मनाचे सामर्थ्य 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 3 February 2017

बहुसंख्य रोग जरी शरीराच्या पातळीवर दिसत असले तरी मनामुळे झालेले असतात. अर्थातच रोग बरा करायचा असला, तर त्याला मनाची साथ हवीच असते. नेमके निदान करण्यासाठी वैद्याला रुग्णाचे मन विचारात घेणे गरजेचे असते, तसेच मनाची धीरता रोगनिवारणासाठी महत्त्वाची असते. 

आरोग्य टिकवायचे असो किंवा रोग बरा करायचा असो, मनाची सकारात्मता, मनाची प्रसन्नता फार महत्त्वाची असते. मन सूक्ष्म असले तरी संपूर्ण शरीराला व्यापून असते, इंद्रियांच्या सर्व कार्यांचे साक्षीदार असते. शारीरिक रोग व मानसिक रोग असे रोगाचे दोन मुख्य प्रकार असतात. 

बहुसंख्य रोग जरी शरीराच्या पातळीवर दिसत असले, तरी मनामुळे झालेले असतात. अर्थातच रोग बरा करायचा असला, तर त्याला मनाची साथ हवीच असते. असाध्य रोगाची लक्षणे सांगताना आयुर्वेदाने मनाच्या दुर्बलतेचा समावेश केलेला आहे, 
औत्सुक्‍यारतिसंमोहकरमिन्द्रियनाशनम्‌ ।दुर्बलस्य सुसंवृद्धं व्याधिं सारिष्टमेव च ।।...चरक सूत्रस्थान 

जो रोगी अधीर होतो, मनाने बेचैन होतो, काय करावे काय करू नये हे ज्याला समजेनासे होते, ज्याच्या इंद्रियांची शक्‍ती नष्ट झालेली असते, जो शरीराने तसेच मनाने दुर्बल होतो, ज्याचा रोग मात्र बळावलेला असतो तो रोगी बरा होत नाही. 
मनाचा कणखरपणा म्हणजे धैर्य. "मनसो विपद्यप्यदैन्यम्‌ धैर्यम्‌' म्हणजे संकटाच्या काळातही मन न खचणे म्हणजे धैर्य. धैर्य समजते ते अविषण्णतेवरून. थोड्या कारणाने विषण्ण म्हणजे दुःखी होणारे मन धैर्यवान असू शकत नाही. तसे पाहता जीवन जगताना मनोधैर्य पदोपदी आवश्‍यक असतेच; पण आजारपणात त्याची आवश्‍यकता फारच मोठी असते. 

कणखरपणावरून मनाचे तीन प्रकार केलेले आहेत, प्रवरसत्त्वसार, मध्यसत्त्वसार व हीनसत्त्वसार. ज्याचे मन कधीही खचत नाही, जो कधीही विषण्ण होत नाही, ज्याची समज चांगली असते, ज्याची स्मरणशक्‍ती चांगली असते, जो कोणत्याही कामासाठी तत्पर असतो, जो काम मनापासून करतो, ज्याचे आचरण शुद्ध व पवित्र असते, ज्याला शारीरिक वा मानसिक वेदना झाल्या तरी जणू झाल्याच नाहीत, असा दिसतो तो मनुष्य प्रवरसत्त्वसार असतो. 

दुसरा मनुष्य वेदना सहन करतो आहे म्हणून आपणही सहन केल्या पाहिजेत, असे समजून मनाचे धैर्य एकवटतो तो मनुष्य मध्यसत्त्वसार असतो. दुसऱ्याने समजावले असता, धीर दिला असता त्यांची सहनशक्‍ती वाढते. 
हीनसारवान मनुष्याचे धैर्य खूपच कमी असते. दुसऱ्याकडे पाहून किंवा दुसऱ्याचे ऐकूनही तो धीर धरू शकत नाही. शरीर बलवान असले तरी थोड्याही वेदना सहन करू शकत नाही व तो अगदी हळव्या मनाचा असतो. 

रोगाचे निदान करतानाही मनाच्या या प्रवृत्तीचा विचार करणे भाग असते. कारण उत्तम धैर्य असणारा मनुष्य जेवढा त्रास होत असेल त्याच्या मानाने खूप कमी प्रमाणात तो वर्णन करतो, तर हीन धैर्य असणारा मनुष्य त्रास कमी असला तरी खूप अधिक प्रमाणात वर्णन करतो. अर्थातच नेमके निदान करण्यासाठी वैद्याला रुग्णाचे मन विचारात घेणे गरजेचे असते, मनाची ही धीरता नंतर रोगनिवारणासाठीही तेवढीच महत्त्वाची असते. 

उपचार यशस्वी होण्यासाठी आयुर्वेदाने चिकित्साचतुष्पाद सांगितले आहेत. यात वैद्य, औषध, परिचारक आणि रुग्ण यांचा समावेश केलेला आहे. हे चारही पाद कसे असावेत, काय गुणांनी युक्‍त असावेत हेही सांगितले आहेत. यातील रुग्णाचे गुण सांगताना तो "सत्त्ववान' म्हणजे खंबीर मनाचा, धैर्यवान असावा असे सांगितले आहे. यावरूनही आजारपणात मनाचे धैर्य किती महत्त्वाचे असते हे लक्षात येते. 

मानसविकारांवर मनःशांती, मनप्रसादन हा उपचारस्वरूप सांगितला आहेच; पण इतर विकारातही मनाचा कणखरपणा महत्त्वाचा असतो. मनाची धीरता टिकून राहण्यासाठी आयुर्वेदाने आश्वासनचिकित्साही सांगितली आहे. 
आश्वासयेत्‌ सुहृद्वा तं वाक्‍यैर्धर्मार्थसंहितैः ।।...चरक चिकित्सास्थान 

धर्म व अर्थाने परिपूर्ण अशा वचनांनी रुग्णाला आश्वासित करावे. या प्रकारचे आश्वासन मित्र देऊ शकतात तसेच वैद्य वा इतर अधिकारी व्यक्‍तीसुद्धा देऊ शकतात. प्रत्यक्षातही असा अनेक रुग्णांचा अनुभव असतो की वैद्याशी नुसते बोलण्यानेच रोग बरा झाल्यासारखा वाटू लागतो. हे काम मनाला मिळालेल्या धीरामुळेच झालेले असते. याउलट मनाने खचलेल्या रुग्णाला कितीही चांगले उपचार मिळाले तरी त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. 

प्रकृत्ती जशी जन्मजात असते तसा स्वभाव, एकंदर मनाची ठेवणसुद्धा जन्मजात असते मात्र तरीही मनाची धैर्यशीलता कायम ठेवण्यासाठी, वाढविण्यासाठी प्रयत्न निश्‍चितपणे करता येतात. 

मन व प्राण यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध असतो. प्राणायाम, दीर्घश्वसन वगैरे उपायांच्या साहाय्याने प्राण-अपानावर नियमन आणता आले की मनावर आपोआपच काम होते आणि मनावरचा संयम, मनाची धैर्यशीलता वाढू शकते. 

- ॐकार गुंजन आणि स्वास्थ्यसंगीताचे श्रवण हे दोन मनावर काम करणारे प्रभावी उपचार होत. याने मनाची ताकद तर वाढतेच; पण ॐकार व संगीताच्या सूक्ष्म कंपनांची मदत रोग बरा होण्यासाठीही मिळते. 
- आयुर्वेदाने, वेदांनी सांगितलेले मंत्रोच्चार, धूपादी उपचारसुद्धा मनाद्वारेच रोगशमनाचे काम करण्यास समर्थ असतात. 
खंबीरता कायम ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्यावर आलेल्या परिस्थितीची जबाबदारी आपण स्वतः घेण्याची पूर्ण तयारी ठेवणे. माझ्याच वाट्याला असे का, असा प्रश्न विचारून रडत बसल्याने मनोधैर्य खचणे स्वाभाविक असते. आयुर्वेदानेही कर्मज रोग असा रोगाचा प्रकार सांगितला आहे, तेव्हा कधी कधी कर्मशुद्धी होण्याच्या दृष्टीनेही रोग होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यावर योग्य उपचार करण्याची व त्याला धीराने सामोरे जाण्याची तयारी ठेवणे श्रेयस्कर असते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor