दमा दमवतो बाळांना

डॉ. दीपाली लडकत
Friday, 8 September 2017

बाळांची श्‍वासनलिका पुरेशी वाढलेली नसते. अशावेळी श्‍वासनलिकेला सूज आली तर श्‍वसनास त्रास होऊ शकतो. ऑक्‍सिजनची कमतरता भासते. या बालदम्यासाठी तज्ज्ञांकडून वेळीच उपचार सुरू करणे हिताचे असते. 

बाळांची श्‍वासनलिका पुरेशी वाढलेली नसते. अशावेळी श्‍वासनलिकेला सूज आली तर श्‍वसनास त्रास होऊ शकतो. ऑक्‍सिजनची कमतरता भासते. या बालदम्यासाठी तज्ज्ञांकडून वेळीच उपचार सुरू करणे हिताचे असते. 

फुप्फुसांच्या वाढलेल्या संवेदनशीलतेस दमा असे म्हणतात. लहान मुलांचा सर्वाधिक त्रासदायक आजार म्हणजे त्यांना होणारा दमा. श्‍वसनमार्गातील हवा वाहून नेणाऱ्या नलिकांना सूज येऊन दाह होतो. या कारणामुळे श्‍वसनमार्ग निरोगी असताना जसा श्‍वासोच्छ्वास सुरळीत होतो, तसा तो आता होत नाही. श्‍वसननलिकांना सूज आल्याने व स्रवणाऱ्या स्त्रावामुळे (कफामुळे) ऑक्‍सिजन फुप्फुसात पोचण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे मुलास खोकला येतो. ठराविक अंतराने खोकला येऊन दम लागतो. छातीतून श्‍वास सोडताना घरघर आवाज ऐकू येतो. श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो, थकवा येतो. तान्ह्या  बाळांमध्ये ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे बाळ काळेनिळे पडू शकते, अशी दम्याची लक्षणे असतात.

बालदम्याला कारण म्हणजे हवामानातील बदल. धूळ, अन्नपदार्थ (ॲलर्जीक), औषधे, सुगंधी अत्तरे, फुलांचे परागकण इत्यादींची ॲलर्जी, ॲलर्जीक पदार्थ, मानसिक ताण, जीवाणू आणि अनुवंशिकता. काही मुलांना  सर्दी-खोकला असतानाच दम्याचा त्रास होतो व नंतर कमी होतो. तसेच काही मुलांच्या बाबतीत खूप दमल्यानंतर, म्हणजे पळल्यानंतर, खेळल्यानंतर त्यांना त्रास होतो. त्यास व्यायाम प्रभावित दमा असे म्हणतात. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.

दम्यास प्रतिबंध करण्यासाठी ॲलर्जीक पदार्थांचे सेवन टाळावे. धुळीची किंवा परागकणांची ॲलर्जी असेल तर त्यापासून मुलाचे रक्षण करावे. सिगारेटचा धूर, चुलीचा धूर, प्रदूषण याने त्रास बळावू शकतो.

मुलांना वारंवार श्‍वास लागणे, खोकला येणे, खोकण्याची ढास फार वेळ राहणे, तसेच घरातील कुणाला दम्याचा त्रास असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. बालदम्याच्या प्रकारामध्ये वैविध्य असते. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून मूल काही वर्षांचे होईपर्यंत छातीमध्ये घरघर होते.

मुले झोपल्यावर ही घरघर वाढते. खूप खोकला येत नाही. मात्र मुलाला खाली ठेवल्यावर अस्वस्थपणा येतो. उभे धरल्यास घरघर कमी होते. अनेक मुलांमध्ये वाढत्या वयासह हा त्रास कमी होतो. मुलाचे वय वाढल्यावर श्‍वासनलिकेचा मार्ग रुंदावतो व हा त्रास कमी होतो किंवा मैदानी खेळ, पोहणे, प्राणायाम हे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार केल्यास फुप्फुसे बळकट होण्यास मदत होते आणि आजार बळावत नाही.

आता या दमेकरी मुलांसाठी होमिओपॅथीचा कसा उपयोग होतो, हे आपण पाहूया. लक्षण साधर्म्यानुसार योग्य औषध व मात्रा दिल्यास होमिओपॅथीचा बालदम्याच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो. काही उपयुक्त होमिओपॅथिक औषधे पुढीलप्रमाणे -
अर्सोनिकम अल्बम - मध्यरात्रीनंतर दम्याचा त्रास वाढत असल्यास, मुलांस झोपता येत नाही. सारखी तहान लागते. अत्यंत अस्वस्थता, एका जागी किंवा एका स्थितीत बसवत नाही. घाम येत असतो. रात्री तीन नंतर त्रास कमी होतो.
अमोनियम कार्ब - नाक चोंदते, तोंडाने श्‍वास घ्यावा लागतो. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान दम्याचा जोर वाढतो.
ॲन्टीन टार्ट - छाती भरलेली असते, पण खोकला आल्यावर कफ थोडाच बाहेर येतो. मूल मलूल असते. दमा रात्री आणि संध्याकाळी जास्त असतो.
इपीकॅकॉना - कफयुक्त दमा, छातीत घरघर असते. मळमळ, उलटी होते. उष्ण व दमट हवामानातील दमा मोकळ्या हवेत रुग्णास बरे वाटते.
सॅम्ब्युकस - मुलांना उच्छवासास त्रास होतो. नाक चोंदलेले असते. अंगावर दूध पिणाऱ्या बाळांना होणाऱ्या दम्यासाठी उपयुक्त.

याशिवाय लोबेलिया, क्‍युप्रम मेट, उल्कामारा, बॅसीलीनम, ग्रॅंडेलिया, सल्फर, स्टिक्‍टा, मेफायटीस, ड्रोसेरा इ. होमिओपॅथी आणि कालिफॉस, कालीमूर नेद्रममूर इ. बाराक्षार औषधे बालदम्यासाठी उपयुक्त ठरतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच लहान मुलांवर औषधोपचार करणे योग्य असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor asthma infuses babies