पोटदुखीस कारण की...

संतोष शेणई
Friday, 19 January 2018

कोणाच्या पोटात का व कधी दुखू लागेल, हे सांगता येत नाही. बरे, ही पोटदुखी खरी आहे की खोटी, याचेही निदान सहज करता येत नाही. पोटदुखीमागचे कारण समजून घेणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. कारण समजले, की योग्य उपचार करता येतात.

पोट दुखण्याचा अनुभव आपण लहानपणापासून घेत आलेलो असतो. खरी पोटदुखीही लहानपणी अनुभवलेली असते आणि शाळेला दांडी मारावीशी वाटली, की अचानक पोटदुखीचा बहाणा सुरू व्हायचा, हेही आठवत असेल.

कोणाच्या पोटात का व कधी दुखू लागेल, हे सांगता येत नाही. बरे, ही पोटदुखी खरी आहे की खोटी, याचेही निदान सहज करता येत नाही. पोटदुखीमागचे कारण समजून घेणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. कारण समजले, की योग्य उपचार करता येतात.

पोट दुखण्याचा अनुभव आपण लहानपणापासून घेत आलेलो असतो. खरी पोटदुखीही लहानपणी अनुभवलेली असते आणि शाळेला दांडी मारावीशी वाटली, की अचानक पोटदुखीचा बहाणा सुरू व्हायचा, हेही आठवत असेल.

पोटदुखी बाहेरून दिसत नाही आणि कित्येकदा रुग्णाला पोटदुखीचे नेमके वर्णनही करता येत नाही. पोटदुखी म्हटले, की पचनसंस्थेत बिघाड झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटणे स्वाभाविक आहे. तथापि, पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात. मल-मूत्र अडवून धरणे, अधिक उपवास, खूप जास्त हसणे, बोलणे, अतिव्यायाम, जागरण, हरभरे, वाटाणे, तूर यांसारखी धान्ये किंवा रुक्ष पदार्थ खाणे, वारंवार अजीर्ण होणे, वेळी-अवेळी जेवणे, सुकलेल्या भाज्या खाणे यांसारख्या कारणांसोबतच अमांश, आम्लपित्त, वात यामुळे देखील पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रजजन संस्थेचे विकार, मूत्रपिंडे व मूत्रवितरण संस्थेतील दोष, स्नायू व त्यांची आवरणे, रक्‍तवाहिन्यांचे आजार किंवा काही प्रकारच्या विषबाधा यांनी पोट दुखू शकते. पोटदुखी कधी कधी गंभीर आजाराची निदर्शक असू शकते. उदराच्या पोकळीत असणाऱ्या अनेक अंतःस्थ अवयवांच्या दोषाने पोटदुखी होते. या अवयवांच्या आजूबाजूला असणाऱ्या आतड्यांच्या अभ्रयातील दोष, यकृत, प्लीहा किंवा मूत्रपिंडे यांच्यावरील अभ्रे इथूनही वेदना निर्माण होते. पोटातील व्रण किंवा जखम फुटणे, आंत्रपुच्छाचा (ॲपेडिंक्‍स) तीव्र दाह होणे, आतड्याला पीळ पडणे, स्वादुपिंडाला सूज येणे, पित्ताशयाला सूज येणे, यकृताला सूज येणे, मूतखडा, स्त्रियांत गर्भाशयाचे काही आजार, महारोहिणीचे आजार, या सर्वांखेरीज पोटाबाहेरच्या अवयवातील आजारांमुळेसुद्धा पोटात दुखू शकते.

न्यूमोनियासारख्या आजारांमध्ये बेंबीच्या उजव्या बाजूला दुखते. तर अंडाशयांच्या आजारामध्ये अंडाशयापासून पोटाकडे वेदना पसरतात. मधुमेहामध्येसुद्धा काही वेळा पोट दुखते आणि दुखण्याचे ठिकाण बदलत असते. नागीणसारख्या त्वचारोगात अचानक सुई टोचल्यासारखे दुखते. शारीरिक आजारांच्या जोडीने मानसिक व्यथांमुळेदेखील पोटात अनेक वेळा दुखू शकते. 

कधी कधी एकाच जागी दुखते, तर काही वेळा संपूर्ण पोट दुखते. पोटदुखी अकस्मात सुरू होते किंवा हळूहळू बराच काळ होते व त्या दुखण्याची तीव्रता कमी-जास्त होत राहते. अंतःस्थ अवयवांच्या आजारात पोटदुखीची सुरवात बेंबीच्या आसपास होते. पोटाच्या आतल्या बाजूने खोल आतून दुखण्याची भावना येते. नेमके कोठे दुखते आहे, हे एकाच बोटाने दाखविणे कठीण असते. वरच्या पोटात, मध्ये किंवा ओटीपोटात दुखते, असे रुग्ण सांगू शकतो. तर स्नायू किंवा आवरणातील दुखण्याची वेदना नेहमी कोठे आहे, हे रुग्ण एका बोटाने दाखवू शकतो. खोकण्याने आणि शस्त्रक्रियेने स्नायूंची वेदना तीव्र होते. अंतःस्थ अवयवांच्या आजारात त्वचा किंवा स्नायू येथे वेदना जाणवते. अशी वेदना अवयवाच्या जागेवरच असेल असे नाही. अवयवाकडून संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूंच्या शिरा ज्या त्वचेच्या भागातून वेदना वाहतात त्या भागात ही वेदना जाणवते.

गंभीर आजाराचे लक्षण
साधारणपणे पोटदुखीचा दोन प्रकारे विचार करता येतो. एका प्रकारची पोटदुखी अकस्मात सुरू होते. अशी पोटदुखी सहसा जोरात असते. पोटात अमुक एका ठिकाणी दुखत असल्याचे सांगता येते. ही तीव्र प्रकारची विशिष्ट ठिकाणी उद्‌भविणारी पोटदुखी म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारात, संपूर्ण पोटात दुःख जाणवते. दुःखाची तीव्रताही कमी असते. मात्र ती अस्वस्थ करून सोडते.

एकाच ठिकाणी जाणविणारी आणि सहसा अकस्मात येणारी पोटदुखी गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. हे दुःख पोटातील कोणत्याही एका अवयवाच्या आजारातून येणे संभवते. अशा वेळी पोटात गंभीर आजार नाही ना, याची खात्री करून घेणे आणि पोटदुखीचे निदान लवकरात लवकर करणे जरुरीचे असते. त्याखेरीज उपचार करणे धोक्‍याचे ठरू शकते. अकस्मात तीव्र पोटदुखी झाली, तर रुग्णाकडे लक्ष देत राहणे आवश्‍यक ठरते. रुग्णाच्या नाडीची गती, रक्‍तदाब, तापमान व श्‍वसनाची गती लगेच पाहावी. नाडीची गती वाढणे, रक्‍तदाब कमी होणे, घाम सुटलेला असणे, ही लक्षणे गंभीर आजाराची असू शकतात. कमरेखाली त्वचा काळीनिळी पडत असली, पोटात स्पंदन जाणविणारा गोळा हाताला लागत असला किंवा पोट कडक लागत असले तर गंभीर आजार असण्याची व शस्त्रक्रियेची गरज असण्याची शक्‍यता अधिक असते. पोट दुखण्याचे निश्‍चित कारण जोवर कळलेले नाही, तोपर्यंत रुग्णाला झापड किंवा मांद्य येईल असे कोणतेही (वेदनाशामक) औषधही देता कामा नये. कारण अशा उपायांमुळे रुग्णात घडत असलेले बदल समजणे कठीण होऊन बसते.

पोटदुखीचे कारण लवकरात लवकर शोधून काढणे अत्यावश्‍यक असते. रुग्णाला तातडीने शस्त्रक्रियेची आवश्‍यकता आहे किंवा कसे, हे ठरविणे हे वैद्यकीय तज्ज्ञासमोरचे आव्हान असते. आंत्रपुच्छाचा तीव्र दाह या आजाराचे निश्‍चित निदान करता येईल, अशी कोणतीही एक तपासणी उपलब्ध नाही. केवळ तज्ज्ञ आणि अनुभवी शल्यविशारद आपल्याला काय वाटते यावरच तसे ठरवू शकतो. हा निर्णय फार महत्त्वाचा असतो. रुग्णाला आंत्रपुच्छाचा तीव्र दाह असला तर आंत्रपुच्छ फुटू शकते व प्राणघातक प्रसंग ओढवू शकतो, हे ध्यानात ठेवले पाहिजे. योग्य वेळी केलेली शस्त्रक्रिया रुग्णाचे प्राण वाचवू शकते. रुग्णाला होणारा त्रास समजून घेऊन, पोट तपासून, रक्त, लघवी इत्यादी तपासून आवश्‍यकता वाटल्यास सोनोग्राफी, क्ष किरणांनी केलेले उपाय व रुग्णाची प्रगती नजरेखाली पाहून शल्यविशारद हे निदान करू शकतात. 

कोठे दुखते ते जाणा
स्वादुपिंडावर तीव्र सूज येण्याच्या आजाराचे निदान रक्ताच्या तपासणीवरून करता येते. स्वादुपिंडावर सूज आल्यास रक्तातील अमायलेझ या विकराची (एन्झाइमची) पातळी वाढलेली असते. 

पोटाची कुठची बाजू जास्त दुखते आहे यावरून कोणत्या अवयवात विकार झाला असावा, याचा थोडाफार अंदाज करता येतो. आंत्रपुच्छ  उजवीकडे खाली असते, परंतु त्याचा दाह झाल्यास बेंबीच्या आसपास दुखू लागते. आंत्रपुच्छाचा दाह जेव्हा पसरतो तेव्हाच पोट उजवीकडे खाली दुखू लागते. लहान आतड्याच्या आजारात बेंबीच्या आजूबाजूला वेदना जाणवते. मोठ्या आतड्यात सुरवातीला विकार असला तरीदेखील बेंबीच्या बाजूला दुखते, त्याबरोबर उजवीकडे पोटात वेदना जाणवते. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागातील दुखणे डावीकडे जाणवते. जठराच्या आजारात पोटाच्या वरच्या भागामध्ये दुखते. कधी वरच्या भागात डावीकडे दुखते किंवा दोन्ही खांदे दुखतात. पित्ताशयाचे आजार असतील तर पोटात वरच्या किंवा मधल्या भागात उजवीकडे दुखते किंवा पाठीत फऱ्याजवळ दुखते. मूत्रपिंडातून मूत्राशयाकडे मूत्र वाहून नेणाऱ्या नलिकांना युरेटर म्हणतात. या मूत्रवाहिन्यांमधील विकारांमुळे पाठीच्या फासळ्या व पाठीतील कणा यामधील भागात वेदना जाणवतात. मूत्रवाहिन्यांच्या कडेच्या भागातील आजाराच्या वेदना जननेंद्रियाच्या बाजूने जाणवते. स्वादुपिंडातील विकारांमुळे पोटाच्या मधल्या व आजूबाजूला वरच्या भागात दुखते, तेव्हा पाठही दुखते. कधी कधी डावा खांदाही दुखतो. स्त्रीबीज, गर्भाशय येथील आजारात ओटीपोटात दुखते. जांघेत वेदना जाणवते आणि मांड्यांच्या उजव्या बाजूने दुखते.

यकृत, मूत्रपिंडे, प्लीहा किंवा स्वादुपिंड या अवयवांच्या पेशीतून वेदना जाणवत नाही. आतड्याच्या परिघात तणाव निर्माण झाला किंवा आतड्याचे स्नायू जोरात आकसले तर दुखते. आतड्याचा अभ्रा ताणला गेला तर वेदनेची जाणीव होते. आतड्याला किंवा अवयवाला रक्‍तपुरवठा झाला नाही किंवा तेथे सूज आली तर या अभ्रयाला दाह होतो, मग वेदना येतात.

पोटात दुखण्याची रुग्णाला भावना होते, तेव्हा आजार उदराच्या पोकळीच्या बाहेरही असू शकतो. हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काही वेळा पोटाच्या वरच्या भागात दुखते. ही घटना हृदयाच्या कर्णिकांना इजा झाल्यास होते. श्‍वसनपटलाच्या वरच्या बाजूला लागून असणाऱ्या फुफ्फुसात दाह झाला अथवा फुफ्फुसात सूज आली तरी पोटात दुखते. मधुमेही रुग्णाला शरीरात ॲसिटोन नावाचे विषारी द्रव्य साचण्याचा धोका असतो. अशा वेळी रुग्णाच्या पोटात दुखू लागते. सिकल सेल डिसीज नावाचा रक्‍तदोष आनुवंशीय जनुकीय दोषामुळे होतो. असा दोष असणाऱ्या रुग्णांच्या पोटात असह्य वेदना होतात, त्याचप्रमाणे पॉर्फायरिया नावाच्या आजारात वारंवार पोटात कळा येतात. या सर्व आजारांत उदराच्या पोटातील अवयवांच्या तपासण्यांत दोष सापडत नाही.

सर्वच पोट खूप दुखत असेल, तर आतड्याच्या वर असणारा अभ्रा सुजलेला असू शकतो. ही स्थिती गंभीर असू शकते व शस्त्रक्रियेची गरज पडण्याची शक्‍यता जास्त असते. त्याचप्रमाणे आतड्यातून मळ पुढे सरकण्यास अडथळा आला तरी संपूर्ण पोट दुखू शकते. एकूण काय, पोटदुखीकडे दुर्लक्ष करता कामा नये. सुरवातीला क्षुल्लक वाटणारी पोटदुखी केव्हाही गंभीर स्वरूप धारण करू शकते.

पोट दुखल्यास...
गरम पाणी प्या.
गरम पाण्यात लिंबू पिळून व किंचित मीठ घालून ते प्या. 
बेंबीपाशी मुरडा आल्यास पाण्यात बडीशेप घालून उकळलेले पाणी गरम असताना प्या.
ओवा, जिरे, हळीव, मेथ्या यांची बारीक पावडर समभाग घ्या. ही पावडर अर्धा चमचा प्रमाणात गरम पाण्यासह घ्या. 
जेवणानंतर ओवा आणि मीठ चावून खा. पचन चांगले होते.

मुलांची पोटदुखी
लहान मुलांमध्ये पोटदुखीची सर्वसामान्य कारणे म्हणजे-

१) जंत
२) अन्नपचन नीट न होणे
३) अति खाणे व न चावता खाणे
४) अति तिखट, तेलकट, पचायला जड पदार्थांचे सेवन
५) मलावरोध
६) गॅसेस
मुलांच्या विशेषतः उजव्या बाजूला पोट दुखते. गॅसेसमुळे पोट दुखण्याची तक्रार कायम असते. संध्याकाळी चार ते रात्री नऊ या दरम्यान त्रास वाढतो. अशावेळी पोटावर हलकासा दाब देऊन किंवा गरम पाण्याने पोट शेकून वायू बाहेर पडेल असे पाहावे. मुलांच्या बाबतीत स्वच्छ हात न धुणे, खूप गोड खाणे या कारणांनी जंत होऊन पोट दुखू शकते. मुलांना नियमितपणे जंत पाडण्याचे औषध द्यावे.

स्त्रियांसाठी...
खूप कोरडा तिखट आहार घेणे, जेवणाची वेळ नियमित नसणे, पाणी कमी पिणे, ब्रेड-पाव, शिळे अन्न जास्त खाणे, पोट साफ नसणे, लघवीला जाण्याचा कंटाळा करणे आदींमुळे पोट दुखू शकते. तरुण वयात आलेल्या मुलींना शतावरी कल्प किंवा पावडर दुधाबरोबर रोज द्यावी, त्यामुळे गर्भाशयाला बळ मिळते. मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो. तांदळाचे धुवण म्हणजे तांदूळ धुऊन जे पाणी मिळते, ते जर घेतले तरी अतिस्राव, पांढरे जाणे, कंबरदुखी, पोटदुखी कमी होते. विशेषतः मुली मोठ्या होत असताना खारीक पूड, दूध, डिंक, खीर, शतावरी घातलेले दूध, साजूक तूप यांचा समावेश जरूर आहारात असावा. चौरस पौष्टिक आहार, जेवणाची वेळ नियमित ठेवणे, बाहेरचे खाणे कमी करणे या गोष्टी पाळल्या आणि पाणी भरपूर प्यायले, तर पोटदुखीची तक्रार सहसा आढळत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor article santosh shenai on illness