चहा

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 15 December 2017

दर वेळी ‘चहा’ प्यावासा वाटला, की नेहमीचा काळा चहाच प्यायला हवा असे नाही. त्याऐवजी हर्बल चहा म्हणजे निरनिराळ्या घरगुती द्रव्यांपासून ते बागेतील वनस्पतींपर्यंत, किंवा सहज उपलब्ध असणाऱ्या नित्य परिचयाच्या औषधी वनस्पतींपासूनही चहा बनविता येतो. ऋतुमान, प्रकृतिमान यांचा विचार करूनही कधी कोणता हर्बल टी प्यायचा हे ठरविता येऊ शकते. चहा तयार करताना प्रक्रिया जितकी कमीत कमी केलेली असेल, तितका तो आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. 
 

दर वेळी ‘चहा’ प्यावासा वाटला, की नेहमीचा काळा चहाच प्यायला हवा असे नाही. त्याऐवजी हर्बल चहा म्हणजे निरनिराळ्या घरगुती द्रव्यांपासून ते बागेतील वनस्पतींपर्यंत, किंवा सहज उपलब्ध असणाऱ्या नित्य परिचयाच्या औषधी वनस्पतींपासूनही चहा बनविता येतो. ऋतुमान, प्रकृतिमान यांचा विचार करूनही कधी कोणता हर्बल टी प्यायचा हे ठरविता येऊ शकते. चहा तयार करताना प्रक्रिया जितकी कमीत कमी केलेली असेल, तितका तो आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. 
 

आदरातिथ्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे चहा. जगात सगळीकडे चहा हे पेय आवडीने प्यायले जाते. प्राचीन भारतात चहाची लागवड केली जात नसे. मात्र रानावनात चहाची झुडपे असत आणि त्यांचा औषधात वापर केला जात असे. विशेषतः ईशान्य भारताच्या जंगलांमध्ये चहा होत असे. चहाचे नक्की उगमस्थान कोणते आहे, याबद्दल १०० टक्के एकमत नसले, तरी उत्तर भारत, चीन, तिबेट या ठिकाणी चहाची झाडे अस्तित्वात होती, हे सर्वजण मान्य करतात. चहाची लागवड भारतात सर्वप्रथम केली गेली ती इंग्रजांच्या काळात आणि तीसुद्धा आसाममध्ये. सध्या आसामचा चहा संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. इतकेच नाही, तर चहाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देशही आपला भारत देशच आहे. सुमारे ७१५ हजार टन चहा भारतात दरवर्षी तयार होतो. काही आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये ‘श्‍यामपर्णी’ नावाच्या वनस्पतीचा उल्लेख सापडतो, तो चहाशी मिळता-जुळता आहे. चहाचे शास्त्रीय नाव ‘कॅमेलिया सिनेन्सिस’ असे असून, तो चवीला तुरट, कडू असतो, वीर्याने उष्ण असतो आणि लघु (पचायला हलका), रुक्ष (कोरडेपणा उत्पन्न करणारा) असतो. चहाचे झुडूप सदैव हिरवे राहते आणि ते सहसा सहा फुटांपेक्षा उंच वाढू दिले जात नाही. याची फुले पांढरी- पिवळट असतात. फळांमधून ज्या बिया निघतात, त्यापासून तेल काढले जाते. चहाची कोवळी, फिकट हिरवी पाने चहा तयार करण्यासाठी खुडली जातात. सहसा अगदी वरचे, पुंगळीसारखे, अजून पूर्णपणे न उघडलेले व त्याच्या खालची दोन- तीन पाने हाताने खुडली जातात. असे समजले जाते, की उंच पर्वतांवर उगवणारा चहा उत्तम चवीचा असतो. जमीन, हवामान व समुद्रपातळीपासूनची उंची या तिन्हींवर चहाची चव व प्रत अवलंबून असते. थंड प्रदेशात आणि उंच पर्वतावर लागवड केलेल्या चहाला सहसा वसंत ऋतूत खुडता येते आणि याची चव सर्वोत्तम असते. उष्ण हवामानाच्या प्रदेशात लागवड केलेला चहा जवळजवळ वर्षभर खुडता येतो. 

बाजारात काळा चहा म्हणजे नेहमीचा चहा, हिरवा चहा (ग्रीन टी), पांढरा चहा असे चहाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतात. वास्तविक हे सर्व चहा एकाच चहाच्या झुडपापासून बनविलेले असतात, फक्‍त त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्यामुळे त्याच्या रंगात, स्वादात, चहा तयार करण्याच्या पद्धतीत फरक असतो. ग्रीन टी हा प्रकार चीन व जपानमध्ये अधिक लोकप्रिय आहे. उत्तम प्रतीचा ग्रीन टी तयार करताना सर्व प्रक्रिया हाताने केल्या जातात व त्यासाठी खूप वेळही लागतो, श्रमही खूप असतात; पण असा ग्रीन टी गुणांनी उत्तम समजला जातो. ग्रीन टी बनविण्यासाठी अगदी उकळते पाणी वापरले जात नाही, तसेच यात नंतर दूधही मिसळायचे नसते. एक कप चहासाठी एक चमचा ग्रीन टी घ्यायचा असतो. पाणी उकळायला आले की गॅस बंद करून त्यात चमचाभर ग्रीन टी टाकून, दोन मिनिटे तसेच ठेवायचे असते. दोन मिनिटांनी चवीनुसार साखर मिसळून गाळून घेऊन प्यायचे असते. 

काळा चहा किंवा नेहमीचा चहा तयार करण्यासाठी मशिनचा वापर केला जातो. याचेही आकारानुसार वेगवेगळे प्रकार असतात व प्रतही आकारानुरूप ठरत जाते. पांढरा चहा तयार करताना कमीत कमी प्रक्रिया केलेली असते, त्यामुळे तो नेहमीच्या चहासारखा तीक्ष्ण- स्ट्राँग नसतो आणि त्याच्यात कडवटपणाही कमीत कमी असतो. चहाचे पान, जे अजून पूर्ण उलगडलेले नाही, त्यापासून हा पांढरा चहा तयार केलेला असतो. 

चहा तयार करताना प्रक्रिया जितकी कमीत कमी केलेली असेल, तितका तो आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. कोरा चहा प्यायचा असला तर त्यासाठी मूळचा चहा ग्रीन टी किंवा पांढरा चहा घ्यायला हवा. काळा चहा घ्यायचा असला तर एक तर तो बनविताना कमीत कमी किंवा अजिबात न उकळणे, थोडी तरी साखर व दूध मिसळून पिणे चांगले असते. चहा करताना त्यात थोडे आले किंवा गवती चहा टाकला तर ते अधिक चांगले. 

अवेळी झोप येऊ नये, थकवा दूर व्हावा, काम करण्याची स्फूर्ती मिळावी यासाठी चहा घ्यावासा वाटणे स्वाभाविक आहे. कित्येकांना पोट साफ होण्यासाठीसुद्धा कपभर चहा घेण्याची गरज असते; मात्र दर वेळी ‘चहा’ प्यावासा वाटला की नेहमीचा काळा चहाच प्यायला हवा असे नाही. 

त्याऐवजी हर्बल चहा म्हणजे निरनिराळ्या घरगुती द्रव्यांपासून ते बागेतील वनस्पतींपर्यंत किंवा सहज उपलब्ध असणाऱ्या नित्य परिचयाच्या औषधी वनस्पतींपासूनही चहा बनविता येतो. ऋतुमान, प्रकृतिमान यांचा विचार करूनही कधी कोणता हर्बल टी प्यायचा हे ठरविता येऊ शकते.

चहाचे प्रकार
आपण या ठिकाणी नित्य परिचयाच्या औषधी वनस्पतींपासूनचे काही चहाचे प्रकार पाहू.

पावसाळ्यामध्ये, विशेषतः सर्दी-ताप होण्याची शक्‍यता वाटत असेल, घशात खवखव वगैरे होत असेल, तर या प्रकारे हर्बल टी घेता येतो. चार कप पाणी, ताजा गवती चहा दोन पाती, आल्याचा तुकडा, दालचिनीचा एक इंचाचा तुकडा, पाच- सहा तुळशीची ताजी पाने हे सर्व एकत्र करून मंद आचेवर उकळण्यास ठेवावे. एकचतुर्थांश म्हणजे एक कप उरल्यानंतर त्यात चवीपुरती साखर टाकून गरम गरम असताना प्यावयास द्यावे. याने कसकस कमी होते, अंग दुखायचे थांबते. सर्दी- खोकलाही कमी होतो.

नीट भूक लागत नसली; पोटात जडपणा, गॅसेस जाणवत असतील, तर पुढील हर्बल टी घेता येतो. एक कप पाण्यात चमचाभर साखर, छोटा आल्याचा तुकडा, एक चिमूटभर हळद व जिऱ्याची पूड, अर्धी चिमूट मिरीपूड, चवीनुसार सैंधव मीठ मिसळून उकळण्यास ठेवावे. उकळी फुटली की गॅस बंद करून दोन मिनिटांसाठी झाकून ठेवावे. मग यात दोन- तीन थेंब लिंबाचा रस पिळून कपामध्ये गाळून घ्यावे. गरम असताना घोट घोट पिण्याने लगेच बरे वाटते, तोंडाला चव येते. 

उन्हाळ्या लागण्याची सवय असली, सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येण्याची प्रवृत्ती असली, लघवीला पूर्ण साफ होत नाही असे वाटत असले, तर रोज सकाळी पुढील हर्बल टी घेता येतो. कपभर पाण्यात पाव चमचा धणे, पाव चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप मिसळावी व सदर मिश्रण मंद आचेवर उकळण्यास ठेवावे. उकळी फुटली की गॅस बंद करून वर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे व नंतर गाळून घेऊन प्यावे. धणे, जिरे आणि बडीशेप अगोदर थोडीशी चेचून घेतलेली असली तर अजून चांगला स्वाद येतो. बडीशेप निसर्गतः थोडी गोड असल्याने यात वेगळी साखर टाकण्याची गरज नसते; मात्र हवी असेल तर थोडी साखर टाकली तरी चालते.

उन्हाळ्यात किंवा शरद ऋतूत जेव्हा वातावरणात उष्णता वाढलेली असते, तेव्हा असा चहा पिता येतो. 

पचन सुधारावे, खाल्लेले अन्न नीट अंगी लागावे यासाठी जाठराग्नी आणि सात धात्वग्नी कार्यक्षम राहणे गरजेचे असते. आयुर्वेदाने यासाठी आले उत्तम सांगतिले आहे. आले, लिंबू, तसेच बेसिलची पाने यांपासून बनविलेला हा हर्बल टी लागतोही छान, शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असतो. छोट्या पातेल्यात तीन- चार आल्याच्या चकत्या, लिंबाची सालासकटची पातळ चकती आणि चार- पाच बेसिलची (तुळशीचा प्रकार) पाने घ्यावीत. यावर कपभर उकळते पाणी ओतून दोन मिनिटे झाकून ठेवावे. कपामध्ये गाळून घ्यावे, हवे असेल तर यात चमचाभर मध मिसळता येते. मात्र मध मिसळण्यापूर्वी चहा थोडा निवू द्यावा. उकळत्या पाण्यात किंवा चहात मध मिसळणे टाळायला हवे. बेसिलची पाने हाताने थोडी कुस्करून घेतली तर अधिक चांगला स्वाद येतो.

रक्‍तशुद्धीसाठी अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा ही द्रव्ये उत्तम असतात. यांचा चहा रोज एकदा घेण्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास, त्वचेचा पोत सुधारण्यास, त्वचेवर तेज येण्यास मदत मिळते. सदर वनस्पतींची भरड वापरणे उत्तम असते किंवा अखंड वनस्पती असली तर ती थोडी चेचून घेतली तरी चालते. एक कप पाण्यात तिन्ही किंवा उपलब्ध असतील त्या वनस्पतींचा अर्धा चमचा मिश्रण मिसळावे व उकळण्यास ठेवावे. उकळी फुटल्यावरही दोन मिनिटे उकळू द्यावे, मग गॅस बंद करून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे व नंतर गाळून घ्यावे. यात ज्येष्ठमधाचा गोडवा असल्याने वेगळी साखर टाकली नाही तरी चालते.

थोडक्‍यात, चहा चांगल्या प्रतीचा निवडला, तो तयार करताना योग्य ती खबरदारी घेतली व योग्य प्रमाणात प्यायला, तर तो आरोग्याला हातभारच लावेल. हवामान व प्रकृतीचा विचार करून हर्बल टी घेतला तर त्यामुळे चहाचा आनंदही घेता येईल, शिवाय आरोग्यही सुरक्षित राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor balaji tambe article on tea