वारंवार ‘घाई’

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 9 February 2018

मूत्राशय अधिक वारंवार आकुंचित पावणे हा एक मूत्राशयाचा गुणधर्म असू शकतो. अशा व्यक्तीला दिवसा वारंवार लघवीला जावे लागतेच. लघवीला जाण्याची घाई होते. शेवटच्या काही सेकंदांत लघवी रोखणे अशक्‍य होते. कपड्यातसुद्धा लघवी होऊ शकते. काही वेळा मूत्राशयातून मूत्र बाहेर टाकण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मूत्राशय भरते व सतत तयार होणाऱ्या मूत्राला जागा राहत नाही, त्यामुळे सतत मूत्राचे विरेचन होत राहते.

मूत्राशय अधिक वारंवार आकुंचित पावणे हा एक मूत्राशयाचा गुणधर्म असू शकतो. अशा व्यक्तीला दिवसा वारंवार लघवीला जावे लागतेच. लघवीला जाण्याची घाई होते. शेवटच्या काही सेकंदांत लघवी रोखणे अशक्‍य होते. कपड्यातसुद्धा लघवी होऊ शकते. काही वेळा मूत्राशयातून मूत्र बाहेर टाकण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मूत्राशय भरते व सतत तयार होणाऱ्या मूत्राला जागा राहत नाही, त्यामुळे सतत मूत्राचे विरेचन होत राहते.

निरामय प्रकृतीतील व्यक्तीच्या मूत्राशयात पाचशे मिलिलिटर मूत्र मावण्याची क्षमता असते. मूत्रपिंडातून सामान्य दर मिनिटाला एक मिलिलिटर मूत्र तयार होते, ते मूत्राशयात सांचवले जाते. मूत्राशय रिकामे करण्याची योग्य (समाजमान्य) वेळ आली, तर व्यक्ती मूत्रविसर्जन करते, अन्यथा मूत्रविसर्जनाची घाई होऊ लागते किंवा कपड्यातच लघवी होते. सर्वसाधारणपणे माणसाला चोवीस तासांत सातापेक्षा कमी वेळा लघवीला जावे लागते. अर्थात माणूस पाणी (किंवा कोणतेही पेय) किती प्रमाणात सेवन करतो हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहेच. थंड वातावरणात जास्त वेळा लघवीला जावे लागते.

आपल्या त्वचेतून सूक्ष्म छिद्रांतून पाणी सारखे बाहेर पडते असते. ते आपल्याला जाणवत नाही. सामान्यपणे फार गरम नाही आणि फार थंड नाही अशा वातावरणात चोवीस तासांत पाचशे मिलिलिटर इतके पाणी या छिद्रातून बाहेर पडत राहते. त्यामुळे जितकी लघवी होईल, त्यापेक्षा पाचशे मिलिलिटर जास्त पाणी चोवीस तासांत घेणे इष्ट असते. वाढत्या वयात (वार्धक्‍यात) मूत्राशयात दीडशे मिलिलिटर इतकेच मूत्र मावू शकते.

तरुणपणी एका वेळेस २०० ते ३०० मिलिलिटर मूत्राचे एका वेळेस विसर्जन होते. वातावरणात उष्णता असली (उन्हाळ्यात) तर लघवीला जाण्याची गरज कमी होते, कारण त्वचेद्वारे शरीरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढलेले असते. सामान्यतः माणूस दररोज पंधराशे ते दोन हजार मिलिलिटर एवढे पाणी पितो. याखेरीज आपल्या अन्नातून शरीरात पाणी निर्माण होते.
मूत्राशय अधिक वारंवार आकुंचित पावणे हा एक मूत्राशयाचा गुणधर्म असू शकतो. अशा व्यक्तीला दिवसा वारंवार लघवीला जावे लागतेच. लघवीला जाण्याची घाई होते. जर ती व्यक्ती कशात तरी रमली असली (वाचावेसे वाटणारे पुस्तक वाचणे, विशेष आवडीचा खेळ टीव्हीवर पाहणे, आवडत्या व्यक्तीबरोबर संवाद करत असणे इत्यादी) तर बराच वेळ लघवीला जावे अशी भावना येत नाही; पण लघवीला जाण्याकरता योग्य ठिकाणी (बाथरूम/ युरिनल) जाण्यास सुरवात केल्यावर लघवीला जाण्याची भावना तीव्र होऊ लागते. लघवी करण्याची घाई आवरता येत नाही. या शेवटच्या काही सेकंदांत लघवी रोखणे अशक्‍य होते. कपड्यातसुद्धा लघवी होऊ शकते. या स्थितीला अर्ज इन्कॉन्टिनन्स (Urge Incontinance) म्हणतात. याला उपाय म्हणजे दर दीड ते पावणेदोन तासाने लघवी करून मूत्राशय मोकळे करून यावे. इन्कॉन्टिनन्सवर औषधांचा फारसा उपयोग होत नाही.

रात्री लघवीला उठावे लागणे (नॉक्ट्यूरिया) हा एक त्रासदायक दोष असतो. मेंदूच्या तळाशी पिट्युटरी ग्रंथी असते. त्या ग्रंथीपासून अँटिडाययुरेटिक हॉर्मोन स्रवले जाते, शिवाय मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांत झोपेत काही बदल होतात (वासा रेक्‍टाय उघडतात) त्यामुळे झोपेत मूत्र कमी तयार होते. निरायम स्थितीतील व्यक्तीने झोपण्यापूर्वी बरेच पेय (पाणी, सरबत, मद्य) घेतलेले असले, तर रात्री मूत्र विसर्जनासाठी उठावे लागते. निसर्गतः वाढत्या वयात (साठी/ सत्तरी आल्यावर) झोपेत रात्री अधिकाधिक मूत्र स्रवले जाते.

परिणामी रात्री उठावे लागते. मूत्राशयाची मूत्र साठवण्याची क्षमता ज्यांची कमी असते त्यांना दिवसासुद्धा जास्त वेळा मूत्र विरेचन करणे आवश्‍यक पडते. सामान्यतः तारुण्यात व्यक्ती २०० ते ३०० मिलिलिटर मूत्र एका वेळेस विसर्जित करते. वाढत्या वयात मूत्र साठविण्याची क्षमता कमी झाल्यामुळे दीडशे मिलिलिटरपेक्षा अधिक मूत्र साठवता येत नाही.

कोणत्याही कारणाने पायावर सूज आलेली असली (व्हेरिकोझ व्हेन्स, रक्तात आल्बूमिन प्रथिनाची कमतरता, हृदयाच्या स्नायूंची कमजोरी इत्यादीमुळे तर त्वचेखालचे पाणी शरीर सरळ आडवे असताना रक्तात शोषले जाते. त्यामुळे रक्ताचा आकार (volume) वाढतो. परिणामी अँटि-डाययुरेटिक हॉर्मोनचा स्राव कमी होतो व मूत्र अधिक प्रमाणात निर्माण होते. मधुमेह (आणि क्वचित होणारा डायबेटिस इन्सिपीडस) यात मूत्राचे प्रमाण वाढलेले असते.

वारंवार लघवीला जावे लागण्याच्या स्थितीत काही आजारांचा विशेष विचार करावा लागतो. त्यात प्रथम मूत्रविरेचन मार्गाचा दाह/ संसर्ग (Urinary tract infection) आहे का हे पाहणे जरुरीचे असते. लघवीच्या नेहमीच्या (Routine) तपासणीत पझ्‌सेल्स आढळले तर लघवीचे कल्चर करून खात्री करून घेता येते. कल्चरच्या रिपोर्टप्रमाणे योग्य प्रतिजैविवांचा वापराबदलचा सल्ला आवश्‍यक असतो. रुग्णास वारंवार लघवीला जावे लागते, रात्रीही उठावे लागते, लघवीला घाई होते, लघवी करताना वेदना जाणवते, कधी कपड्यात लघवी होते. मूत्राशयातून मूत्र बाहेर टाकण्याची नलिका (Urethra) युरिथ्रा येथे संसर्ग झाल्यास वारंवार लघवीला जाणे होते, परंतु रात्री लघवीला उठणे, घाई होणे, वेदना होणे किंवा कपड्यात लघवी होणे हे त्रास त्यामानाने कमी प्रमाणात जाणवतात. कॅन्सरसारख्या आजारात खालच्या पोटात डीप एक्‍स-रे उपयोग करताना रेडिएशन सिस्टायरिस नावाचा मूत्रपिंडाचा दाह होतो. त्यात मूत्रविरेचन मार्गाच्या संसर्गाप्रमाणे त्रास होतो; परंतु कपड्यात लघवी होण्याचा त्रास क्वचितच होतो.

पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या मुखावर प्रॉस्टेट (पूरस्थ) नावांची ग्रंथी असते. वाढत्या वयात काही पुरुषांची ही ग्रंथी वाढते, काहींना तेथे कॅन्सरही होऊ शकतो. गाठ वाढून मूत्राशयातील जागा प्रॉस्टेट ग्रंथीने भरू लागली तर मूत्राशयाची मूत्र साठविण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत रात्री लघवीला उठणे व वारंवार लघवीला जाणे असे त्रास रुग्णाला होतात.

मूत्राशयाच्या बाजूच्या स्नायू आणि इतर पेशींमध्ये संसर्ग होतो. यानेदेखील वारंवार लघवी जावे लागणे, घाई होणे, रात्री लघवीला उठावे लागणे हे सगळे त्रास होतात; परंतु कपड्यात लघवी होण्याचा त्रास क्वचितच होतो.

मूत्राशयात खडा होतो व तो बराच मोठाही होऊ शकतो. या विकारातदेखील लघवीला घाई होणे, रात्री उठावे लागणे, लघवी केल्यानंतर वेदना जाणवणे इत्यादी त्रास होतात. सायक्‍लोफॉस्पोमाईड नावाचे एक औषध कॅन्सरच्या आणि इतर काही आजारांत वापरले जाते. त्यानेदेखील मूत्राशयाच्या अस्तराचा दाह होतो. काही वेळा मूत्राशयातून मूत्र बाहेर टाकण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. (प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ) त्यामुळे मूत्राशय भरते व सतत तयार होणाऱ्या मूत्राला जागा राहत नाही, त्यामुळे सतत मूत्राचे विरेचन होत राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Bladder