हृदयाची काळजी

हृदयाची काळजी

‘हृदयाचा झटका येणे’ ही हृद्रोगातील एक विशिष्ट अवस्था आहे. प्रत्येक हृद्रोग्याला हृदयाचा झटका आलेला असतोच असे नाही. तसेच हृदयाचा झटका आल्याने प्रत्येक व्यक्‍ती मृत्यू पावतेच असेही नाही. एक गोष्ट मात्र खरी की, बहुतेक वेळेला अचानक झटका आल्यानंतरच आपल्याला हृद्रोग आहे हे त्या व्यक्‍तीला माहीत पडते. मात्र हृद्रोगाचा सुरवात त्या अगोदरच झालेली असते.

हृद्रोगाचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. मात्र हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका हे शब्द कानावर आल्यावर ऐकणाऱ्याच्याही छातीत क्षणभरासाठी धस्स झाल्याशिवाय राहात नाही. 

‘झटका’ कोणताही असो तो येण्यामागे मुख्यत्वे वातदोष कारणीभूत असतो. अर्धांगवाताचा झटका, धनुर्वाताचा झटका वगैरे शब्द ऐकीवात असतात. या रोगांच्या नावातच वात आहे. ‘हृद्रोग’ शब्दावरून हा रोग हृदयाशी संबंधित विकार आहे हे समजत असले तरी ‘हृदयाचा झटका’ किंवा  ‘हार्ट अटॅक’ येण्यामागे मुख्यत्वे वातदोषच जबाबदार असतो. त्यातही हृदय हे शरीरातील महत्त्वाचे मर्मस्थान समजले जात असल्याने ‘हृदयाचा झटका’ हा गंभीर विकारात मोडतो.  

ज्याप्रमाणे घर किंवा कोणतीही वास्तू तिला आधारभूत असणाऱ्या खांबावर उभी असते, त्याप्रमाणे शरीराचे आरोग्य, प्रतिष्ठा मुख्यत्वे हृदयावर अवलंबून असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

तेन मूलेन महता महामूला मता दश ।
ओजोवहाः शरीरेऽस्मिन्‌ विधम्यन्ते समन्तः ।।
...चरक सूत्रस्थान

हृदयाशी दहा ‘महामूळ’ समजल्या जाणाऱ्या धमन्या संबंधित असतात व त्यांच्याकरवी संपूर्ण शरीराला ओज, रस, रक्‍त यांचा पुरवठा अव्याहतपणे होत असतो. आणि म्हणूनच हृदयावर कोणत्याही प्रकारचा अभिघात झाला किंवा हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर गंभीर परिस्थिती उद्भवते. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारणे आवश्‍यक असते. कारण जोपर्यंत हृदय सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत हृदयाच्या आधाराने असणारे चेतनातत्त्व, प्राणशक्‍ती, ओज या सगळ्यांचा शरीराला हवा तेवढा पुरवठा होत नाही. जीवनासाठी मात्र शरीराला या गोष्टी अव्याहत मिळण्याची नितांत आवश्‍यकता असते.

हृत्शूल म्हणजे काय हे आपण मागच्या अंकात पाहिले. हा  हृत्शूल उपेक्षित राहिला किंवा रुग्णाला जाणवला नाही तर त्याचे पर्यवसान झटका येण्यामध्ये होऊ शकते. यात वाताचा सहभाग जेवढा अधिक असेल, तेवढी त्रासाची तीव्रता वाढते, तसेच रोग असाध्यतेकडे झुकतो. चरकसंहितेतील पुढील सूत्रात हेच सांगितले आहे.

हृदयं च गुदं चोभे गृहीत्वा मारुतो बली ।
दुर्बलस्य विशेषेण सद्यो मुण्णाति जीवितम्‌ ।।
...चरक इन्द्रियस्थान

हृदयातल्या प्रकुपित वातदोषाला जर गुदामधल्या प्रकुपित वातदोषाची जोड मिळाली तर तो अति बलवान वायू विशेषतः दुर्बल मनुष्याच्या किंवा अशक्‍त हृदय असलेल्या मनुष्याच्या जीवनाचा तत्काळ नाश करतो.

‘हृदयाचा झटका येणे’ ही हृद्रोगातील एक विशिष्ट अवस्था आहे. प्रत्येक हृद्रोग्याला हृदयाचा झटका आलेला असतोच असे नाही. तसेच हृदयाचा झटका आल्याने प्रत्येक व्यक्‍ती मृत्यू पावतेच असेही नाही. एक गोष्ट मात्र खरी की, बहुतेक वेळेला अचानक झटका आल्यानंतरच आपल्याला हृद्रोग आहे हे त्या व्यक्‍तीला माहीत पडते. मात्र हृद्रोगाचा सुरवात त्या अगोदरच झालेली असते. हृदय हे अविरतपणे संपूर्ण शरीराला शुद्ध रक्‍ताचा पुरवठा करत असते हे सर्वविदितच आहे. प्रत्येक अवयवाचे कार्य, प्रत्येक स्नायूचे कार्य, प्रत्येक हालचाल हृदयातून आलेल्या शुद्ध रक्‍तातून मिळालेल्या शक्‍तीतून होत असते. साहजिकच संपूर्ण शरीराला रक्‍त पुरवणाऱ्या हृदयालाही काम करण्यासाठी रक्‍ताची आवश्‍यकता असते. हृदयाला रक्‍त पुरवणाऱ्या रक्‍तवाहिन्या (करोनरी आर्टरीज्‌) असतात. या रक्‍तवाहिन्या काही कारणांमुळे जाड झाल्याने किंवा त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयाला होणारा रक्‍तपुरवठा कमी झाला किंवा थांबला की, हृदयाच्या त्या विशिष्ट भागाला रक्‍त व रक्‍तातून मिळणारी शक्‍ती मिळत नाही व हृदयाचा तो भाग निकामी होतो. याचा परिणाम म्हणून हृदयाच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, कैक वेळेला या वेदना डाव्या हाताकडे पसरतात, छातीत जड वाटते, घाम येतो, दम लागतो, अस्वस्थता जाणवते. अशी लक्षणे घेऊन व्यक्‍ती दवाखान्यात गेली की सहसा ’हार्ट अटॅक’ असे निदान होते.

काही लोकांना छातीत दुखत नाही, तर फक्‍त घाम येतो, चक्कर येते. तरीही तपासल्यानंतर ’हार्ट अटॅक‘ येऊन गेल्याचे निश्‍चित होते. तर क्वचित असेही दिसते की, पूर्वी हार्ट अटॅक आला होता, असे डॉक्‍टरच व्यक्‍तीला सांगतात, तिला स्वतःला मात्र त्याप्रकारचा काहीही त्रास जाणवलेला नसतो.

हार्ट अटॅक आला असता उद्भवणारी आत्ययिक अवस्था (इमर्जन्सी) यशस्वी रीत्या सांभाळण्यासाठी आधुनिक विज्ञानाने सांगितलेले ’कार्डियाक मसाज‘ किंवा ताबडतोब ऑक्‍सिजन देणे, औषधे घेणे वगैरे उपचार करावयास हरकत नाही. मात्र एकदा इमर्जन्सी आटोक्‍यात आली की हृद्रोग व्हायचे मूळ कारण शोधून ‘निदानं परिवर्जनम्‌’ या तत्त्वाला अनुसरून ती कारणे कटाक्षाने टाळणे व हृद्रोगाची संप्राप्ती जाणून घेऊन त्याला अनुसरून हृद्रोग बरा होण्यासाठी योग्य उपचार सुरू करणे गरजेचे असते.

हृदयाचा झटका येऊन गेल्यावर प्रथम काही दिवस म्हणजे साधारणतः दोन आठवडे विश्रांती घेणे, त्यानंतर जमेल, सोसवेल तेवढे थोडे थोडे हिंडणे, फिरणे, मात्र हृदयावर ताण येईल अशा गोष्टी टाळणे आवश्‍यक असते. आहार पचावयास हलका, ताजा व प्रकृतीला अनुकूल योजणे, तेलकट, मसालेदार तसेच चवळी, पावटा आदी वातवर्धक रुक्ष पदार्थ खाणे टाळणे श्रेयस्कर असते. पोटाला तडस लागेपर्यंत न जेवणे, विशेषतः रात्री उशिरा व जड जेवण न करणे महत्त्वाचे असते. जेवणानंतर, विशेषतः दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घेणे म्हणजे जेवणानंतर आरामखुर्चीत बसणे किंवा झोप येणार नाही अशा बेताने वामकुक्षी करणे चांगले असते. मात्र जेवणानंतर लगेच फिरायला जाणे, प्रवास करणे किंवा जोरजोराने बोलणे इत्यादी थकवणाऱ्या गोष्टी टाळणेही आवश्‍यक असते. 

हृदय हे मनाचे स्थान असल्याने मन प्रसन्न, शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे, धसका बसेल, भीती वाटेल असे प्रसंग, अशा प्रकारचे वाचन, टीव्हीवरील मालिका वगैरे न पाहणे, व्यसनापासून दूर राहणे सुद्धा गरजेचे असते. मनाबरोबरच हृदय ओजाचे स्थान असल्याने ओजाला शक्‍ती मिळेल अशी आहारद्रव्ये उदा. दूध, घरी बनवलेले साजूक तूप, पंचामृत, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम अशा पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश असणे हितावह होय. कोलेस्टेरॉल वाढेल व वजन वाढेल, पुन्हा हार्ट अटॅक येईल या भीतीने या ओजवर्धक, हृदयाला पोषक गोष्टींपासून हृदयाला वंचित ठेवण्याची गरज नाही. तूप हे योग्य पद्धतीने बनवलेले असल्यास, दूध भारतीय वंशाच्या गाईचे आणि कोणतीही अनैसर्गिक प्रक्रिया न केलेले असेल तर तूप-दूधाने अपाय होणे तर दूरच, पण अप्रतिम फायदाच होतो हा आजवर असंख्य रुग्णांचा अनुभव आहे.

हृदयाचा झटका येऊ नये, तसेच एकदा झटका आला असला तरी पुन्हा येऊ नये यासाठी व हृदयाला पुनर्जीवित करण्यासाठी, पूर्ववत बलवान बनवण्यासाठी आयुर्वेदातील रसायन चिकित्सा अत्यंत उपयुक्‍त असते. आयुर्वेदिक पद्धतीने स्नेहन, स्वेदनपूर्वक विधिवत्‌ विरेचन, बस्ती आदि पंचकर्माने शरीर अगोदर शुद्ध करून नंतर शृंगभस्म, प्रवाळपंचामृत, सुवर्णमाक्षिक भस्म, जवाहरमोहरा भस्म, सुवर्णसूतशेखर, बृहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अभ्रक भस्म, संतुलन सुहृद्‌प्राश, कार्डिसॅन प्लस, अर्जुनारिष्ट, पुनर्नवासव वगैरे औषधांचे सेवन वैद्यांच्या सल्ल्याने करता येते, या उपायांनी हृदयाच्या झटक्‍यामुळे आलेले हृदयदौर्बल्य दूर होऊन मुळातला हृद्रोग बरा व्हायला अप्रतिम मदत होताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com