महिमा शक्‍तीचा

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 23 December 2016

मनुष्याच्या शरीरात असलेल्या शक्‍तीला, ऊर्जेला "प्राण' असे नाव दिले, तरी तो प्राण म्हणजे काय आहे हे मात्र अजून समजलेले नाही. सगळीच पंचमहाभूते ऊर्जेच्या साह्याने दृग्गोचर होतात व प्राणशक्‍ती निघून गेल्यानंतर विरून जातात. म्हणून प्राणशक्‍तीला प्रणव, ॐकार व परमेश्वराचे स्पंदन, परमेश्वराचा नाद अशी अनाकलनीय व अगम्य नावे देण्यात आली. या प्राणशक्‍तीवर मनुष्यमात्राचा कुठलाही प्रभाव चालत नसल्यामुळे एक गोष्ट निश्‍चित झाली, की हे शक्‍तीचे गूढ असे रूप आहे व ते अनुभवता येऊ असते; पण समजत नाही. मनुष्यमात्राला मिळणारी शक्‍ती जरी अन्न-पाण्यातून मिळत असली, तरी त्या अन्नातील शक्‍ती स्वीकारण्यासाठी परमेश्वरी शक्‍तीचा संपर्क व प्रभाव असण्याची नितांत आवश्‍यकता असते.

असे म्हणतात की डोळ्यांनी दिसत नाही तर डोळ्यांमागे असणाऱ्या डोळ्यामुळे आपल्याला दिसू शकते. एखादी वस्तू केवळ ती आहे म्हणून दिसत नाही, तर त्यावर प्रकाश पडून परिवर्तित झाला की ती वस्तू दिसू लागते. बदल व विस्तार हा जीवनाचा मुख्य गुण आहे व ह्या दोन्ही गोष्टी शक्‍तीशिवाय शक्‍य नसतात, त्यामुळे शक्‍ती नसली, ऊर्जा नसली तर जीवन संभवत नाही.

शक्‍तिउपासना ही भारतीयांची सर्वप्रथम पसंती आहे, तीच उपासनामार्गातील पहिली पायरी आहे व तेच अंतिम ध्येय आहे, असेही म्हणायला हरकत नाही.

ही शक्‍ती म्हणजे काय? दोन मिनिटांपूर्वी हसत खेळत उड्या मारणारी व्यक्‍ती प्राण निघून गेल्यानंतर दिसते आधीसारखीच, पण त्या शरीराला शरीर न म्हणता शव का म्हणायचे? या शिवामधील "इ तत्त्व' (एनर्जी तत्त्व) निघून गेल्यानंतर उरलेले ते शव. म्हणूनच हे "इ तत्त्व' काय आहे ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कायमच सुरू असलेला दिसतो. मनुष्याच्या शरीरात असलेल्या शक्‍तीला, ऊर्जेला "प्राण' असे नाव दिले तरी तो प्राण म्हणजे काय आहे हे मात्र अजून समजलेले नाही. तसेच एखादी वस्तू हलली वा चालली नाही म्हणजे तिच्यात प्राण नाही असे समजण्याचेही कारण नाही. झाडे एका जागी उभी असतात, पण त्यांच्यात प्राण असतो. एखादा मोठा दगड अगदी दगडासारखा पडून राहिलेला असला तरी त्यात प्राणशक्‍ती असतेच. म्हणूनच दगड उचलायचा वा हलवायचा असल्यास खूप मोठ्या प्राणशक्‍तीची आवश्‍यकता असल्याचे लक्षात येते. त्यातील प्राणशक्‍ती निघून गेली तर त्याचे बारीक बारीक अणू आकाशात विलीन होतात व ते अत्यंत सूक्ष्म होत होत प्राणतत्त्वात विलीन होऊन जातात. सगळीच पंचमहाभूते ऊर्जेच्या साह्याने दृग्गोचर होतात व प्राणशक्‍ती निघून गेल्यानंतर विरून जातात. म्हणून प्राणशक्‍तीला प्रणव, ॐकार व परमेश्वराचे स्पंदन, परमेश्वराचा नाद अशी अनाकलनीय व अगम्य नावे देण्यात आली. या प्राणशक्‍तीवर मनुष्यमात्राचा कुठलाही प्रभाव चालत नसल्यामुळे एक गोष्ट निश्‍चित झाली की हे शक्‍तीचे गूढ असे रूप आहे व ते अनुभवता येऊ असते पण समजत नाही.

मनुष्यमात्राला मिळणारी शक्‍ती जरी अन्न-पाण्यातून मिळत असली तरी त्या अन्नातील शक्‍ती स्वीकारण्यासाठी परमेश्वरी शक्‍तीचा संपर्क व प्रभाव असण्याची नितांत आवश्‍यकता असते. म्हणजे काय तर जडातील शक्‍ती सुटी करण्यासाठी त्याहून अधिक श्रेष्ठ असलेल्या शक्‍तीचे साह्य मिळणे आवश्‍यक असते.

देव किंवा परमेश्वर आहे का? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. त्याचे उत्तर "देव आहे व देव म्हणजे एक सर्वांहून श्रेष्ठ अशी अदृश्‍य शक्‍ती, जिच्यामुळे सृष्टीतील सर्व जीवनव्यापार चालतो.' मुळात अशी जर एखादी शक्‍ती अस्तित्वातच नसली तर जडाचे चैतन्यात व चैतन्याचे जडात रूपांतर होऊन सृष्टिचक्र चालू राहूच शकणार नाही. यासाठी पुरावा म्हणून एक साधे वैज्ञानिक सत्य समजावून घेण्यासारखे आहे. माणसाच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच अन्न-पाण्यातून शक्‍ती तयार होऊन मनुष्य आपले जीवनकार्य चालवू शकतो. शरीरात प्राण नसेल तर तोंडात टाकलेले अन्न-पाणी पचणार नाही, त्यातून शक्‍ती निर्माण होणार नाही. मनुष्याच्या शरीरात काही द्रव्ये, ज्यांना रसायने/ एन्झाइम्स /हॉर्मोन्स असे काहीही म्हणता येईल, ती मुळात शरीरातच असतात, ती मनुष्याने निर्माण केलेली नाहीत. अशी द्रव्ये शरीरात असल्यामुळे अन्नाचे पचन होऊन अन्नाचे शक्‍तीत रूपांतर होते. मुळात निसर्गात असलेल्या क्‍लोरोफिल नावाच्या द्रव्यामुळेच वृक्षवल्लीचे जीवन फुलू शकते व त्यामुळेच आपल्याला कंद, मुळे, फळे, धान्य मिळू शकते व त्यांचे सेवन केल्यानंतर शरीरात असलेल्या पाचक रसामुळे त्याचे पुढे सप्तधातूत व शक्‍तीत रूपांतर होते. तेव्हा आपल्याला असे दिसून येते की शक्‍तीचे उच्च शक्‍तीत परिवर्तन, संक्रमण वा उत्थान होत असताना प्रत्येक वेळा त्या शक्‍तीहून उच्च शक्‍तीची आवश्‍यकता लागते. फळांच्या रसांचे रक्‍तात रूपांतर होण्यासाठी शरीरातील रक्‍तसदृश मूळद्रव्यांची आवश्‍यकता असते.

शरीरात अन्नातील शक्‍तीचे रक्‍त-मासांदी धातूत रूपांतर झाल्यानंतर त्यात असणारे पंचप्राण कार्यरत होऊन शरीराचे पुढील घटक बनतात व त्या घटकांमार्फत प्रत्येक कृतीसाठी लागणारी शक्‍तीही पुरवितात. म्हणजे रक्‍तात असणारे घटक रक्‍तातून शक्‍ती पुरवितात किंवा प्रत्येक स्नायू, हाडात असणाऱ्या मूलपेशीत ही शक्‍ती साठवून प्रत्येक क्रियेसाठी उपलब्ध करून देतात.

एखादा मनुष्य व्यवस्थित खातो-पितो पण मेहनत करत नाही त्या वेळी ती शक्‍ती वापरली न गेल्यामुळे कालांतराने नष्ट होऊ शकते किंवा ज्या धातूत त्या शक्‍तीचा संग्रह झालेला असेल त्या धातूत विकृती निर्माण होऊ शकते. उदा. पचन पूर्ण झाले नाही तर मेदवृद्धी होऊन मनुष्याचे वजन वाढू शकते. मनुष्याला प्रत्येक क्रियेला विशिष्ट शक्‍तीची आवश्‍यकता असते. नुसते बसून राहण्यासाठीसुद्धा काही शक्‍ती लागतेच. शांत झोपेत अगदी कमी शक्‍ती खर्च होते, तर पळताना विशेषतः डोंगरावर पळत असताना अधिक शक्‍ती खर्च होते. त्याहीपेक्षा अधिक शक्‍ती मैथुनात खर्च होते म्हणून मैथुनाचे नियम पाळून स्वतःचे आत्मतेज/आत्मतत्त्व संग्रह करण्याचा ब्रह्मचर्य हा विषय सगळ्यात श्रेष्ठ समजला गेला आहे.

आपण अन्न नीट चावून चावून खाल्ले असता त्यात लाळ मिसळली जाते व तेथेच अन्नाचे पचन सुरू होते. अन्न पोटात आल्यावर त्यात आणखी काही रसायने मिसळली जातात म्हणजेच त्यावर यकृत, प्लीहा, पॅनक्रियाज्‌ यांच्यातून स्रवणाऱ्या रसायनांचे संस्कार होतात व अन्नाचे परिवर्तन होते. ही अन्नात मिसळली जाणारी द्रव्ये बाहेर कारखान्यात बनवता येत नाहीत, तर शरीरातच असावी लागतात. ह्या द्रव्यांमुळेच अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही तर रोगाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ज्या वेळी मनुष्याला मानसिक ताण असतो किंवा त्याच्या मनाविरुद्ध वर्तन घडलेले असते, तेव्हा शरीराची मूलभूत व्यवस्था बिघडते व असे झाल्यास होणारे रोग बरे करणे अवघड असते.

आपला असा समज असतो की, शक्‍ती फक्‍त हालचाल करण्यासाठी, उठण्या-बसण्यासाठी आवश्‍यक असते; पण आपल्या मनोमय देहातील मनालाही शक्‍तीची आवश्‍यकता असते. मन श्रद्धावान असले व ते सौंदर्य व सृजनता व चांगुलपणा पाहणारे असले तर त्याची शक्‍ती वाढती राहते. विकृत मन अधिक विकृतींना जन्म देते. म्हणून मन प्रसन्न ठेवण्याने मनःशक्‍ती वाढते व मनुष्याला सुख मिळू शकते.
शक्‍तीचा विचार करत असताना आलेले अनुभव जर आत्म्याशी साधर्म्य दाखविणारे म्हणजे आनंद व शांतीचा अनुभव देणारे असले तर ते आत्मतत्त्वाच्या ठिकाणी जमा होतात आणि त्या ठिकाणी असलेली शक्‍ती मनुष्याला परमानंदाचा अत्युच्च आनंदाचा लाभ देऊ शकते.

तिन्ही पातळ्यांवर शक्‍तीचे चक्र चालू राहण्यासाठी आवश्‍यक असतात आशीर्वाद, आवश्‍यक असते परमेश्वरी कृपा. परमेश्वरी शक्‍ती, जी आधीपासूनच निसर्गात अस्तित्वात होती व जिची मदत घेतल्याशिवाय शक्‍तीचे रूपांतर एका अवस्थेतून वरच्या प्रगत दुसऱ्या अवस्थेत होऊ शकत नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor