पथ्यापथ्य-ताप

पथ्यापथ्य-ताप

ताप सर्वांच्या परिचयाचा रोग होय. ताप येतो तो एकटा कधीच येत नाही, बरोबरीने कधी डोकेदुखी, कधी अंगदुखी, कधी सर्दी-खोकला, कधी जुलाब असे अजून कितीतरी त्रास बरोबरीने घेऊन येतो. आयुर्वेदात तापाच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार वेगवेगळी औषधे दिलेली आहेतच; पण त्याबरोबरीने औषधांनी युक्‍त पथ्याहाराच्या निरनिराळ्या पाककृतीसुद्धा सुचवल्या आहेत. 

औषधी सिद्ध पेज
ताप आलेल्या व्यक्‍तीचे डोके दुखत असेल, बस्ती म्हणजे लघवी साठते त्या मूत्राशयाशी संबंधित वेदना होत असतील, पार्श्वभागी म्हणजे नितंब, कंबर, या ठिकाणी दुखत असेल तर याप्रमाणे पेज तयार करून द्यावी.
पेयां वा रक्‍तशालीनां पार्श्वबस्तिशिरोरुजि ।
श्वदंष्ट्राकण्टकारीभ्यां सिद्धां ज्वरहरां पिबेत्‌ ।।

गोक्षुर (ट्रिब्युलस टेरेस्ट्रिस Tribulus terrestris) आणि कंटकारी (सोलॅनम झॅन्थोकार्पम्‌ Solanum xanthocarpum) यांचा काढा करावा व यात रक्‍तसाळीचे तांदूळ शिजवून तयार केलेली पेज घ्यावी. 

पद्धत - पारंपरिक तसेच वृद्ध वैद्याधारानुसार औषधी सिद्ध जल तयार करताना दहा ग्रॅम औषधी द्रव्य ६४० मिली पाण्यात उकळायला ठेवून पाणी निम्मे शिल्लक राहीपर्यंत उकळायचे असते. पेज बनविण्यासाठी तांदळाच्या चौदा पट प्रमाणात हे औषधी जल घ्यायचे असते. त्यामुळे ज्या द्रव्यांचा काढा करायचा आहे त्या द्रव्यांचे पाच ग्रॅम मिश्रण घेऊन त्यात ३२० मिली पाणी मिसळून ते १६० मिली शिल्लक राहीपर्यंत उकळवले की औषधी सिद्ध जल तयार होते. या १६० मिली पाण्यात ११.५ ग्रॅम तांदूळ टाकून ते शिजेपर्यंत उष्णता दिली की औषधी सिद्ध पेज तयार होते.  

पेजेत काय मिसळाल?
 तापाबरोबर जुलाब होत असले तर 
ज्वरातिसारी पेयां वा पिबेत्‌ साम्लां श्रृतां नरः ।
पृश्निपर्णीबलाबिल्व-नागरोत्पलधान्यकैः ।।

पृश्निपर्णी (युरारिया लॅगोपॉयडस्‌ Uraria lagopoides), बला (सीडा कॉर्डिफोलिया Sida cordifolia), बेलफळ, सुंठ, निळे कमळ, धणे यांचा काढा करून त्यात तांदूळ शिजवून तयार केलेली पेज डाळिंबाचा रस मिसळून प्यावी. 

 तापामध्ये मलावष्टंभ असला तर
विबद्धवर्चाः सयवां पिप्पल्यामलकैः श्रृताम्‌ ।
सर्पिष्मतीं पिबेत्‌ पेयां ज्वरी दोषानुलोमनीम्‌ ।।

पिंपळी आणि आवळा यांचा काढा करून त्यात जव आणि रक्‍तसाळ तांदूळ शिजवावा. अशा प्रकारे तयार झालेल्या पेजेत बरेचसे तूप मिसळून प्यावे.  

 तापामध्ये पोटात दुखत असेल व कोठ्यात दोष साठून राहिल्यासारखे वाटत असेल तर 
कोष्ठे विबद्धे सरुजि पिबेत्‌ पेयां श्रृतां ज्वरी ।
मृद्वीका पिप्पलीमूल-चव्यामलकनागरै।।

मनुका, पिंपळीमूळ, चव्य (पायपर चाबा Piper chaba), आवळा व सुंठ यांचा काढा करून त्यात तांदूळ शिजवून तयार केलेली पेज प्यावी. 

तापामध्ये फिशर म्हणजे गुदभागी आग, भेगा पडण्याचा त्रास होत असला तर 
पिबेत्‌ सबिल्वां पेयां वा ज्वरे सपरिकर्तिके ।
बलावृक्षाम्लकोलाम्ल-कलशीधावनीश्रृताम्‌ ।।

बला (सीडा कॉर्डिफोलिया Sida cordifolia), कोकम, बोर, पृश्निपर्णी (युरारिया लॅगोपॉयडस्‌ Uraria lagopoides), कंटकारी (सोलॅनम झॅन्थोकार्पम्‌ Solanum xanthocarpum) यांच्या काढ्यात तांदूळ शिजवून पेज तयार करावी व त्यात बेलफळाचा गर किंवा बेलफळाचे चूर्ण मिसळून प्यायला द्यावी. 

तापामध्ये घाम येत नसला, झोप अजिबात येत नसली, फार तहान लागत असली तर 
अस्वेदनिद्रस्तृष्णार्तः पिबेत्‌ पेयां सशर्कराम्‌ ।
नागरामलकैः सिद्धां घृतभृष्टां ज्वरापहाम्‌ ।।

सुंठ आणि आवळ्याच्या काढ्यात बनविलेल्या पेजेला तुपाची फोडणी देऊन त्यात साखर मिसळून प्यायला द्यावी. 

सूप आणि भाज्या
तापामध्ये विशिष्ट कडधान्यांपासून बनविलेले ‘यूष’ म्हणजे विशेष पद्धतीने बनविलेले सूपसुद्धा हितकर सांगितलेले आहे. 
मृद्गान्‌ मसुरांश्‍चणकान्‌ कुलत्थान्‌ समकुष्ठकान्‌ ।
यूषार्थे यूषसात्म्यानां ज्वरितानां प्रदापयेत्‌ ।।

मूग, मसूर, चणे, कुळीथ आणि मटकी यापैकी जे कडधान्य ज्या प्रकृतीच्या व्यक्‍तीला सात्म्य असेल, त्याचे यूष बनवून द्यावे. 
यूष बनविण्याची पद्धत - ४० ग्रॅम कडधान्यामध्ये ६४० मिली पाणी मिसळावे व ते निम्मे किंवा चतुर्थांश शिल्लक राहीपर्यंत उकळून प्यायला द्यावे. 
तापामध्ये हितकर भाज्या - पडवळ, लहान कारले, कर्टोली, लाल पुनर्नवा. 

तापात टाळावे असे
तापामध्ये अपथ्य लक्षात घ्यावे. दूध, दही, मद्यपान, गोड पदार्थ, पचण्यास जड पदार्थ, खारट पदार्थ, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, कलिंगड, मासे, मश्रूम, पिठापासून बनविलेले पदार्थ हे सर्व तापात वर्ज्य समजावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com