अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 11 May 2018

उन्हाळ्यात अग्नी मंदावतो, भूक लागत नाही, याचेच पर्यवसान म्हणून जेव्हा अंगात कसकस वाटते, अशा वेळी लंघन करून वाळ्याचे पाणी पिण्याने बरे वाटते.

अग्र्यसंग्रहातील सर्वच माहिती अशी आहे की ती वैद्याला तर मुखोद्‌गत असायलाच हवी, पण सर्वसामान्यांना सुद्धा समजायला हवी. छोटे विकार, मानसिक असंतुलन, व्यवहारातील चुका टाळायच्या असतील तर यातील माहितीचा उत्तम उपयोग होऊ शकतो. मागच्या वेळी आपण मुस्ता ही वनस्पती मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारी, अग्निदीपन तसेच पचनासाठी उत्तम असते हे पाहिले. आज या पुढची माहिती घेऊया. 

उदीच्यं निर्वापणदीपनीयपाचनीयच्छर्द्यतीसारहराणाम्‌ - उदीच्य ही वाळ्याची एक जात आहे, जी अधिक सुगंधी असते. हा वाळा दीपन, पाचन, सुधारण्यासाठी तसेच उलटी, जुलाब थांबविण्यासाठी उत्तम सर्वोत्तम असतो. 

अग्नी मंदावतो, भूक लागत नाही, याचेच पर्यवसान म्हणून जेव्हा अंगात कसकस वाटते, अशा वेळी लंघन करून वाळ्याचे पाणी पिण्याने बरे वाटते. साधारण एक ग्रॅम वाळ्याचे चूर्ण ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेऊन पिता येते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा जेव्हा अतिउष्णतेने भूक लागत नाही, पचनक्रिया मंदावते तेव्हा हलका आहार घेऊन असे पाणी पिण्याचा उपयोग होतो. 

जुलाबावर वाळा, धणे, बडीशेप, नागरमोथा यांचा काढा करून घेता येतो. उलट्या होत असल्यास हाच काढा साखर मिसळून घेता येतो. 

अनन्ता सांग्राहिकरक्‍तपित्तप्रशमनानाम्‌ - अनंतमूळ नावाची अतिशय सुगंधी मूळ असणारी वेल असते. याची मुळे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारी आणि रक्‍तदोष, पित्तदोष कमी करण्यास मदत करणारी, शरीरातून कोठूनही रक्‍तस्राव होत असल्यास दूर होण्यास मदत करणारी असतात. 

रक्‍त व पित्त या दोघांची शुद्धी करण्यासाठी अनंतमूळ श्रेष्ठ असल्याने सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये हे एक उत्तम औषध समजले जाते. अंगावर खाज येणे, पित्त उठणे, खरूज, नायटा, नागीण वगैरे विकारांमध्ये दहा ग्रॅम अनंतमुळाचा काढा विधिवत्‌ करून तो खडीसाखरेसह घेण्याचा फायदा होतो. लघवी साफ होण्यासाठी, विशेषतः बस्ती, योनीमार्ग, गर्भाशय वगैरे ठिकाणी जंतुसंसर्ग असला, लघवी करताना जळजळ होत असली तर त्यावरही असा काढा घेण्याने लगेच गुण येतो. त्वचा तजेलदार राहावी, उजळावी व कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार होऊ नये यासाठी अनंतमुळापासून बनविलेला अनंतकल्प दूध किंवा सरबताबरोबर घेता येतो, व तो अतिशय रुचकरही असतो. 

अमृता सांग्राहिकवातहरदीपनीयश्‍लेष्मशोणितविबन्धप्रशमनानाम्‌ - अमृता म्हणजे गुळवेल. ही वनस्पती मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वाताचे शमन करते, अग्नीचे दीपन करते, कफदोष, रक्‍तदोष कमी करते आणि मलावष्टंभाचा नाश करते.

नावातच अमृत असणारी ही वनस्पती अनेक प्रकारे गुणकारी असते. जवळजवळ कोणत्याही प्रकारच्या तापावर गुळवेल उत्तम लागू पडते. विशेषतः उष्णता वाढून ताप आला असला, अंगाचा खूप दाह होत असला, तहानेचे समाधान होत नसले, एखादी उलटी होत असली तर गुळवेलीचा रस खडीसाखरेसह घेता येतो. चवीला गुळवेल फार कडू असते, मात्र गुणाने अमृतासमान असते. गुळवेल, नागरमोथा, सुंठ यांचा काढा करून घेतला तर तो सर्व प्रकारच्या तापामध्ये उपयोगी पडतो. थंडी-ताप, टायफॉइड वगैरे तापावरही गुळवेलीचा काढा किंवा गुळवेलीचे सत्त्व घेण्याने बरे वाटते. गुळवेल वातशामक तसेच शरीरातील विबंध (अडथळा) दूर करणारी असल्याने वातरोगातही उपयुक्‍त असते. आमावातामध्ये गुळवेल व सुंठ यांचा काढा  सकाळ-संध्याकाळ घेणे प्रशस्त असते.

बिल्वं सांग्राहिकदीपनीयवातकफप्रशमनानाम्‌ - बेलफळ सुद्धा मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे, अग्निप्रदीपन करणारे आणि वातदोष तसेच कफदोष कमी करणारे असते.  महादेवांना बेलाची पाने वाहिली जातात. याच बेलाचे फळ म्हणजे बेलफळ. अर्धवट पिकलेले बेलफळ औषधात वापरले जाते. ताजे बेलफळ नेहमी मिळू शकत नाही, अशा वेळी बेलफळाचे तुकडे करून वाळवून ठेवून आवश्‍यकतेनुसार वापरता येतात. 

बेलफळाचा ताजा किंवा वाळविलेला गर साखरेबरोबर दिल्यास जुलाब होणे थांबते. म्हणूनच बेलफळाचा मोरांबा आव पडणे, जुलाब होणे, संग्रहणी वगैरे विकारांमध्ये वापरला जातो. पूर्ण पिकलेले बेलफळसुद्धा सेवन करता येते, मात्र त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. बेलाचे मूळ दशमुळांपैकी एक आहे. वातदोषाला कमी करण्यासाठी, अंगावरील सूज कमी करण्यासाठी बेलाच्या मुळाचा वापर होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue balaji tambe article