महत्त्वाच्या तीन गोष्टी

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 11 May 2018

उपचारांच्या यशात महत्त्वाचा वाटा असतो ‘निदाना’चा. ‘निदाना’च्या विविध पैलूंबाबत रुग्णांनाही माहिती असली पाहिजे.

यशस्वी उपचाराचा पाया ‘अचूक निदान’ आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर अमेरिकेतील बॉस्टन येथे सर विल्यम ऑस्लट नावाचे एक विख्यात धन्वंतरी होऊन गेले. त्यांच्या व्यावसायिक यशाचे रहस्य काय आहे, असे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारले असता, त्यांनी दिलेले उत्तर शंभर वर्षांनीही तितकेच मार्मिक आहे. डॉक्‍टरसाहेब म्हणाले, ‘‘माझ्या यशाचे रहस्य तीन गोष्टी जाणण्यात आहे. पहिली म्हणजे रुग्णाच्या विकाराचे निदान. कारण, निदान केल्याखेरीज रुग्णाला कोणता उपचार सुचवावा, हे मला कळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे परत निदान. कारण, रुग्ण बरा झाला आहे, की त्याला नुसते बरे वाटते आहे, यावर किती काळ उपचार चालू ठेवणे आवश्‍यक आहे हे ठरवावे लागते. ते केवळ निदान समजले तरच शक्‍य आहे आणि तिसरी व शेवटची गोष्ट म्हणजे परत निदान. कारण, रुग्णासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे निदान समजले तरच मला देता येतात, तेव्हा वैद्यकीय व्यावसायिक यशाचे रहस्य म्हणजे निदान, निदान आणि निदान हेच आहे.’’ या निदानाच्या शरीरक्रियात्मक, शरीररचनात्मक, विकृतीचे ज्ञान होणे आणि मूळ कारणाची मीमांसा (फिजिऑलॉजिकल डायग्नोसिस, ॲनॉटॉनिकल डायग्नोसिस, पॅथालॉजिकल डायग्नोसिस, इंटिओलॉजिकल डायग्नोसिस) अशा चार पैलूंची माहिती असणे आवश्‍यक आहे. 

यापैकी पहिली पायरी शरीरक्रियांत कोणते बदल झाले आहेत, हे जाणून घेण्याची. हा निदानाचा पाया होय. रुग्णाच्या तक्रारीचं निवारण करण्याकरिता शरीरक्रियेत झालेले बदल जाणून ते दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. एखादा रुग्ण धाप लागते, अशी तक्रार करतो. ही धाप श्‍वासनलिका आकुंचित पावल्यामुळे लागत आहे, की फुफ्फुसांत पाणी साठल्यामुळे लागत आहे, याचा निर्णय रुग्णाला तत्काळ आराम देण्याच्या दृष्टीने नितांत महत्त्वाचा असतो. श्‍वासनलिका आकुंचित होत असल्या (ब्रॉन्कोस्पाझम), तर या नलिका रुंदावण्याची औषधे (ब्राँकोडायलेटरर्स) वापरून लगेच बरे वाटेल. फुफ्फुसांत पाणी साठत असेल (पल्मेनरी कंजेक्‍शन अथवा एडिया), तर लघवी जास्त होण्याची (डाययुरेटिक्‍स) द्यावी लागतील. रुग्णाच्या जीवन-मृत्यूचे सगळे प्रश्‍न शरीरक्रियांशी निगडित असतात. प्राणवायूचा पुरवठा होणे न होणे, रक्तशर्करा खूप वाढणे अथवा फारच कमी होणे, एखाद्या अवयवाला रक्तपुरवठा कमी होणे किंवा अतिरेकी पूर आल्यासारखा होणे. काही क्षार कमी किंवा जास्त होणे हे शरीरक्रियांचे बदल तातडीने जाणणे आवश्‍यक असते. यात दिरंगाई झाली, तर रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो. यास्तव शरीरक्रियात्मक बदलांचे निदान हा सर्व उपचारांचा पाया असतो. हे निदान न करता केवळ मूळ कारणाची मीमांसा करणे कधीही योग्य होणार नाही. चयापचयांत होणारे बदल (मेटॅबॉलिक चेंजेस), रक्तवाहिन्यांची क्षमता, रक्तघटकांतील बदल, हातापायांच्या मज्जातंतूचे कार्य समजणे हे सारे शरीरक्रियात्मक विकाराचे भाग असतात. शरीरक्रियात्मक निदान महत्त्वाचे; परंतु तेथे निदानाच्या प्रक्रियेची सुरवात झाली, हे लक्षात ठेवले पाहिजे. धाप लागते ती श्‍वासनलिकांच्या दोषामुळे, का हृदयविकाराने, का रक्तक्षय झाल्याने, का थायरॉईड ग्रंथीच्या आजाराने, का फुफ्फुसाच्या कमकुवतपणाने हे जाणणे महत्त्वाचे आहे. शरीराच्या कोणत्या अवयवात कोठे दोष आहे, हे कळल्याखेरीज तो दुरुस्त कसा करता येईल? हृदयाची झडप अरुंद झाली असली तर रुंदावता येईल, रक्तवाहिनी अरुंद होऊन बंद पडली तर त्यात फुगा सरकवून ती रुंदावता (अँजिओप्लास्टी) येईल, अचूक ठिकाणी हाड मोडले आहे हे कळले, की ते सांधले जाण्याकरिता काय करावे, ते ठरविता येईल. शरीराला फुगवटा आला, तर तो भाग, तेथील स्नायू व इतर आवरणे कमजोर झाल्याचे कळले तर (हर्निया) त्याची शस्त्रक्रिया करता येईल. किंबहुना कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शरीररचनेत झालेला बदल अचूक कळणे अत्यंत आवश्‍यक आहे. कोठे दोष सापडतो आहे का, यादृष्टीने शोधत राहण्याची शस्त्रक्रिया केव्हाही निदानानंतर केलेल्या शस्त्रक्रियेपेक्षा गौणच मानली पाहिजे; केवळ आपद्‌धर्म म्हणूनच स्वीकारली पाहिजे. विकृतीचे निदान करण्याकरिता कोणत्या भागाचा तपास करायचा, फोटो कुठले आणि कसले काढायचे, विविध स्कॅन्स कोणत्या भागाचे करायचे, हे ठरविण्याकरिता रुग्णाच्या बिछान्याशेजारी केलेले निदानच महत्त्वाचे असते. हे सत्य नजरेआड करून चालत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor 750th issue H V sardesai article