भीती गेली कोलेस्टेरॉलची

Dr.-balaji-Tambe
Dr.-balaji-Tambe

हृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला आणि भारतीय आहारातून दूध बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आता कोलेस्टेरॉलचीच भीती उरली नाही.

मानसिक ताण आणि त्यातून निर्माण झालेले अनैसर्गिक वागणे, हे जर सर्व रोगांचे मूळ कारण धरले तर, मानसिक ताण हेच कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌स अन्‌ त्याच्याशी संबंधित असणारे हृदयरोगासारख्या आजारांचे मुख्य कारण आहे हे समजून घ्यावे लागेल. आहारातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर रक्‍तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण अवलंबून नसून ते मानसिक ताणावरच अवलंबून असते. शरीर, आहारातून आलेल्या कोलेस्टेरॉलच्या तीन ते चार पट अधिक कोलेस्टेरॉल तयार करते.

कोलेस्टेरॉल वाढले म्हणून दूध, तूप सर्व बंद करून जवळ जवळ नुसत्या पाण्यावर राहिलेल्यांचेही कोलेस्टेरॉल वाढताना दिसते. कोरडे गवत खाऊन गाय चरबी कशी काय तयार करते असा विचार अशा वेळी मनात येतो. मानसिक ताण अन्नाचे पचन पूर्ण होऊ देत नाही व त्यातून निर्मिती होते कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌ससारख्या आमयुक्‍त विषद्रव्यांची!

कोलेस्टेरॉलच्या बागुलबुव्याचा फुगा फुगवून फुगवून अनेक कंपन्यांनी स्वतःचे गाल फुगवून तुंबड्या भरून घेतल्या. दूध व दुधाच्या सर्व पदार्थांचे सेवन बंद करावे म्हणजे कोलेस्टेरॉल वाढणार नाही असा एक ‘अद्वितीय’ शोध कोणीतरी लावला व जनतेच्या आरोग्याची काळजी आहे, असा भास उत्पन्न करून ‘स्वहिता’चीच काळजी करणाऱ्यांनी त्याचा सर्व ठिकाणी पाठपुरावा केला आणि मार्गारिन या वनस्पतिज द्रव्याचा भरपूर व्यापारही करून घेतला. आता अनेक वर्षांनी हे खरे नव्हे, असे सिद्ध झाले आहे. शेवटी दूध-तूप ही प्राणिज द्रव्ये आहाराच्या उपयोगासाठी निसर्गाने योजलेली असल्यामुळे पचायला सोपी असतात व त्यांची तुलना वनस्पतिज द्रव्यांशी करताच येत नाही. प्राण्याचे मांस मात्र माणसाचा नैसर्गिक आहार म्हणून तयार केलेले नसते. साखरेपेक्षा मध आणि सोयाबीनच्या टोफूपेक्षा दूध, पनीर वगैरे पदार्थ शरीरात सहज स्वीकार केले जातात.

भारतीय संस्कृतीमधील अनेक शतकांपासून प्रसिद्ध असलेला ‘साजूक तूप’ हा एक प्रमुख घटक अचानक आरोग्याला बाधा आणणारा कसा काय झाला हे कोडे सोडवायचा प्रयत्न कोणीच केला नाही. गेल्या दोन-तीन दशकांपासून दूध-तूप खाऊ नये, हा सल्ला दिल्यानंतरही हृदयांच्या धमन्यात अडथळे (हार्ट आर्टरी ब्लॉक्‍स) निर्माण होण्याचे व कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, ते कशामुळे यावरही विचार करण्यास कुणाला सवड नाही. मनुष्यमात्राच्या आरोग्यासाठी ताजे, शुद्ध दूध-तूप किती चांगले आहे हे अनेक प्रयोगांनी व उदाहरणांनी मी सिद्ध केले आहे. 

अर्थात ताजे दूध हवे असल्यास सकाळी लवकर उठावे लागेल, गाई-म्हशींना मनुष्यवस्तीपासून फार दूर नेता येणार नाही व वितरकांना इमानदारीने शुद्ध ताजे दूध देण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. एका बाजूने प्राण्यावर दया करा अशी घोषणा देणे व दुसऱ्या बाजूने मनुष्यजीवनाशी एकरूप झालेल्या प्रेमळ पाळीव जनावरांना दूर कोठेतरी ठेवण्यास भाग पाडणे, यामुळे दूध मनुष्यवस्त्यांपर्यंत ताजेपणा टिकवून पोचवता येत नाही. म्हणून ते अधिक दिवस टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे; दुधातील फॅटची अणूरेणूरचना बदलणे किंवा त्यातील क्रीम काढून घेणे किंवा त्यात दुधाची पावडर किंवा क्रीम मिसळणे असे सर्व केले जाते. असे दूध व त्याच दुधाचे पुढे प्रक्रिया झालेले पदार्थ पचनाला भलतेच अवघड होऊन बसतात. मग रक्‍तात वाढते कोलेस्टेरॉल! शुद्ध दूध-तुपाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात, दात चांगले राहतात, डोळ्यांना ताकद मिळते, त्वचेवर तेज वाढते आणि कोलेस्टेरॉल कमी होते. माझ्या हार्ट पेशंटच्या अभ्यासावरून असेही लक्षात आले आहे की, हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी झालेल्या वार्षिक तपासण्यांत अनेक रोग्यांचे कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात सापडलेले नव्हते. माझ्या प्रॅक्‍टिसमध्ये वीस हजाराहून अधिक रुग्णांना दूध-तूप पाजून त्यांचे कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌स कमी झाले व आर्टरी ब्लॉक्‍स कमी होऊन हृदयविकार व इतर रोगांवर मात करता आली. हे सर्व दाखवून दिल्यानंतर अजूनही तुपाने कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌स वाढतील ही भीती बाळगणारे अनेक महाभाग आहेत.

कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌ससारखी द्रव्ये आणि त्यातील उपयोगी कोलेस्टेरॉल, त्रास देणारे कोलेस्टेरॉल (एच्‌.डी. एल्‌., एल्‌.डी.एल्‌.) हे सर्व संशोधन चुकीचे आहे असे नव्हे, पण त्याची कारणमीमांसा केवळ आहारातील पदार्थात असलेल्या कोलेस्टेरॉलवर अवलंबून नसते. अधिक काळ टिकणारे डबाबंद अन्न; जंक फूड व फास्ट फूड म्हणून प्रचलित असणारे पदार्थ; एकदा किंवा दोनदा तळलेले वडा, सामोसा व फरसाणसारखे पदार्थ; मांसाहार; भलत्या सलत्या मिश्रणाच्या बनवलेल्या मिठाया आणि त्यांचे सेवन; चमचमीत नवीन नवीन आकर्षक व चवीसाठी बनवलेल्या मेनूतील पदार्थ (ज्यात त्रिदोषांचे संतुलन नसतेच व सुलभ पचन व वीर्यवृद्धीचाही विचार केलेला नसतो) अशामुळे रक्‍त दूषित होते व शरीरात आम, कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌स वाढतात. 

कोलेस्टेरॉल शरीराला उपयोगी पण आहे. ज्या वेळी कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधे घेतली जातात त्या वेळी नुसतेच त्रास देणारे कोलेस्टेरॉल कमी होते, असे नसून बऱ्याच जणांना अशक्‍तता जाणवणे वगैरे त्रासही अनुभवास येतात आणि इतरही दुष्परिणाम दिसतात. हाय कोलेस्टेरॉलने जसे आर्टरी ब्लॉक्‍स होतात, तसे अति कमी कोलेस्टेरॉलने पण होतात हेही सध्या निदर्शनास आले आहे.

अंगमेहनतीची कामे मुळीच न करणे; योग, व्यायाम, मैदानी खेळ टाळणे याने पण पचन बिघडतेच. आधीच गतिमान झालेल्या जीवनात चुकीच्या प्रकृतीचा, स्वतःच्या प्रकृतीशी मेळ नसलेला आहार घेतला की शरीराबरोबर मनही बिघडते. त्याचबरोबर इच्छा आकांक्षांची झेप आकाशापलीकडे गेल्यामुळे हव्यासापायी ‘कर्मापराध’ पण होतो. या सर्वामुळे मानसिक ताण वाढला की त्यातून घडलेल्या ‘प्रज्ञापराधा’मुळे कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड्‌स वाढणेच काय तर कॅन्सरही होऊ शकतो. नुकतेच पुन्हा प्रगत देशाच्या अन्न प्रशासनाने कोलेस्टेरॉलला दोषमुक्‍त ठरविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com