चिंतेचे चिंतन

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 25 August 2017

चिंता ही अनिश्‍चित निर्णयाची भावनात्मक बाजू असते. उपलब्ध पर्यायांपैकी काही तरी निश्‍चित निवडले गेले, की चिंता शमते. आपल्या दैनंदिन जीवनात चिंता काही प्रमाणात उपयोगीही पडते. आपल्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही क्षेत्रांत चिंतेमुळे फायदा होतो. पण काही वेळा चिंतेचे रुपांतर मानसिक, शारीरिक तक्रारीमध्ये होते.

‘युद्ध अथवा पलायन’ हा आपले अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रतिसाद आहे. आपल्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणीव या प्रतिसादाच्या उगमात असते. खरोखरीचा धोका असला (जंगलातून जाताना समोर वाघ आला) अथवा हा प्रसंग माझ्या अस्तित्वाला आत्ता किंवा भवितव्यात धोका निर्माण करू शकेल, असा अंदाज जरी असला (परीक्षेत प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे उत्तर माहित नसणे) तरी ‘युद्ध अथवा पलायन’ यातील एक मार्ग निवडावाच लागतो. एकदा या दोन पर्यायांपैकी कोणताही एक मार्ग निश्‍चित निवडला गेला, की चिंता शमते. चिंता ही अनिश्‍चित निर्णयाची भावनात्मक बाजू असते. उलटपक्षी भीती ही भावना युद्ध अथवा प्रतिकार न करता संकटाची जाणीव होण्यातून निर्माण होते. भीती ही खिन्नता जाणवण्यापूर्वी जाणवली जाणारी भावना असते. संकटाचे परिणाम काय होतील, याची जाणीव आणि युद्ध अथवा पलायन यातील कोणता पर्याय निवडावा याची अनिश्‍चितता म्हणजे भय. आपल्या दैनंदिन जीवनात चिंता काही प्रमाणात उपयोगीही पडते. आपल्या शारीरिक आणि मानसिक (जसे परीक्षेतील कार्यान्नितसा) या दोन्ही क्षेत्रांत चिंतेमुळे फायदा होतो. अशा किफायतदार तणावाला ‘यू-स्ट्रेस’ म्हटले जाते. वारंवार आणि अतिरेकी चिंतेमुळे आपल्या क्षमतांचा ऱ्हास होऊ लागतो. त्याला ‘डिस्ट्रेस’ म्हटले जाते. असा यू-स्ट्रेस उपयुक्त असतो. लहान-सहान आजार, सौम्य व तात्कालिक वेदना, आधार नसल्याची खंत, सामान्य शिक्षा (बाकावर उभे करणे, वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड), तात्कालिक विरह अथवा आपली फसवणूक झाली किंवा आपला अहंकार दुखावला असा क्षणिक अनुभव अशा संकटातून बाहेर पडण्यात यू-स्ट्रेसमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल उपयुक्त पडतात.

खरोखरीचे घातक प्रसंग सामोरे आल्यावर त्यांना तोंड कसे द्यावे हे ठरविताना त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण उपयोगी पडते. आपला संकटाला तोंड देण्याकरिता काही प्रतिसाद ठरून गेलेले असतात. हे प्रतिसाद आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असतात. ज्या माणसाचे मन समृद्ध असते अशी व्यक्ती या प्रतिसादांचा आविष्कार लगेच करू शकते. एखादा तरुण आपल्या नव्याने परिचित, परंतु आकर्षक तरुणीच्या ओळखीकडे कसे पाहतो, यावर त्याची विचारसरणी आणि आचार ठरतात. एखादी समृद्ध मनाची व्यक्ती आपले प्रेमसंबंध अधिकाधिक दृढ करण्याकरिता काय करावे याचे नियोजन करू लागेल तर दुसरा तितक्‍याच समृद्ध मनाचा एखादा आपल्या अभ्यासाकडे अधिकाधिक लक्ष देईल. परीक्षेत चांगले यश मिळवेल. या यशामुळे आपली ‘प्रेयसी’ आपल्याकडे आकृष्ट होईल असे मानेल. ज्या तरुणाचे मन पुरेसे समृद्ध नसेल तर योग्य निर्णय व कार्यवाही होणार नाही. असा तरुण झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस घेईल किंवा त्याचे कशातही चित्त रमणार नाही. मानवी परिपक्व आणि समृद्ध मनामध्ये अशा विविध प्रतिसादांना जोपासता येते. आनुवंशिकता आणि लहान वयात झालेले संस्कार हे प्रतिसाद रुजवतात. या प्रतिसादांपैकी काहींचे विश्‍लेषण आता पाहता येईल. मनाच्या वाढीच्या प्रगतीमध्ये उलट्या दिशेने (अधोगतीने) जाणे याला म्हणतात. लहान मूल हट्टी असते. जसे वय वाढते, समज वाढते, जबाबदारी कळते, तसे हट्टीपणाच्या जागेवर समजूतपणा येणे अपेक्षित असते. अशी समजूतदार व्यक्ती जेव्हा संकटात सापडते आणि त्या व्यक्तीचे मन पुरेसे समृद्ध नसेल तर विचार आणि निर्णय लहान बालकासारखे (आत्मकेंद्रित, जबाबदारीची जाणीव नसण्यासारखे, इतरांच्या फायद्या-तोट्याचा विचार नसणारे) होऊ लागतात. याला भावनात्मक अधोगती म्हटले जाते. अशा स्थितीत माणसे स्वतःच्या सुद्धा हिताचा विचार करताना आढळत नाहीत. सुख आणि दीर्घकालीन स्वास्थ्य यातील निवड करताना समृद्ध मन दीर्घकालीन स्वास्थ्याची निवड अग्रक्रमाने करेल. त्याउलट अपरिपक्व मन तात्कालिन सुखाकडे आकर्षित होते. दुसरा एक प्रतिसाद ‘नाकारणे’ हा होय. ‘मला मधुमेह नाहीच आहे, तेव्हा कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही’, असा विचार आणि त्यानुसार आचार अनेक मधुमेही रुग्ण करताना आढळतात. ‘रोज व्यायाम कशाला करावयाला पाहिजे! मी काही अशक्त नाहीये. तेव्हा ‘आज व्यायामाला सुटी घेऊ या,’ असा विचार ‘रोज’ करणारी माणसे बरीच असतात. इतर काही आपल्यातील दोषांचे किंवा चुकांचे समर्थन करतात. ‘परीक्षेतील यश म्हणजे जीवनातील यश नसते. कितीतरी यशस्वी माणसे फार ‘शिकलेली’ नव्हती.’ मग अभ्यास कशाला करा? अशा विचारांना ‘समर्थन’ म्हणतात. आपल्यात असणारे दोष हे दुसऱ्याच व्यक्तीमध्ये असल्याचे मानणे याला प्रोजेक्‍शन म्हणतात. स्वतः आळशी व्यक्ती दुसऱ्या माणसाला आळशी म्हणते. स्वतः कोणत्याही प्रकारचा दानधर्म न करणारी व्यक्ती दुसऱ्याला ‘चिक्कू’ म्हणून संबोधितते. खरे तर मूळ व्यक्तीला कशाची तरी चिंता असते आणि त्या व्यक्तीचे अपरिपक्व मन ‘या समस्येतून कसे बाहेर पडायचे या विवंचनेत असते. वास्तव मानणे आणि वास्तव स्वीकारणे याला पर्याय नसतो. आपल्या समस्यांचे उत्तर योग्य प्रकारचे काढण्याकरिता योग्य कृतीची गरज असते, हे समजणे म्हणजेच मन समृद्ध होणे. उदाहरणार्थ, परीक्षेत यश मिळविण्याकरिता कसून तयारी आणि नियमाने अभ्यास करणे आवश्‍यक आहे हे परिपक्व मनाला समजेल व तशी कृती ती व्यक्ती करेल. उलटपक्षी अपरिपक्व मनोवृत्तीची व्यक्ती परीक्षकाचे नाव, गाव, पत्ता, ओळख ही माहिती काढण्यात वेळ घालवेल. ‘‘अभ्यास केल्याने काही होत नाही, मागच्या वेळी मी खूप अभ्यास केला होता. उत्तरे बरोबर दिली होती, तरी नापास झालो,’’ असे म्हणत चुकीच्या दिशेने विचार आणि आचार केले जातात.

कधी कधी मन परिपक्व असूनही चिंतेचा ताण फार मोठा असला तरी मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण होऊ शकते. जिवाला धोका निर्माण होईल असे अपघात, खरोखरीच्या युद्धात तोफगोळ्यांच्या वर्षावात सापडल्यामुळे आलेले शारीरिक आणि मानसिक अधार आघात, मोठ्या प्रमाणात झालेली डोक्‍याला (पर्यायाने मेंदूला) इजा किंवा कॅन्सर, अवयवांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया, आजारातून  उठण्याची शक्‍यता कमी वाटणे अशा परिस्थितीत सामान्य परिपक्व मनाची व्यक्तीसुद्धा खचून जाऊ शकते. कधी कधी प्रत्यक्ष आजार जिवाला धोकादायक नसतो. परंतु, वर्षानुवर्षे चालू राहतो व त्या दीर्घकाळ होत राहणाऱ्या आणि कधी बरा होईल याची खात्री नसण्याचादेखील मन व शरीर यावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना औषधांपेक्षा त्यांच्याशी आश्‍वासक संवाद करणे आणि त्यांच्या शंका समजून घेऊन त्यांचे समाधान करणे हे अधिक महत्त्वाचे असते.

चिंतेच्या शारीरिक परिणामामध्ये एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ‘चिंते’चे मानसिक रूप बदलून त्याची जागा शारीरिक तक्रारी घेऊ लागतात. अशा व्यक्ती त्यांना मानसिक अथवा भावनात्मक तणाव असल्याचे मान्य करीत नाहीत. या प्रकारच्या मुळाशी ‘मानसिक त्रास किंवा आजार’ याचा अर्थ ‘‘काल्पनिक किंवा आजार नाही, पण उगीचच तक्रार करतो आहे’’ अशा आपल्या कुटुंबीयांचा ग्रह होईल, असा रुग्णाच्या सुप्त-मनात झालेला ग्रह असतो. काही वेळा रुग्णांचा असाही ग्रह होतो, की डॉक्‍टर्स ‘शारीरिक दुखण्याकडे’ अधिक गांभीर्याने पाहतात आणि ‘मानसिक दुखण्यां’ना दुर्लक्षितात. कधी कधी आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. ‘‘आपल्याच घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून आपले (लैंगिक) शोषण होत आहे हे बोलणेदेखील अशक्‍य होते. ‘आपल्याच घरात मुलगा किंवा सून आपल्याला मारतात. अन्न न देता उपाशी ठेवतात’ इत्यादी गोष्टी डॉक्‍टरांजवळ बोलता येत नाहीत. अशा कोंडमाऱ्याचे परिणाम, चिंतेचे रुपांतर शारीरिक तक्रारीमध्ये होण्यात होते. काही सामाजिक विकृतीमुळे झालेले अन्याय, शोषण किंवा बळजबरीच्या प्रकारातून निर्माण झालेल्या चिंतेला वाचा फोडणे फार कठीण असते. कारण त्याच परिस्थितीत राहावयाचे आहे, याची जाणीव तोंड बंद करते. अशा वेळी रुग्णाच्या तकारी पुढीलप्रमाणे असतात. डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत दुखणे, धडधडणे, पचनाच्या तक्रारी, हातपाय कापणे, थकवा जाणविणे आणि क्षुल्लक कारणाने भावनांचा अतिरेक होणे (अमर्याद क्रोध, अकारण खिन्नता, अनपेक्षित लोभ). तथापि या तक्रारी खरोखरीच्या शारीरिक दुखण्यानेदेखील होतात, याचे ध्यान उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना ठेवावेच लागते. ‘चिंता’ या विकाराचे निदान करण्यातील खरी अडचण डॉक्‍टरांना याची जाणीव नसणे ही असते. परिणामी अनेकदा अनावश्‍यक तपासण्या व निरुपयोगी (कधी कधी अपायकारक) उपाययोजना केल्या जातात. केवळ शरीराचे व आजाराचे ज्ञान पुरेसे नसते. डॉक्‍टरांकडे चतुराईदेखील असावी लागते. येथेच खऱ्या डॉक्‍टर आणि पुस्तकी पंडित यातला फरक उघड होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor anxiety h v Sardesai