पर्यावरण रक्षणासाठी..!

Environment
Environment

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. वृक्षांची लागवड व जोपासना करणे ही सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍यक आहे. आज सगळ्यांचे लक्ष पर्यावरणाकडे तर लागलेले आहे. जनपदोध्वंस झाला म्हणजे पर्यावरणाचे संतुलन बिघडले, वातावरणात विषारी द्रव्ये पसरली तर मनुष्याला काय काय भोगावे लागेल हे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे.

‘झाडे वाढवा, पर्यावरण वाचवा’ अशा प्रकारचे फलक दिसू लागेपर्यंत, तसेच अधिक वृक्ष लावा, वृक्षतोड करू नका, वाहनांचा, विशेषतः मोटरगाड्यांचा सामुदायिकरीत्या वापर करा म्हणजे धुराचे प्रमाण कमी होईल हे सर्व उपाय करणे आवश्‍यकता आहे हे लक्षात येऊन तशी उपाययोजना आखेपर्यंत बिघडलेल्या पर्यावरणामुळे मानवाचे जगणे अवघड होऊन बसल्याचे लक्षात आले. समुद्राच्या पाण्यात प्लॅस्टिकचे कण आढळू लागले. पिण्याच्या पाण्यात कारखान्यांतून सोडलेले पाणी, सांडपाणी, विषारी द्रव्ये जाऊ नये यासाठी व्यवस्था करणे आवश्‍यक आहे हे लक्षात येऊन तशी व्यवस्था करण्यापूर्वी सर्व पाणी दूषित होऊन बसले. नुसते पाणी दूषित झाले असे नाही, तर पृथ्वीवरचे प्यायचे पाणी कमी होऊन गेले. सर्व ठिकाणी प्यायच्या पाण्याची ओरड सुरू झाली. २-४ मैलांची पायपीट करून कुठूनतरी दोन हंडे पाणी मिळाले तर त्यात धन्यता मानण्याची वेळ आली, हे मिळालेले पाणी शुद्ध व त्यात कुठलेही विषारी द्रव्य मिसळलेले नसेल याची खात्री राहिली नाही.

स्वर्गातून येणारी गंगानदी पृथ्वीला स्पर्श करेपर्यंत शुद्ध पाणी धारण करत होती परंतु पुढे गंगेच्या पाण्याचा रंग बदलला, गंगा शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याची वेळ आली. गंगेच्या किनाऱ्यावर अनेक शहरांचा व कारखान्यांचा विस्तार झाला, त्यातून येणारे सर्व पाप म्हणजे त्यातून येणारी घाण गंगेलाच पोटात घ्यावी लागली. केवळ गंगेचीच नव्हे तर अनेक नद्यांची हीच तऱ्हा झाली. नदीच्या पात्रात बेसुमार प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीला अडथळा उत्पन्न होऊ लागला. कुठलेही नियमन न ठेवता नदीच्या काठी मनुष्यवस्त्यांचे आक्रमण झाले. यातून लहान लहान नद्या, नाले यांचीही सुटका झाली नाही. 

पाण्याच्या पाठोपाठ अन्नासंबंधीही ओरड सुरू झाली. हे खा, ते खाऊ नका असे सांगण्यात येऊ लागले. सूर्यफूल, सोयाबीन वगैरे गोष्टी ज्या देशांत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते त्या देशांकडून या गोष्टी खाण्याने आरोग्य मिळेल असा प्रवाद पसरविण्यात आला. जमीन प्रदूषित, पाणी प्रदूषित, हवा प्रदूषित झाली. पिकावर पडणारी कीड, पिकावर येणारा रोग आटोक्‍यात आणण्यासाठी अमर्यादित प्रमाणात पिकांवर विषारी औषधांच्या फवारण्या करण्यात येऊ लागल्या. यातून पुढे भीक नको कुत्रा आवर अशी परिस्थिती निर्माण झाली. दुधाबद्दल तर काही बोलायची सोयच नाही. 

वातावरणात कार्बन-डाय-ऑक्‍साइड, कार्बनमोनॉक्‍साइड वगैरेंचे प्रमाण वाढले. याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला, पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढले. पृथ्वीच्या वातावरणाचे संरक्षक कवच असलेल्या ओझोन लेअरला भोके पडायला सुरवात झाली. 

अजूनही व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर हे सर्व प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्‍यता आहे असा विचार मांडण्यात आला. याचा अर्थ पृथ्वीचा अंत जवळ आला आहे असे सांगणे किंवा लोकांना घाबरवणे असा नसून लहान-थोरापासून, गरीब-श्रीमंतापासून प्रत्येकाने पंचतत्त्वांपासून तयार झालेले आपल्या आजूबाजूचे विश्व व वातावरण यांची काळजी घेण्याची वेळ आलेली आहे असे सुचविण्याचा आहे.  

नुकतीच एक बातमी वाचनात आली ती अशी - शहराच्या भोवती, गावाच्या भोवती झाडाझुडपांचे संरक्षण कवच केले जाते. तेथे अनेक प्रकारच्या वनस्पती लावल्या जातात. गावाभोवती जाणारा गोलाकार रस्ता असावा अशाप्रकारे कमी जागेत वनस्पती लावल्या जातात. पृथ्वीला हिरवा शालू शोभून दिसतो या कल्पनेप्रमाणेच अशाप्रकारे आपल्या गावाला, शहराला हिरवा शालू नेसविण्यासारखेच आहे. मी तर म्हणेन का केवळ गावालाच का, तर प्रत्येक घराने, प्रत्येक सोसायटीने अशाप्रकारे लागवड केली तरी हरकत नाही. शिवाय आपापल्या परसदारी, इमारतींच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत झाडे लावायला हरकत नाही. झाडे लावल्यावर माळी नसला तर तेथे केवळ पिंपळ, उंबर ही मोजकी झाडे शिल्लक राहतात असे दिसते, तेव्हा सोसायटीत राहणाऱ्याला प्रत्येकाला काही दिवस झाडांची निगा राखण्याची जबाबदारी देऊन झाडांचे रक्षण करणे शक्‍य आहे. फुले तोडायला प्रत्येक जण उत्सुक असतो, पण झाडाचे संरक्षण, त्याची छाटणी करणे, झाडाला खतपाणी करणे हे करायला कोणी पुढे येत नाही असा अनुभव येतो. आपल्या परिसरात असलेला पालापाचोळा खतात परिवर्तित केला तर बाहेरून वेगळे खत आणण्याची गरज भासणार नाही. शिवाय झाडांना सेंद्रिय खते घातल्यामुळे वनस्पतींवरून येणारी हवा आरोग्याला लाभदायक ठरेल.

अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. पण वृक्षांची लागवड व जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. जातीधर्म, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍यक आहे. 

आज सगळ्यांचे लक्ष पर्यावरणाकडे तर लागलेले आहे. जनपदोध्वंस झाला म्हणजे पर्यावरणाचे संतुलन बिघडले, वातावरणात विषारी द्रव्ये पसरली तर मनुष्याला काय काय भोगावे लागेल हे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे. हे सर्व पूर्वी सांगून ठेवलेले असले तरी त्या वेळी सांगितलेली लक्षणे आज जशीच्या तशी दिसू लागली आहेत असे दिसते. भारतीय ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वृक्ष-वल्ली, नद्या, पर्वत वगैरेंना देवत्व दिलेले दिसते व यासाठी त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोचू नये, पर्यावरणाचे रक्षण करावे असे सुचवले आहे. यातूनच पर्जन्य, नद्या, वृक्ष, पर्वत यांची पूजा, वसंतोत्सवाचे आगमन गुढ्या-तोरणे उभारून करणे वगैरे प्रथा-उत्सव यांचा उगम झालेला आहे. 

होळीच्या दिवशी एरंडासारख्या एखाद्या झाडाची एखादी फांदी जाळल्याने, शेते भाजताना आजूबाजूच्या झाडाच्या काही फांद्या कापण्याने पर्यावरणाचा नाश होतो, अशी ओरड करण्याची आवश्‍यकता नाही. प्रत्येक होळीत अंगठ्याएवढ्या जाडीची दोन फूट लांबीची फांदी जाळण्याने पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे वाटत नाही.

अनेक मंडळी सकाळी शहराच्या बाहेर, खेडेगावाच्या आजूबाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत, डोंगरावर जातात, तेथे वाढलेली वनसंपदा तोडतात, संध्याकाळी लाकडांची मोठी मोळी डोक्‍यावर घेऊन परत येतात. नंतर लाकूड विकतात किंवा त्यावर आपल्या घरची चूल पेटवतात. असे करण्याने वृक्षांची तोड तर होतेच, परंतु अनवधानाने औषधी वनस्पतींचीही तोड होते. याला कोठेतरी धरबंद बसणे आवश्‍यक आहे. याबद्दलचे शिक्षण संबंधितांना देणे आवश्‍यक आहे. चंदनाचे झाड वगैरे कोठे आहे अशी माहिती या मंडळींकडून शे-दोनशे रुपये देऊन घेतली जाते व तीही झाडे तोडली जातात. 

सुट्ट्यांच्या दिवसात किंवा शनिवार-रविवार गावाबाहेर जाणे, नदीकाठी बसणे, डोंगरावर जाणे यासाठी सहली आयोजित केल्या जातात. अशा वेळी पर्यावरणाचा नाश होईल, एखाद्या झाडाला इजा होईल असे वागू नये. पाणी पिऊन झाल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या इकडे-तिकडे न फेकणे वगैरे गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 

पूर्वीच्या माणसाची ताकद अधिक होती तसेच पूर्वीच्या वनस्पतींची ताकदही अधिक होती. पर्यावरणातील बदलांमुळे हलके हलके  वनस्पतींमधील औषधी गुण कमी झाला, त्यांचे वीर्य कमी झाले, त्यांचा कस कमी झाला.

पर्यावरणाचे महत्त्व समजून घेऊन त्याचा ऱ्हास होणार नाही अशी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. पर्यावरणतज्ज्ञ मंडळी यासाठी खूप प्रयत्न करत असतात, प्रचार करत असतात. यातून काही निष्पन्न होत नसले तर कायदा करायला लागेल काय याचा विचार करण्यासारखी परिस्थिती आज आलेली दिसते. आयुर्वेदाच्या दृष्टीने शरीर आरोग्यवान ठेवायचे असले, तन-मन संतुलित ठेवायचे असेल तर हे सगळे वनस्पतींशिवाय शक्‍य होणार नाही हे लक्षात घेऊन पर्यावरणाची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com