पथ्यापथ्य-रक्‍तपित्त

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 11 August 2017

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

आयुर्वेदिक पाकसंकल्पनेवर आधारलेला आहार आणि औषध यात फार मोठा फरक नसतो. औषधांचा गुण अधिक चांगला यावा यासाठी सुद्धा आहारनियोजन फार महत्त्वाचे असते. आयुर्वेदात रोगानुसार आहार समजावलेला आहे, त्याची आपण माहिती घेतो आहेत. आज आपण ‘रक्‍तपित्त’ या रोगात आहार कसा असायला हवा हे पाहणार आहोत. 

नाकाचा घोळणा फुटल्याचे आपण सर्वांनी कधी ना कधी पाहिलेले, अनुभवलेले असेल. नाक, मुख, डोळे, कान, त्वचा, गुदद्वार, योनी वगैरे शरीरातील जी सर्व दारे (ओपनिंग्ज) आहेत त्यापैकी एका किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणातून रक्‍तस्राव होणे याला ‘रक्‍तपित्त’ असे म्हटलेले आहे. नावाप्रमाणे यात रक्‍तात बिघाड झालेला असतो, तसेच पित्त प्रकुपित झालेले असते. अर्थातच यावर उपचारांची किंवा आहाराची योजना करताना थंड द्रव्यांचा प्रामुख्याने वापर करायचा असतो. रक्‍तपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी प्यायचे पाणी पुढील पद्धतीने संस्कारित करून  घ्यायचे असते. 

ऱ्हीबेरचन्दनोशीर-मुस्तपर्पटकैः श्रृतम्‌ ।
केवलं श्रृतशीतं वा दद्यात्‌ तोयं पिपासवे ।।
....चरक चिकित्सास्थान

सुगंधी वाळा, चंदन, वाळा, नागरमोथा व पित्तपापडा यांचा श्रृतशीत पद्धतीने बनविलेला काढा (म्हणजे द्रव्यांच्या ६४ पट पाणी घालून उकळण्यास ठेवणे आणि ते निम्मे शिल्लक राहिले की गाळून घेणे) पाणी म्हणून पिण्यास वापरावा किंवा ही द्रव्ये रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी गाळून घेतलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. असे पाणी अतिशय सुगंधी व चविष्ट असते. उष्णता कमी करण्यासाठी किंवा तहान शमत नसेल, तर पाणी म्हणून पिण्यासाठी असे संस्कारित जल उत्तम असते. 

रक्‍तपित्त रोगाचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, एक ऊर्ध्वग म्हणजे नाक, कान, डोळे, मुख या शरीराच्या वरच्या भागातून रक्‍तस्राव होत असणे आणि दुसरा अधोग म्हणजे गुदद्वार, मूत्रद्वार, योनी या ठिकाणाहून रक्‍तस्राव होत असणे. ऊर्ध्वग प्रकारच्या रक्‍तपित्तात पुढील खर्जुरादी तर्पण आणि लाजातर्पण औषधाप्रमाणे सुचवले आहे, 

जलं खर्जूरमृद्विकामलकैः सपरुषकैः ।
श्रृतशीतं प्रयोक्‍तव्यं तर्पणार्थे सशर्करम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

खजूर, मनुका, आवळा, फालसा (एक प्रकारचे गोड फळ) यांचा श्रृतशीत पद्धतीने काढा बनवून त्यात साखर मिसळून पिण्यास द्यावे.
 
तर्पणं सघृतक्षौद्रं लाजचूर्णैः प्रदापयेत्‌ ।
ऊर्ध्वगं रक्‍तपित्तं तत्‌ पीतं काले व्यपोहति ।।
....चरक चिकित्सास्थान

साळीच्या लाह्यांच्या चूर्णात बरेचसे मध आणि तूप मिसळून तयार केलेले लाजतर्पण ऊर्ध्वग रक्‍तपित्तात उपयोगी ठरते. ज्या व्यक्‍तींना रक्‍तपित्ताचा त्रास असतो आणि बरोबरीने अग्नी मंदावलेला असतो, त्यांना या दोन्ही तर्पणामध्ये आवळा किंवा डाळिंबाचा रस मिसळून देण्याचा अधिक चांगला गुण येतो. 

रक्‍तपित्तामध्ये धान्यांपैकी साठेसाळीचे तांदूळ, वरीचे तांदूळ, कोद्रव, नाचणी वगैरे हितकर असतात. कडधान्यांपैकी मूग, मसूर, चणे, मटकी, तूर हे पथ्यकर असतात. त्यामुळे यापासून बनविलेले सूप रक्‍तपित्तामध्ये हितावह असते. रक्‍तपित्तामध्ये भाज्यासुद्धा सुचविलेल्या आहेत, 

स्विन्नं वा सर्पिषा भृष्टं यूषयूद्‌ वा विपाचितम्‌ ।
....चरक चिकित्सास्थान

भाज्या उकडून किंवा तुपावर परतून घेऊन सेवन करता येतात किंवा भाज्यांचे सूप करून घेता येते. यासाठी परवर, कडुनिंबाची कोवळी पाने, काश्‍मरीची फुले, कांचनारची फुले, काटेसावरीची फुले, कारले वगैरे भाज्या वापरता येतात. 

रक्‍तपित्तामध्ये तांदळाची पेया म्हणजे चौदा पट पाण्यात तांदूळ शिजवून बनविलेली पेज ही सुद्धा उत्तम समजली जाते. 

पद्मोत्पलानां किंजल्कः पृश्निपर्णीप्रियंगुकाः ।
जले साध्या रसे तस्मिन्‌ पेया स्यात्‌ रक्‍तपित्तिनाम्‌ ।।....
चरक चिकित्सास्थान

लाल कमळातील केशर, पिठवण, प्रियंगू या द्रव्यांपासून अगोदर श्रृतशीत पद्धतीने संस्कारित जल तयार करावे व त्यात तांदूळ शिजवून तयार केलेली पेज प्यावयास द्यावी. याच संकल्पनेवर पेयाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, उदा. 
१. रक्‍तचंदन, वाळा, लोध्र, सुंठ यांच्या पाण्यात बनविलेली पेया.
२. काडेचिराईत, वाळा, नागरमोथा यांच्या पाण्यात बनविलेली पेया.
३. धायटी, धमासा, वाळा, बेलाचा गर यांच्या पाण्यात बनविलेली पेया.
४. मसुराची डाळ व पिठवण यांच्या पाण्यात बनविलेली पेया. 
५. सालवण व मुगाची डाळ यांच्या पाण्यात बनविलेली पेया
याप्रकारे तयार केलेली पेज रक्‍तपित्तामध्ये औषधाप्रमाणे वापरता येते. 

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor blood