अतिरेक आरोग्य मार्गदर्शनाचा 

Excessive Health Guidance
Excessive Health Guidance

भरपूर प्रमाणात, पौष्टिक चारी ठाव खायचे व व्यायाम करायचा नाही, चालायचे नाही किंवा कोणतीही अंगमेहनत करायची नाही अशी जीवनशैली असणे चुकीचे ठरते व त्यामुळे आरोग्य बिघडते. ज्या प्रकारचे शारीरिक काम करायचे आहे त्या प्रकारच्या शक्‍तीची पूर्ती करणारा असावा, असे आयुर्वेदात तसेच आपल्या संस्कृतीत मार्गदर्शन केलेले आढळते. स्वतःची प्रकृती व वात-पित्त-कफ दोष, आपल्या शरीरातील धातू, आपल्या कुटुंबातील संस्कृतीत कुठले पदार्थ खाण्याची पद्धत होती असा सर्वंकष विचार करून रोजची आहारयोजना ठरविली तर चांगले. 


सध्या व्हॉट्‌सऍप, फेसबुक, यू ट्यूब वगैरे सोशल मिडियांद्वारा आरोग्यासंबंधी प्रचंड माहिती प्रकाशित होत असते. अमुक भाजी खाल्ली की, आरोग्याच्याबाबतीत काही विचार करण्याचे कारण नाही, ती व्यक्‍ती शतायुषी होणार; प्रत्येकाच्याच शरीरात जणू काही `डी व्हिटॅमिन’ कमी झालेले आहे, त्यामुळे हे खा-ते टाळा, अमुक करा- तमुक करू नका असे सल्ले सोशल मिडियावर दिलेले दिसतात. व्यायाम करावा इथपर्यंत सल्ला देणे ठीक असते, परंतु सकाळी दीड तास प्रत्येकाने चालावे, प्रत्येकाने जिममध्ये जावे अशा सरसकट सल्ल्यांचा काही उपयोग नसतो. सकाळी उठल्यावर रोज लिटरभर पाणी पिण्याचा कोणी सल्ला देतात. कोणी म्हणते, फार पाणी पिऊ नका. अशा विविध सल्ल्यांची खैरात सोशल मिडियावर झालेली दिसते. 

‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये अनेक प्रश्न विचारले जातात, तसेच प्रत्येक वैद्यालाही अनेक प्रश्न विचारले जातात. व्हॉट्‌सऍपवरही प्रश्न विचारून उत्तर द्या अशा सूचनाही येतात. 

पाणी कितीही शुद्ध असले तरी ते उकळूनच प्यावे, हा सरसकट सर्वांना लागू होणारा सल्ला आहे. झाडाला पाणी घातल्यावर जशी टवटवी येते, तशी टवटवी उकळलेले पाणी पिण्याने शरीराला व मनाला येते. थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात किंवा एरवीही, किमान जेवताना गरम पाणी प्यावे, इथपर्यंत बरोबर आहे. परंतु उठसूट प्रत्येकाने पाणी पिताना ते फुंकर घालून प्यावे लागेल इतके गरम असावे असे सांगणेही बरोबर नाही. व्यक्‍तीच्या वात-पित्त-कफाच्या प्रकृतीनुसार, ऋतुनुसार ही गोष्ट ठरवावी लागेल. गार पाणी प्यायचे असल्यास ते माठात गार केलेले असावे. आयुर्वेदानुसार जेवणाच्या पूर्वी आचमनभर म्हणजे घोटभर पाणी घ्यावे. जेवणाच्या मधे-मधे थोडे पाणी प्यावे. म्हणजे भात खाल्ल्यावर थोडे पाणी प्यावे, नंतर आपल्याला हव्या असतील त्या एक-दोन पोळ्या खाल्ल्यावर थोडे पाणी प्यावे. जेवणाच्या शेवटी थोडे पाणी प्यावे. जेवण संपवून उठताना शेवटी पुन्हा एकदा आचमन घ्यावे. असे केल्याने अन्न नीट पचते.

जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यायले तर जेवण नीट जात नाही. जेवणानंतर पाणी पिल्यास अन्नापासून आहाररस पर्यायाने पुढचे निर्माण होण्यात अडथळा येतो. दिवसभरात थोडे थोडे पाणी पिणे आवश्‍यक असते. कंठ नेहमी ओला राहिला पाहिजे. नुकतीच कोरोनाची साथ आली असता असे मार्गदर्शन केले होते की, कंठ नेहमी ओला राहणे आवश्‍यक असते, त्यासाठी अधून मधून थोडे थोडे पाणी प्यावे. तसेही जीभ नेहमी ओली असावी. तोंडाला कोरड पडणे हे शरीराची शक्‍ती कमी होत चालल्याचे एक लक्षण असते. 

सध्या आरोग्याच्या नावाखाली सोशल मिडियामधून जाहिरातींसाठी तयार केलेल्या सूचना दिल्या जातात. उदा. मी अमुक तेल वापरतो त्यामुळे मला हृदयविकाराचा त्रास नाही, अशी जाहिरात आपण पाहतो. तेल हृदयविकारावरील औषध आहे का? कुठलेही तेल मुळात चिकटपणा करते, त्यामुळे तेलाची शुद्धी होण्यासाठी फोडणी करण्याची पद्धत आहे. शेंगदाणा तेल किंवा खूप थंडीच्या दिवसात तिळाचे तेल सर्वोत्तम होय. परंतु वेगवेगळ्या देशांतून आयात केलेली वेगवेगळी तेले विकता यावीत म्हणून त्याचे मुद्दाम अतिशयोक्‍तीपूर्ण फायदे सांगितलेले असतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

अनेक वैद्यांकडे त्यांच्या गुरुंनी लिहिलेली हस्तलिखिते असतात, त्यात असे काही उपचार लिहिलेले असतात जे सहजासहजी आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतीलच असे नसते. काही सोपे उपाय त्यांनी अनुभवातून तयार केलेले असावेत. परंतु नुसती अशी हस्तलिखिते वाचून एखाद्या नवशिक्‍याने रुग्णावर उपचार करण्याआधी खूप काळजी घेण्याची आवश्‍यकता असते. त्याऐवजी प्रचारमाध्यमांतून असे उपचार सुचवणे म्हणजे दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखे आहे. 

एखाद्या डाळीत प्रथिने कमी असतात तर एखाद्या डाळीत जास्ती असतात. पूर्वी मुलांना रात्रभर भिजवलेले चणे वा चण्याची डाळ खायला देत असत. पण म्हणून रोज मूठभर चणे वा चण्याची डाळ खाल्ली तर फायद्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्‍यता अधिक असते. 
ज्या प्रमाणात शारीरिक काम केले जाते त्याप्रमाणात आहार असावा. मेहनतीची कामे करणाऱ्यांचा आहार जास्त असावा, ज्या प्रकारचे शारीरिक काम करायचे आहे त्या प्रकारच्या शक्‍तीची पूर्ती करणारा असावा, असे आयुर्वेदात तसेच आपल्या संस्कृतीत मार्गदर्शन केलेले आढळते. भरपूर प्रमाणात, पौष्टिक चारी ठाव खायचे व व्यायाम करायचा नाही, चालायचे नाही किंवा कोणतीही अंगमेहनत करायची नाही अशी जीवनशैली असणे चुकीचे ठरते व त्यामुळे आरोग्य बिघडते. अमुक एक भाजी मुळीच न खाणे किंवा अति प्रमाणात खाणे हेही चुकीचे ठरते. फळांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. सध्या बाजारात खूप मोठ्या आकाराचे हायब्रीड पेरू उपलब्ध असतात. असे पेरू खाताना पेरू खातो आहे असे वाटत नाही. अशा पेरूचा काय उपयोग होत असेल? उपयोग नाही म्हणजे नुकसान होण्याचीच शक्‍यता अधिक असते. सध्या सर्व जगातील फळे आयात होऊन बाजारात उपलब्ध असतात. फळे कुठल्या ऋतूत कोणी खावीत याचे मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले असते. 

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील ‘आयुर्वेद उवाच’ या लेखमालेत खाद्यवस्तूचे आयुर्वेदात सांगितलेले गुण, ती वस्तू शरीरात कुठल्या दोष वा धातूवर काय काम करते हे सांगितलेले आहे. स्वतःची प्रकृती ओळखणे कसे महत्त्वाचे आहे हेही ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये अनेक वेळा सुचवलेले असते. परंतु प्रत्येकाने वैद्यांकडे जाऊन किंवा आयुर्वेदात सांगितलेले नीट वाचून, समजून आपली प्रकृती समजून घेतली आहे का? 
आपली प्रकृती माहीत नसताना या सर्व प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या उपचार स्वतःवर केले तर मोठे नुकसान होऊ शकते. मला हा रोग का झाला असा प्रश्न बरेच माणसाला पडू शकतो. पण तसा रोग होण्यासाठी दहा-पंधरा वर्षांपासूनच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात हा विचार केला जात नाही. ‘पहिला प्याला’ विनाशाचे कारण का ठरतो, तर त्यातून दुसरा, तिसऱ्या बाटलीला आमंत्रण करतो. सिगारेटचेही तसेच आहे, एक दिवस धूम्रपान केल्यास फुप्फुसे भरत नाहीत, पण नंतर सवय लागू शकते. म्हणून कुठलीही गोष्ट करताना स्वतःची प्रकृती व वात-पित्त-कफ दोष, आपल्या शरीरातील धातू, आपल्या कुटुंबातील संस्कृतीत कुठले पदार्थ खाण्याची पद्धत होती असा सर्वंकष विचार करून रोजची आहारयोजना ठरविली तर चांगले. 

पाण्यावर व अन्नावर वातावरणाचे व विचारांचे परिणाम होतात हे आता विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. तरीही रस्त्यावर उभे राहून उघड्यावर खायचे असले तर सकाळी उठून जिममध्ये जाण्यात काय अर्थ आहे? आधुनिकता म्हणजे स्वतः निसर्गनियमांना सोडून वागणे आणि दुसऱ्यांना त्रास झाला तरी मी मला वाटेल तसेच वागणार असा अट्टहास चालू ठेवणे हे वाईट. 

एकूण सारांशरूपाने सांगायचे तर, आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्‍टरकडे, वैद्यांकडे जाऊन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीचा शहानिशा करून घ्यावा. जाहिरातीतील पदार्थ आपल्या प्रकृतीला आवश्‍यक आहे का, उपयोगी ठरणारा आहे का याची माहिती करून घेऊन नंतर चविष्ट व चमचमीत पदार्थ खाल्ले तरी हरकत नसते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com