नऊ रसांचे जीवन

नऊ रसांचे जीवन

मुळात मनाचे रस आठ आणि त्यात आणखी एक आत्म्याचा भक्‍तिरस. सर्व रसांचा शृंगार रस हा राजा! पण "शृंगार' या शब्दाचा भाव इंग्रजीतील "मेकअप' या शब्दाच्या भावात येत नाही. नुसती पावडर लावणे, आय-ब्रो करणे म्हणजे शृंगार नाही तर शृंगार हा एक रस आहे. शरीराचे हावभाव, शरीरातील ऊर्जा प्रेममय होऊन सर्वांना व्याप्त करू इच्छिते व त्यातल्या त्यात एखाद्या आवडत्या व्यक्‍तीवर जास्त आकर्षित करते तो शृंगाररस. शृंगाररस व्यक्‍त होण्यासाठी शरीराची साथ तर हवीच. "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌' असे उगाच म्हटलेले नाही. जीवनाचे साफल्य नऊ रसांतच सापडते. चतुर्विध पुरुषार्थ किंवा चार प्रकारचे अन्न एवढ्यावर सर्व होणार नाही. शरीरामध्ये सर्व धातू व्यवस्थित असले आणि प्रत्येक क्षेत्रात वयोपरत्वे काही तरी कार्य सिद्ध केलेले असले, तरी भक्‍तिरसाशिवाय समर्पण नाही. भक्‍तिरसाच्या समर्पणासाठी, भक्‍तिरसाला चलितही करण्यासाठी लागतो शृंगाररस. हा व्यक्‍त होण्यासाठी शरीर हे माध्यम आवश्‍यक असते.


शरीर कसे रसरशीत पाहिजे. म्हणून जे शरीर अन्नापासूनच तयार होते व जे अन्नावरच अवलंबून आहे त्या शरीराचे पोषण करण्यासाठी आयुर्वेदाने मांडली षड्‍रसांची कल्पना. या सहा रसांमध्ये सर्वांत महत्त्वाचा असतो तो मधुररस. शृंगाररसात जशी गोडीगुलाबी महत्त्वाची तशीच आहार रसांमध्ये मधुररसाची गोडी महत्त्वाची. असे म्हणतात, ""अन्नाला मिठाशिवाय चव येत नाही. रंगमंचाशिवाय कला सादर करणे अवघड असते तसे तिखटमिठाच्या वस्तूशिवाय नंतरची गोडी व त्याचे महत्त्व कळत नाही. अतितिखट खाऊन जीभ भाजली, तर मधुररसाची आठवण होते आणि मधुर रसाच्या सेवनापूर्वी तिखट मिठाचे पदार्थ तोंडात टाकले असल्यास मधुररसाची गोडी चाखण्यात खरा आनंद मिळतो. अगदी श्रीखंड, जिलबीबरोबर सुद्धा आंबट-तिखट मठ्ठा दिलेला असतो तो यासाठीच.
सहा रसांचे रहस्य एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे समजते. त्यातल्या त्यात मुळीच टाळता न येण्यासारखा रस तो मधुररस. सध्या समाजात अनेकांनी नेमक्‍या मधुररसाचे सेवन करणे सोडलेले असते. या रसाच्या जोरावर येणारा शृंगार मात्र मानसिकदृष्ट्या सेवन करण्याचा प्रयत्न अधिकाधिक केला जातो. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे आजारपण उद्‌भवणे निश्‍चित असते. हलके हलके मधुररस पचविण्याची क्षमता कमी झाली की, मधुमेहासारख्या विकाराला सामोरे जायची पाळी येते. वीर्य हा शरीरातील रसांचा साररूप राजा. वीर्यावरच शरीराचे ओज व शक्‍ती अवलंबून असल्यामुळे वीर्यक्षय होऊन चालत नाही. वीर्य धातूकडे जास्त लक्ष देण्यासाठीच अनेकांनी मार्गदर्शन केलेले दिसते.


ब्रह्म हा मानवी शरीरातील मेंदू आणि संपूर्ण विश्वातील परमपुरुष परमात्मा. मेंदूचे कार्य केवळ रसात्मक असल्यामुळे मेंदूत मेंदूजल भरलेलेच असते. या मेंदूजलाला ताकद मिळण्यासाठी असते आवश्‍यकता वीर्याची.


अन्न सेवन करताना रससेवन खूप महत्त्वाचे. भारतीय भोजनात सुरुवातीला एक-दोन चमचे खीर किंवा दुधावरची मलई घातलेले सूप घेण्याची पद्धत आहे. भात मऊ असणे चांगले असते. भात आणखी रसदार करण्यासाठी त्यावर घेण्यात येते डाळ. पदार्थांतील रस शरीरातील रसाशी सात्म्य होण्यासाठी वरून पिळण्यात येते लिंबू आणि बाह्यजगतातील अमृतरस तूप. कोरडे अन्न कधी खाऊ नये. अन्न नेहमी रसात्मक असावे. आत ओलावा असला की पदार्थ अधिक रुचकर लागतो. जसे की लाडू मऊ असला की अधिक चवदार, अधिक गोड लागतो.


असे हे षड्‍रसांचे माहात्म्य. प्रत्येक रसाचा गुण वेगळा असतो, प्रत्येक रसाची शरीरात आवश्‍यकता वेगळी असते. कडू रसही शरीराला आवश्‍यक असतो. जीवनातही थोड्या कडवटपणाचा स्वीकार केला की बरे असते. असे झाले तर जीवनामध्ये एक प्रकारची आशा उत्पन्न होते, एक प्रकारची नवी ऊर्मी उत्पन्न होते आणि जीवनाचा, राहणीमानाचा विकास होतो.
असा हा जीवनसार असलेला "रस'!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com