#FamilyDoctor घोरण्याचा घोर, परिणाम  प्रजनन क्षमतेवर

डॉ. इशिता लुकंड
Thursday, 13 September 2018

अपुरी झोप व अयोग्य आहार याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. हा दुष्परिणाम टाळणे केवळ आपल्याच हाती असते.

योग्य वेळी आणि पुरेशा कालावधीसाठी झोपण्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. पुरेशी झोप घेतल्याने शारीरिक आरोग्यात सुधारणा तर होतेच, पण पुरेशी झोप लैंगिक आरोग्यावरही प्रभाव टाकते. जे पुरुष खूप कमी किंवा खूप जास्त झोपतात त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झालेला दिसतो. सहा ते आठ तासांचा कालावधी विश्रांतीसाठी पुरेसा आहे. पण जर प्रत्येक रात्री हा कालावधी सहा तासांपेक्षा कमी किंवा नऊ तासांपेक्षा जास्त असेल तर पुरूषाची प्रजनन क्षमता कमजोर होते. जर कोणताही पुरुष एका महिन्यात प्रत्येक रात्री सहा तासांपेक्षा कमी किंवा नऊ तासांपेक्षा जास्त झोपत असेल तर त्या महिन्यात त्याची प्रजनन क्षमता बेचाळीस टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकते, असे प्रयोग सांगतात.

घोरणे हे याचे प्राथमिक लक्षण आहे. जर व्यक्तीच्या झोपेत अडथळा येत असेल तर ती व्यक्ती तुलनेने कमी झोपते. गाढ झोपत असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत झोपेत व्यत्यय येत असलेल्या व्यक्तीमधील शुक्राणूंची संख्या तीस टक्के कमी होते. पुरुषांच्या वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांची वाढ करणारे संप्रेरक प्रजननासाठी महत्त्वाचे असते. पुरुषांमध्ये दररोज पुरुष संप्रेरक (टेस्टोस्टेरॉन) बाहेर सोडलें जातें, त्यापैकी अधिकतर संप्रेरक झोपेत सोडले जाते. म्हणजेच शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे हे प्रमाण झोपण्याच्या कालावधीशी सरळपणे जोडले गेले आहे. जे पुरूष  सहा तासांपेक्षा कमी झोपतात आणि त्यांची झोपसुद्धा गाढ होत नसेल, त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्यादेखील कमी असते. तसेच शुक्राणूंच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. 

घोरण्याची समस्या स्त्रियांच्या तुलनेत दुपटीने पुरुषांवर जास्त परिणाम करते. व्यक्ती घोरत असते तेव्हा मऊ ऊती आपल्या नाक-घशात कंपन पावते. वजन जास्त असणे, दारू जास्त पिणे, धूम्रपान आणि ॲलर्जी यामुळे हे प्रमाण अधिक असू शकते. एखाद्याचा श्वास एका वेळी दहा सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी थांबतो. असे एकाच रात्रीत अनेक वेळा घडते. कालांतराने हे हृदय विकार आणि झटक्‍याचे कारणही बनू शकते. अपुऱ्या झोपेमुळे वंध्यत्व आलेल्या जोडप्यांमधील वीस टक्के पुरूष असतात. या रुग्णातील पाच टक्के रुग्णांमध्ये अपुऱ्या झोपेमुळे शुक्राणूंची संख्या कमी झालेली आढळते. एक टक्का पुरुष ॲझोस्पेरमियाग्रस्त असतात. ॲझोस्पेरमिया म्हणजे स्खलन शुक्राणूंची संख्या कमी असणे. कोणत्याही पुरुषाने तीन आठवड्यांहून जास्त काळ परिपूर्ण झोप घेतलेली नसेल तर त्याच्या शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम झालेला दिसतो. तसेच शुक्राणूंचा आकार विकृत झालेला आणि त्यांची वेगाने पुढे जाण्याची, बीज फलीत करण्याची क्षमता कमी झालेली आढळते. जर आपले झोपेचे वेळापत्रक गडबडले, आपली जीवनशैली बिघडली तर लैंगिक संबंधांमध्ये स्वारस्य राहत नाही.

प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी -
पुरेशी झोप घ्या 
घोरण्यावर वेळीच इलाज करा
कोलेस्टेरॉल वाढवणारे मांसाहारी व जंक फूड टाळा. 
ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या खा
प्रसन्न राहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eshita lunkad article