#FamilyDoctor बैठका काढायच्या ?

डॉ. मितेन शेठ
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

बैठका काढणे हा आपल्या परंपरेतील उत्तम व्यायाम म्हणून परिचित आहे. पण सगळ्यांनाच बैठका काढणे योग्य नसते. बैठकांचा व्यायाम काहींना तरी टाळावाच लागेल.

बैठका काढणे हा आपल्या परंपरेतील उत्तम व्यायाम म्हणून परिचित आहे. पण सगळ्यांनाच बैठका काढणे योग्य नसते. बैठकांचा व्यायाम काहींना तरी टाळावाच लागेल.

‘बैठका’ हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आपण टाळावा का? 
बैठका काढणे ही शरीराची एक अत्यंत मूलभूत हालचाल असते. या व्यायाम प्रकाराला व्यायामाचा राजा असेही म्हटले जाते, कारण शारीरिक ताकदीची आवश्‍यकता असलेल्या प्रत्येक खेळात या व्यायाम प्रकाराचा वारसा चालत आलेला आहे. शरीरसौष्ठवापासून ते कुस्तीपर्यंत दैनंदिन व्यायामात बैठका हा एक महत्त्वाचा व्यायाम असतो. यात शरीराचे कंबरेपासून खालचे अवयव आणि शरीराच्या मध्यवर्ती भागातील स्नायू समाविष्ट असतात. त्यामुळे ही अत्यंत कार्यक्षम अशी हालचाल असते.

असे असले तरी बैठकांमध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी सराव आणि वेळ दोन्हीची आवश्‍यकता असते. ही काही सहजसाध्य गोष्ट नाही. त्यात अनेक तांत्रिक बाबी लक्षात घ्यावा लागतात, शरीराच्या हालचालीची ढब बदलावी लागते, अनेक बारीसारीक तपशीलांचा विचार करावा लागतो. पण, बैठका काढणे न जमणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल तर काय? बैठका काढताना किंवा बैठका काढल्यानंतर तुमच्या गुडघ्याच्या भोवती वेदना होत असतील तर काय? यातील सत्य हे की तुमच्या आवडत्या व्यायामप्रकारच्या बाबतीत तुम्ही अधिक विचार केला पाहिजे आणि तुम्ही तो व्यायाम किती वेळ करता हेही लक्षात घेतले पाहिजे. पण तुम्ही या आधी कधी जिममध्ये गेलाच नसाल किंवा पहिल्यांदाच जिममध्ये जाणार असाल तर काय? बैठका पूर्णपणे टाळणे, हाच त्यावरील उपाय आहे का?

बैठका हा एक संयुक्त, पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. बैठकांमध्ये विविध प्रकारच्या हालचाली, तीव्रता, वजन, पुनरावृत्ती, सेट्‌स आणि बैठकांचे प्रकार (स्मिथ मशीन किंवा बारबेल) यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात उर्जा खर्च होते. बैठका आणि वजन किंवा अडथळे यामुळे गुडघ्यांच्या सांध्यांवर दाब येतो. त्याचप्रमाणे बैठकांमुळे पाठीच्या कण्याचा कटीभाग आणि गुडघ्यांचे आजार उद्भवू शकतात, असे अनेक आढळून आले आहे. त्याचप्रमाणे गुडघ्यांचा ऑस्टिओआर्थरायटिस (जीर्ण) होण्यासाठी बैठकांचा व्यायाम कारणीभूत असतो, अशा प्रकारची निरीक्षणे आढळून आली आहेत.

आपल्यापैकी काही जणांना शारीरिकदृष्ट्याच बैठकांचा व्यायाम साजेसा नसतो आणि पुढील कारणांसाठी हा व्यायामप्रकार टाळणे आवश्‍यक होऊन बसते:

मांडीच्या मागील बाजूस ग्लुट्‌स आणि हॅमस्ट्रिंग्स हे स्नायू असतात. या दोन स्नायूंकडे काहीसे दुर्लक्ष होते आणि विशेषत: ज्या व्यक्ती दिवसभर बसून असतात, कारमध्ये बसून ऑफिसला जातात किंवा ज्यांची बैठी जीवनशैली असते त्या व्यक्तींचे हे स्नायू कालांतराने हे कमकुवत होतात. तुमचे हॅमस्ट्रिंगचे स्नायू आणि ग्लुट्‌स कमकुवत असताना तुम्ही बैठका मारण्याचा प्रयत्न केला तर शरीर पाठीच्या खालच्या भागातील स्नायू अधिक वापरते. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात दुखणी निर्माण होऊ शकतात.

अनेकांना पोक काढून बसायची सवय असते. अशा व्यक्तींनी शारीरिक ढब न बदलताच बैठका मारण्यास सुरुवात केली तर त्यांच्या पाठीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. 

टीनएजर्स, विशेषत: स्थूल मुली किंवा ज्यांचे पाय सपाट आहे त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक बैठका काढल्यास गुडघ्याच्या पुढील भागात (गुडघ्याच्या वाटीभोवती) वेदना होऊ शकतात. ही सहनशक्तीची मर्यादा व्यक्तीसापेक्ष आहे आणि पौगंडावस्थेतील काहींमध्ये याचे प्रमाण नगण्य असू शकते. 
उच्च रक्तदाब असलेल्या किंवा स्ट्रोक येण्याची शक्‍यता असलेल्या व्यक्तींनी बैठका काढणे टाळावे कारण काही अहवालांनुसार हा व्यायामप्रकार करताना रक्तदाब अचानक वाढू शकतो.

मग, तुम्ही बैठका टाळाव्यात का? बहुतेक संशोधनांनुसार योग्य पद्धतीने बैठका काढणे हा सुरक्षित आणि परिणामकारक व्यायामप्रकार आहे. इतकी चांगली गोष्ट वाईटही असू शकते का? ’अति तेथे माती’ ही म्हण आपल्या सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे सुजाणपणा आणि नियमन ही गुरूकिल्ली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exercise Health