गब्दुल्याची गोष्ट

डॉ. जयश्री तोडकर, संतोष शेणई
Friday, 11 May 2018

अगदीच किडकिडीत असू नये. किडकिडीत असणे आणि सडपातळ असणे यात फरक आहे. अंगावर थोडे मांस चढावेच. पण आपल्या अंगावर मांस चढलेय की चरबी वाढलीय याकडे लक्ष द्यायला हवे.

‘जाड्याभरड्या,’ ‘फोपशा,’ ‘गब्दुल्या’ अशा आपण आपल्या मित्रांना हाका मारतो. त्यात सलगी असते, कोणत्याही प्रकारची कुचेष्टा नसते. पण हेच शब्द आपण तिऱ्हाईताच्या संदर्भात वापरले किंवा भांडणात वापरले तर त्यात कुचेष्टा डोकावते. म्हणजे लठ्ठपणा हा कुचेष्टेचा विषय कधी होईल व कधी होणार नाही हे दोघांमधल्या नात्यावर अवलंबून असते. याचाच अर्थ असा, की लठ्ठ व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कुचेष्टेचाच असतो. ‘लठ्ठ’ व ‘गलेलठ्ठ’ या विशेषणांचा रूढ अर्थ जवळ जवळ एकच आहे. तरीही खूप लठ्ठ व्यक्तीचे वर्णन करताना ‘गलेलठ्ठ’ हे विशेषण वापरले जाते. लट्ठ हा शब्द हिंदीतील ‘लठ’ या पुल्लिंगी नामावरून बनला आहे. ‘लठ’ म्हणजे ‘सोटा.’ थोडा जाडजूड ‘वासा’ या अर्थाने हिंदीत ‘लठ्ठा’ असा शब्द आहे.

संस्कृतमध्ये ‘गल’ म्हणजे ‘गला.’ त्यावरून ‘जाडजूड गळा असलेला’ तो ‘गलेलठ्ठ’ असा शब्द बनला असावा. आपल्याला जाड्या-रड्याची जोडी आठवतेय? म्हणजे लॉरेल-हार्डीची ही जोडी. त्यातील ऑलिव्हर हार्डी हे गलेलठ्ठ या शब्दासाठी प्रसिद्ध असे उदाहरण नजरेसमोर येते. त्याच्यासाठी ‘जाड्या’ असा शब्दप्रयोग केला जातो. संस्कृतातील ‘जड’वरून मराठीत ‘जाडा’ असा शब्द बनला, असे मानले जाते. संस्कृतात ‘जड’चा अर्थ ‘लठ्ठ’ असा असल्याचे शब्दकोशात तरी दिसत नाही, मात्र मराठीत ‘जड’ म्हणजे ‘वजनदार’ असाच अर्थ आहे, म्हणजेच ‘जड,’ ‘जाड,’ ‘जाडा,’ ‘जाड्या’ असे शब्दाचे वजन बदलत गेलेले आढळते. लठ्ठ असलेल्या ठेंगण्या व्यक्तीला ‘आडव्या अंगाचा’ असे म्हटले जाते, अशा व्यक्तींच्या बाबतील ‘गब्दुल’ असाही शब्दप्रयोग केला जातो. एखादी व्यक्ती लठ्ठ होते, तशी तिची ताकद कमी होत जाते हा अनुभव आपण व्यवहारातही घेत असतो. या व्यक्ती लवकर दमतात. अशा व्यक्तींना ‘फोपसा’ किंवा ‘फोपशा’ असा शब्द वापरला जातो. अशा लोकांच्या बाबतीत ‘स्थूल’ हा संस्कृतातून आलेला शब्दही वापरला जातो. आशय तोच आहे, पण आता कुचेष्टेची छटा उरत नाही. संस्कृतातील शब्द वापरले म्हणजे संभावितपणा, ही समजूत त्यामागे असते. शरीराचा मोठा आकार हा अभिमानाचा व आकर्षणाचाही विषय असू शकतो. यासाठी ‘तगडा,’ ‘धिप्पाड’ या विशेषणांचा वापर केला जातो. ‘तगडा’ या शब्दाने मजबूतपणा व्यक्त केला जातो, तर उंच व मजबूत बांध्याच्या व्यक्तीसंदर्भात ‘धिप्पाड’ हे विशेषण वापरले जाते.

लठ्ठ म्हणावे कोणासी? जो गलेलठ्ठ आहे, त्याच्यासाठी असा प्रश्‍न पडणार नाही. ती व्यक्ती स्थूल असल्याचे नजरेनेच स्पष्ट दिसते. पण जे लठ्ठ असूनही तसे मानण्यास तयार नसतात, त्यांच्यासाठी हाच प्रश्‍न महत्त्वाचा आहे. म्हणजे पाहा, आपण एखाद्याला म्हणतो, ‘‘अरे, पूर्वी काय किडकिडीत होतास, आता अंगाने चांगला भरलायस !’’ आपल्या बोलण्यातही नकळत कौतुक असते. पण हे जे ‘अंगाने भरणे’ आहे ते लठ्ठपणाकडे नेत असते. हो, एक खरे आहे, की अगदीच किडकिडीत असू नये. किडकिडीत असणे आणि सडपातळ असणे यात फरक आहे. अंगावर थोडे मांस चढावेच. पण आपल्या अंगावर मांस चढलेय की चरबी वाढलीय याकडे लक्ष द्यायला हवे. एखादी व्यक्ती अंगाने चांगलीच भरलेली दिसते; पण कदाचित ती ‘लठ्ठ’ या गटात असणारही नाही, तर ती ‘मजबूत,’ ‘तगडी,’ ‘वजनदार’ या गटात बसेल. मग लठ्ठ म्हणावे कोणासी? आपण आपल्या वजनाकडे लक्ष द्यायला हवे. कॉलेजमध्ये असताना एकाला फिशपाँड मिळाला होता. ‘चंद्र वाढतो कलेकलेने, चंद्रकांत वाढतो किलोकिलोने.’ यातली गंमत विसरा. जर आपले वजन असे व्यस्त प्रमाणात वाढत गेले, तर आपले शरीर नक्कीच अस्ताव्यस्त पसरत जाईल, हे नक्की. कारण हे वजन हाडांचे, स्नायूंचे किंवा मांसाचे नसते, तर चरबीचे असते. हाडांचे व स्नायूंचे वजन वाढते तेव्हा शरीराला एक प्रकारे कमनीयता येते. शरीरसौष्ठव जाणवू लागते. पण चरबी वाढली की ती शरीरात जागा मिळेल तिथे साचत जाते आणि काही काळाने शरीर मैद्याच्या पोत्यासारखे बेढब दिसू लागते. म्हणून आपण आपल्या वजनाबाबत सावध असायलाच हवे. 

आणखी एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन केवळ काट्यावर तोलून उपयोग नाही. म्हणजेच वजन वाढले तर वाढू दे, की असे म्हणून गप्प बसून उपयोगाचे नाही. कारण चरबी शरीराचे केवळ वजन वाढवत नाही, तर चरबी कितीतरी रसायने निर्माण करते आणि आपल्या शरीराला हानी पोचवते, हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे पाहा, चेंडू व बाँब दोन्ही गोल असतात. पण त्या दोन्ही वस्तू हाताळण्यात फरक करावा लागतो. चेंडूलाही त्याचे असे वजन असते. पण चेंडूने खेळता येते. बाँबने खेळणे जिवावर उठेल. चरबी ही बाँबगोळ्याप्रमाणेच विध्वंसक असते. आपण स्थूल आहोत की नाही, याची खात्री कशी करून घ्यायची? उंची व वजनाचे प्रमाणित तक्ते उपलब्ध आहेत. त्याचा आधार घेता येईल. आपल्या उंचीनुसार योग्य वजन आहे का, हे आपल्यालाच तपासून पाहता येते. उंचीच्या प्रमाणात वजन दहा टक्‍क्‍यांनी जास्त असेल, तर तुम्ही स्थूल होत चालला आहात, म्हणजे तुमचे वजन थोडे वाढलेले आहे, असे समजायला हरकत नाही. हेच प्रमाण वीस टक्‍क्‍यांनी अधिक असेल तर मात्र तुम्ही लठ्ठ आहात, याची खूणगाठ मनाशी पक्की करा. अर्थात, हे वजन पाहताना आणखी एका गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते. वजन काट्याबरोबरच तुमचे दिवसभरातील श्रम विचारात घ्यावे लागतील. म्हणजे असे, की तुम्ही दिवसभरात काहीही शारीरिक श्रम करीत नसाल, पुरेसा व्यायामही करीत नसाल आणि तुम्ही बैठे काम करीत असाल, तर तुमचे वजन उंचीच्या प्रमाणात योग्य असूनही तुम्ही लठ्ठ आहात, असे होऊ शकते. पण याउलट एखादा श्रमिक, शारीरिक मेहनत करणारा कामगार, मैदानी खेळ खेळणारा खेळाडू यांचे वजन उंचीच्या प्रमाणात वीस टक्‍क्‍यांनी अधिक असूनही त्यांचा लठ्ठवर्गात समावेश होणार नाही; तर ते मजबूत किंवा वजनदार वर्गात मोडतील. कारण शारीरिक मेहनत करणाऱ्यांची हाडे व स्नायू मजबूत होतात; हाडांचे व स्नायूंचे वजन वाढलेले असते. वजनदार हाडे व स्नायू शरीराला तगडी बनवतात, तर शारीरिक मेहनत न करणाऱ्यांमध्ये चरबी वाढते व त्यामुळे वजन वाढते. त्यामुळेच उंचीच्या प्रमाणात वजन योग्य वाटले तरी ते चरबीचे वजन असल्याने ती व्यक्ती लठ्ठ मानली जाते. याचाच सरळ अर्थ असा, की लठ्ठपणा म्हणजे शरीरातील चरबीचे अतिरिक्त प्रमाण.

९० कोटी - कुपोषण होणारे
१५० कोटी - अतिपोषण होणारे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue Obesity