धरून ठेवावेत असे वेग

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 19 January 2018

शारीरिक व मानसिक आरोग्य टिकण्यासाठी जसे मलमूत्रादी वेगांचे धारण करणे टाळायला हवे, तसेच काया-वाचा-मनाने वाईट कर्म करण्यापासूनही स्वतःला थांबवायला हवे. सामाजिकदृष्ट्या निषिद्ध कर्मांपासून आणि अनाठायी साहसांपासून दूर राहायला हवे. 

शारीरिक व मानसिक आरोग्य टिकण्यासाठी जसे मलमूत्रादी वेगांचे धारण करणे टाळायला हवे, तसेच काया-वाचा-मनाने वाईट कर्म करण्यापासूनही स्वतःला थांबवायला हवे. सामाजिकदृष्ट्या निषिद्ध कर्मांपासून आणि अनाठायी साहसांपासून दूर राहायला हवे. 

वेद, आयुर्वेद, तसेच इतर बहुतेक सर्व भारतीय प्राचीन शास्त्रांमध्ये इहलोक, परलोक, तसेच प्रेयस, श्रेयस अशा संकल्पना मांडलेल्या आहेत. इहलोक म्हणजे आपण राहतो, पाहतो, अनुभवतो ते जग आणि परलोक म्हणजे मृत्यूनंतर ज्याचा आपल्याला अनुभव येणार असतो. प्रेयस म्हणजे ज्यामुळे आपल्याला इहलोकात सुख मिळते, जे आपल्याला हवेहवेसे वाटते, तर श्रेयस म्हणजे जे आत्ता केल्याने नंतर श्रेयस्कर ठरते. आयुर्वेद शास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्यात इहलोक व परलोक या दोन्हींसाठी श्रेयस्कर काय, हितकर काय याचे मार्गदर्शन केलेले आहे.

तस्यायुषः पुण्यतमो वेदो वेदविदां मतः ।
वक्ष्यते यन्मनुष्याणां लोकयोरुभयोर्हितम्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
आयुष्याचा पुण्यतम वेद म्हणजेच आयुर्वेद हा विद्वानांकडून प्रशंसित झालेला आहे, कारण तो मनुष्यासाठी या इहलोकात तसेच परलोकातही हितकर आहे.

याचेच एक उदाहरण म्हणजे चरकसंहितेतील पुढील सूत्र,
इमांस्तु धारयेत्‌ वेगान्‌ हितार्थी प्रेत्य चेह च ।
साहसानाम्‌ अशस्तानां मनोवाक्‌कायकर्मणाम्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही स्वतःचे हित व्हावे अशी इच्छा असणाऱ्या व्यक्‍तींनी अप्रशस्त (निषिद्ध), साहसपूर्ण कर्म करणाऱ्या आवेगाला आवरून धरावे. तसेच काया, वाचा, मनाने निंदित कर्म करण्यापासून स्वतःला परावृत्त करावे.

अनाठायी साहस नको
थोडक्‍यात, मलमूत्रादी वेगांचे धारण करणे जसे टाळायला हवे, तसेच काया-वाचा-मनाने वाईट कर्म करण्यापासून स्वतःला थांबवायला हवे, जेणेकरून शारीरिक, मानसिक आरोग्य टिकू शकेल. अप्रशस्त कर्म म्हणजे त्या त्या समाजपद्धतीमध्ये जे कर्म निषिद्ध समजले जाते ते करणे. उदा. अगदीच वेगळे कपडे घालणे, इतरांना त्रास होईल असे वागणे, अफवा पसरवणे, लोकांच्या मनात भीती-दहशत होईल असे वागणे वगैरे.

साहस कर्म म्हणजे आवेशाच्या भरात स्वतःच्या शक्‍तीला न झेपेल असे काहीतरी करणे, उदा. फार उंचावरून उडी मारणे, खूप जास्ती वजन उचलणे, सवय नसताना एकदम खूप व्यायाम करणे वगैरे. रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या नादात सध्या ज्या भलत्या गोष्टी केल्या जातात, त्या साहस कर्मात मोजल्या जाऊ शकतात. 

मानसिक वेग, ज्यांचे धारण करणे हे आपल्या स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्‍तीच्या किंवा संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आवश्‍यक असते, ते पुढीलप्रमाणे होत, 

लोभशोकभयक्रोधमानवेगान्‌ विधारयेत्‌ ।
नैर्लज्येरर्ष्यातिरागाणाम्‌ अभिध्यायाश्‍च बुद्धिमान्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
लोभ, शोक, क्रोध, अहंकार, निर्जज्जता, ईर्षा, अतिप्रेम, दुसऱ्याचे धन घेण्याची इच्छा या मानसिक वेगांचे धारण करावे म्हणजे मानवी स्वभावानुसार मनात या भावना उत्पन्न होणे शक्‍य असले, तरी त्यांना वेळीच आवरून धरणे महत्त्वाचे होय. 

बोलणे आवरावे
वाचा म्हणजे बोलणे, एकदा उच्चारलेला शब्द परत घेता येत नाही असे जे म्हटले जाते, त्या अनुषंगाने कोणत्या प्रकारच्या बोलण्याचा वेग आवरून धरायला हवा हे पुढील सूत्रात सांगितले आहे,
परुषस्यातिमात्रस्य सूचकत्यानृतस्य च ।
वाक्‍यस्याकालयुक्‍तस्य धारयेत्‌ वेगमुत्थितम्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
अत्यंत कठोर बोलणे, दुसऱ्याची चुगली करणे, खोटे बोलणे आणि वेळ-काळाचा विचार न करता भलतेच काहीतरी बोलणे या वाचिक वेगांचे धारण करायला हवे. 

तिसऱ्या प्रकारचा जो वेग आवरून धरायचा तो म्हणजे शरीराच्या माध्यमातून चुकीचे वागण्याचा वेग.  
देहप्रवृत्तीर्या काचिद्विद्यते परपीडया ।
स्त्रीभोगस्तेयहिंसाद्या तस्या वेगान्‌ विधारयेत्‌ ।।
....चरक सूत्रस्थान
दुसऱ्याला शारीरिक त्रास होईल, वेदना होतील अशा प्रकारचे वागणे, परस्त्रीशी संबंध, चोरी, हिंसा या प्रकारच्या वागण्याचा वेगसुद्धा घरून ठेवायला हवा. अर्थात या गोष्टी टाळायला हव्यात. 

अशा प्रकारे काया, वाचा, मनाने स्वतःच्या कर्मांवर नियंत्रण ठेवले तर मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकतो, तसेच सामाजिक व्यवस्थासुद्धा सुरक्षित राहू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor balaji tambe article