‘फॅमिली डॉक्‍टर’ आहे आपल्या सर्वांगीण आरोग्याचा शुभचिंतक!!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 May 2018

गेली पंधरा वर्षे दर शुक्रवारी दै. ‘सकाळ’चा ‘फॅमिली डॉक्‍टर’ घराघरात व्हिजिट करतो आहे. ‘फॅमिली डॉक्‍टर’ आहे आजारांची नेमकी माहिती देणारा मार्गदर्शक, घरगुती उपचारांपासून आधुनिक उपचारांपर्यंत उपाय सुचवणारा सोबती, आयुर्वेदिक जीवनशैली सुचवणारा गुरू आणि आपल्या मनातील प्रश्‍नांना उत्तरे देणारा तज्ज्ञ.

 

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा
#FamilyDoctor750
Email : webditor@eSakal.com
Facebook - SakalNews

आरोग्याचा हितचिंतक
‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां। आजार पळून जाई खरा-खरा ।। ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते वृद्धांपर्यंतच्या आपाद-मस्तकापर्यंतच्या सर्व आजारांविषयीची समर्पक माहिती देणारे सर्व पॅथीतील ख्यातनाम डॉक्‍टरांचे लेख फक्त ‘फॅमिली डॉक्‍टर’मधेच येतात. ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ‘फॅमिली डॉक्‍टर’ !  
-सुजाता आल्हाद लेले, पुणे

विश्‍वासार्ह वैद्यकीय ज्ञान
‘फॅमिली डॉक्‍टर’ सामान्य आजारांकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्याचे काम करत आहे. चौदा टक्के लोकांना मधुमेह आहे तर आठ टक्के लोक या आजाराच्या काठावर आहेत. वयात आलेल्या चाळीस टक्के मुलींचे रक्त पातळ असते. दहा पैकी दोघांना टीबी असतो. वेळीच काळजी, योग्य सल्ला घेतल्यास हे आजार टाळता येतात. मीठ व साखर प्रमाणात वापरल्यास मधुमेह, रक्तदाब टाळता येतो. यासारख्या अनेक छोट्या गोष्टींवर प्रबोधनाचे काम ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या माध्यमातून होत आहे. 
- डॉ. कुलदीपसिंग राऊळ, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद

सल्ला देणारा घरचा डॉक्‍टर
आजची पिढी आरोग्याविषयी सजग आहे. आमच्या पिढीला आरोग्य सांभाळायला हवें हे कळत होते, पण वळत नव्हते. ती जाणीव करून दिली ‘फॅमिली डॉक्‍टर’ने. फॅमिली डॉक्‍टर आपल्या खांद्यावर हात ठेवून काही गोष्टी समजून सांगतो तसाच काहीसा सल्ला ‘फॅमिली डॉक्‍टर’ आपल्याला देतो. सध्याच्या व्हॉट्‌सॲप युगात सल्ले देणारे खूप झाले आहेत. तुमची वागणूक कशी असावी यापासून रोज सकाळी अमुक प्या आणि रोगमुक्त व्हा सांगणाऱ्या अनेक ‘पोस्ट’ रोजच धडकत असतात. आपण गोंधळात पडतो. अशावेळी ‘फॅमिली डॉक्‍टर’ हा मोठाच आधार वाटतो. 
-प्रकाश हिर्लेकर, ठाणे

फॅमिली मेंबर
‘सकाळ’च्या फॅमिली डॉक्‍टर पुरवणीतून मिळणाऱ्या माहितीचा मला खूप फायदा झाला. आहार, व्यायाम, तसेच अनेक विकारांचे निराकरण कसे कराल यासाठीचे घरगुती उपाय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधोपचार पद्धती याची माहिती घरबसल्या मिळत गेली. ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी आमची फॅमिली मेंबरच बनली. आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर चार सुवर्ण, दोन रौप्य व चार ब्राँझ पदके पटकाविली आहेत. ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील सल्ल्यामुळे आरोग्याची तंदुरुस्ती राहिली आहे. 
-ऋतुजा पवार, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, बेळगाव

कुटुंबाचा ‘डॉक्‍टर’
धकाधकीच्या जीवनात विविध प्रकारचे आजार, विकार माणसाला भयभीत करतात. अशा या दुखण्यांविषयी वैद्यकीय माहिती, मनातील शंकांचे निरसन, आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे आणि खात्रीलायक, साधी पण निसर्गचक्राला अनुकूल शास्त्रोक्त उपचारपद्धती यांसाठी ’फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी महत्त्वपूर्ण ठरते. पूर्वी ’आजीचा बटवा’ हा घरादाराची काळजी घेत असे. आजच्या काळात तीच भूमिका अधिक शास्त्रोक्त पद्धतीने ‘फॅमिली डॉक्‍टर’ बजावत आहे. माणसाला निरामय आयुष्य लाभावे म्हणून कार्यरत असलेल्या या पुरवणीला शुभेच्छा ! 
प्रा. नीला कदम, पुणे

सामान्य जनांसाठी संजीवनी
‘फॅमिली डॉक्‍टर’ हे आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी संजीवनी आहे. कारण ऋतुकालानुसार आहार, विहार, व्यायाम तसेच त्रिदोषांनुसार पथ्यपाणी कसे असावे याचे उत्तम विश्‍लेषण असते. आमच्या फॅमिलीचा हा खरा मार्गदर्शक असल्याने सर्वांचे आरोग्य अत्यंत ठणठणीत आणि उत्तम आहे. डॉ. श्री बालाजी तांबे आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांना शतशः
धन्यवाद ! 
- सविता दौंड, पिंपरी

कुटुंबाचा आरोग्यसखा 
दर ‘शुक्रवारी’ प्रसिद्ध होणाऱ्या ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीतील अत्यंत महत्त्वपूर्ण व अचूक माहितीमुळे स्वत:ची आणि घरच्यांची आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी याचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. कुटुंबातील लहानांपासून थोरांना योग्य टिप्स मिळतात आणि त्यामुळे वेळीच उपचारासाठी मदत मिळते. ‘फॅमिली डॉक्‍टर’ हा आमच्या कुटुंबाचा ‘आरोग्यसखा’ म्हणून काम करतो.
-सुरेखा म. राजेशिर्के, आर. के. नगर, कोल्हापूर

आजाराची भीती पळाली 
आजाराची काळजी करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी काय करायला हवे, त्याचं उत्तम मार्गदर्शन ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून मिळते. डॉ. श्री बालाजी तांबे यांच्या लेखातून विविध व्याधींवर काय उपाय करावे ते कळते. त्यांची सहज, सोपी शैली आणि विश्‍लेषण मनाला समाधान देते. आजाराला सकारात्मक पद्धतीने कसे हाताळावे ते त्यांच्या लेखातून आम्हाला समजते. एका वाक्‍यात सांगायचे तर ‘फॅमिली डॉक्‍टर’ आमच्या आयुष्याचाच एक भाग बनले आहे. 
- रमाकांत शिंदे, सोलापूर

आयुर्वेद व आहाराचे महत्त्व 
गेल्या दहा वर्षांपासून ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणी वाचतो आहे. या पुरवणीतून आरोग्याला उपयुक्त माहिती दिली जात आहे. आयुर्वेदात आहाराचे महत्त्व चरकानी सांगितले आहे. या पिढीत हे महत्त्व डॉ. बालाजी तांबे आपणास पटवून देत आहेत. नियमित योगासने, ध्यान याला सुद्धा खूप महत्त्व आहे. यासह आरोग्यविषयक उपयुक्त व बहुमोल माहिती ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये दर शुक्रवारी वाचायला मिळत असते.  
-डॉ. अरुणकुमार खोलकुटे, नागपूर

कुटुंबासाठी आरोग्यदायी 
‘सकाळ’ची दर शुक्रवारी प्रसिद्ध होणारी ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुस्तिका कुटुंबीयांसाठी आरोग्यदायी अशीच आहे. डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेले विविध आजारासंबंधीचे लेख लाभदायक असेच असतात. आबालवृद्धांना होणाऱ्या आजारांसंबंधी घरी करावयाच्या उपचारासंबंधी माहिती अत्यंत उपयुक्त आहे. स्त्रियांच्या आजारासंबंधीचे मार्गदर्शनही मोलाचे आहे. ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शनाचा आम्हाला उपयोग होतो. 
- मंजूश्री खमितकर, सोलापूर

निदानज्ञान देणारी पुरवणी
छोट्या-छोट्या व्याधींचे आयुर्वेदात निदान कसे करायचे याची माहिती ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून मिळते. आहार कसा घ्यावा, किती घ्यावा याची माहिती या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळते. पंचकर्माची इत्थंभूत माहिती ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून सर्वसामान्यांना मिळत आहे. गर्भसंस्काराचे महत्त्वही डॉ. बालाजी तांबे यांनी या पुरवणीतून पटवून दिले आहे. 
-डॉ. राजीव धानोरकर,  आयुर्वेदाचार्य, चंद्रपूर 

परिपूर्ण आरोग्यमंत्र  
चांगले आरोग्य टिकवायचे असेल तर, मनाची सकारात्मकता, प्रसन्नता फार महत्वाची आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे स्वत:सह दुसऱ्यांमध्येही आत्मविश्‍वास वाढवता येतो हे ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून शिकता आले. अनेक आजारांवर सहज-सोप्या उपायांनी मात करता येते याबाबतची माहिती गुरुवर्य बालाजी तांबे यांच्याकडून मिळतेे. फॅमिली डॉक्‍टरकडून मिळणारा आरोग्य मंत्र सतत सुरू राहावा हीच अपेक्षा.
- प्राजक्ता सावंत, जानवली, जि. सिंधुदुर्ग

आरोग्यवाटा दाखविणारा गुरू
तरुणपणात पैसे कमाविण्यासाठी आरोग्याची काळजी घेता येत नाही, मग मिळविलेला सारा पैसा उतारवयात आरोग्यासाठी खर्च करायची वेळ येते. ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ने आरोग्याविषयी विचार करायला लावला. नैसर्गिक वाटांनी प्रकृती उत्तम कशी राखता येईल हे सांगितले. आरोग्याच्या वाटा दाखविणारा एक उत्तम गुरूच आहे तो. माझ्याकडे ‘फॅमिली डॉक्‍टर’चे अनेक अंक जपून ठेवलेले आहेत.  
-शशिकांत कांदळकर, बोरीवली, मुंबई

अन्नयोगाची उत्तम माहिती
चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासोबत आहारही महत्वाचा आहे. कुठल्या ऋतुमध्ये कशा पद्धतीचा आहार सेवन करावा. यासह विविध व्याधींमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या आहाराची सखोल माहिती ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये वाचायला मिळते. अंकातील माहिती आवर्जून वाचते आणि वाचलेली माहिती परिचित, मैत्रिणींना सांगत त्यांनाही त्याचा फायदा होईल, असा प्रयत्न असतो. संग्रहित करून ठेवण्यासारखा हा अंक आहे.
-वैदेही जोशी, नाशिक

आमचा मार्गदर्शक 
‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणी वाचनीय आहे. त्यातील तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आरोग्याचा ठेवा आहे. पुरवणीतील आरोग्यविषक टिप्स मार्गदर्शक आहेत. मी नियमित पुरवणी वाचतो, त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. घरातील सर्व सदस्यही पुरवणी वाचतात.  ‘सकाळ’चा ‘फॅमिली डॉक्‍टर’ चुकीच्या गोष्टी कधीच सांगणार नाही याची खात्री आहेच, म्हणून या ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या अपॉइंटमेंटची आठवडाभर प्रतीक्षा असते.
- विहार सातपुते, सांगली  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue Best wisher of all round health