balaji tambe
balaji tambe

‘फॅमिली डॉक्‍टर’ अमृतमहोत्सव दहावा!

फॅमिली डॉक्‍टर हेच मुळी आरोग्यासाठी एक उत्तम औषध आहे. म्हणजे औषध घेण्यापूर्वी किंवा आजारी पडू नये म्हणून ज्या गोष्टींची आवश्‍यकता असते त्यात शरीराची, आजारांची, औषधांची माहिती असणे आवश्‍यक असते. हे सर्व एकत्रितपणे उपलब्ध असणे हाच फॅमिली डॉक्‍टर. पूर्वी फॅमिली डॉक्‍टर ही एक व्यक्‍ती असे. 

पुन्हा एकदा फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना अस्तित्वात यावी, ही इच्छा मनात धरून ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीची सुरुवात झाली. कुटुंबाचे एक फॅमिली डॉक्‍टर असले, तर त्यांना कुटुंबातील सर्वांच्या प्रकृतीची,  कुटुंबातील सर्वांच्या सवयींची, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या-वागण्याच्या सवयींची, त्यांच्या मानसिक अवस्थेची सर्व माहिती असल्यामुळे ते सर्वांच्या आरोग्यरक्षणाची जबाबदारी सहज पार पाडू शकतात. तसेच ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीत कुटुंबातील सदस्य आजारी पडू नयेत यासाठी मार्गदर्शन केले व कोणी आजारी पडलेच तर सोपे सोपे घरगुती उपचार कोणते करावेत, कसे करावे, रोग झालाच तर त्याची मानसिकता बदलून रोग मागे कसा हटवावा, याचे मार्गदर्शन प्रथम केले व त्यानंतर औषधांची चर्चा केली. औषधे कशी तयार होतात, रोग्याला आवश्‍यक असलेली औषधे कुठे मिळतील, ही सर्व माहितीही पुरवली. अशा या ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा आज ७५०वा अंक प्रकाशित होत आहे. मनुष्याचा ७५वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, तसे ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीचा हा ७५०वा वाढदिवस आहे असे म्हणायला हरकत नाही. दै. ‘सकाळ’ची ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी आज लाखो घरांत वास्तव्य करत आहे आणि या सर्व घरांत हा वाढदिवस साजरा केला जाईल, यात शंका नाही. 

या पुरवणीतील काही महत्त्वाचे विषय संकलित करून ‘निवडक फॅमिली डॉक्‍टर’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर ‘मंत्र आरोग्याचा’, ‘मंत्र जीवनाचा’, ‘आयुर्वेद उवाच’, ‘वातव्याधी’, ‘स्त्रीआरोग्य’, ‘स्वास्थ्याचे २१ मंत्र’, ‘चमत्कार पंचकर्माचा’, ‘नाते वनस्पतींचे’, ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’, ‘आरोग्य सुभाषित’ वगैरे पुस्तके प्रकाशित झाली. कुणाला काही त्रास झाला तर फॅमिली डॉक्‍टरला बोलावणे पाठवावे लागते तेव्हा घरातच एखादा फॅमिली डॉक्‍टर असावा, या हेतूने या पुस्तकांची योजना केली. त्यामुळे घरातच मार्गदर्शन मिळण्याची सोय झाली. ही सर्व पुस्तकांने आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. 

‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीचा जन्म २००३ मध्ये झाला. पहिल्या दिवसापासूनच सर्वांनी या बाळाला अत्यंत प्रेमाने वाढवले. लहान मूल घरात आले की सर्वांनाच ते हवेहवेसे वाटते, सर्व जण त्याचे लाड करतात, तसेच या पुरवणीचे सुरवातीपासून खूप कौतुक झाले. बाळाचे वय वाढते तसे कौतुकाचे प्रमाण कमी होते; परंतु या पुरवणीच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. आजच्या ७५०व्या अंकापर्यंत यावर सगळ्यांनी भरभरून प्रेम केले. अनेकांच्या जीवनात या पुरवणीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे व हिच्या मदतीने अनेकांनी आरोग्य अनुभवले आहे. 

या पुरवणीत ‘प्रश्नोत्तरे’ हे एक लोकप्रिय सदर आहे. यात वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली असतात. यासाठी नेहमीच वाचकांकडून पत्र, मेल वगैरेंद्वारा प्रश्नांचा ओघ येत राहिलेला आहे. ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये ज्या जाहिराती दिल्या जातात त्या औषधांनाही नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. म्हणजे केवळ रुग्णांनी, सामान्य लोकांनीच नव्हे तर औषधे बनविणाऱ्या कंपन्यांनी सुद्धा ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीची दखल घेतली, तिच्यावर प्रेम केले व ही पुरवणी वाढविण्यास आपला हातभार लावला. 

या पुरवणीचे विषय आयुर्वेदाचे वा आरोग्याचे असले तरी आरोग्य केवळ शरीराचे नसते, ते शरीराचे, मनाचे व आत्म्याचे असते हे लक्षात घेऊन या विषयांवरही ‘फॅमिली डॉक्‍टर’चे काही अंक काढले गेले. या सर्वच अंकाची मांडणी करताना यातील भाषा सोपी, सर्वसामान्यांना समजेल अशी ठेवण्याचा कटाक्ष पाळला. त्यामुळे आरोग्याचा विषय सर्वांपर्यंत पोहोचविणे साध्य झाले. जीवन नेहमी संतुलित असावे. ‘संतुलन आयुर्वेद’ या आमच्या आयुर्वेदिक संस्थेतील अनेकांनी या पुरवण्यांसाठी मदत केली. त्यातील महत्त्वाची मदत डॉ. भाग्यश्री झोपे (एम.डी. आयुर्वेद) यांनी केली. आरोग्य सुभाषित व अन्नयोग देण्याची जबाबदारी डॉ. सौ. वीणा तांबे यांनी पार पाडली. त्याबरोबरीने डीटीपीचे काम विजया कोल्हे यांनी सांभाळले. ‘साम’ टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीतील माहिती दृश्‍य स्वरूपात वाचक व प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी माझ्याबरोबर डॉ. सौ. मालविका तांबे ((एम. डी. आयुर्वेद), डॉ. भाग्यश्री झोपे (एम. डी. आयुर्वेद) यांनी खूप मदत केली. संदर्भ शोधण्यासाठी डॉ. नेहा गोयल (एम.डी. स्कीन), तसेच डॉ. नमिता पारेख व ‘संतुलन’च्या इतरांनी खूप मदत केली. संदर्भ चित्रे सुनील तांबे यांनी पुरविली. मुख्य म्हणजे प्रोत्साहनाचे काम ‘सकाळ’ माध्यम समूहाचे कार्यकारी संचालक अभिजित पवार यांनी केले. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संतोष शेणई यांनी समन्वयाचे आणि समूहाच्या आर्टिस्टनी अंकाच्या आकर्षक मांडणीचे काम केले. या सर्वांचा मी व्यक्‍तिशः आभारी आहे. एकूण सर्वांनी एकामागून एक ७५० आठवडे या पुरवणीची पाठराखण केली, त्यामुळेच आज या पुरवणीची ७५१व्या अंकाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com