबही सूतशेखर मात्रा दिल्यानंतर किंवा इतर उपचार केल्यानंतर लगेच कमी होतो. पोटातील गॅसमुळे हृदयावर दाब येत असला व त्यामुळे ॲटॅकसदृश परिस्थिती निर्माण झाल्यासारखी वाटली, तर आल्या-लिंबाचा रस व मध एकत्र करून दिले तर रोग्याला आराम वाटतो. आयुर्वेदात इतर रोगांसाठी तातडीच्या सेवेसाठी बरेच इलाज सुचविलेले असतात. जुलाब झाले, बद्धकोष्ठाचा त्रास होत असला तर वेळेवर उपचार केल्यास पुढे होऊ शकणारे आगंतुक ॲटॅक टाळले जाऊ शकतात. 

पंचकर्म केल्यामुळे काही त्रास झाला तर काय करायचे, हा अत्यंत हास्यास्पद प्रश्‍न अनेकदा विचारला जातो. पंचकर्माच्या पूर्वतयारीच्या काळात म्हणजे स्नेहन, स्वेदनाच्या काळात कुणालाही त्रास होऊ शकत नाही. आंतर्स्नेहन करून शरीराची शुद्धी करण्याच्या काळात इमर्जन्सी येण्याचीमुळीच शक्‍यता नसते. गेल्या ३५ वर्षांच्या माझ्या प्रॅक्‍टिसमध्ये असा अनुभव आलेला नाही. या काळात एखाद्या रुग्णाला काही त्रास झालाच, तर आयुर्वेदातील औषधे वापरून इलाज होतो. 

आयुर्वेदिक उपचार करणारे वैद्य घराच्या आजूबाजूला बऱ्याच उपयोगी वनस्पती वाढवत असावेत. कार्ल्यासारख्या ठिकाणी कोरफड, निवडुंग, निर्गुडी, तुळशी, गवती चहा, आले, हळद यांच्यासारख्या अनेक वनस्पती असू शकतात, यांचा उपयोग तातडीचे उपचार करताना होऊ शकतो. बस्ती, शेक करणे, पोटली, पोटीस वगैरे उपचारही करता येतात. इमर्जन्सी उपचारांच्या वेळी यांचा उपयोग केल्यास रुग्णाला बराच आराम मिळू शकतो.  

एकूण, आयुर्वेदात असे उपचार सुचविलेले आहेत. अनेक आयुर्वेदाचे वैद्य इमर्जन्सीला न घाबरता उपचार करतात आणि रोगी बरे झालेले दिसतात. आयुर्वेदात कुठल्या वनस्पती, कुठल्या तऱ्हेचे उपचार तातडीचे उपचार म्हणून करता येतील यावर अधिक माहिती वाचकांना देता येऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com