मणक्‍याचा स्पाँडिलोसिस,डिस्कमधील दाब 

डॉ. जयदेव पंचवाघ
Friday, 11 May 2018

‘ताठ कण्याने जगा’ असे मोठी माणसे नेहमी सांगतात. मणक्‍याचे विकार जडायला नको असतील, तर मोठ्यांचे हे सांगणे ऐकायलाच हवे.

डॉक्‍टर, मला दोन आठवड्यांपासून उभं राहिल्यावर कंबर आणि पायातून प्रचंड कळा येत आहेत. परवापासून उजव्या पायात मांडीपासून आणि पोटरीमधून असह्य कळ सुरू झाली आहे... पस्तीशीतील संजय मला सांगत होता. 

संजय गेली आठ वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो. बारा-बारा तास बसूनच काम करणं हा तर त्या क्षेत्रातला नित्यनियम. मान, पाठ आणि कंबर एका विशिष्ट अवघडलेल्या स्थितीत ठेवून, एक हात "माऊस'वर व दुसरा "की बोर्ड'वर स्थिरावून ही मंडळी डोळे व मेंदू "स्क्रीन' वरून यत्किंचितही न हलवता बसलेली असतात. या अशा प्रकारच्या कामामुळे मणक्‍यामध्ये विविध ठिकाणी ताण न आला तरच नवल. 

संजयच्या कंबरेच्या मणक्‍यामधील चार आणि पाच नंबरच्या मणक्‍यातील डिस्क (चकती) घसरली होती. यालाच आपण "स्लिए डिस्क' म्हणतो. ही चकती मणक्‍याच्या आत शिरून पायाकडे जाणाऱ्या नसांवर दाब आणत होती आणि म्हणूनच संजयला कंबरेपासून पोटरीपर्यंत कळा व मुंग्या येत होत्या. कंबरेच्या एमआरआयमध्ये हे चित्र अगदी स्वच्छपणे आम्हाला दिसलं. "रो डिस्केक्‍टॉमी' या दुर्बिणीतून करण्याच्या शस्त्रक्रियेने त्याचं दुखणं गेलं आणि दोन दिवसांत तो परत घरी गेला. 

कंबरेच्या मणक्‍यांमधील चकतीचं घसरणं आणि रोजचं अनेक तासांचं बैठं काम यांचा जवळचा संबंध आहे. "स्पॉंडिलोसिस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मणक्‍याच्या आजाराशीसुद्धा अनेक तास अवघडलेल्या अवस्थेत बसून काम करण्याचा संबंध आहे. तो नेमका कशामुळे होतं हे समजून घेऊ. कंबरेच्या दोन मणक्‍यांमध्ये एक गादीप्रमाणे कुर्चा असते. त्यालाच आपण "डिस्क' म्हणतो. मणक्‍यांच्या हालचालींदरम्यान "शॉक ऍब्सॉर्वर' व "बॉल बेअरींग'प्रमाणे काम करणारी ही गादी दोन भागांची मिळून बनलेली असते. या गादीचा  बाहेरचा भाग हा तंतूंच्या घट्ट वीणेने बनलेला असतो. मध्य भागात ‘जेली’च्या घनतेचा मऊ भाग असतो. मणक्‍यांच्या हालचाली दरम्यान हा मऊ भाग दाबला जातो; पण भोवतांच्या घट्ट वीणेमुळे तो आपली जागा सोडत नाही. या मऊ भागाला ‘न्यूक्‍लिअस पल्पोजस’ व घट्ट वीणेला ‘ऍन्यूलस फायब्रोसस’ म्हणतात. ज्या वेळेला आपण पुढे वाकून बसतो. पुढे वाकून जड वस्तू उचलतो त्या वेळी हा "न्यूक्‍लिअस' ढकलला जातो. यातला दाब वाढलेला असतो. कॉम्प्युटरवर काम करताना अनेक तास कंबर पुढे वाकलेल्या स्थितीत असते. कंबर, पाठ व मान यांना "पोक' बोर्डवर असल्याने हा ‘पोक’आणखी वाढतो. डिस्कमधला दाब वाढल्यामुळे त्याची बाहेरची घट्ट वीण (ऍन्युलस) उसवायला किंवा फाटायला लागते आणि मधल्या मऊ न्युक्‍लिअसचा काही भाग या फाटलेल्या भागात घसरतो. ही "स्लिप्ड डिस्क'ची सुरवात असते. या घसरण्याने कंबरदुखी सुरू होते आणि त्यामुळे कंबरेचे स्नायू आकुंचन पावलेल्या अवस्थेत राहतात. यामुळे तर डिस्कमधला दाब अजूनच वाढतो आणि असं दुष्टचक्र चालू राहिलं, तर हा मधला मऊ भाग घट्ट वीण फाडून पूर्ण बाहेर येतो. बाहेर येऊन तो मणक्‍यातून बाहेर पडून, पायाकडे जाणाऱ्या नसांवर जोरात दाब आणतो. त्यामुळे कंबरेपासून कुल्ले, मांडीचा मागचा भाग, पोटरी व पावलात कळा येऊ लागतात. त्याबरोबर मुंग्या व बधीरपणासुद्धा जाणवायला लागतो. ही स्थिती कमी न होता वाढत गेली, तर पायातली शक्ती कमी होते. 

‘डिस्क’ दाब जर अनेक दिवस अशा चुकीच्या आणि खूप वेळच्या बसण्यामुळे जर वाढत राहिला, तर "स्पॉंडिलोसिस'च्या प्रक्रियेला वेगाने सुरवात होते. डिस्कवरच्या अतिरिक्त ताणामुळे तिची उंची कमी होत जाते आणि अशा वेळेला त्या भागात (दोन मणक्‍यांतील सांध्यांमध्ये व डिस्कच्या सभोवताली) अतिरिक्त "कॅल्शियम' जमा होत जाते. या कॅल्शियमच्या जमणाऱ्या पुटांमुळे मणक्‍याच्या आतल्या "कॅनॉल'चा आकार चिंचोळा होत जातो. कंबरेच्या मणक्‍यामध्ये अशावेळी नसांच्या संपूर्ण समूहावरच दाब येतो आणि लंबर कॅनॉल "स्टेनोसिस'चा आजार होतो. यात थोडे अंतर चालल्यावर मांड्या व पोटऱ्या भरून येणे, पायातली शक्ती कमी होणे, थोडा वेळ उभे राहिल्यावर पाय भरून येऊन बसावं लागणे, अशा प्रकारचा त्रास सुरू होतो. 

मानेच्या भागात हा त्रास सुरू झाला, तर मान दुखणे, चालताना तोल जाणे, चप्पल निसटणे, हातांनी नाजूक व क्‍लिष्टं कामं (गुंडी लावणे, बक्कल सोडणे, नाडीची गाठ मारणे वगैरे) करता न येणे, पायातली शक्ती जाऊन चालणं बंद होणे वगैरे गोष्टी घडू शकतात. हा आजार जर असाच वाढत गेला, तर वेळीच शस्त्रक्रिया करावी लागते. 

या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की मणक्‍यांच्या बऱ्याच आजारांचं मूळ हे "डिस्क'च्या समस्येत असतं. म्हणूनच दोन मणक्‍यांमधल्या डिस्कचा दाब नेमका कसा बदलतो. हे बघणं महत्त्वाचं आहे. 

स्पाईन क्‍लिनिकमध्ये येणारे बरेच लोक हे खूप वेळ बसून काम करणारे असतात. यात "कॉम्प्युटर सॉफ्टवेअर' कंपनीत काम करणारे अनेक असतात, पण इतरही व्यवसायातील असतात. नेमकी कोणत्या प्रकारे उठ-बस केली असता डिस्कमधला दाब कमी-जास्त होतो, यावर केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष पुढे दिला आहे. कंबरेच्या मणक्‍यातील डिस्क मधला दाब यात मोजला आहे. 

उताणं झोपलेल्या अवस्थेत (कापसाच्या घट्ट गादीवर) 
- 25 कि.ग्रॅ. 
एका कुशीवर झोपल्यास - 75 कि.ग्रॅ. 
सरळ उभे राहिल्यास - 100 कि. ग्रॅ. 
उभे राहून पुढे वाकल्यास - 150 कि. ग्रॅ.

उभं राहिलेले असताना पुढे वाकून जड वस्तू उचलताना - 225 कि. ग्रॅ. 
मागे टेकून सरळ पाठ ठेऊन बसल्यास - 150 कि. ग्रॅ. 
बसलेल्या अवस्थेत पुढे वाकून जड वस्तू उचलताना - 275 कि. ग्रॅ. 

यावरून स्पष्ट दिसतं की, बसलेल्या स्थितीत डिस्कमधला दाब सर्वाधिक असतो. पाठीत पोक काढून बसल्यास तर तो फारच वाढतो. खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तीकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की, संपूर्ण पाठीला नकळत पोक आलेला असतो, मान पुढे वाकलेली असते व कंबर मागे. या स्थितीतच डिस्कचा दाब खूप वाढलेला असतो. 

काय कराल? 
यावर काय करावं असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. यावर उत्तर असे - 
खूप वेळ बसून काम करण्याआधी दहा मिनिटं झप-झप चालून ‘वॉर्म-अप’ करावा. पोटावर झोपून अर्धा मिनिटे सहज जमेल तेवढे भुजंगासन करावे आणि मग पाठ व कंबर सरळ ठेवून बसावे. खुर्चीचे सीट फार मऊ नसावं. पाठ सहज टेकली जाईल अशा प्रकारे स्थिती असावी. नकळत पोक येऊ नये म्हणून कंबरेच्या मागे मध्यम आकाराची उशी घ्यावी. अर्धा-पाऊण तासाने उठून थोडं चालून प्रथम ताडासन व नंतर भुजंगासन करावे (प्रत्येकी वीस सेकंद) आणि पुन्हा बसून काम सुरू करावे. याच बरोबर नियमित पाठीचे व्यायाम करणे व वजन कमी ठेवणे उपयुक्त आहे. मणक्‍याचं ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनासुद्धा याचा उपयोग होतो.

मज्जासंस्थेचे विकार
36 टक्के  - मोटार अपघातामुळे 
25 टक्के - पडल्यामुळे
17 टक्के  - चुकीच्या  जीवनशैलीमुळे
13 टक्के  - अल्कोहोल किंवा तत्सम सेवनामुळे
09 टक्के - खेळताना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue Dr. jaydev panchwagh article