अनुपान

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 2 December 2016

रोगाची अवस्था, रोगाचे स्थान, दोषाचा प्रकार वगैरे गोष्टी ध्यानात घेऊन नेमका औषधमार्ग निवडला किंवा एकापेक्षा अधिक मार्गांनी औषध शरीरात प्रवेशित करवले, तर अधिक चांगला आणि लवकर गुण येऊ शकतो.

औषध शरीरात कोणकोणत्या मार्गांनी प्रवेशित होऊ शकते याची माहिती आपण घेतो आहोत. मागच्या वेळी मुखमार्ग, गुदमार्ग, मूत्रमार्ग, योनीमार्ग, प्राणमार्ग हे औषध प्रवेशासाठी कसे वापरले जातात हे पाहिले.

श्वासावाटे म्हणजे गंधाच्या माध्यमातून उपचार करता येतात. आयुर्वेदिक पद्धतीने करायचे धूमपान दोन प्रकारचे असते. नाकातून धूम आत घेऊन मुखाने बाहेर काढणे आणि मुखातून धूम आत घेऊन मुखाने बाहेर काढणे. या प्रकारच्या धूमपानामुळे मुख, नाक, जीभ, घसा, ज्ञानेंद्रियांची शुद्धी होते. धूमपानासाठी साधारणतः अगरू, गुग्गुळ, मुस्ता, राळ, कमळ, ज्येष्ठमध, घृत वगैरे द्रव्ये वापरली जातात.

घ्राणमार्ग - घ्राण म्हणजे नाक. नासा हि शिरसो द्वारम्‌ तेन तद्‌ व्याप्य हन्ति तान्‌ । म्हणजे नाक शिरोभागाचे दार असून, शिरोभागातील सर्व प्रकारच्या रोगांवर नस्य (नाकात औषध टाकणे) हा प्रभावी उपचार आहे. नाकात टाकलेले औषध फक्‍त डोक्‍यावरच नाही तर डोळे, नाक, कान, घसा या अवयवांवरही काम करते. डोक्‍यात किंवा या अवयवांत फार दोष साठले असले, तर ते बाहेर काढून टाकण्यासाठी विरेचन नस्य दिले जाते. दोष कमी प्रमाणात असले तर त्यांचे शमन होण्यासाठी शमन नस्य दिले जाते आणि मेंदू, डोळे, कान वगैरे अवयवांना, त्या ठिकाणच्या नसांना शक्‍ती द्यायची असेल, तर बृंहण नस्य दिले जाते.

"शिर' हे संपूर्ण शरीराचे मूळ असल्याने नस्याचा उपयोग संपूर्ण शरीरावरही होऊ शकतो. उदा. अर्धांगवायू, कंपवात वगैरे विकारांमध्ये नस्य अतिशय प्रभावी असते.
त्वचामार्ग - त्वचा हे सर्व धातूंना आच्छादणारे कवच आहे, तरीही ती सच्छिद्र असल्याने औषध शरीरात प्रवेशित होण्याचे उत्तम माध्यम आहे. अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे, लेप म्हणजे विशिष्ट औषधांचा त्वचेवर लेप करणे, परिषेक म्हणजे औषधांचा काढा करून त्याची धार शरीरावर धरणे, अवगाहन म्हणजे काढ्यात वगैरे पाय बुडवणे, टब बाथ घेणे, बसणे वगैरे सर्व उपचार त्वचेच्या मार्गामार्फत होत असतात. त्वचेमध्ये असणारे भ्राजक पित्त त्वचेच्या संपर्कात येणाऱ्या औषधाचे शोषण आणि पचन करून त्याचा उपयोग करून घेत असते. अभ्यंगामुळे त्वचेतील सूक्ष्म छिद्रांमध्ये राहणारा वातदोष नियंत्रणात राहतो, श्रमामुळे आलेला थकवा दूर होतो, दृष्टीला शक्‍ती मिळते, एकंदर शरीराचे पोषण होते.

लेप रोगानुसार वेगवेगळ्या द्रव्यांच्या मिश्रणापासून तयार केले जातात. उदा. सूज असल्यास पुनर्नवा, देवदारू, शेवग्याची पाने, सुंठ वगैरे द्रव्यांचा लेप केला जातो. एखाद्या ठिकाणी दाह व वेदना होत असली तर बेहड्याच्या बीमधली मज्जा लावण्याचा उपयोग होतो. वडाचे अंकुर, मसुराचे पीठ, चंदन वगैरेंचा लेप केल्यास कांती उजळते वगैरे. सांधे दुखत असले तर निर्गुडी, शेवगा, दशमूळ वगैरे वातशामक द्रव्यांचा काढा करून त्याची धार धरण्याचा उपयोग होतो. सर्व शरीरात वातदोष वाढलेला असला तर द्रोणी (टब)मध्ये असा काढा किंवा संस्कारित तेल भरून त्यात अवगाहन (बाथ) घेता येते.

कर्णमार्ग - कमी ऐकू येणे, कानात आवाज येणे, कानात खाज येणे वगैरे कर्णरोगांवर कानात औषध टाकण्याचा उपयोग होतो. कानात सहसा औषधी तेल किंवा वनस्पतींचे रस टाकता येतात. जंतुसंसर्गाची लक्षणे असली तर कानाला धूप देण्याचाही फायदा होतो. कान हे वातदोषाचे राहण्याचे ठिकाण असल्याने कानात तेल टाकण्याने एकंदर वातदोष संतुलित राहण्यासही मदत मिळते.

झोप लागत नसेल, फार स्वप्ने पडत असतील, तर कानात तेल टाकण्याचा उपयोग होतो.

नेत्रमार्ग - थेंब टाकणे, अंजन करणे, तर्पण करणे या प्रकारांनी डोळ्यांद्वारा औषध प्रवेशित करता येते. डोळ्यांत टाकलेल्या औषधाचा उपयोग डोळ्यांना तर होतोच; पण डोळ्यात टाकलेल्या औषधाचा प्रभाव डोके, नाक, मुखापर्यंत पोचू शकतो. अंजनाचा परिणाम तर संपूर्ण शरीरावर होत असतो. म्हणून विषमज्वर, बेशुद्धावस्था, उन्माद (चित्तभ्रम), अपस्मार (फिट येणे), सर्पदंश, विषबाधा वगैरे विकारांमध्ये अंजनाचा प्रयोग केला जातो.

अशा प्रकारे रोगाची अवस्था, रोगाचे स्थान, दोषाचा प्रकार वगैरे गोष्टी ध्यानात घेऊन नेमका औषधमार्ग निवडला किंवा एकापेक्षा अधिक मार्गांनी औषध शरीरात प्रवेशित करवले तर अधिक चांगला आणि लवकर गुण येऊ शकतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor