अग्निदुष्टीकर भाव 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 14 April 2017

कधी कधी आवडणारा पदार्थ मुद्दाम जास्त प्रमाणात बनवून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी खाल्ला जातो, पदार्थ खराब होऊ नये म्हणून तो जरी फ्रिजमध्ये ठेवला तरी तो काळाच्या संस्कारामुळे शिळा बनतच असतो. पाणी सुटलेली फळे खाणे, पुन्हा पुन्हा गरम केलेले अन्न खाणे, सलॅडचे जेवण करणे, अर्धवट शिजलेला भात, खिचडी, पोळी वगैरे खाणे या सर्व गोष्टी अग्नी बिघडविणाऱ्या असतात. 

आरोग्य आणि अग्नी यांचा परस्पर संबंध फार जवळचा असतो. आरोग्य चांगले हवे, तर अग्नीचे रक्षण करायलाच हवे. अग्नी बिघडू नये यासाठीही प्रयत्न करायला हवेत. यासाठी चरकसंहितेमध्ये अग्निदुष्टीकर भाव समजावले आहेत. मागच्या वेळी आपण अभोजन, अजीर्ण भोजन, अतिभोजन आणि विषमाशन म्हणजे काय आणि त्यामुळे अग्नी कसा बिघडू शकतो हे पाहिले. आज यापुढील अग्निदुष्टीकर भाव पाहूया. 

असात्म्यगुरुशीत अतिरुक्षसंदुष्टभोजनात्‌ । विरेकवमनस्नेहविभ्रमाद्‌ व्याधिकर्षणात्‌ ।।...चरक चिकित्सास्थान 

असात्म्य भोजन - स्वतःला न मानवणारे भोजन करण्याने अग्नी बिघडतो. प्रत्येकाने स्वतःची प्रकृती, ऋतुमान, शरीरातील वात-पित्त-कफ दोषांची स्थिती, राहतो तो देश वगैरे गोष्टींचा विचार करून योग्य आहाराचे सेवन करणे म्हणजे सात्म्य भोजन करणे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून केवळ रुचीपायी भोजन करणे हे "असात्म्य" होय. उदा. पावसाळ्यात अग्नी मंदावलेला असतो, त्यामुळे ऋतुचर्येनुसार पावसाळ्यात पचायला अगदी सोपा, हलका आहार करायचा असतो. मात्र याकडे दुर्लक्ष करून पावसाळ्यात ब्रेड, चीज, तळलेले पदार्थ वगैरे खात राहणे किंवा शरद ऋतूत वाढणाऱ्या पित्तदोषाचा विचार न करता चमचमीत गोष्टी रुचीपोटी खात राहणे हे "असात्म्य' भोजनात मोडते. महाराष्ट्रातील आहार वेगळा, राजस्थानातमधील आहार त्याहून वेगळा, दक्षिण भारतातील त्याहीपेक्षा वेगळा असण्यामागे अग्निरक्षणाची भूमिका असते. पण व्यवसायामुळे किंवा कोणत्याही कामामुळे राहण्याच्या ठिकाणात मोठा बदल झाला, तर त्यानुसार खाण्यात बदल करावा लागतो. सवय म्हणून किंवा आवड म्हणून हा बदल झाला नाही तर ते "असात्म्य' भोजन ठरते. आणि हळूहळू अग्नी बिघडतो. 

गुरुशीतरुक्ष भोजन - गुरु म्हणजे पचण्यास जड. मिठाया, चीज, चक्का, अंडी, मांसाहार वगैरे रोजच्या खाण्यात असले, तर त्याचा भार अग्नीवर येणे स्वाभाविक असते. शीत म्हणजे तापमानाने थंड. फ्रिजमधले अन्न, पाणी पिणे, फार थंड केलेली शीतपेये, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा वगैरे नियमितपणे सेवन करणे हे सर्व अग्नीला बिघडविणारे भाव होत. इतकेच नाही तर थंडीचा दीर्घकाळ संस्कार झालेले डीप फ्रोजन किंवा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने गोठवून ठेवलेले अन्न नंतर जरी गरम करून खाल्ले, तरी काही प्रमाणात अग्नी बिघडविण्यास कारणीभूत ठरतोच. वजन वाढेल, कोलेस्टेरॉल वाढेल, हृद्रोग होईल अशा अकारण भीतीपोटी आजकाल कोरडे अन्न खाण्याचा प्रघात पडलेला दिसतो, पण असे रुक्ष अन्न अग्नीला बिघडविणारे असते. अग्नी संधुक्षित होण्यासाठी तसेच आतड्यांना पुरेशी स्निग्धता मिळण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात आणि योग्य स्निग्धांश असावा लागतो. याकडे दुर्लक्ष झाले तर शरीरात कोरडेपणा उत्पन्न होतो, तसेच अग्नी विषम होतो व बिघडतो. 

संदुष्ट भोजन - शिळे, पाणी सुटलेले, फार शिजलेले, कच्चे अन्न खाणे हे सर्व संदुष्ट भोजनात मोडते. अनेकदा नियोजनाच्या अभावामुळे किंवा सवयीमुळे रात्रीचे अन्न दुसऱ्या दिवशी खाण्यात येते. कधी कधी आवडणारा पदार्थ मुद्दाम जास्त प्रमाणात बनवून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी खाल्ला जातो, पदार्थ खराब होऊ नये म्हणून तो जरी फ्रिजमध्ये ठेवला तरी तो काळाच्या संस्कारामुळे शिळा बनतच असतो. पाणी सुटलेली फळे खाणे, पुन्हा पुन्हा गरम केलेले अन्न खाणे, सलॅडचे जेवण करणे, अर्धवट शिजलेला भात, खिचडी, पोळी वगैरे खाणे या सर्व गोष्टी संदुष्ट भोजनात मोडतात आणि अग्नी बिघडविणाऱ्या असतात. 

विरेकवमनस्नेहविभ्रम - पंचकर्म, पूर्वकर्मातील स्नेहन वगैरे उपचार करताना आहारात, आचरणात नीट काळजी घेतली नाही, तर त्यामुळेही अग्नीमध्ये बिघाड होऊ शकतो. 

व्याधिकर्षण - कोणताही व्याधी दुर्लक्षित राहिला किंवा उपचार करूनही दीर्घकाळपर्यंत शरीरात राहिला, तर त्यामुळे अग्नी दुष्ट होतो. त्यामुळे व्याधीची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच त्यावर योग्य उपचार करणे हे श्रेयस्कर. 

याच्या पुढील अग्निदुष्टीकर भावांची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor dr balaji tambe food