वटवृक्षाचा महिमा

Banyan-Tree
Banyan-Tree

वडाचा उपयोग स्त्री-आरोग्यावर, गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होतो असा समज असल्याने स्त्रियांनी वडाच्या झाडाच्या संपर्कात राहावे, वडाच्या झाडाच्या भोवती फिरावे, अशी पद्धत रूढ झाली असावी. 

भारतीय संस्कृतीने व्रत-वैकल्ये, उपासना, उत्सवांच्या माध्यमातून निसर्गाची जवळीक साधण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आढळतो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत येणारी वटपौर्णिमा हे त्याचेच एक उदाहरण. वडाचे झाड सर्वांच्या परिचयाचे असते. तसेच पारंब्यांमुळे ओळखू येण्यास सोपे असते. या कुळातील इतरही बऱ्याच वृक्षांना पारंब्या फुटतात, परंतु वडाच्या पारंब्या दणकट असतात, जमिनीपर्यंत पोचणाऱ्या असतात आणि जमिनीत रोवल्या गेल्या की त्यातून अजून झाडे तयार होतात.  

भारतात काही ठिकाणी या पद्धतीने अरण्य तयार झाल्याचा भास होईल अशा प्रकारे वडाची झाडे वाढलेली दिसतात. वडाचे झाड खूप मोठे होते आणि कायम हिरवेगार असते. वडाचे खोड खूप विस्तीर्ण होऊ शकते. वडाची पाने मोठी, अंडाकार व जाड असतात. कोवळ्या पानांवर एका बाजूने नाजूक लव असते. वडाला पावसाळ्यात फळे येतात. वडाचे पान तोडले तर त्यातून पांढरा चीक बाहेर येतो. 

वडाची पाने, फळे, चीक व साल या सर्वांचा औषधात उपयोग केला जातो. 
वडाचे झाड अनेक वर्षे जगते म्हणून त्याला ‘अक्षय्यवट’ असेही म्हटले जाते. कदाचित म्हणूनच दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी वटवृक्ष आदर्श असतो.

शिवाय वडाचा उपयोग स्त्री-आरोग्यावर, गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होतो असा समज असल्याने स्त्रियांनी वडाच्या झाडाच्या संपर्कात राहावे, वडाच्या झाडाच्या भोवती फिरावे असा पद्धत रूढ झाली असावी.
भावप्रकाश या ग्रंथात वडाचे गुणधर्म असे दिले आहेत,
वटः शीतो गुरुर्ग्राही कफपित्तव्रणापहः ।
वर्ण्यो विसर्पदाहघ्नः कषायो योनिदोषहृत्‌ ।।
...भावप्रकाश
रस - तुरट
गुण - शीत
वीर्य - शीतल
दोषघ्नता - कफ - पित्तशामक
वड ग्राही म्हणजे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो, जखम शुद्ध करण्यास व भरून आणण्यास मदत करतो, त्वचेसाठी हितकर असतो, विसर्प म्हणजे नागिणीवर उपयोगी असतो, दाह कमी करतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गर्भाशयाचे रोग दूर करण्यास सक्षम असतो. 

वडाची पाने
लघवीला व्यवस्थित होत नसली, लघवी होताना जळजळ होत असली, लघवी पूर्ण झाली आहे असे वाटत नसले तर वडाच्या पिकलेल्या पानांचा काढा करून घेण्याचा उपयोग होतो. वडाची चार-पाच पिकलेली पाने एक लिटर पाण्यात घालून एक अष्टमांश काढा करता येतो. 

ताप आला असता घाम आणण्यासाठी वडाची पाने उपयोगी असतात. साळीच्या लाह्यांचे पीठ पाण्यात मिसळावे, त्यातच स्वच्छ धुतलेली वडाची दोन-तीन पाने टाकावीत व एक अष्टमांश काढा करावा. हा काढा घेण्याने घाम येतो व ताप कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेला ताप या उपायाने चांगल्या प्रकारे कमी होतो. 

वटांकुर 
वडाला पालवी फुटते त्यावेळी फांदीच्या टोकाला कळीप्रमाणे दिसणारे अंकुर येतात. हे वटांकुर खूप औषधी असतात. 

वड थंड असतो त्यामुळे वटांकुर अतिशय पित्तशामक असतात, पित्तामुळे नागीण उठल्यास खूप दाह होतो, त्यावर वटांकुर बारीक वाटून लेप करण्याचा उपयोग होतो. वटांकुर बारीक वाटून त्यात मसुराचे पीठ मिसळून चेहऱ्यावर लावण्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत मिळते. 

वडाचे अंकुर शुक्रवर्धक असतात, तसेच गर्भाशयाची ताकदही वाढवितात म्हणूनच वटांकुर गर्भधारणेस मदत करतात. ताजे वटांकुर वाटून त्याच्या बोराएवढ्या आकाराच्या तीन गोळ्या रोज तूप-साखरेसह घेण्याने व वरून दूध पिण्याने गर्भधारणा होण्यास मदत मिळते. 

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी, बाळ दीर्घायुषी व्हावे यासाठी पहिल्या महिन्यात वटांकुर आठपट दुधात वाटून सेवन करण्यास सांगितले आहे. 

वडाचे साल
वडाच्या सालीचा काढा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्राव जात असल्यास कमी होतो. पाळीच्या दिवसात किंवा पाळीव्यतिरिक्‍त अति रक्‍तस्राव होत असल्यास तो कमी करण्याचा उपयोग होतो. गोवर-कांजिण्या आल्यावर दाह होत असल्यास थंड पाण्यात वडाची साल वाटून लेप करण्याने बरे वाटते. 

जखम भरत नसल्यास त्यावर वडाची साल ठेचून बांधण्याचा आणि बरोबरीने वडाच्या सालीचा काढा घेण्याचा उपयोग होतो. 

तोंड येते त्यावरही वड-उंबराच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या करण्याने किंवा काढा सात-आठ मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याने बरे वाटते. 

वडाच्या पारंब्या
तापात अंगाची आग होत असताना वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो. 
प्रमेहावर वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो. 
वडाच्या पारंब्यांसह इतर केश्‍य द्रव्यांनी संस्कारित केलेले तेल केसांसाठी चांगले असते. यामुळे केस लांब, दाट व गडद रंगाचे होण्यास मदत मिळते. जुलाब होत असल्यास वडाच्या पारंब्या तांदळाच्या धुवणासह वाटून ताकासह देण्याचा उपयोग होतो. पित्तामुळे उलट्या होत असताना वडाच्या पारंब्या भिजत घातलेले पाणी पिण्याचा उपयोग होतो. या पाण्यामुळे तहानही शमते, पित्तामुळे येणारी चक्कर कमी होते.

वडाचे फळ
वडाची फळे फारशी खाल्ली जात नाहीत; पण प्रमेहामध्ये वडाची फळे खाण्याचा उपयोग होतो. 
अशा प्रकारे वडाचे संपूर्ण झाड आरोग्यासाठी मदत करणारे असते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचे महत्त्व समजून घेऊन जर त्याची लागवड केली कर त्यातून आपला फायदाच होणार आहे.

वडाचा चीक 
ताकद वाढविण्यासाठी, धातुवृद्धीसाठी वडाचा चीक खूप उपयोगी असते. चमचाभर खडीसाखरेचे चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात वडाचा चीक मिसळून तयार झालेले मिश्रण आठ दिवस घेण्याने गुण येतो. 
सांधेदुखीवर वडाचा चीक लावण्याचा उपयोग होतो. 
जळवातामुळे हाता-पायाला भेगा पडतात त्यावर वडाचा चीक लावण्याचा फायदा होतो. यामुळे वेदना पटकन कमी होतात. 
विंचू चावल्यास वरून वडाचा चीक लावण्याची पद्धत आहे. 

वडाचा चीक 
ताकद वाढविण्यासाठी, धातुवृद्धीसाठी वडाचा चीक खूप उपयोगी असते. चमचाभर खडीसाखरेचे चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात वडाचा चीक मिसळून तयार झालेले मिश्रण आठ दिवस घेण्याने गुण येतो. 
सांधेदुखीवर वडाचा चीक लावण्याचा उपयोग होतो. 
जळवातामुळे हाता-पायाला भेगा पडतात त्यावर वडाचा चीक लावण्याचा फायदा होतो. यामुळे वेदना पटकन कमी होतात. 
विंचू चावल्यास वरून वडाचा चीक लावण्याची पद्धत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com