डाएट फंडा आभास आणि वस्तुस्थिती

डॉ. अविनाश भोंडवे
Friday, 11 May 2018

वेगवेगळ्या ‘डाएट’ची चलती अधूनमधून असते. ‘डाएट’ चालू आहे, हे सांगणे काहीसे स्व-गौरवाचे होऊ लागले आहे. पण ही ‘उपासमार’ आरोग्याला उपकारक असते का?

विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात. 

स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या व्यक्तीचे वजन जेव्हा त्याच्या जास्तीत जास्त आदर्श वजनाच्या वीस टक्‍क्‍यांहून जास्त असते, तेव्हा त्याला ’स्थूल’ म्हणतात. आदर्श वजनाच्या एक ते वीस टक्के जास्त वजन असेल, तर वजनवाढीच्या कोष्टकात ती व्यक्ती ‘जाड’ समजली जाते. अतिरेकी वजनवाढ आणि स्थूलत्व या जगातील एक मोठ्या आरोग्यसमस्या गणल्या जाऊ लागल्या आहेत. जगभरात आजमितीला सत्तर कोटी लोक स्थूल आहेत. त्यापैकी जवळजवळ एक कोटी भारतीय आहेत आणि या संख्येच्या किमान दहापट व्यक्ती या ‘जाड’ या वर्गवारीत बसतात. 

शरीराला अजिबात श्रम न पडता कार्यभाग साधला गेला पाहिजे, हे संगणक युगातील आजच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत कटाक्षाने आज पाळले जाते. साहजिकच वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी, शरीराला कसलेही कष्ट न देता, ‘टुणटुणची कटरिना’ बनवायला अनेक फंडा प्रसृत होतात. गोलमटोल शरीरांचा भार कमी करण्यासाठी वजन कमी करण्याचे आणि निरोगी जीवन जगण्याचे आमिष देणारी अनेक ‘पथ्यकारक आहार पद्धती’ किंवा प्रचलित भाषेत ‘डाएट प्लॅन’ जगभरात अर्थातच पर्यायाने भारतातसुद्धा पाळले जात आहेत. 

या डाएट प्लॅन्सचा प्रणेता कुणी तरी तथाकथित नामांकित आहारतज्ज्ञ असतो. आरोग्यदायी व परंपरागत आहाराच्या पद्धतीची मोठ्या कौशल्याने मोडतोड करून हे ‘प्लान्स’ बनवले गेलेले असतात. अशा आहारपद्धतीचे काही व्यावसायिक कंपन्यांकडून खूप चातुर्याने प्रमोशन केले जाते. वर्तमानपत्रे, मासिके, टेलिव्हिजन, इंटरनेट, घरोघरी प्रचारक पाठवणे आणि मौखिक प्रसिद्धी, अशा सर्व पद्धतीने या डाएट प्लान्सची वारेमाप जाहिरात केली जाते. महिनाभरात वीस किलो वजन कमी केलेल्या तथाकथित व्यक्तींचे ‘तेव्हा आणि आता’ अशी मनाला भुरळ पाडणारी छायाचित्रे छापली जातात. कंपनी पुरस्कृत या डाएट प्लॅन्सचा पगडा एवढा घट्ट असतो, की अनेक सुशिक्षित, नामांकित आणि उच्चपदस्थ व्यक्तीदेखील ‘मी अमुक डाएट प्लॅन पाळतो,’ असे मोठ्या अभिमानाने स्नेहीजनांना सांगत राहतात. येन केन कारणेन प्रसिद्धी आणि व्यावसायिक नफा कमावणे हा उद्देश या प्रत्येक प्लान्समध्ये आढळून येतो. 

या सर्व डाएट प्लॉन्समध्ये खाण्याचे पदार्थ आणि पेये याबाबतीत काही पदार्थ एकतर वर्ज्य केलेले असतात किंवा काही ठराविक गोष्टीच खाण्याचा आग्रह असतो. वेचक खाद्य पदार्थांची निवड आणि त्यांच्या प्रमाणाचे काटेकोरपणे कोष्टक बनवलेले असते. या प्लान्समध्ये त्या गोष्टी खाल्ल्याने होणारी वजनाची घट आणि आरोग्याला होणारे फायदे यावरच भर दिलेला असतो. मात्र, काही गोष्टी खाऊच नका, असा आग्रह धरल्याने आरोग्याचे होणारे तोटे डोळ्याआड केले जातात.  

याची प्रचिती घेण्यासाठी जगभरातल्या काही प्रसिद्ध डाएट प्लॅन्सचा विचार करणे आवश्‍यक ठरते. 

ॲटकिन्स डाएट- डॉ. रॉबर्ट ॲटकिन्स यांनी या विषयावर १९७२ मध्ये एक पुस्तक लिहिले आणि तेव्हापासून वजन कमी करण्यासाठी, तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक जगातला प्रसिद्ध डाएट प्लान मानला जातो. याचे चार टप्पे असतात. 

पहिला टप्पा- दोन आठवड्यांच्या या टप्प्यात रोजच्या आहारात पिष्टमय पदार्थ वीस ग्रॅमपेक्षा कमी ठेवायचे असतात. यासाठी पालेभाज्या, काकडी, मुळा, मश्रूम, कोथिंबीर यावर भर पाहिजे. याबरोबर चमचाभर ऑलिव्ह ऑईल पाहिजे. मात्र, चिकन, मटन, अंडी आणि चरबीयुक्त पदार्थ खायला हरकत नसते. हा आहार दिवसातून चार वेळा सम प्रमाणात घ्यावा. आणि एकही वेळ त्या चौदा दिवसांत चुकवू नये. शिवाय आठ ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच पाहिजे, असा संकेत असतो. या टप्प्यात वजन कमी व्हायला सुरुवात होते.

दुसरा टप्पा- या टप्प्यात पुढचे चौदा दिवस पहिल्या टप्प्यातील आहाराला फळे, फळभाज्या आणि डाळी, शेंगदाणे वगैरेची जोड देणे अपेक्षित असते. 

तिसरा टप्पा- या टप्प्यात पहिल्यापेक्षा थोडे जास्त गोड आणि पिठूळ पदार्थ खायला हरकत नसते. 

चौथा टप्पा- यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील पालेभाज्यांसमवेत सकस असे पिठूळ पदार्थ खायला हरकत नसते. मात्र, वजन यात कायम राहते.

वर्ज्य गोष्टी- या आहारपद्धतीत शीतपेये, कोलापेये, फळांचे रस, केक, आइस्क्रीम, कॅंडी असे गोड पदार्थ; गहू, तांदूळ, बार्ली, राय अशी तृणधान्ये; सरकीचे तेल, मक्‍याचे तेल, सोयाबीन, तसेच कॅनोला (पांढरी मोहरी) तेल; हायड्रोजिनेटेड वनस्पती तूप, ट्रान्सफॅट असलेले प्रक्रियाकृत अन्नपदार्थ; बटाटा, गाजर, रताळे अशी कंदमुळे; केळी, सफरचंद, संत्री, द्राक्षे, पीअर अशी शर्करायुक्त फळे; मसूर, सोयाबीन, राजमा, चणे अशी द्विदल धान्ये खायला मज्जाव असतो. 

तोटे- पिष्टमय पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. या डाएटमध्ये त्यांच्यावर निर्बंध आल्यामुळे खूप गळून गेल्यासारखे होते. अनेकांना गरगरल्यासारखे होणे, चक्कर येणे, असे त्रास होतात. फळे, तृणधान्ये वर्ज्य केल्याने, शरीरात काही अत्यावश्‍यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. हे डाएट करणाऱ्या व्यक्ती बहुतांशी आजच्या जीवनशैलीतील चिप्स, पिझ्झा, वडे, कोलड्रिंक्‍स अशी चटकदार खाद्य-पेये खाण्यास चटावलेले असतात. साहजिकच थोड्याच दिवसांत ही डाएट सोडून दिली जातात. 
(पूर्वार्ध)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue avinash bhondwe article