रोग शरीराला - औषध मनाला 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 3 February 2017

मनोविकारामुळे शारीरिक विकार उत्पन्न होतात व त्यातून भीती व अशाश्वतता निर्माण होते. त्यातून पुढे मन अधिकच व्यथित होऊन छिन्नभिन्न होते. आजारपणात एखाद्या प्रिय व्यक्‍तीने, वडिलधाऱ्याने वा वैद्यांनी भेटून दिलेला धीर म्हणजे मनाला उपचारच असतो. मनाला एकत्र आणून खात्री मिळू शकली तर रोगावर विजय मिळविणे सोपे होते. आपण आता मरणारच, आपल्याला वाचविणारा कोणीच नाही, रोग आता आपल्याला संपवणार अशा कल्पना मनात रुजल्यास औषधे व उपचार लागू पडणे कठीण होते. 

"मोडेन पण वाकणार नाही' व "वाकेन पण मोडणार नाही' असे दोन वाक्‍प्रचार प्रचारात असलेले दिसतात. शेवटी काय या दोन्ही वाक्‍यांचे महत्त्व सारखेच आहे. कारण मोडेन पण वाकणार नाही असे म्हणण्यात शेवटी फायदा काहीच नाही. कारण एकदा मोडले व अस्तित्वच संपले तर वाकायचा संबंध येतोच कुठे? वाकेन पण मोडणार नाही याचे दृष्टान्त बरेच देता येतात. वादळात वाकणारा ऊस टिकू शकतो, पण न वाकणारा माड टिकू शकत नाही. 

एकूण पाहता मोडते बिचारे शरीर; पण वाकायचे असते मनाने. इतरांशी मिळवून घेण्यात मनाला वाकवून घ्यावे लागले तरी एकूण ताठ मानेने जगता येण्यासाठी अहंकाराची गरज नसतेच. यावरून एक गोष्ट नक्की होते की संपूर्ण आयुष्य मनच चालवते. खरे अस्तित्व असते ते मनाचेच. 

मनुष्याला असलेले मन ही त्याची विशेषतः आहे. दगड, किडा-मुंगीपासून ते झाडाझुडपात मनोभाव असला तरी मनुष्य म्हणण्याइतपत मनाची उत्क्रांती फक्‍त माणसातच झालेली दिसते. मोड फुटल्यानंतर बीजाचे रूपांतर रोपटे, लहान झाड, वृक्ष, फळा-फुलांनी लगडलेला वृक्ष वगैरेत होते. या रूपांतर प्रक्रियेमुळे एका बीजापासून लाखो बिया तयार होऊ शकतील, अशी संख्यात्मक उत्क्रांती होत राहतेच; पण त्याचबरोबर झाडावरच्या फुलांचे सौंदर्य व सुगंध, फळांचा स्वाद व रंग, म्हणजे झाडाचे मन म्हणू या, ते नेहमीच आकर्षक असते. "देता एक कराने किती घेशील दो करांनी' या उक्‍तीनुसार निसर्ग नेहमीच हजार हातांनी परत करत असतो व त्यातूनच उत्पन्नाचा आनंदही मिळतो. ही निसर्गाची उत्क्रांतीची प्रक्रिया आहे किंवा हा निसर्गाचा मूळ स्वभावच आहे. म्हणूनच शारीरिक वा भौतिक पातळीवरच्या उत्क्रांती प्रक्रियेत मनुष्य शरीर तयार होऊ शकले. शरीरात असणारा मनुष्य म्हणजेच मनोभाव. फुलाचा जसा वास तसा शरीरात असलेल्या मनाचा वास. मनःशक्‍तीमुळे घडणारी सर्व कार्ये ही उत्क्रांतीची परिसीमा होय. चित्रकाराने काढलेल्या चित्रामुळे आपले दुःख विसरून नवीन भरारी आलेली एखादी व्यक्‍ती किंवा एखाद्या गायकाचे संगीत ऐकून जीवनाची दिशा सापडलेली एखादी व्यक्‍ती चित्राच्या भौतिकतेपलीकडील भावशक्‍तीनेच प्रभावित होते. 

मनुष्याची उत्क्रांती खरे तर मनापर्यंतच होत जाते व पुढे जो कोणी मनावर मेहनत घेईल त्याला मनाच्या सूक्ष्मत्वाकडून परमशक्‍तीकडे जाण्याचा मार्ग सापडतो. वस्तुमात्रातून कणाकडे, कणातून अणूकडे व अणूतून परमाणूकडे जसजशी वाटचाल होईल तसतशी शक्‍ती अधिकाधिक प्रकट होते त्याचप्रमाणे शरीरापेक्षा मनाची शक्‍ती मोठी असते. खरे तर शरीराने केलेली कामे शरीराने केली असे वाटले तरी खरे पाहता ती मनाच्या शक्‍तीमुळेच झालेली असतात. मनाची प्रेरणा नसेल तर प्रत्येक गोष्ट खूप अवघड वाटेल व कार्य सिद्ध होणार नाही. त्याच मनाला व्यवस्थित शक्‍ती मिळाली व त्याने एकदा निर्णय घेतला तर कुठलेही कार्य करणे अवघड नाही. मनोरथ पूर्ण व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांना मनाच्या शक्‍तीद्वारे स्वतःचे सर्व मनोरथ पूर्ण करून घेता येऊ शकतात. रथ जमिनीवर चालतो व त्याचा प्रवास अखंडित असतो या दृष्टिकोनातून इच्छा एखाद्या भौतिक प्राप्तीसाठी असली तरी त्यापासून मिळणारे समाधान मनुष्याला पुढे जाण्यासाठी उद्युक्‍त करते. आरोग्य, समृद्धी शांतीची अपेक्षा असणाऱ्यांनी बाह्य वस्तूंकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या मनाकडून आरोग्य प्राप्त होईल याकडे लक्ष दिले तर ते अधिक सोयीचे व खात्रीशीर ठरेल. आहाराने, औषधांनी सर्व रोग बरे होत असते तर मुळात मनुष्य आजारीच पडला नसता. म्हणूनच आजारपणाचे कारण मनोव्यथेत असते असे आयुर्वेदाने सांगितले आहे. 

आजारपणाचे कारण मनोव्यथेत असेल तर त्याचा इलाज सुद्धा मनाद्वारा नक्कीच करता येऊ शकेल. पैसाअडका, समृद्धी, श्रीमंती ही सुद्धा मनाच्या माध्यमातूनच मिळते. मनात आळस भरलेला असेल तर मनुष्याला काम करावेसे वाटणार नाही. अशा वेळी शारीरिक स्वास्थ्य ठीक असले, तरी मनाची साथ नसल्यामुळे वेळ आळसात घालवला तर श्रीमंती वा समृद्धी कधीच मिळणार नाही. "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण' असे तुकाराम महाराजांनी सांगितले ते काही उगाच नव्हे. आज जगात दिसत असलेले सर्व शोधही त्या त्या वैज्ञानिकाच्या मनाच्या स्फुरणातूनच लागलेले असतात. अगदी भौतिकाची प्रगतीसुद्धा मनाच्या इच्छेमुळेच झालेली असते. 

अशी आहे मनाची ताकद. या मनाला एकाग्र करण्यासाठी उपयोगी पडते ध्यान व मंत्र. मनाचा एकमेव आधार व आहे मनाचा तारणहार आहे मंत्र. छोटी छोटी शकले होऊन अनेक दिशात मनोतरंग पांगण्यापासून मनाला वाचविण्याचे काम मंत्र करतो म्हणून मंत्र मनाचा तारणहार आहे. "मननात्‌ त्रायते इति मन्त्रः' मनाला वेसण घालण्याचे काम "राम नाम' करू शकते अन्यथा मन मोकाट सुटलेल्या जनावराप्रमाणे धावत सुटते. "सोम - संतुलन ॐ ध्यानयोग' या पद्धतीने मनावर उत्तम काम करता येते. 
म्हणून मनाला समर्थ रामदासांनी उपदेश केला आहे "प्रभाते मनी राम चिंतीत जावा'. मनाची परमावस्था म्हणजे अत्यंत सूक्ष्म मन. जसजसे ते सूक्ष्म होत जाईल तसतसे ते व्यापक व महान शक्‍तिशाली होऊन "हे विश्वचि माझे घर' याची जाणीव करून देईल व मनाला परमशांती व परमशक्‍तीचा लाभ होईल. 

मुख्य म्हणजे मनोविकारामुळे शारीरिक विकार उत्पन्न होतात व त्यातून भीती व अशाश्वतता निर्माण होते. त्यातून पुढे मन अधिकच व्यथित होऊन छिन्नभिन्न होते. आजारपणात एखाद्या प्रिय व्यक्‍तीने, वडिलधाऱ्याने वा वैद्यांनी भेटून दिलेला धीर म्हणजे मनाला उपचारच असतो. मनाला एकत्र आणून खात्री मिळू शकली तर रोगावर विजय मिळविणे सोपे होते. आपण आता मरणारच, आपल्याला वाचविणारा कोणीच नाही, रोग आता आपल्याला संपवणार अशा कल्पना मनात रुजल्यास औषधे व उपचार लागू पडणे कठीण होते. पाण्यात दगड टाकल्यामुळे तयार होणाऱ्या लाटा काही वेळानंतर आपसूक शांत होतात फक्‍त गरज असते ती पुन्हा पाण्यात दगड न टाकण्याची. तेव्हा प्रत्येक व्यक्‍तीने आजारपणात मनाची उभारी ठेवणे खूप गरजेचे असते. त्यासाठी उपयोगी पडते श्रद्धा व प्रार्थना. औषधोपचाराव्यतिरिक्‍त होणारे शुभेच्छा वगैरे इलाज श्रद्धेतून जन्माला येतात. श्रद्धेमुळे मनःशक्‍ती वाढून रोगाशी सामना करण्याची क्षमता निर्माण होते. अर्थात जगण्यासाठी काहीतरी कारण लागते. माझा काही उपयोग नाही असे समजण्यात किंवा स्वतःला सर्व व्यवहार करता येतात या नावाखाली घरातील मंडळींनी आता तुमची गरज नाही अशी वडिलधाऱ्यांची समज करून देण्यात जीवेष्णा कमी होऊ लगली तर मन रोग उत्पन्न करेल यात काही नवल नाही. प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःचा म्हणून काही छंद, मित्रमंडळी, अभ्यास, नित्यकर्म चालू ठेवणे गरजेचे असते. त्याही पलीकडे जाऊन असे म्हणता येईल की दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल कारण दुसऱ्याच्या हास्यात मिळणाऱ्या आनंदाची अवीट गोडी चाखण्यासाठी मला जगायचे आहे, असे मनाने ठरविले तर रोग होणार नाहीत व आरोग्य उत्तम राहील. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor