थंडीची तयारी

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

शरीराला उष्णतेचा त्रास होतो, पण ऊब शरीराला क्रियाशील ठेवते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. थंडीच्या दिवसांत आहाराची ऊब शरीराला मिळावी यासाठी विशेष लक्ष पुरवावे लागते.
 

शरीराला उष्णतेचा त्रास होतो, पण ऊब शरीराला क्रियाशील ठेवते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. थंडीच्या दिवसांत आहाराची ऊब शरीराला मिळावी यासाठी विशेष लक्ष पुरवावे लागते.
 

दीपावलीच्या काळात अशी सुंदर गुलाबी थंडी असते की, त्यामुळे दीपावलीची मजा वाढते. भारतीय महिने पुढे-मागे सरकल्यामुळे सध्या जवळ जवळ दीपावलीपर्यंत पाऊस सुरू असतो. दीपावलीच्या काळात पाऊस थांबून वातावरण थंड, शुद्ध, मंगलदायी असते; बाहेर हिरवीगार निसर्गसंपदा असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी मुलांना सकाळी अभ्यंगस्नानासाठी उठवणे हा एक मोठा अनुभव असतो. अभ्यंग करत असताना जी काही गुलाबी थंडी असेल, त्यामुळे फारच आनंद होतो.

बघता बघता दीपावली संपली. आता येणार तुळशीचे लग्न. तुळशी असते उष्ण वीर्याची. थंडी सुरू होणार हे तुळशीच्या लग्नामुळे प्रकर्षाने जाणवते. थंडीमध्ये तुळशीचा उपयोग होईल या दृष्टिकोनातून तुळशीवृंदावनाकडे लक्ष देणे, माती बदलणे, तुळशीला पुन्हा टवटवी येईल अशा तऱ्हेने तुळशीकडे पाहणे हा तुळशीच्या लग्नाचा हेतू असावा. तुळशीचे एक पान रोजचा चहा करताना टाकले तर येणाऱ्या थंडीपासून संरक्षण मिळू शकेल. भारतीय सणांची, भारतीय परंपरेची आणि भारतीय संस्कृतीची हीच विशेषता आहे.

सणांमुळे आनंदापरी आनंद तर होतोच, पण आरोग्य व विज्ञान यांची सांगड घालून भारतीय सणवार बांधलेले असतात, त्याचाही लाभ मिळतो. तुळशीच्या लग्नाच्या वेळी चिंचा, आवळे यांनाही स्थान दिलेले असते. या सर्व वस्तू आता प्रकृतीस्वास्थ्यासाठी आवश्‍यक असतात, हेही सुचविलेले असते. आवळ्याचा रस किंवा आवळ्याच्या रसाच्या भावना दिलेले आवळ्याचे चूर्ण याच्याएवढे मोठे रसायन नाही. आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राश थंडीच्या दिवसात रोज सेवन केला तर पुढे वर्षभर शरीराचे धारण चांगले होऊ शकते. 

उष्णता नको, ऊब हवी!
संक्रांतीची गुळाची पोळी असो किंवा थंडी संपता संपता शरीराला सौना देण्याचा प्रकार असलेली होळी असो, या सगळ्या सणांद्वारा त्या त्या ऋतुमध्ये योग्य खाणे-पिणे काय असावे याची आठवण करून दिलेली असते. आहार नीट ठेवला नाही तर मनुष्य जीवनाची लढाई हरतो. आहाराकडे विशेष लक्ष दिले तर  केवळ शारीरिक आरोग्य, शरीराचे स्नायू व त्यांचा घाट नीट राहतो असे नाही, तर आहारामुळे शरीर तयार होते आणि शरीर व मनाचा निकट संबंध असल्यामुळे आहाराचा मानसिकतेवर परिणाम होऊन आनंद,चांगुलपणा व सौंदर्य पाहण्याची मनाची कुवत तयार होते, असे म्हणायला हरकत नाही.

पोटात अन्नाचा कण नसला की नुसती थंडीच वाजते असे नाही तर हात-पाय लटलटायलाही लागतात, उभे राहताना ग्लानी येऊ शकते व काहीही करू नये असे वाटले तर नवल नसते. थंडीच्या दिवसात ऊबदार पांघरूण घेऊन झोपणे आणि सकाळी जाग आली तरी ‘आज व्यायाम झाला नाही तरी चालेल’, ‘आज फार थंडी आहे तेव्हा ऑफिसला दांडी मारू’, अशा तऱ्हेचे विचार मनात येऊ लागतात. कारण पांघरुणाची ऊब त्यातून बाहेर आल्यावर मिळू शकत नाही. शेवटी शरीराची ऊब असो वा प्रेम असो, ते आतूनच यावे लागते, त्याचे सोंग घेता येत नाही किंवा त्याचा कल्पनेने अनुभव घेता येत नाही, ते प्रकट व्हावे लागते व त्यासाठी लागते शक्‍ती. 

मनुष्याचे पूर्ण जीवन आहारावर अवलंबून असते. सर्व शक्‍ती आहारातूनच मिळवावी लागते. आहारातून शक्‍ती काढून घेत असताना किंवा त्या शक्‍तीचा इंद्रियचलनासाठी वा कुठलेही कार्य करण्यासाठी वापर होताना शरीरात उष्णता उत्पन्न होते. पण तरीही मुळातच आहार जर उष्णवीर्य असला तर तो सहज पचू शकतो त्यातून ऊबही मिळू शकते. तिळाच्या रेवड्या किंवा गुळाची पोळी उन्हाळ्यात खाल्ली असता हातापायाची, डोळ्यांची जळजळ होणे किंवा मूळव्याधीसारखा त्रास होण्याची शक्‍यता असते. 

आहारातील गोष्टींचा विचार केला तर तांदूळ थंड असतो व गहू उष्ण असतो. तिखट, खारट व आंबट वस्तू साधारणतः उष्ण असतात; गोड वस्तू साधारणतः शीत असतात. अपवाद म्हणता येणार नाही पण आंबट-गोड चवीचा गूळ उष्णवीर्याचा असतो; साखर मात्र वीर्याने थंड असते म्हणून तिचे नामकरण आयुर्वेदाने शीता-सीता असे केलेले दिसते. 

आहाराची ऊब
सेवन केलेल्या आहाराचे अपचन झाले की शरीरात मेदोत्पत्ती होते. हा मेद स्पर्शाला थंड असतो, त्यामुळे तो शरीरात अति प्रमाणात वाढला की शरीराला अधिक उबेची गरज भासू लागते. रक्‍ताभिसरणासाठी उष्णता लागते आणि रक्‍ताभिसरण झाले की उष्णता वाढते. हृदयाच्या धडधडीमुळे शरीराची उष्णता वाढते व थंडीमुळे हृदयाला काम करणे अवघड होते. बाहेरून थकून भागून आलेल्या व्यक्‍तीला ‘या-बसा’ अशा प्रेमाच्या स्वागताने मिळालेली ऊब पुरशी नसल्याने त्याला गूळ-दाणे देण्याची पद्धत दिसते.

शरीर थंड पडले की प्राण गेला असे लक्षात येते. तसा संशय आल्यास कपाळावर हात लावून धुगधुगी आहे की नाही, म्हणजे उष्णता प्राण आहे की नाही याचा अंदाज घेतला जातो. जिवंत मनुष्य व उष्णता यांचा संबंध नक्कीच असतो. हाता-पायाची घडी घालून एखादा मनुष्य शांत बसून राहिलेला असला तर ‘काय थंडपणे बसून राहिला आहेस, काय मेल्यासारखा बसला आहेस’ असा प्रश्न विचारला जातो. 

गती व उष्णता यांचाही संबंध आपल्याला दिसतो. उष्णतेसाठी गती आवश्‍यक असते. एकूणच जीवनासाठी उष्णता व ऊब यांची आवश्‍यकता असते. शरीराची ऊब टिकावी व कार्यासाठी उत्साह राहावा म्हणून आहारावर खूप लक्ष ठेवावे लागते. एक गोष्ट खरी की, शरीराला ऊब हवी हे खरे असले तरी शरीरात अति उष्णता असली तर शरीराचे क्षरण लवकर होईल व म्हातारपणाकडे वाटचाल होईल. शारीरिक क्रियांमध्ये व मानसिक क्रियांमध्ये थंड राहिले तर अधिक चांगले असते. 

म्हणून उष्णतेपेक्षा ऊब अधिक महत्त्वाची समजली जाते. असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे उष्णता वाढली तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिरची, मिरी, गूळ वगैरे अति उष्ण वीर्याचे  पदार्थ अति प्रमाणात खाऊन चालत नाही, कारण अशा पदार्थांच्या अति प्रमाणात सेवनाने ऊबेपेक्षा उष्णता वाढू शकते. तेव्हा प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून ऋतुमानाप्रमाणे आहार करावा हे खरे असले तरी थंडीत आहाराची ऊब मिळणे महत्त्वाचे असते हे लक्षात ठेवणे इष्ट असते.

Web Title: family doctor cold preparation