पुरुषांचा व लहान मुलांचा मूत्रदाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुषांचा व लहान मुलांचा मूत्रदाह

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मूत्रदाहाचे प्रमाण कमी आढळते. मात्र मूत्रदाह लवकर लक्षात येऊन त्यावर उपचार सुरू व्हायला हवेत. कित्येकदा मूत्रदाहाचे मूळ कारण दुरुस्त करायला शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबावा लागतो. तसे वेळीच केले नाही, तर त्याचा परिणाम म्हणून मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो.

पुरुषांचा व लहान मुलांचा मूत्रदाह

पुरुषांमध्ये मूत्रदाहाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा कमी आढळते. याचे मुख्य कारण म्हणजे पुरुषांच्या बाह्य मूत्रमार्गाची लांबी जवळजवळ चौदा ते सोळा सेंटिमीटर असते. या लांबीमुळे जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी असते. मूत्रमार्गात जंतुसंसर्ग तीन प्रकारे होऊ शकतो.

रक्तामधून,
मूत्रमार्गातून,
रसग्रंथीमधून.

मूत्रमार्गामध्ये जंतू हे असतातच; पण शरीराची प्रतिकारशक्ती काही कारणास्तव कमी झाली तरच हे जंतू डोके वर काढतात आणि जंतुसंसर्ग जाणवतो, ते मूत्रदाहास कारणीभूत होतात. अन्टिबायोटिक्‍ससारखी औषधे योग्य प्रमाणात व योग्य रीतीने दिली गेली नाहीत, तर त्याचा परिणाम म्हणून मूत्रदाह होऊ शकतो. आपल्याकडे वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेण्याचा प्रकार सर्रास घडतो. त्यात ही चूक घडू शकते. मूत्रपिंडापासून मूत्रद्वारापर्यंतच्या कोणत्याही अवयवावरती दाब आल्यास, तेथे काही अडथळा निर्माण झाल्यास मूत्रपिंडदाह होऊ शकतो. जंतुसंसर्गामुळे मूत्रपिंड किंवा मूत्राशयास सूज आल्याने मूत्रपिंडदाह होऊ शकतो. 

मूत्रदाहाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे मूत्रविसर्जन पूर्ण न होणे. जर मूत्रविसर्जनानंतरही लघवी मूत्राशयात साठून राहत असेल तर या शिल्लक राहणाऱ्या लघवीमध्ये जंतू झपाट्याने वाढीला लागतात. जसे वाहत्या पाण्याला दुर्गंधी येत नाही; पण डबक्‍यात किंवा मोरीमध्ये साठून राहणाऱ्या पाण्याला जंतूंची वाढ झाल्याने दुर्गंधी येते, तसे येथेही घडते. काही वेळा मूत्राशयात अडथळ्यांमुळे फुगे (ब्लॅडर डायव्हर्टिकुलम) तयार होतात. यामध्ये मूत्र साठून मूत्रदाह होतो.

मूत्रविसर्जन पूर्ण न होण्याची कारणे पुढीलप्रमाणे देता येतात.
बाह्य मूत्रमार्ग बारीक होणे (स्ट्रिक्‍चर युरेथ्रा)
मूत्राशयाचे तोंड बारीक होणे
मूत्रमार्गात प्रोस्टेट ग्रंथींमुळे अडथळा निर्माण होणे

पुरुषांमध्ये प्रजननमार्ग व मूत्रमार्ग हे संलग्न असतात. वृषणांकडून निघणाऱ्या वीर्यवाहक नलिका प्रोस्टेट ग्रंथींजवळ बाह्यमूत्रमार्गात उघडतात. यामुळे तीव्र स्वरूपाच्या मूत्रदाहात जंतू वीर्यवाहक नलिकांमार्फत वृषणांमध्ये जातात. अशा वेळेस वृषणांचा जंतुसंसर्ग होऊन त्यांना सूज येते. म्हणूनच जर वृषणांना वारंवार सूज येत असेल तर मूत्रमार्गाची तपासणी करणे गरजेचे ठऱते.

मूतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ, मूत्रमार्ग आकुंचित होणे हे विकार खूप सामान्यपणे दिसून येतात. बऱ्याच वेळा मूत्रमार्गाच्या रचनेत दोष निर्माण होत असतो. त्यामुळे मूत्रवहनाच्या कार्यात बिघाड होतो. यामध्येही मूत्रदाह हा उपद्रव असतो. वेळेवर उपचार न केल्यास त्याचे रूपांतर तीव्र मूत्रदाहात होते. अशा वेळास मूतखडा काढणे, प्रोस्टेट ग्रंथींची शस्त्रक्रिया करणे, मूत्रमार्गाची पुनर्रचना करणे असे उपचार योजण्याची गरज असते. मूत्रदाह बरेच दिवस मूत्रपिंडात राहिल्यास औषधोपचारांचा किंवा अडथळा काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही; कारण तोवर मूत्रपिंड निकामी झालेले असते. त्यामुळे मूत्रपिंड काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.

मुलांमधील समस्या
काही दोष हे मूत्रमार्गातील जन्मजात वैगुण्यांमुळे होत असतात. बाह्य मूत्रमार्गात जन्मजात एक प्रकारचा पडदा, अनैसर्गिक झडपा निर्माण होतात.  त्यामुळे मूत्रविसर्जनासाठी बाळाला खूप जोर लावावा लागतो. कालांतराने त्याचा दाब सतत पडून मूत्रवाहक नलिकांच्या झडपा निकामी होतात आणि मूत्राशयात साठलेले मूत्र विसर्जनाच्या वेळी उलट्या दिशेने म्हणजे मूत्रवाहक नलिकेतून पुन्हा मूत्रपिंडाकडे प्रवाहित होते. मूत्रविसर्जन थांबले की, पुन्हा मूत्रपिंडाकडे गेलेले मूत्र परत मूत्राशयाकडे जमा होते. या प्रक्रियेमुळे वारंवार व तीव्र स्वरूपाचा मूत्रदाह होतो. वेळीच लक्ष न दिल्यास लहान वयातच दोन्ही मूत्रपिंडांवर ताण पडून ती निकामी होऊ शकतात. काही वेळेस मूत्रपिंड आणि मूत्रवाहक नलिका यांच्या सांध्यात अवरोध निर्माण होतो किंवा मूत्राशय व मूत्रवाहक नलिकेत मांस वाढते. त्यामुळेही मूत्रवहनात अडथळा निर्माण होतो. अशा दोषांमुळे मूत्रपिंड कायमचे निकामी होण्याचा धोका संभवतो. अशा वेळेस तातडीची शस्त्रक्रिया करावी लागते. हल्ली पोटातल्या बाळाचीही सोनोग्राफी केली जाते. त्या वेळी अशा जन्मजात वैगुण्याचे निदान करता येते. मी स्वतः सात दिवसांच्या बाळाच्या दोन्ही मूत्रपिडांवर शस्त्रक्रिया केली आहे. काही वेळा हा दोष अज्ञात राहतो आणि उपद्रव झाल्यानंतर त्याचे निदान होते. 

अस्वच्छतेमुळेही बाळाला जंतुसंसर्ग झाल्या कारणाने मूत्रदाहाचा त्रास होतो. विशेषतः अर्भकाला शौच व लघवी झाल्यानंतर त्याचे लंगोट ताबडतोब बदलले पाहिजेत. ते कोरडे असले पाहिजेत. बाळाची आई व इतर माणसे कामात असतील, तर खराब झालेले लंगोट तातडीने बदलायचे राहून जातात. त्यामुळे शौचातील जंतू मूत्रमार्गात प्रवेश करतात व मूत्रदाहाचा त्रास बाळाला होऊ लागतो. लहान मुलांचे दात किडल्यानंतर त्याचा विषारी परिणाम म्हणून जंतुसंसर्ग झाल्याचे व त्यामुळे मूत्रदाह झाल्याचे आढळते. टॉन्सिल्स फार सुजल्यामुळेही मूत्रदाहाचा विकार लहान मुलांमध्ये आढळतो. अशा वेळी सकाळी झोपून उठल्यावर चेहऱ्यावर, विशेषतः पापण्यांवर सूज दिसते. असा त्रास होत असल्यास योग्य उपचार वेळीच करावेत. अन्यथा ही सूज साऱ्या शरीरभर पसरू लागते, हृदय कमजोर होते.

बाळाला मूत्रदाहाचा त्रास असल्यास ते मूत्रविसर्जनाच्यावेळी रडू लागते. बाळ वारंवार शिश्नाला हात लावते, ओढू लागते. बाळाला वरचेवर ताप येतो. त्याच्या शरीराची वाढ खुंटते. असे काही आढळल्यास वैद्यकीय सल्ला तातडीने घेणे आवश्‍यक आहे. 

नाळगूद
लहान मुलांमध्ये नाळगूद हा विकारही आढळतो. मुलांचा घसा दुखत असताना विशेष काळजी घेतली नाही, तर नाळगूदचा त्रास संभवतो. मुलांचा घसा दुखत असताना बहुतेकदा दुखणे आपोआप बरे होईल किंवा घरगुती उपचारांनी दुखायचे थांबेल असे म्हणून पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. काही वेळा घरगुती उपचारांनी घसा दुखायचा थांबतोही; पण काही वेळा ‘स्टेप्टोकोकस‘ या विषाणुंमुळे घसा दुखत असतो. तो घरगुती उपायांनी आटोक्‍यात येत नाही. किंवा घरगुती उपायांनी घसा दुखणे थांबले तरी विषाणूंचा प्रभाव रोखला गेलेला नसतो. अशा वेळी जंतुरोधक अशा अन्टिबायोटिक्‍स औषधांचाच वापर करावा लागतो. पण तसे करण्याकडे दुर्लक्ष झाले की, विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक होतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या मूत्रपिंडावर होतो. घसा दुखायचे कमी झाल्यानंतर साधारणतः दोन आठवड्यांनी या आजाराला सुरवात होते. 

जर घसा दुखण्याचा त्रास झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यांनी मुलाला ताप यायला लागला, मुलाची नाडी जलद चालते आहे असे आढळले किंवा मुलाचा चेहरा, त्याचे हात-पाय यावर सूज दिसली तर सावध व्हायला हवे. अशा वेळी मुलाच्या लघवीकडे लक्ष द्या. मुलाच्या लघवीचे प्रमाण कमी झालेले असेल, त्याला स्वच्छ व साफ लघवी होत नसेल, त्याच्या लघवीचा रंग लालसर व धुरकट दिसत असेल, तर त्याला नाळगूद झालेला असू शकतो हे ध्यानात घ्या. या आजारात दुर्लक्ष झाले तर आजार वाढत जातो, अंगावर सूज वाढत जाते, ताप वाढू लागतो व अखेर लघवी व्हायचे बंद होते. त्याचा थेट परिणाम मूत्रपिंडांवर होतो. 

या आजारात वैद्यकीय सल्ला तातडीने घ्या. पेनिसिलीनसारखे एखादे इंजेक्‍शन डॉक्‍टर देण्याची शक्‍यता आहे. मुख्य म्हणजे पूर्ण बरे होईपर्यंत मुलाला पूर्ण विश्रांती द्या. या आजारात मुलांने पूर्णतः झोपूनच राहिले पाहिजे हे विसरू नका. मुलाच्या आहारातील मीठ तातडीने बंद करा. दूध, अंडी, डाळी किंवा मटण यांसारखे प्रथिनाचे पदार्थही मुलाला या काळात अजिबात देऊ नका. पूर्ण बरे वाटेपर्यंत तूप-भात खायला द्यावा. हे पथ्य पाळले, पूर्ण विश्रांती घेतली आणि वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार केले तर मूल नाळगूद या विकारातून बाहेर पडू शकेल.

९७.५ टक्के - मूत्रपिंडविषयक त्रास एकदा तरी झालेले
1० टक्के - मूत्रपिंडासंबंधी गंभीर त्रासावर उपचार घेऊ शकणारे
स्त्रिया १ /४  पुरुष   १ /5 - मूत्रपिंडविषयक आजार