पथ्यापथ्य खोकला

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 25 August 2017

वातावरणातील बदलांनंतर काही वेळा खोकला होत असतो. पण जर वरचेवर खोकला होत असेल आणि तो टिकून राहत असेल तर वैद्यांचा सल्ला घेणेच उत्तम. खोकल्याची उपेक्षा ही रुग्णास क्षयापर्यंत नेऊ शकते. 

खोकला आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी होत असतो. वरचेवर खोकला हा साधा वाटला तरी ‘कासात्‌ संजायते क्षयः’ अर्थात खोकल्याची उपेक्षा ही रुग्णास क्षयापर्यंत नेऊ शकते असे सांगितलेले असल्याने खोकला पूर्णपणे बरा होण्यासाठी योग्य उपचार करणे भाग असते. यासाठी औषधोपचारांइतकाच आहारसुद्धा महत्त्वाचा असतो. आज आपण खोकल्यातील पथ्य-अपथ्याचा विचार करणार आहोत. 

वाताचा खोकला
वातज कास किंवा वाताचा खोकला म्हणजे कोरडा खोकला. यात कफ पडत नाही, पण छाती-पोट-बरगड्या या ठिकाणी खूप वेदना असतात. या प्रकारच्या खोकल्यावर विशेष प्रकारची पेज घ्यायला सांगितली आहे. 
यवानीपिप्पलीबिल्व-मध्यनागरचित्रकैः ।
रास्नाजाजीपृथक्‌पर्णी पलाशशटिपौष्करैः ।।
....चरक चिकित्सास्थान

ओवा, पिंपळी, बेलाचा गर, सुंठ, चित्रक, रास्ना, जिरे, पिठवण, पळस, कापूरकाचरी, पुष्करमूूळ ही सर्व द्रव्ये समभाग घेऊन त्याचे षडंगोदक पद्धतीने औषधी पाणी तयार करावे. म्हणजे या मिश्रणाच्या ६४ पट पाणी घेऊन ते निम्मे शिल्लक राहीपर्यंत मंद आचेवर उकळावे, मग या पाण्यात तांदूळ शिजवावेत. यासाठी तांदळाच्या १४ पट पाणी घेऊन तांदूळ शिजेपर्यंत उष्णता द्यावी. तयार पेजेत तूप, डाळिंबाचा रस आणि सैंधव मीठ मिसळून खोकला झालेल्या व्यक्‍तीला पिण्यास द्यावी. यामुळे खोकला, दमा, वारंवार उचकी लागणे हे त्रास तसेच कंबर, छाती, बरगड्या, कोठा या ठिकाणी होणाऱ्या वेदना शांत होतात. 

दशमूले रसे तद्वत्‌ पंचकोलगुडान्विताम्‌ ।
सिद्धां समतिला दद्यात्‌ क्षीरे वाऽपि ससैन्धवम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

याच पद्धतीने दशमुळांपासून बनविलेल्या औषधी पाण्यात तांदूळ शिजवून तयार केलेल्या पेजेत गूळ आणि पंचकोलचूर्ण म्हणजे पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ, यांचे थोडेसे चवीपुरते चूर्ण मिसळून खोकला झालेल्या व्यक्‍तीला प्यायला द्यावे. ज्याला गोड चव आवडत नाही त्याने गुळाऐवजी सैंधव मीठ टाकले तरी चालते. 
तांदूळ व तीळ ही दोन्ही द्रव्ये समभाग घेऊन दुधात शिजवून तयार केलेली खीर प्यायला द्यावी. किंवा तांदूळ व तीळ यांच्या १४ पट पाणी घेऊन तयार केलेल्या पेजेमध्ये सैंधव मीठ मिसळून प्यायला द्यावी. 

कोरडा खोकला असणाऱ्या व्यक्‍तींनी आहारात चाकवत, मुळ्याची पाने, चांगेरीची पाने, तिळाचे तेल, दूध-गूळ-उसाचा रस यापासून बनविलेले पदार्थ, कांजी, आंबट फळांचा रस (डाळिंब, आमसूल वगैरे), सैंधव मीठ वगैरे द्रव्यांचा अधिकाधिक समावेश करण्याचा प्रयत्न करावा. मांसाहारी व्यक्‍तींना मासे, कोंबडी यांच्यापासून बनविलेले सूप, तूप आणि सैंधव मीठ मिसळून घेता येते, फक्‍त मांसावर अनैसर्गिक प्रक्रिया केलेली नाही ना याकडे लक्ष देणे चांगले होय. 

पित्ताचा खोकला
खोकल्याचा दुसरा प्रकार असतो, पित्तज. यात खोकताना कफाबरोबर पित्त पडते, डोळ्यांसमोर काजवे चमकतात, तोंडात कडू चव लागते, वारंवार फार तहान लागते, चक्कर येते. या प्रकारच्या खोकल्यात मुगाच्या सुपाबरोबर जवाचा भात, वरईचा भात खायला सुचवलेले दिसते. 
काकोलीबृहतीमेदायुग्मैः सवृषनागरैः ।
पित्तकासे रसान्‌ क्षीरं यूषांश्‍चाप्युपकल्पयेत्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

काकोली, बृहती, मेदा, महामेदा, अडुळसा, सुंठ या द्रव्यांचा काढा करून त्यात तांदूळ, मूग वगैरे धान्य शिजवून तयार केलेले सूप पित्तज कासात उत्तम असते. 
या प्रकारच्या खोकल्यावर औषधी दुधाचे योगही सुचवलेले आहेत. 
शरादिपञ्चमूलस्य पिप्पलीद्राक्षयोस्तथा ।
कषायेण श्रृतं क्षीरं पिबेत्‌ समधुरशर्करम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

कुश, काश, शर, दर्भ, ऊस यांचे मूळ, पिंपळी, मनुका, यांच्या चारपट दूध आणि दुधाच्या चारपट पाणी असे मिश्रण एकत्र करून पाणी उडून जाईपर्यंत मंद आच द्यावी. फक्‍त दूध शिल्लक राहिले की अग्नी देणे बंद करून दूध गाळून घ्यावे. या दुधात मध व साखर मिसळून प्यायला द्यावे. 
स्थिरासितापृश्निपर्णीश्रावणीबृहतीयुगैः ।
जीवकर्षभकाकोली-तामलकी ऋद्धिजीवकैः ।।
....चरक चिकित्सास्थान

सालवण, खडीसाखर, पिठवण, गोरखमुंडी, बृहती, कंटकारी, जीवक (दोन भाग), काकोली, भूम्यामलकी, ऋद्धी, यांच्यापासून वरील पद्धतीने दूध संस्कारित करून  घ्यावे व थंड झाल्यावर प्यायला द्यावे. यामुळे पित्तज खोकला, ताप, अंगाचा दाह वगैरे सर्वच त्रासांवर आराम मिळतो. 

कफाचा खोकला झाला असेल तर आहारनियोजन कसे करावे याची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Cough