आवेग-उलटी

आवेग-उलटी

मुळात उलटीचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच आहार-आचरणात काळजी घेणे चांगले. मात्र, कधी उलटी होईल असे वाटले तर तो आवेग दाबून धरू नये. उलटी होऊ द्यावी. जोपर्यंत उचंबळलेले दोष उलटीवाटे शरीराबाहेर निघून जात नाहीत तोपर्यंत उलटी थांबविण्याचे औषध देऊ नये. 

नैसर्गिक आवेगांचे धारण करणे आरोग्यासाठी का चांगले नाही याची माहिती आपण घेतो आहोत. सोय नाही म्हणून किंवा वेळ नाही म्हणून मल-मूत्राचा वेग आवरून धरला जातो, तसाच अजून एक वेग म्हणजे उलटीचा वेग.

अनेकांना उलटी होण्याची भीती वाटते, त्यातूनही उलटीचा वेग दाबून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. उलटी का होते आहे याचा विचार न करताच किंवा आतील असंतुलन, बिघाड दुरुस्त न करता फक्‍त उलटी बंद होण्यासाठी औषध घेणे हेसुद्धा एक प्रकारचे वेगधारणच असते. आयुर्वेदात तर उलटीवर उपचार सांगताना म्हटले आहे की, जोपर्यंत उचंबळलेले दोष उलटीवाटे शरीराबाहेर निघून जात नाहीत तोपर्यंत उलटीची उपेक्षा करावी म्हणजे उलटी थांबविण्याचे औषध देऊ नये. अर्थात कधीपर्यंत उपेक्षा करावी हे ठरविण्यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घेणे भाग असते.

उलटी रोखल्यास...
प्रत्यक्षातही अनेकांचा हा अनुभव असतो की कधी अपचन झाले, काही चुकीचे खाण्यात आले किंवा पित्त वाढले तर उलटी झाली रे झाली की लगेच खूप बरे वाटू लागते. तेव्हा मुळात उलटीचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच आहार-आचरणात काळजी घेणे चांगले. मात्र, कधी उलटी होईल असे वाटले तर तो आवेग दाबून न धरणे योग्य. उलटीचा वेग धरून ठेवला तर पुढील त्रास होतात, 
कण्डु कोठारुचिव्यंग-शोथपाण्ड्‌वामयज्वराः ।
कुष्ठहृल्लासवीसर्प छर्दिनिग्रहजा गदाः ।।
....चरक सूत्रस्थान
अंगावर खाज सुटणे, पित्त उठणे, खाण्याची इच्छा न होणे, चेहऱ्यावर वांगाचे डाग उठणे, सूज, पाण्डू (निस्तेजता), ताप, त्वचारोग, मळमळ आणि वीसर्प (नागिणीसारखा एक प्रकारचा त्वचारोग) हे त्रास उलटीचा वेग धरून ठेवल्याने होतात. 
यातील काही त्रास लगेच उद्भवतात, काही कालांतराने उद्भवतात, पण उलटी दाबून ठेवण्याने शरीरदोष तयार होतो हे नक्की. 

उपचार काय?
उलटीचा त्रास होत असल्यास पुढील उपचारांची योजना करता येते. 
भुक्‍त्वा प्रच्छर्दनं धूमो लंघनं रक्‍तमोक्षणम्‌ ।
रुक्षान्नपानं व्यायामो विरेकश्‍चात्र शस्यते।।
...चरक सूत्रस्थान
काहीतरी खाऊन उलटी करवणे, धूम्रपान (औषधी) योजणे, लंघन, रक्‍तमोक्षण, कोरडे अन्नपान, व्यायाम व विरेचन हे उपाय करायचे असतात. 

उलटी करवणे- उलटी होऊ नये म्हणून कितीही प्रयत्न केला तरी उचंबळून आलेले दोष बाहेर निघणे आवश्‍यक असतेच. उपचार म्हणून उलटी करवताना अगोदर काहीतरी खाऊन मग मिठाचे पाणी किंवा ज्येष्ठमधाचा काढा आकंठ प्यायला देऊन दोष बाहेर काढायचे असतात. 

धूम्रपान- म्हणजे औषधांची धुरी मुखावाटे ओढून मुखाद्वारा किंवा नाकावाटे ओढून नाकाद्वारा बाहेर टाकणे. औषधांची पोकळ नळी तयार करून ती बिडीप्रमाणे ओढता येऊ शकते किंवा हुक्का ओढतात त्या पद्धतीने औषधांची धुरी घेता येते. यासाठी गुग्गुळ, देवदारू, गुळवेल, कंटकारी वगैरे द्रव्ये वापरायची असतात. 

लंघन- उलटीमुळे उचंबळून आलेले दोष शांत करण्यासाठी काही न खाणे किंवा अगदी हलका आहार घेणे योग्य असते. उलटी झाली नाही किंवा झाली तरी नंतर काही खाण्याची इच्छा सहसा होत नाही असे दिसते. अशा वेळी जबरदस्तीने न खाणे चांगले. भूक लागेल त्याप्रमाणे भाताची पेज, मऊ खिचडी, मुगाचे कढण वगैरे गोष्टी घेता येतात. 

रक्‍तमोक्षण- वेगावरोधामुळे दाबले गेलेले दोष जेव्हा त्वचेपर्यंत पोचतात, उदा. अंगावर पित्त उठते, खाज येते, त्वचारोग किंवा नागीण वगैरे त्रास सुरू होतात. अशा वेळी रक्‍तमोक्षणासारखे उपचार घेता येतात. 

रुक्ष अन्नपान- म्हणजे कोरड्या साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, लोणी काढलेले पातळ ताक, सुंठीने संस्कारित प्यायचे पाणी घेता येते. 

व्यायाम- व्यायामाने अग्नी प्रदीप्त होतो. अग्नी प्रदीप्त झाला की शरीरात मलरूप होऊन राहिलेले दोष पचायला मदत मिळते. या दृष्टीने प्रकृतीनुरूप योग्य व्यायाम केला की उलटी दाबल्यामुळे शरीरात साठून राहिलेले दोष कमी होतात. 

विरेचन- यातही मलशुद्धी, दोषशुद्धी अपेक्षित असते. वेगधारणामुळे भडकलेले दोष शरीरात लीन होऊन राहिले तर अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न करू शकतात. यासाठी ते वेळीच विरेचनाच्या मदतीने बाहेर काढून टाकणे श्रेयस्कर असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com