पथ्य-अपथ्य 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 19 May 2017

आयुर्वेदिक औषधे घेताना पथ्य सांभाळायचे असते हे सर्वांनाच माहिती असते, मात्र पथ्य पाळायचे म्हणजे नेमके काय करायचे, अमुक गोष्टी खाण्यातून वर्ज्य करणे म्हणजे पथ्य पाळणे असते का, अमुकच गोष्टी फक्‍त आहाराचा ठेवायच्या हे पथ्य पाळणे असते का याविषयी अनेकांच्या मनात संदिग्धता असते.

भेषजेन उपपन्नोऽपि निराहारो न शक्‍यते । तस्मात्‌ भिषग्भिराहारो महाभैषज्यमुच्यते ।।....काश्‍यपसंहिता 

उत्तम औषधसुद्धा आहाराशिवाय रोग बरा करू शकत नाही म्हणून वैद्यमंडळी आहारालाच "महाभैषज्य' किंवा "सर्वश्रेष्ठ औषध' असे म्हणतात.
 
आरोग्य टिकवायचे असो किंवा रोग बरा करायचा असो, आयुर्वेदात आहाराला नितांत महत्त्व दिलेले असते. वैद्याने कितीही उत्तम निदान केले, सर्व प्रकारची काळजी घेऊन उत्तम औषध बनवून दिले, रुग्णाची रोगावस्था, दोषावस्था वगैरे लक्षात घेऊन योग्य काळी, योग्य अनुपानासह औषध घ्यायला सांगितले तरी बरोबरीने रुग्णाने आहारात आवश्‍यक ती काळजी घेतली नाही तर औषधाचा फायदा होऊ शकत नाही. म्हणून आयुर्वेदात पथ्य-अपथ्याला खूप महत्त्व असते. कित्येकदा, खरे तर बहुतेक वेळेला, आजार होण्यामागे "चुकीचा आहार' हेच मुख्य कारण असते. अशा वेळी औषधाच्या बरोबरीने पथ्यकर आहार घेणे अपरिहार्य असते. आयुर्वेदात तर याच्याही पुढे पाऊल घेतलेले दिसते, ते म्हणजे आहाराच्या रूपात औषधांची योजना करणे. म्हणजे प्यायच्या पाण्यावर रोगानुसार विशिष्ट वनस्पतींचा संस्कार करणे, भाताची पेज किंवा सूप वगैरे बनविण्यासाठी धान्ये, भाज्या वगैरेंबरोबर जे पाणी मिसळायचे असते ते औषधांनी सिद्ध करून घेतलेले असणे वगैरे. 

आयुर्वेदिक औषधे घेताना पथ्य सांभाळायचे असते हे सर्वांनाच माहिती असते, मात्र पथ्य पाळायचे म्हणजे नेमके काय करायचे, अमुक गोष्टी खाण्यातून वर्ज्य करणे म्हणजे पथ्य पाळणे असते का, अमुकच गोष्टी फक्‍त आहाराचा ठेवायच्या हे पथ्य पाळणे असते का याविषयी अनेकांच्या मनात संदिग्धता असते. आयुर्वेदाच्या ग्रंथांत पथ्य आणि अपथ्य या दोहोंची म्हणजे काय खावे व काय खाऊ नये, या दोन्ही प्रकारे मार्गदर्शन केलेले असते. हे मार्गदर्शन अर्थातच केवळ रोगाला धरून केलेले असते. वैद्याला जेव्हा रुग्णाला आहार समजावयाचा असतो तेव्हा रोगासाठीचे पथ्य-अपथ्य तसेच रुग्णाच्या प्रकृतीसाठीचे पथ्य-अपथ्य अशा दोघांचा मेळ घालणे भाग असते. त्यामुळे वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन सर्वांत महत्त्वाचे असते. 

पथ्य-अपथ्याचा विचार करताना अष्टांदहृदयातील खालील सूत्रही लक्षात घ्यावे लागते, 
शमनं कोपनं स्वस्थहितं द्रव्यमिति त्रिधा ।....अष्टांगहृदय सूत्रस्थान 
1. शमन - या प्रकारची द्रव्ये बिघडलेल्या दोषांना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतात. 
2. कोपन - या प्रकारची द्रव्ये शरीरात गेल्यावर दोषांना भडकवणारी आणि पर्यायाने धातू-मलांना बिघडवणारी असतात. 
3. स्वस्थहित - या प्रकारची द्रव्ये आरोग्यासाठी कायम हितकर असतात, अर्थात प्रकृती कुठलीही असो, ऋतुमान, देश कोणताही असो, स्वस्थहित द्रव्ये कायम अनुकूल अशी असतात. 

आहारद्रव्यांचा विचार करायचा तर स्वस्थ हितकर द्रव्यांत खालील गोष्टींचा समावेश होतो. 

धान्यवर्ग - एक वर्ष जुना तांदूळ, यातही आंबेमोहोर, कोलम, रक्‍तशाली, आजरा वगैरे जातीचे तांदूळ, ज्वारी, नाचणी, वरई, भाजून घेतलेले गहू वगैरे. 

भाज्या - वेलवर्गीय भाज्या उदा. दुधी, तोंडली, कोहळा, तांबडा भोपळा, परवर, घोसाळी, दोडकी, टिंडा, कारले वगैरे. 

कडधान्ये - मूग, मटकी, मसूर 

मसाल्याचे पदार्थ - जिरे, हळद, धणे, सैंधव मीठ, आले, लिंबू, कोकम, खोबरे, कोथिंबीर, दालचिनी, तमालपत्र, दगडफूल, बडीशेप, वेलची, केशर, कढीपत्ता वगैरे. 

फळे - डाळिंब, द्राक्षे, सफरचंद, अंजीर, ऋतुपरत्वे मिळणारी संत्री, मोसंबी, पपई, पेअर वगैरे. 

सुका मेवा - मनुका, अंजीर, जर्दाळू, भिजवलेले बदाम 

दूध व दुधाचे पदार्थ - दूध, ताक, लोणी, तूप 

इतर - मध, खडीसाखर, साळीच्या लाह्या, उकळलेले पाणी 

सध्याचा काळ आणि प्रकृतिमान पाहता सहसा या गोष्टी "स्वस्थहित' म्हणजे सर्वांना अनुकूल असतात असे दिसते, मात्र आजारपण किंवा विशिष्ट ऋतुमानानुसार यात बदल करणे गरजेचे असू शकते. यासाठी वैद्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेच उत्तम होय. पुढच्या वेळी आपण आयुर्वेदाच्या ग्रंथात प्रत्येक रोगामध्ये पथ्यकर, अपथ्यकर म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांची माहिती घेणार आहोत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor dr balaji tambe food