रक्षण पर्यावरणाचे

Environment
Environment

आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक दिवसापर्यंत असा सांगितला नाही तर त्या ऋतूत होणारे बदल बघून, पर्यावरणाचे निरीक्षण करून त्यानुसार ऋतुनिश्‍चिती करावी, असे सांगितले आहे. म्हणूनच आयुर्वेद हे जरी भारतीय शास्त्र असले तरी त्याचा उपयोग संपूर्ण जगाला होऊ शकतो.

पर्यावरण आणि आपण या मुळात दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. पर्यावरणाचाच एक भाग म्हणजे आपण. निसर्ग, सृष्टी, अवकाश, पशू, पक्षी, वनस्पती, नदी, तलाव, पर्वत, सागर वगैरे सर्व दृश्‍य-अदृश्‍य गोष्टींचा समावेश पर्यावरणात होत असतो. आयुर्वेदात पर्यावरणाला ‘लोक’ असे म्हटलेले दिसते. 

या संबंधात चरकाचार्य म्हणतात, 
अपरिसंख्येया लोकावयवविशेषाः ।...चरक सूत्रस्थान
आपण राहतो त्या लोकांचे म्हणजेच पर्यावरणाचे अगणित अवयव-विशेष आहेत, मोजता येणार नाहीत एवढे घटक आहेत. आयुर्वेदाचा एक मुख्य सिद्धान्त म्हणजे ‘लोक-पुरुष साम्य सिद्धान्त’.  
पुरुषोऽयं लोकसंमितः । 
यावन्तो हि लोके मूर्तिमन्तो भावविशेषाः तावन्तः पुरुषे ।

 ...चरक सूत्रस्थान
जे जे काही बाह्यजगतामध्ये आहे, त्या सर्वांचा आपल्यावर परिणाम होत असतो. एवढेच नाही तर मनुष्य बाह्य पर्यावरणाची जणू प्रतिकृती आहे असे आयुर्वेद समजतो.

या ठिकाणी पुरुष हा शब्द सजीव मनुष्य या अर्थाने वापरलेला आहे. प्रत्येक पुरुष हा लोक म्हणजेच या सृष्टीच्या, पर्यावरणाच्या समान असतो. सृष्टीत जेवढे म्हणून भावविशेष आहेत तेवढेच सजीव मनुष्याच्या शरीरातही आहेत. यावरून आयुर्वेदामध्ये पर्यावरण किती महत्त्व आहे, हे लक्षात येईल. म्हणूनच स्वतःच्या आरोग्याची काळजी जेवढी प्रयत्नपूर्वक घ्यायची तेवढीच काळजी पर्यावरणाची घ्यायला हवी, हे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. आयुर्वेदिक जीवनशैलीतून आजही हे सिद्ध होते. 

आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते तमुक दिवसापर्यंत असा सांगितला नाही तर त्या ऋतूत होणारे बदल बघून, पर्यावरणाचे निरीक्षण करून त्यानुसार ऋतुनिश्‍चिती करावी, असे सांगितले आहे. म्हणूनच आयुर्वेद हे जरी भारतीय शास्त्र असले तरी त्याचा उपयोग संपूर्ण जगाला होऊ शकतो.

व्याधीने ग्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार करण्यासाठी अगोदर त्याच्यात बिघडलेल्या दोषांचे, व्याधीचे निदान करावे लागते. उपचारांचे स्वरूप ठरविण्यासाठी त्या व्यक्‍तीची ताकदही समजून घ्यावी लागते. यासाठी आयुर्वेदाने अनेक मुद्दे विचारात घ्यायला सांगितले आहेत. त्यातला एक म्हणजे देश. देश म्हणजे भारत, जर्मनी या अर्थाने नाही तर कफ, वात, पित्ताचे प्राधान्य असणारा किंवा सम साधारण असणारा प्रदेश असा अर्थ यात अभिप्रेत असतो. भारतातील उदाहरण घ्यायचे तर काश्‍मीर, पंजाबमध्ये कफाचे आधिक्‍य असते तर राजस्थानात वात-पित्ताचे आधिक्‍य असते. काश्‍मीरमधल्या व्यक्‍तींची प्रकृती राजस्थानातील व्यक्‍तीपेक्षा वेगळी असते हे आपण जाणतोच. अशा प्रकारे निदान करताना प्रकृतीनुरूप आहार-आचरणाचे नियोजन करताना आयुर्वेद पर्यावरणाचा विचार करतो. 

पाणी हा पर्यावरणातील एक जीवनावश्‍यक घटक. ज्या नद्या पश्‍चिमेच्या समुद्राला मिळतात त्यांचे पाणी पथ्यकर असते. तर पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पचायला जड असते. दक्षिणेकडे वाहणारे पाणी साधारण म्हणजे खूप पथ्यकरही नसते किंवा दोषकारकही नसते. वेगाने वाहणाऱ्या व स्वच्छ पाणी असणाऱ्या नद्यांचे पाणी पचायला हलके असते. याउलट, संथ गतीने वाहणाऱ्या, शेवाळाने आच्छादित नद्यांचे पाणी जड असते. यासारखे जे वर्णन आयुर्वेदाने केलेले आहे ते पर्यावरणाच्या अभ्यासातूनच केलेले आहे.
आयुर्वेदाने वाऱ्याचे गुणही सांगितलेले आहेत. पूर्वेकडच्या वाऱ्यात बसण्याने वातदोष प्रकुपित होतो पण पश्‍चिमेकडचा वारा थंड गुणाचा असल्याने दाह, तृष्णा, मूर्च्छा यांचा नाश करतो. दक्षिणेकडचा वारा डोळ्यांसाठी हितकारक व ताकद वाढवणारा असतो तर उत्तरेकडचा वारा स्निग्ध व मृदू असतो. 
व्याधीचे साध्यत्व, असाध्यत्व ठरविण्यासाठीही आयुर्वेदाने पर्यावरणाचा आधार घेतलेला आढळतो. 
अतुल्यदूष्यदेशर्तुप्रकृतिः पादसंपदि ।...अष्टांगसंग्रह
विकारास कारणीभूत दोष आणि पर्यावरण म्हणजे ऋतुमान, देश, पाणी वगैरे गोष्टी एकमेकांना पूरक, सहायक असल्या तर तो विकार असाध्य ठरू शकतो.
पर्यावरणात अशा अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे जनपदोध्वंस. 
ये अन्ये भावाः सामान्याः तद्‌ वैगुण्यात्‌ समानाकालाः । 
समानलिंगाश्‍च व्याधयः अभिनिर्वर्तमाना जनपदमुध्वंसयन्ति ।।

...चरक विमानस्थान
वायू, जल, देश व काल हे चार भाव दूषित झाले तर त्यामुळे एकाच वेळी अनेकांना एकाच प्रकारची लक्षणे असणारे व्याधी निर्माण होऊ शकतात.
सध्या भेडसावत असणाऱ्या प्रदूषित हवा, अशुद्ध पाणी, बिघडलेली जमीन आणि बदलणारे ऋतू या सर्व समस्यांचे मूळ कारण आयुर्वेदाने पूर्वीच समजावलेले आहे.

या सर्व विवेचनावरून आयुर्वेदाने पर्यावरणाचा किती सखोल विचार केला आहे हे अगदी सहज लक्षात येऊ शकते. आरोग्य टिकविण्यासाठी पर्यावरण शुद्ध ठेवायला हवे याकडेही आयुर्वेदाने लक्ष दिलेले आहे. मुळात आयुर्वेद हे सर्वांगीण, संपूर्ण आरोग्यशास्त्र आहे, त्यामुळे त्यात फक्‍त मनुष्याच्या आरोग्याची काळजी घेतलेली नाही तर प्राणी, वृक्ष निरोगी राहावेत, पाणी, जमीन, हवा शुद्ध राहावी यासाठीही अनेक उपाय सुचवले आहेत, ज्यांचा आजही उत्तम परिणाम होताना दिसतो. हत्ती, घोडे वगैरे प्राण्यांसाठी आयुर्वेदाच्या विशेष संहिता आजही उपलब्ध आहेत. वृक्षार्युर्वेदातल्या उपायांचा आजही उत्तम उपयोग होताना दिसतो. 

हवा शुद्ध होण्यासाठी प्राचीन काळी भैषज्ययज्ञ केले जात असत. यामुळे ऋतुबदल होताना पर्यावरणात उत्पन्न होऊ शकणाऱ्या वैषम्याचे निराकरण होत असे, पर्यायाने ऋतुबदलामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होत असे.
हवा शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदाने घरोघरी धूप करण्यास सुचविले आहे.

गुग्गुळ, धूप, चंदन, कडुनिंब, कापूर, वगैरे जंतुनाशक व सुगंधी द्रव्यांची किंवा तयार ‘संतुलन प्युरिफायर धुपा’ची धुरी विविध दृश्‍यादृश्‍य जंतूंचा नाश करण्यास समर्थ असते. 

हवेतील विषद्रव्यांचा नायनाट करण्याचे उपायही आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, 
देवदारुनतानन्तामधुकाञ्जनगैरिकम्‌ । 
वज्रकन्दं लतां लोध्रं विकिरेत्‌ श्‍लष्णचूर्णितम्‌ ।।
वृक्षाग्रेषु पताकासु दूष्येषु सुमहत्सु च । 
सर्वतश्‍चूर्ण सम्पर्कात्‌ निर्विषो जातेऽनिलः ।।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
देवदार, तगर, अनंत, ज्येष्ठमध, अंजन, गैरिक, दूर्वा, लोध्र वगैरे द्रव्यांचे सूक्ष्म चूर्ण बनवून वृक्षांच्या शेंड्यांवर, पताकांवर, झेंड्यांवर वगैरे शिंपडावे किंवा पाण्यात कालवून पताका, झेंड्यांवर लेप लावावा. यामुळे हवेचा चहू बाजूंनी या द्रव्यांशी संपर्क आल्यामुळे हवा शुद्ध होते. 
विषद्रव्यांमुळे जमिनीमध्ये दोष निर्माण झाला असता विशिष्ट द्रव्यांचा जमिनीवर शिडकावा करावयास सांगितले आहे, 
मूत्राण्यजो विहास्तिभ्यो मांसानि रुधिराणि च । 
सर्वगन्धैः समायोज्य पचेत्पक्वे च निक्षिपेत्‌ ।। 
सोमराजीं सुनन्दाख्यां सरलां गन्धनाकुलीम्‌ । 
चारटीं त्रायमाणां च प्रोक्षयेत्तेन तां भुवम्‌ ।।
..अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
बकरी, लांडगा, हत्ती वगैरे प्राण्यांचे मूत्र, मांस, रक्‍त यांच्यासह वेलची, जटामांसी, दालचिनी, तमालपत्र, नागकेशर, गुग्गुळ, वाळा, केशर, देवदार वगैरे द्रव्ये शिजवावीत. मग यावर बावची, रास्ना, निशोत्तर, सर्पाक्षी, त्रायमाणा वगैरे द्रव्यांचें चूर्ण घालावे व हे मिश्रण जमिनीवर शिंपडावे.

वृक्षायुर्वेदात वृक्षाच्या रक्षणाकरता वावडिंगाचे चूर्ण, तीळ वाटून तयार केलेला गोळा, दूध व पाणी यांचे मिश्रण वृक्षावर शिंपडण्यास सांगितले आहे. याच द्रव्यांची धुरी देण्यास सांगितले आहे. विशिष्ट झाडांना विशिष्ट द्रव्यांची खते देण्यास सांगितली आहेत, एवढेच नाही तर वृक्षांना वात-पित्त-कफामुळे कोणते रोग होतात, कोणती लक्षणे दिसू लागतात व त्यांचे निराकरण कसे करावे हेही सविस्तर समजावलेले आहे.

अशा प्रकारे पर्यावरण आणि आरोग्य या परस्परांना पूरक गोष्टी आहेत. पर्यावरणाची काळजी घेतली तरच आरोग्य नीट राहील आणि आरोग्य नीट राहण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना करण्यानेच पर्यावरण स्वस्थ राहील हे लक्षात आले तर २१व्या शतकातही ‘आयुर्वेद’ हेच आरोग्यशास्त्र आहे हे सुद्धा समजू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com