वेद - आयुर्वेद

Balaji Tambe
Balaji Tambe

शरीर हे महत्त्वाचे साधन आहे. शरीराचे आरोग्य टिकविण्याचे मार्गदर्शन केलेले आहे ते आयुर्वेदशास्त्र सर्वांत महत्त्वाचे समजले जाते. वेदांमध्ये वनस्पती किंवा औषधाला "ओषधि‘ शब्द वापरला आहे. ओष्‌ म्हणजे वेदना. त्यामुळे वेदना किंवा दुःख दूर करणारी ती ओषधि. औषधीला वेदात माता असेही म्हटलेले आहे. 

"आयुर्वेद‘ या शब्दातच वेद आहे. आयुष्यावरची सर्व माहिती ज्यात आहे तो आयुर्वेद. कसे जगावे, कसे वागावे, रोग होऊ नयेत म्हणून काय करावे, रोग झाल्यावर काय करावे, समाजात राहताना काय काळजी घ्यावी वगैरे अगणित विषयांचे समर्पक वर्णन आयुर्वेदात केलेले आहे. या आयुर्वेदशास्त्राची मुळे सापडतात ती वेदवाङ्‌मयात. 

 
अनुत्पाद्यैव प्रजा आयुर्वेदं एव अग्रे असृजत्‌ ।...सुश्रुत सूत्रस्थान 1 
सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी "ज्ञान‘ अस्तित्वात आले असे भारतीय शास्त्रे सांगतात. सुश्रुत संहितेतही आयुर्वेद अगोदर उत्पन्न झाला आणि त्यानंतर प्रजा (पशु-पक्षी-वनस्पती) अस्तित्वात आली असा उल्लेख आहे. 


ज्याप्रमाणे बालकाचा जन्म होण्यापूर्वीच मातेमध्ये "स्तन्य‘ तयार होते, त्याप्रमाणे मनुष्य किंवा सृष्टी तयार होण्यापूर्वी परमात्म्याने जीविकेसाठी आवश्‍यक साधने तयार केली. या साधनांमध्ये आयुर्वेदाचा समावेश असल्यामुळे आयुर्वेद हे वेदाचे उपांग समजले जाते. 
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌ । 


शरीर महत्त्वाचे साधन असल्यामुळे "आयुर्वेद‘ ज्यात शरीराचे आरोग्य टिकविण्याचे मार्गदर्शन केलेले आहे ते शास्त्र सर्वांत महत्त्वाचे समजले जाते. काश्‍यपसंहितेतसुद्धा म्हटले आहे की एका हातात चार बोटे व पाचवा अंगठा असतो. तो इतर बोटांपेक्षा आकाराने, ठिकाणाने वेगळा असतो व इतर बोटांवर शासन करतो. त्याप्रमाणे आयुर्वेदसुद्धा चारही वेदांमध्ये मुख्य आहे. 


वेदांमध्ये इंद्र, अग्नी व सोम देवतेनंतर "अश्विनौ‘ यांची गणना केलेली आढळते. आयुर्वेदात अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य आहेत असे सांगितले आहे. वेदामध्ये वैद्याची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. 


यत्रौषधीः समग्मत राजानः समितामिव । विप्रः स उच्यते भिषग्‌ रक्षोहामीवचातनः ।। 


- सर्व औषधे आपल्या जवळ ठेवणारा 
- आपल्या शास्त्राचे संपूर्ण ज्ञान असणारा 
- युक्‍ती आणि योजना कशी करावी हे जाणणारा 
- राक्षसांचा नाश करण्यास समर्थ असणारा (या ठिकाणी राक्षस म्हणजे सूक्ष्म जीवजंतू-जीवाणू व विषाणू वगैरे) 
- रोग मुळापासून बरा करणारा 
कृमी किंवा जीवजंतूंना वेदामध्ये राक्षस, असुर, यातुधान हे शब्द वापरले आहेत. सुश्रुत संहितेतही त्यांना निशाचर, रक्ष म्हटलेले आहे. कृमी व राक्षस या दोघांमध्ये पुढील साम्य असते, 
- दोघे अंधारात किंवा रात्रीच्या वेळी आक्रमण करतात. त्यांना प्रकाश आवडत नाही. 
- दोघे सूर्यप्रकाशापासून दूर पळतात. 
- धूम-यज्ञाला घाबरतात. 
- दोघांनाही मांस आणि रक्‍त प्रिय असते. यांच्यावरच आक्रमण करतात. 
- दोघेही रूप बदलत राहतात. 


वेदांमध्ये वनस्पती किंवा औषधाला "ओषधि‘ शब्द वापरला आहे. ओष्‌ म्हणजे वेदना. त्यामुळे वेदना किंवा दुःख दूर करणारी ती ओषधि. औषधीला वेदात माता असेही म्हटलेले आहे. 


ऋग्वेदात औषधी वनस्पतींबद्दल म्हटले आहे, 
औषधयः संवदन्ते सोमेन सह राज्ञा । यस्मै कृणोति ब्राह्मणस्तं राजन्‌ पारयामसि ।।...ऋग्वेद 10-19-22 
ओषधि "सोम‘ राजाला म्हणते, हे राजन्‌, ब्रह्मज्ञान असणारा जो वैद्य रोग्यासाठी आमची योजना करतो, त्या रोग्याचा रोग आम्ही पार करतो म्हणजे बरा करतो. 


वेदांमध्ये निसर्गातील तत्त्वांना देवता संबोधले आहे आणि त्यांना आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. 
रुत्‌ - हे बलशाली मरुत्‌ देवांनो, तुमची जी कल्याणकारी, पवित्र व सुखदायी औषधी आहेत, त्यांची आम्ही इच्छा करतो आहोत. 
जल - जलामध्ये सर्व औषधी समाश्रित आहेत, हे जल देवांनो, जीवनरक्षक औषधींना आमच्या शरीरात स्थित करावे. 
सूर्य - उदय होणारा सूर्य कृमींचा नाश करो. 
आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी. म्हणून पूर्वीपासून सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. रक्‍ताची कमतरता सूर्यकिरणांमुळे दूर होते आणि रक्‍त कमी झाले की त्वचेचा रंग हिरवा-पिवळा होतो आणि त्यासाठी सूर्यकिरणे उत्तम असतात असे अथर्ववेदात सांगितले आहे. आजही कावीळ वगैरे विकारांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करण्याची पद्धत आहे. 
वेदात हृदयरोग व कावीळ या रोगांचा स्पष्ट उल्लेख आहे. या दोहोंची चिकित्सा सूर्यकिरणांनी होते. 
वायू - हे वायू तू सर्व ओषधींनी युक्‍त असा आहेत. तू सर्व औषधे आण आणि आमचे सर्व दोष दूर कर. 
वेदांमध्ये प्राण व अपान या दोघांचा उल्लेख आहे. प्राण शरीरात बल आणतो. अपान शरीरातून पाप व रोगांना बाहेर काढतो. 
अथर्ववेदांत उल्लेख असलेल्या वनस्पती 
पिंपळी-पिंपळी म्हणते की जो मनुष्य आमचा उपयोग करतो तो कधी नष्ट होत नाही. पिंपळी वातरोग, उन्माद, अपस्मार यावर उत्तम ओषधि आहे. 
अपामार्ग (आघाडा) - क्षुधा, तृष्णा, अनपत्यता यावर उपयुक्‍त. 
पृश्निपर्णी - हे पृश्निपर्णी, तू न दिसणाऱ्या, रक्‍त पिणाऱ्या, उन्नतीला थांबविणाऱ्या, गर्भाची वाढ होऊ न देणाऱ्या रोगाचा नाश कर. 
याशिवाय पिंपळ, वड, अर्जुन, काकडशिंगी, रोहिणी वगैरे वनस्पतींचा वेदांमध्ये उल्लेख सापडतो. 
वेदांमध्ये रोगांचा उल्लेख - शिरःशूळ, कर्णशूळ, रक्‍ताची कमतरता, ज्वर, राजयक्ष्मा, शिरोरोग, विषबाधा, गंडमाळा, कृमी, कामला वगैरे रोगांचा उल्लेख. 
वेदात रोगप्रतिकाराचे-उपचाराचे वर्णन-व्रण धुण्यासाठी मिठाचे पाणी, हृद्रोगावर हिमालयातील नद्यांचे पाणी, लघवी अडली असेल तर मूत्रमार्गातून कापराचे चूर्ण सरकवणे वेदांमध्ये "शिर‘ महत्त्वाचे समजलेले आहे. इतर सर्व शरीरावयवांपेक्षा शिर सर्वांत श्रेष्ठ म्हटलेले आहे. शिरालाच "देवकोश‘ म्हटलेले आहे. अ-थर्व म्हणजे स्थिरचित्त. स्थिरचित्त योग्याने डोक्‍यातील मस्तिष्काच्याही वर आपल्या प्राणाला स्थिर करणे म्हणजे अ-थर्व होणे. असे जे अ-थर्व शिर आहे, ते देवकोश असे. याची रक्षा प्राण, अन्न आणि मनाद्वारा होत असते. 

 
अथर्ववेदात पुरुषशरीराचे (स्त्री किंवा पुरुष) "अयोध्या‘ रूपात वर्णन केलेले आहे. 
न योद्धुं शक्‍या अयोध्या म्हणजे ज्याच्याशी कोणीही लढू शकत नाही ती अयोध्या. अयोध्यानगरीमध्ये आठ चक्र, नऊ द्वारे आहेत. ही देवतांची नगरी आहे आणि हिच्यात हिरण्यकोश (सोन्याचा कोश) आहे. हे मनुष्यशरीरालाही लागू पडते. यात मूलाधारादी चक्र आहेत, दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, मुख, जननेंद्रिय आणि गुद ही नऊद्वारे आहेत. यात इंद्रिये, मन, चंद्र, प्रजापती वगैरे देवता राहात आहेत. याच्यात ज्ञानरूपी हिरण्यकोष आहे. शरीरच याप्रकारे अयोध्या आहे, कोणताही रोगरूपी शत्रू या नगरीशी लढू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com