#FamilyDoctorजपा आपले डोळे

डॉ. श्री बालाजी तांबे
Tuesday, 9 October 2018

डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे. 

डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे. 

चष्मा व वय यांचा सध्या फारसा संबंध राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी चाळिशीनंतर चष्मा लागणे स्वाभाविक असे, आता मात्र अगदी लहान वयात, शाळेत जाण्याच्या आधीच्या वयातही चष्मा लागलेला दिसतो. जगभरात सध्या डोळ्यांचे विविध प्रकारच्या विकारांमध्ये लक्षणीय पद्धतीने वाढ होते आहे, असे आढळून आले आहे. संगणकाचा वाढता वापर, आहारात झालेला मोठा बदल, अनियमित जीवनशैली, अशी बरीचशी कारण यामागे असू शकतात. मात्र, जीवन सुखाने जगायचे असेल, तर डोळ्यांची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. 

नेत्रे श्‍लेष्मणः प्रसादात्‌ ।...सुश्रुत शारीरस्थान
मज्ज्ञः प्रसादात्‌ अपि नेत्रयोरुत्पत्तिरनुमीयते ।।...सुश्रुत सूत्रस्थान
डोळे संतुलित कफाच्या सारभागापासून आणि मज्जाधातूच्या प्रसादभागापासून तयार झालेले असतात. 

चक्षुस्तेजोमयं तस्य विशेषात्‌ श्‍लेष्मणो भयम्‌ ।...अष्टांगहृदय सूत्रस्थान
डोळ्यांवर तेजाचा, पित्ताचा प्रभाव असतो आणि त्यांना कफदोष वाढलेला घातकारक असते. 

यावरून असे समजते, की डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यांतील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे. 

दोषांनुरूप डोळ्यांचे तीन प्रकार सांगितले आहेत. वात प्रकृतीचे डोळे चंचल, रुक्ष, निस्तेज व आकाराने लहान; पित्त प्रकृतीचे डोळे तीक्ष्ण, किंचित पिवळसर व जराशा उष्णतेने लाल होणारे आणि कफ प्रकृतीचे डोळे प्रसन्न, तेजस्वी, प्रेमळ, सुंदर, स्वच्छ व मोठे असतात. या प्रकारावरून मृगनयनी, मीनाक्षी, बदामी डोळे, कमलनयन असे डोळ्यांचे वर्णन केले जाते. वात दोषामुळे डोळे दुखणे, पित्त दोषामुळे डोळ्यांची आग होणे, तर कफ दोषामुळे डोळे चिकट होऊन डोळ्यांतून पाणी येणे, ही लक्षणे दिसतात.

सुश्रुत संहितेत एक कथा सापडते, विदेह देशाचा राजा जनक याने आलंभ यज्ञाचा आरंभ केला. ज्यात प्राण्यांचा बळी चढविल्याने भगवान विष्णू कुपित झाले व त्यांनी राजा जनकाच्या दृष्टीचा नाश केला. यानंतर राजाने कठोर तपस्या केली. तेव्हा सूर्याने त्यांच्या तपस्येवर संतुष्ट होऊन त्यांना पुन्हा दृष्टी प्रदान केली व त्याबरोबरीने चक्षुर्वेदाचेही ज्ञान दिले. यावरून हत्या न करणे, मांस न खाणे व सूर्योपासना आदी गोष्टींचा डोळ्यांच्या आरोग्याशी संबंध येत असावा, असे दिसते. ज्योतिषशास्त्रात पण सूर्याचा डोळ्यांच्या आरोग्याशी संबंध दाखविलेला आहे. एकूणच डोळ्यांचा प्रकाशाशी निश्‍चितच संबंध आहे.

डोळ्यांचे कार्य सूर्याचा प्रतिनिधीरूप असणाऱ्या पित्ताच्या मदतीने होत असते व सूर्यप्रकाश जसा ढगांच्या आच्छादनामुळे अडवला जाऊ शकतो, तशी दृष्टी कफदोषाच्या अमलामुळे मंदावू शकते. म्हणूनच डोळ्यांमध्ये कफदोष वाढणार नाही, यासाठी कायम दक्ष राहणे अभिप्रेत असते. या दृष्टीने पुढील उपाय योजता येतात. 

रोज सकाळी डोळे त्रिफळा-जलाने धुणे. यासाठी पाव चमचा त्रिफळा चूर्ण कपभर पाण्यात भिजत घालता येते, सकाळी चौपदरी सुती कापडातून गाळून घेऊन डोळे धुण्यासाठी मिळणाऱ्या खास कपात घेऊन डोळे धुता येतात. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये, एकंदर डोळे निरोगी राहावेत, दृष्टी चांगली राहावी, यासाठी हा उपाय नियमित करणे फायद्याचे ठरते. 

डोळ्यांतील अतिरिक्‍त कफदोष अश्रूंमार्फत निघून जावा, यासाठी डोळ्यांत अंजन घालावे. त्रिफळा, कापूर वगैरे कफशामक द्रव्यांपासून बनविलेले ‘सॅन अंजन’सारखे आयुर्वेदिक अंजन यासाठी वापरता येते. 

मध हे कफावरचे परमौषध समजले जाते. शुद्ध मध डोळ्यांत अंजनासारखे घालणे उपयोगी असते. यामुळे दृष्टी सुधारायलाही मदत मिळते. 
 कफशामक द्रव्यांचे नस्य करणे. सुंठ, वेखंड, भारंगमूळ, बेहडा वगैरे द्रव्यांनी संस्कारित केलेल्या तेल वा तुपाचे थेंब नाकात टाकल्याने मस्तक, डोळे वगैरे भागातील कफदोषाचे शमन होते, अणू तेल, गंधर्व नस्यासारखे नस्य घृत यासाठी वापरता येते. 

रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा-मध-तुपाचे सेवन करणे. चमचा भर त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा मध व पाव चमचा तूप यांचे मिश्रण घेण्याने डोळ्यांचे, तसेच केसांचे आरोग्य चांगले राहते. 

पित्तदोष शरीरात ज्या-ज्या ठिकाणी राहतो त्यातले एक स्थान म्हणजे डोळे. तसेच पित्ताच्या पाच प्रकारांतील आलोचक पित्तावर दृष्टी अवलंबून असते. म्हणून डोळ्यांच्या आरोग्यासाठी पित्त संतुलित राहणे खूप आवश्‍यक असते. त्यादृष्टीने खालील उपाय सुचवता येतात.

नियमित पादाभ्यंग करणे. पायाचे तळवे व डोळे यांचा निकटचा संबंध असतो. तळव्यांना शतधौतघृत किंवा त्रिफळा घृत किंवा या दोघांच्या मिश्रणापासून तयार केलेले पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने घासल्याने शरीरातील उष्णता कमी होते, डोळे शांत होतात, दृष्टी सुधारते. 

गाळून घेतलेल्या दुधाच्या किंवा गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवणे. 
 हिरवळीवर अनवाणी चालणे. 

तूप, मौक्‍तिक भस्म, वाळा वगैरे शीतल व डोळ्यांना हितकर द्रव्यांपासून तयार केलेले ‘सॅन अंजन’सारखे अंजन डोळ्यांत घालणे. लहान वयात असे अंजन नियमित वापरल्यास भविष्यात डोळे चांगले राहण्यास उत्तम हातभार लागतो. 

दृष्टिदोष दूर होण्यासाठी, तसेच विविध नेत्ररोग बरे होण्यासाठी आयुर्वेदात अनेक औषधी तूप सुचवलेली आहेत. असेच डोळ्यांना हितकर द्रव्यांसह संस्कारित ‘संतुलन सुनयन घृत’होय. 

संगणकावर काम करणे, प्रखर प्रकाशात राहणे, प्रदूषण वगैरे कारणांनी सध्या डोळे कोरडे होण्याचा, त्याच्यातील लवचिकता कमी होण्याचा त्रास वाढतो आहे. यावर विशेष औषधांनी संस्कारित संतुलन सुनयन तेल वारता येते. 

डोळा या अवयवाची ताकद नीट राहावी, यासाठी कफ व मज्जा यांचे पोषण व्यवस्थित होणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने दूध, लोणी, तूप, पंचामृत, बदाम, अक्रोड, जरदाळू वगैरे आहारद्रव्ये उपयोगी असतात. डोळे निरोगी राहावेत, प्रसन्न व तेजस्वी राहावेत, यासाठी तसेच नेत्ररोग झाले असल्यास बरे होण्यासाठी नेत्रबस्ती हा उपचार अतिशय प्रभावी असतो. यात उडदाच्या पिठाच्या साहाय्याने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते आणि त्यात औषधांनी संस्कारित तूप, तेल, दूध घालून काही वेळासाठी तसेच ठेवले जाते.

डोळ्यांवर ताण येणाऱ्या व्यक्‍तींनी, संगणक किंवा तत्सम प्रखर स्क्रीनकडे फार वेळ राहावे, लागणाऱ्या व्यक्‍तींनी, प्रखर प्रकाशात काम करणाऱ्या व्यक्‍तींनी तर नेत्रबस्ती अधूनमधून करून घेणे उत्तम होय.

डोळ्यांचे रक्षण करणे सर्वांसाठीच आवश्‍यक होय. रोजच्या जीवनात नेत्ररक्षणाच्या दृष्टीने  थोडी काळजी घेतली, तर त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो. 
 अति प्रखर प्रकाशाकडे फार वेळ न पाहणे.
 सूर्यग्रहण डोळ्यांना विशेष संरक्षण घेतल्याशिवाय न बघणे.  
 पित्तवर्धक आहार उदा. अति तिखट, चमचमीत, तेलकट पदार्थ न खाणे. 
 अनवाणी पायाने खडबडीत, रुक्ष जमिनीवर न चालणे.
 रात्रीची जागरणे टाळणे, पुरेशी झोप घेणे.
 दिवसा न झोपणे.
 प्रखर सूर्यप्रकाशात डोक्‍यावर संरक्षण घेतल्याशिवाय न जाणे. 
 वाचणे, शिवणकाम करणे वगैरे डोळ्यांवर ताण येणाऱ्या गोष्टी करताना डोळ्यांवर ताण येतो आहे, असे वाटल्यास लगेच थोडा वेळ विश्रांती घेणे.
 अपुऱ्या प्रकाशात लिहिणे, वाचणे वगैरे गोष्टी करणे टाळणे.
 प्रवास करताना विशेषतः गाडी, बस, आगगाडीने प्रवास करताना लिहिणे, वाचणे टाळणे.
 पाठीवर वा पोटावर झोपून न वाचणे.
 कडक उन्हातून आल्यावर लगेच डोळ्यांवर वा डोक्‍यावर थंड पाण्याचे हबके न मारणे.  
 डोळे बंद करून, तोंडात पाणी घेऊन गाल फुगवून डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे (दिवसातून एक-दोन वेळा).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor Care Your Eyes