बाळहक्क

बाळहक्क

बाळाच्या जन्मापासून ते तीन वर्षापर्यंतच्या काळात त्याच्या मेंदूचा विकास (जवळजवळ ७५ टक्के) होत असतो. म्हणूनच या काळात त्याला सर्वात उत्तम पोषण मिळणे आवश्‍यक आहे. म्हणजेच जन्मानंतर एका तासात स्तनपानाची सुरवात व्हायला हवी. पहिल्या तीन दिवसात येणारे चीक दूध, सहा महिने पूर्ण होईपर्यंत निव्वळ स्तनपान, त्यानंतर घरी स्वच्छतापूर्वक बनवलेला मऊसर पूरक आहार अशी सुरवात करुन दहा महिन्यांपर्यंत बाळ घरात बनविलेले सर्व प्रकारचे अन्न देणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर कमीत कमी दुसऱ्या वाढदिवसापर्यंत स्तनपान चालू ठेवले पाहिजे. 

गर्भवती स्त्रीला स्तनपान ही गोष्ट नैसर्गिक वाटते. म्हणजे असे की, बाळ जन्माला आल्यावर, ते रडू लागले स्तनाला लावले की झाले. बाळ नैसर्गिकपणे दूध पिवू लागेल व भूक भागली की झोपी जाईल, इतके ते सोपे असावे असा समज असतो. पण हे काही इतके सहज व सोपे नसते. स्तनपान करायला मातेला व बाळाला खूप शिकावे लागते. स्तनपान ही कौशल्याने करायची कला आहे.  पण नेमके मार्गदर्शन करायला कुणी सोबत नसेल तर मातेच्या दुधाला बाळ दुरावते. जन्मानंतर पहिले तीन दिवस आईला दूधच नव्हते म्हणून  बाळाला बाहेरचे दूध पाजावेच लागले, असे कितीतरी वेळा सांगितले जाते. किती सहजपणे पुढे होणाऱ्या दुष्परिणामांचे विचार न करता बाळाला बाहेरचे दूध पाजले जाते. तेही आईकडे बोट दाखवून की तिला दूध नाही! हा गैरसमज असण्याचीच शक्‍यता अधिक असते. पहिले तीन दिवस येणारे चिकाचे दूध अगदीच कमी नसते. ते बाळाची तेवढी गरज भागवण्याएवढे नक्की असते. पहिल्या तीन दिवसात (७२ तास) येणाऱ्या दुधात संरक्षक घटक जास्त प्रमाणात असतात. (त्यातही पहिल्या २४ तासात सर्वाधिक असतात.) त्यामुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. ते पोटात गेल्यावर बाळाला पहिली शी लवकर होते. ज्यामुळे पुढील दिवसात त्याला कावीळ वाढण्याचा धोका कमी होतो. हे चिकदूध गर्भावस्थेतच शेवटच्या काही आठवड्यामध्ये आईच्या स्तनात तयार करण्याची क्रिया चालू होते. 

जन्माच्या आधी बाळ आईच्या पोटात असते. तेव्हा त्याच्या आजूबाजूला गर्भजल असते. थोडक्‍यात ते पाण्यातच राहते. म्हणूनच जन्मानंतर त्याच्या शरीरात पाण्याचा मोठा भरपूर साठा असतो. हे जास्तीचे पाणी त्याला बाहेर फेकून द्यायचे असते. (म्हणून जन्मानंतर काही दिवस बाळाचे वजन कमी होते) या कारणासाठी निसर्गाने अशी योजना केली आहे की, चिकदूध कमी प्रमाणातच तयार होते. पिळून बघितले तर आईच्या स्तनातून थेंबथेंब बाहेर येते. बाळाने चोखले की त्याला आवश्‍यक तेवढे मिळत राहाते. जन्मतः बाळाच्या पोटाचा आकारही खूप छोटा असतो. त्यामुळे थोडेसेच दूध पिऊन देखील त्याचे पोट भरुन जाते. या थोड्याशा चिकदुधातून मात्र बाळाला आवश्‍यक तेवढे उष्मांक मिळू शकत नाहीत. म्हणून निसर्गाने बाळाच्या पोटात (यकृतात) डबा देऊन पाठविले आहे. जेव्हा जेव्हा बळ स्तन चोखते तेव्हा तेव्हा हा डबा उघडतो व त्याला पाहिजे तेवढी शक्ती मिळत राहाते. म्हणजेच सर्वात महत्वाची गोष्ट कोणी आहे? की, बाळाने वारंवार स्तन चोखले पाहिजेत. दर दोन तासांनी म्हणजेच चोवीस तासात एकूण दहा-बारा वेळा. अशा वेळी बाळाच्या लघवीच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवावे. पहिल्या चोवीस तासांत एकदा व पुढील चोवीस तासांतही एकदा झाली तरी चालेल. नंतर मात्र जसजसे आईचे दूध वाढत जाईल, तसतसे लघवी होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आठ दिवसांपर्यंत सहा ते सात वेळा होणे आवश्‍यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे ते म्हणजे बाळाचे वजन. पहिले तीन ते पाच दिवस बाळाचे वजन कमी होते. साधारण सात-आठ टक्‍के वजन घटते. नंतर वाढायला सुरवात होते आणि जास्तीत जास्त पंधराव्या दिवसांपर्यंत जन्माच्या वजनापेक्षा पुढे जाते. यानंतर बाळाला मागणीनुसार पाजणे आवश्‍यक आहे.

आता लक्षात येईल की, अगदी मोजक्‍या वैद्यकीय कारणांशिवाय बाळाला बाहेरचे दूध पाजण्याची आवश्‍यकता नसते. किंबहुना ते अतिशय धोकादायक ठरु शकते. बाहेरचे दूध पचायला अतिशय जड असते. ज्यामुळे बाळाला लवकर भूक लागत नाही. ते चोखण्यास उत्सुक नसते. बाळाने स्तन चोखलेच नाहीत तर आईला दूध येण्यास अडथळे निर्माण होतात. मग 

आईचे दूध कमी आहे म्हणून अजून बाहेरचे दूध वाढवले जाते. हे दृष्टचक्र चालू होते. बाळ स्तन चोखण्यास उत्सुक का नसते? अनेकदा बाळाला आईपासून वेगळे ठेवलेले असते. बाळ अपुऱ्या दिवसांचे असेल किंवा आजारी असेल तर आईपासून वेगळे ठेवावे लागते. पण या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्तही काही वेळा बाळाला आईपासून वेगळे ठेवले जाते आणि हीच गोष्ट टाळावी लागेल. बाळाला जास्तीत जास्त वेळ आईजवळ ठेवायला हवे व बाळाचा सतत आईचा स्पर्श व्हायला हवा. बाळाला दुपट्यामध्ये घट्ट गुंडाळून ठेवणे किंवा त्याला पाळण्यात झोपवणे हे टाळले पाहिजे. बाळाची झोप हलकी असते. नैसर्गिकपणेच भूक लागल्याची जाणीव त्याला लवकर लवकर होते. जे बाळ आईच्या जवळ असते, ज्याला आईचा सतत स्पर्श होत असतो, ते बाळ स्तनपान करायला लवकर शिकते. बाळ नीट स्तनपान करीत असेल तर आईचे दूध येण्याचे प्रमाणही वाढत जाते. अर्थात बाळाला सक्तीने स्तनपान करायलाही लावता कामा नये. बाळ झोपलेले असताना जबरदस्तीने त्याला उठवून दूध पिण्यासाठी स्तनाला लावू नये. त्यामुळे बाळाला स्तनपान शिकायला अवघड जाते व ते चिडचिडे बनते. 

बाळाला भूक लागली की ते स्तनपान करायलाही उत्सुक असेल. तेव्हाच त्याला स्तनपान द्यावे. बाळ रडे पर्यंतही त्याला दूर ठेवू नये. रडणे ही बाळाची सर्वात शेवटची तक्रार असते. त्यावेळी कित्येकदा चिडून बाळ स्तनपान करीत नाही, हे लक्षात ठेवा. साधारणतः बाळाची चुळबूळ सुरू झाली, डोळे उघडून इकडे तिकडे बघू लागले, हलकेच हुंकार देऊ लागले, मोठा ‘आ’ करुन मान वळवू लागले किंवा तोंडात बोटे घालू लागले की बाळाला भूक लागली आहे हे समजायला हरकत नाही.  

मातेच्या दुधाऐवजी बाहेरचे दूध पाजल्यामुळे बाळाचे काय नुकसान होऊ शकते, तेही समजून घ्यायला हवे.

१. बाहेरचे दूध पाजल्यामुळे बाळाला कानाचा विकार, जुलाब, श्‍वसनरोग होण्याचे प्रमाण वाढते. आईचे दूध पचायला हलके असते. तर बाटलीतून दिलेले बाहेरचे दूध पचायला जड असते. ते अधिकही पाजले जाते. त्यामुळे काही आजार ओढवून घेतले जातात. 
२. दात किडणे, मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी आजार पुढील आयुष्यात उद्‌भवण्याची शक्‍यता वाढते.
३. काही गुंतागुंतीचे व दीर्घकाळ त्रास देणारे विकार, आतड्यांचा दाह, श्‍वेतपेशींचा कर्करोग यासारख्या रोगांचा सामना करावा लागण्याचा धोका वाढते.
४. ॲलर्जी त्वचेची, अन्नाची, दमा होण्याची शक्‍यताही वाढते.
५. बाळाच्या मानसिक व बौद्धिक वाढीवरही परिणाम दिसून येतो. स्तनपानासाठी बाळाला कृती करावी लागते. त्यासाठी काही कष्ट पडतात. पण बाटलीने दूध पिताना बाळ निष्क्रीय होते. त्यामुळे ते गरजेपेक्षा अधिक दूध पिऊन सुस्त होते. 

या सगळ्या महत्वाच्या गोष्टींचा विचार न करता किती सहजपणे बाळाला बाहेरचे दूध पाजले जाते. ‘थांब, उद्याचे माऊली’, हे वाच आणि विचार कर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com