ओजसंवर्धन

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 27 April 2018

वीर्यसाधन, वीर्यसंरक्षण म्हणजेच ओजसंरक्षण. ओजसंरक्षण झाले की आतील प्रकाश तेजरूपाने-कीर्तिरूपाने पसरतो. ओज संपले की जीवन संपते. तेव्हा ओजाची संकल्पना लक्षात घेऊन वीर्य-ओज तयार करण्याची, साठविण्याची, त्यांचा अपव्यय टाळण्याची जबाबदारी घ्यावी.

वीर्यसाधन, वीर्यसंरक्षण म्हणजेच ओजसंरक्षण. ओजसंरक्षण झाले की आतील प्रकाश तेजरूपाने-कीर्तिरूपाने पसरतो. ओज संपले की जीवन संपते. तेव्हा ओजाची संकल्पना लक्षात घेऊन वीर्य-ओज तयार करण्याची, साठविण्याची, त्यांचा अपव्यय टाळण्याची जबाबदारी घ्यावी.

‘फॅमिली डॉक्‍टर’साठी विषय निवडताना असे लक्षात आले की, यातील ‘प्रश्नोत्तरे’ या सदरासाठी येणाऱ्या प्रश्नांवरून विषय ठरविला तर ‘फॅमिली डॉक्‍टर’चा विषयही निवडल्यासारखे होईल आणि प्रश्नांना उत्तरे दिल्यासारखेही होईल. दोन-तीन आठवड्यांपूर्वीच्या ‘फॅमिली डॉक्‍टर’साठी जो विषय घेतलेला असतो, त्याच विषयावरचा प्रश्नही विचारला जातो, असा अनेकदा अनुभव येतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, आपला प्रश्न वेगळा व महत्त्वाचा आहे असे प्रत्येकाला वाटते. हाच आयुर्वेदाचा मोठा विजय समजता येईल. ‘तोंडावर मुरुम, पुटकुळ्या, वांग असल्यास वापरा अमुक तमुक क्रीम’. अशा प्रकारे अनेक तक्रारींवर एकच क्रीम कसे काय काम करू शकेल? शिवाय अशा क्रीमने मुरमावर इलाज झाला असे वाटले तरी पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असतेच. म्हणून असे प्रश्न येत असावेत. 

एक गोष्ट खरी की होणाऱ्या त्रासावर आयुर्वेदामध्ये प्रकृतीनुरूप इलाज केलेला असतो, त्यामुळे व्यक्‍तिगत औषध मिळाले तर चांगले असते. रस्त्यातून पाइपलाइन किंवा विजेच्या तारा टाकण्यासाठी खड्डा खोदला असला किंवा मांडवासाठी खड्डा खोदला असला व तो बुजवायचा असला तर खड्डा कशासाठी पाडला आहे हे विचारायची गरज नसते. प्रत्येकाची प्रतिकारक्षमता कमी-जास्त असल्यामुळे या खड्ड्यांमुळे प्रकृतीनुसार काही त्रास होऊ शकतात, सुरवातीला हे त्रास लक्षात आल्यावर नेहमीचे जुजबी औषध चालू शकते. परंतु असा त्रास वारंवार होऊ लागल्यास वैद्यांना प्रकृती दाखवून त्यांच्याकडून चिकित्सा करून घेऊन औषध घेणे आवश्‍यक असते.

एकच प्रश्‍न वारंवार
वारंवार विचारला जाणारा एक प्रश्न असा - ‘मी अमुक वर्षांचा तरुण आहे. लग्न कर म्हणून घरची मंडळी माझ्यापाठीमागे लागलेली आहेत. मला पूर्वीपासून वाईट सवय होती (ती वाईट सवय कोणती ही सांगायलाही लाज वाटते आहे). त्यामुळे आता मला खूप थकवा वाटतो, पाय गळून जातात आणि मुख्य म्हणजे लग्न करण्याची भीती वाटते.’ 

ही सवय हस्तमैथुनाची असू शकते किंवा अति कामोत्तेजक पुस्तके वाचणे, कामोत्तेजना होईल असे चित्रपट पाहणे, अश्‍लील विषयांवरचे चित्रपट पाहणे किंवा सारखे यौनसंबंधांविषयी किंवा स्त्रीविषयक चिंतन करणे या सर्व गोष्टींमुळे पुरुषाचे वीर्यस्खलन होत राहते. कधी कधी तर प्रत्येक मूत्रविसर्जनाच्या वेळी मूत्राला वीर्याचा चिकटपणा आलेला असतो. अशा तऱ्हेने सतत वीर्य जात राहिले तर त्रास होणारच. अशा सवयी असल्या तर बऱ्याच वेळा आजूबाजूच्या मित्रमंडळींना विचारले जाते. त्यातील बऱ्याच जणांनाही अशाच स्वरूपाची सवय असण्याची शक्‍यता असते. त्यामुळे ‘हे सगळे स्वाभाविक आहे, हे असे या वयात होतच असते, त्यात चिंता करण्यासारखे काही नाही’ वगैरे सांगितले जाते. कोणी डॉक्‍टरांकडे गेला तर तेही हे सगळे स्वाभाविक असल्याचे सांगतात. परंतु, हे स्वाभाविक असते तर याचा अनुभव एका वेगळ्या प्रकारे आला असता, त्यानंतर थकवा, पायात गोळे येणे, लिंगाचे उत्थापन न होणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्या नसत्या. तेव्हा साहजिक काय कारण आहे हे पाहणे आवश्‍यक आहे. 

वैद्यांचा सल्ला घ्या
एका विशिष्ट वयात जेव्हा वीर्य त्याची (शक्‍तीची) पूर्ती सर्व अवयवांना होईल एवढ्या प्रमाणात असते, तेव्हा सर्व ठीक चालू असते. एखादी टाकी पूर्णपणे भरून पाणी वरून वाहू लागते तेव्हा टाकी कोरडी असूच शकत नाही, ती ओव्हरफ्लो होणे स्वाभाविक. परंतु टाकीला खाली एकाऐवजी चार भोके पाडून त्याला नळ्या लावल्या तर टाकी कोरडी व्हायला वेळ लागणार नाही आणि खरोखर ज्यांना पाणी हवे आहे त्यांना अजिबात पाणी न मिळाल्यामुळे त्रास होईल. तेव्हा वीर्यस्खलनाचा अतिरेक होऊन चालत नाही. स्त्री-पुरुष संबंधांतसुद्धा या गोष्टीला महत्त्व असते. मर्यादेत असलेले स्त्री-पुरुष संबंध प्रकृतीला घातक ठरत नाहीत, अन्यथा प्रकृतीवर परिणाम होतो. अशा तऱ्हेचा त्रास होत असला तर मासिकात माहिती वाचून प्राथमिक उपचार करायला सुरवात केली तरी वैद्यांना प्रत्यक्ष भेटणे खूप आवश्‍यक असते. 

आहार-विहार
आहार साधा असणे, चमचमीत, तेलकट, पित्तकर, मसालेदार वस्तूंचे सेवन थांबवणे; सकाळचा नाश्‍ता गरम व ताजा असणे, दुपारचे जेवण वरण-भात-तूप-लिंबू, आमटी, भाजी, पातळ भाजी, पराठे, पोळ्या, भाकरी, चटणी, दही, असे साधे असावे. हॉटेलमधील, रस्त्यावर असलेल्या ढाब्यांवरचे जेवण बंद करावे. आपल्याला कुठला विषय शिकायचा आहे ते ठरवून त्याचा अभ्यास सुरू करावा. संगत चुकीची असली तर असे संबंध ताबडतोब थांबवावेत.

शक्‍तीला त्रास होईल अशा प्रकारे अनैसर्गिक संबंध करू नये. पुरुष-पुरुषात मैत्री असायला हरकत नाही, पण मैत्रीचा उपयोग दोघांचे आयुष्य उत्क्रांत करण्यासाठी, ताकद वाढविण्यासाठी व जीवन सुखी करण्यासाठी उपयोगाला यावी, ओजक्षय होऊन कुठला तरी मोठा रोग होऊन अकालमृत्यू व्हावा इथपर्यंत जाऊ नये. रोज एका चमचा च्यवनप्राश (पाठानुसार बनविलेले) घ्यायला सुरवात करावी. कपभर दुधात चिमूट भर सुंठ पूड व चार वावडिंगाचे दाणे टाकून उकळून घ्यावे. दुधात साडेपाच-सहा टक्के स्निग्धांश असावा. पाणीदार दूध असल्यास त्याचा उपयोग होत नाही. वेळच्या वेळी जेवावे, रात्रीची जागरणे करू नयेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले तीन-चार बदाम सहाणेवर उगाळून बनविलेली पेस्ट दुधाबरोबर घेता येते. खोबरेल तेलावर बनविलेल्या आयुर्वेदिक मसाज तेलाचा मसाज करावा. रात्री झोपताना पोटावरही थोडे तेल लावावे, टाळूवर दोन-तीन थेंब एरंडेल तेल लावावे, रात्री नाकामध्ये तुपाचे थेंब टाकावेत. अशा प्रकारे शरीराचे पित्त व वात आवरण्याचा प्रयत्न करावा. तूप-साखर, लोणी-साखर यांचे मर्यादेत केलेले सेवन हे सुद्धा वीर्योत्पत्तीसाठी व वीर्यव्यय न होण्यासाठी उपयोगी ठरते.

कटिस्नान घेणे उपयोगाचे ठरते. छोले, चवळी, चिकू वगैरे किडनीला अहितकर गोष्टी सेवन करण्यावर मर्यादा असावी. प्रकृतीला अनुकूल असेल असाच आहार ठेवावा. भावना उद्दीपित होतील असे आचरण टाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करावा. ही वाईट सवय घालवायचीच आहे असा निर्धार करावा. अन्यथा आपल्याला एकट्याला जगावे लागणार आहे याचे भान ठेवावे. वैद्यांकडे उपचार करायला गेल्यावर ते स्तंभनाची, वीर्यक्षय न होण्यासाठी औषधे देतील. 

वीर्यसाधन, वीर्यसंरक्षण म्हणजेच ओजसंरक्षण. ओजसंरक्षण झाले की आतील प्रकाश तेजरूपाने-कीर्तिरूपाने पसरतो. ओज संपले की जीवन संपते. तेव्हा ओजाची संकल्पना लक्षात घेऊन वीर्य-ओज तयार करण्याची, साठविण्याची, त्यांचा अपव्यय टाळण्याची जबाबदारी घ्यावी.

तेव्हा हा प्रश्न विचारणाऱ्याने या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor dr. balaji tambe