डॉक्‍टर, मला चष्मा द्या!

डॉ. माधवी मेहेंदळे
Friday, 11 May 2018

डोळ्यांच्या विकारांमुळेच डोळे दुखतील असे नाही. काही वेळा सामाजिक, मानसिक दबावामुळेही डोळ्यांचा त्रास सुरू झाल्यासारखे भासू लागते.

‘‘डॉक्‍टर, तुम्ही मला आता या वेळेस तरी चष्मा देऊनच टाका.’’ बारा वर्षांची चिमुरडी मला अधिकाराने सांगत होती. चेहऱ्यावर मोठ्या माणसासारखे भाव. ‘‘मला फार त्रास होतो बघा. डोकं सारखं दुखतं.’’ हा आमचा संवाद या आधी अनेक वेळा झालेला. अनेक वेळा ती माझ्याकडे अशीच काही तरी तक्रार घेऊन येत होती. पण, प्रत्येक वेळी तिचे डोळे तपासले, की ते नॉर्मलच आढळायचे. तिला जर चष्म्याचा नंबर नव्हताच, तर मी तरी चष्मा कसा देणार? इतर कुठलंही कारण सापडेना. शेवटी एक दिवस तिच्या आईला वेगळं भेटायला बोलावलं. आईशी बोलण्यातून लक्षात आलं, की या मुलीचे वडील तीन-चार वर्षांपूर्वी वारले. आई आता पुन्हा लग्न करायचा विचार करीत होती. पण, प्रत्येक स्थळ बघताना ती मुलीला तिथे घेऊन जात होती. मुलीला विचारत होती, की ‘तुला इथे कसं वाटतं? तुला इथे कम्फर्टेबल वाटत असेल, तरच आपण या स्थळाचा विचार करू. तुला नको वाटत असेल तर तसं सांग.’

आईला मुलीची काळजी वाटत होती. आपल्या पुनर्विवाहामुळे मुलीला काही त्रास होऊ नयेत, असं तिला वाटतं होतं. पण, त्यासाठी ती निर्णयाची जबाबदारी त्या बारा वर्षांच्या मुलीच्या खांद्यावर टाकत होती. आपल्या आईने कुणाशी लग्न करावं, हे त्या मुलीने सांगणं अपेक्षित होतं. ती कसं सांगणार? बारा वर्षांच्या मुलीमध्ये अशी क्षमता कुठून येणार? त्या अपेक्षेचं ओझं तिला पेलवत नव्हतं. त्यामुळे मग ‘चष्मा द्या- डोकं दुखतं.’ अशा नसलेल्या तक्रारी घेऊन ती माझ्याकडे येत होती. तिच्या आईला समजावून सांगितलं, हा निर्णय ती घेऊ शकणार नाही. हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. तिचं मन लक्षात घेणं ठीक आहे, पण निर्णय तुमचा! वडिलांचं निधन व आईचा पुनर्विवाह हा प्रकार क्‍लेषदायक आहे, पण काय करणार? काही क्‍लेष सोसावेच लागतात. त्यात तिला न पेलवणारी जबाबदारी देऊ नका.

माझी नेहमीची पेशंट एक हुशार मुलगी. अचानक पुस्तक वाचलं, बघितलं की खूप चक्कर येते म्हणून दाखवायला आली. पंधरा दिवसांनंतर बारावीची परीक्षा. पालक प्रचंड काळजीत पडलेले. मेरीटमध्ये येणारी आपली मुलगी अशी ऐन परीक्षेच्या आधी आजारी पडली, तर कठीणच! ती माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता. ‘‘मी पुस्तक हातात धरूच शकत नाही.’’

मी तपासलं. कुठे काही कारण सापडेना. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. ‘‘अगं, आता पुस्तक बघूच नको. दोन दिवस मस्त टेकडीवर फिरायला जा. नाहीतर एक छानपैकी सिनेमा बघ. अभ्यास खूप झाला.’’

ती एकदम हमसाहमशी रडू लागली. मी तिला मनसोक्त रडू दिलं. फक्त तिच्या पाठीवरून हलका हात फिरवत राहिले. शांत झाल्यावर म्हणाली, ‘‘आता वाटतंय, मी वाचलेलं मला काही आठवणारच नाही परीक्षेत.’’ बिचारी मुलं. किती त्यांना ताण असतो परीक्षेचा-रिझल्टचा. पुन्हा मी समजावलं, ‘‘आधी वाचलेलं सगळं निश्‍चित आठवतं. ते वाया जात नाही आणि तुझा मेरिटमध्ये नंबर खाली आला किंवा नंबर आला नाही तरी काही बिघडत नाही. आम्हाला सगळ्यांना तू तितकीच आवडशील जेवढी आता आवडतेस.’’ आई-वडिलांच्या नजरेतून, इतरांच्या नजरेतून आपण उतरू का याचा दबाव. तो इतरांनी दिलेला नसेलही, पण तिचा तिनेच घेतला होता. रडून मोकळं झाल्यावर ती छान हसली. आज छान सिनेमा बघेन म्हणाली. बारावीचा रिझल्ट लागला त्या दिवशी तिचा पेपरमध्ये फोटो बघितला. मुलींमध्ये पहिली आली होती.

************************************

शेजारी हॉस्पिटल असणाऱ्या एका सीनियर डॉक्‍टरांचा फोन आला. ‘‘माझ्या नातेवाइकाला अचानक दिसेनासं झालंय. मी लगेच पाठवतो. तू बघून घे.’’

सात-आठ मंडळी आली. त्या माणसाला हाताला धरून आणलं. तो सगळीकडे चाचपडत, धडपडत होता. ‘सकाळी उठल्यापासून त्याची नजर गेली,’ असं सगळे म्हणत होते. तपासलं. पुन्हा काहीच सापडेना. अगदी क्वचित प्रसंगी मेंदूमध्ये काही विशिष्ट बिघाड झाला, तर असं होऊ शकतं. म्हणजे डोळे तपासल्यावर नॉर्मल दिसतात. पण, मेंदूतल्या बिघाडामुळे नजर गेलेली असते. त्या पेशंटला माझ्या खोलीतल्याच एका कोपऱ्यातल्या खुर्चीत बसवलं. बाकी सगळ्या नातेवाइकांना खोलीबाहेर काढलं व शांतपणे माझे पुढचे पेशंट तपासू लागले. ‘त्या पेशंटकडे दुर्लक्ष केलं. मध्ये मध्ये मी हळूच त्याच्याकडे फक्त कटाक्ष टाकत होते. पंधरा-वीस मिनिटांनंतर मी त्याच्याकडे कटाक्ष टाकला तेव्हा तो खोलीतून बाहेर जाणाऱ्या दुसऱ्या पेशंटकडे बघतो आहे, असं मला दिसलं. अचानक त्याने माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली आणि तो माझ्याकडे ‘बघतो’ आहे, हे माझ्या लक्षात आलं. ती नजर आंधळ्याची नव्हती. ती बघणाऱ्याची होती. माझं डायग्नोसिस-निदान झालं. तो माणूस चक्क खोटं बोलत होता. त्याला दिसतं होतं. माझ्या नजरेला नजर मिळवल्यावर आपली चोरी पकडली गेली, हे त्याच्याही लक्षात आलं. त्याच्याशी बोलल्यावर त्याची कहाणी कळली. त्याला नोकरी नव्हती. बायको नोकरी करीत होती. पण सगळीकडून त्यालाही नोकरी करण्यासाठी दबाव येऊ लागला होता. त्याला अजिबात नोकरी करायची इच्छा नव्हती. गावातल्या कुणाची तरी अचानक नजर गेल्याचं त्यानं पाहिलं. मग त्याला वाटलं, आपल्यालाही दिसत नाही, असं सांगितलं, तर नोकरी करायचा प्रश्‍न येणार नाही. आरामात घरी बसून राहता येईल.

************************************
‘‘डॉक्‍टर, माझ्या डोळ्यांतून खूप पाणी येतं. सारखं येतं. काय बिघडलंय ते बघा.’’ पण कुठे काहीच तर बिघडलं नव्हतं. डोळे उत्तम होते. ‘‘डॉक्‍टर, माझ्या मुलीचं लग्न झालं. तेव्हापासून हा त्रास सुरू झाला. तिला अमेरिकेचा व्हिसा मिळाला तेव्हा त्रास खूप वाढला. आता मुलगा चाललाय अमेरिकेला तेव्हा पुन्हा खूप पाणी यायला लागलं.’’

काय बोलणार यावर? काही बिघाड नाही. याला ‘रडणं’ म्हणतात आणि पुरुषांनाही रडायला येऊ शकतं. मुलांच्या बाबतीत बाप हळवा असतो. मनसोक्त रडा. तुम्हाला मोकळं वाटेल!

************************************
एक अठरा-एकोणीस वर्षांची कॉलेज तरुणी आली होती. बावरलेली, घाबरलेली. डोळ्यांची काही तरी विचित्र तक्रार करीत होती. अनुभवाने काही तरी मानसिक ताण असावा, हे मला कळलंच. माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे हा डोळ्यांचा प्रॉब्लेम नाही, त्यामुळे माझा काही संबंध नाही, असं सांगून हात झटकणं. ते फार काही चुकीचं झालं नसतं. मी डोळ्यांची डॉक्‍टर असल्याने जर डोळ्यांचा प्रॉब्लेम नसेल, तर मी काय करणार... किंवा मनावर ताण का आहे, याचा जरा शोध घेणं. शक्‍य असल्यास समुपदेशन करणं. मी दुसरा पर्याय निवडला. नुसत्या चर्चेने होणार असेल, तर सायकियाट्रिस्टकडे कशाला पाठवा. विचारल्यावर जे कळंलं ते असं-

त्यांच्या कॉलेजमध्ये एकतर्फी प्रेमातून एका मुलाने दुसऱ्या मुलाचा खून केला व नंतर आत्महत्या केली. माझ्या या तरुण पेशंटने हा प्रकार तिच्या डोळ्यांसमोर घडताना पाहिला. आपल्या डोळ्यांसमोर जर खून होताना पाहिला, तर आपली काय प्रतिक्रिया होईल? मग या कोवळ्या मुलीच्या मनावर परिणाम झाला, यात काय नवल... तिने बारावीची परीक्षा दिलीच नाही. हुशार मुलगी, पण आता जेमतेम काठावर पास होते. याला कोण जबाबदार? आपला समाज? जिथे मुलं असलं अघोरी कृत्य करतात! त्यांचे पालक? जे प्रेम-शारीरिक आकर्षण या विषयावर आपल्या मुलांशी मोकळी चर्चा करण्याचं टाळतात! त्यामुळे या असल्या भावनांचं काय करावं, याला आपल्या जीवनात किती स्थान आहे, हे न कळलेली ही मुलं गोंधळात पडतात, की टीव्ही -सिनेमा ही प्रसारमाध्यमं? ज्यांत या भावनांना नको तेवढं महत्त्व देऊन त्यांचं उदात्तीकरण केलं जातं! म्हणजेच या मुलीवर उपचार मी एकटी करू शकत नव्हते. यात समाज, पालक, प्रसारमाध्यमं या साऱ्यांचा सहभाग हवा होता.

कुठल्या मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमात आहे यावरचा उपचार? मेडिकल कॉलेजच्या कक्षेबाहेरचे आहेत हे रोग आणि यावर असणारे उपचार! 

माझी एक पेशंट (उच्चवर्गीय कुटुंबातली) लग्न होऊन अमेरिकेला गेली. अधूनमधून यायची. ती कॉन्टॅक्‍ट लेन्स लावायची. नंतर कॉन्टॅक्‍ट लेन्सची ॲलर्जी यायला लागली. मी सांगितलं, मध्ये मध्ये चष्मा घाल. तसं तक्रारीचं काही कारण नव्हतं. दिसायला छान, गोरीपान, सुंदर मुलगी हळूहळू ती अमेरिकेला कमी जाते व इथेच जास्त राहते, असं लक्षात आलं. काही तरी बिनसलं होतं आणि त्यामुळे डोळ्यांच्या नसलेल्या तक्रारी उगवत होत्या. जरा विचारल्यावर तिने सांगितलं, की तिच्या नवऱ्याला ‘सुंदरच’ बायको हवी आहे. ही मुलगी सुंदर होतीच. पण, ती कॉन्टॅक्‍ट लेन्स न घालता कधी कधी चष्मा घालत होती. तिने चष्मा घातला की ‘बायकोच्या सौंदर्याला बाधा येते’ म्हणून नवऱ्याचा आक्षेप होता आणि शेवटी लग्नाला पाच-सहा वर्षे झाली असतानाही ‘चष्मा लावते’ या कारणाने त्याने तिला टाकली. 

मी डोळ्यांची डॉक्‍टर यावर इलाज करू शकते? ‘चष्म्यामुळे सौंदर्यात बाधा येते’ हे सांगण्याचा व त्यामुळे बायकोला ‘टाकण्याचा’ अधिकार गाजवणार पुरुष. उपचाराची खरी गरज त्याला आहे. त्याला चष्मा देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750th issue Dr. Madhavi Mehendale article