पाठीचा कणा

पाठीचा कणा

‘ताठ कण्याने जगावे’ असा शब्दप्रयोग नेहमी केला जातो. ताठ कण्याचा संदर्भ मान-अपमानाशी जोडला जातो हे खरे आहे, पण कण्याचा मानेशी असलेला संबंध अधिक महत्त्वाचा आहे. तरुणपणीच कण्याची काळजी घेतली तर म्हातारपणातही वाकण्याची वेळ येत नाही.

पाठ कधीच दुखली नाही, अशी व्यक्ती सापडणे कठीण आहे. काही तज्ज्ञांच्या मते जगातील सर्व मानवाचे तीन प्रकार असतात. पहिला, ज्यांची पाठ आता वर्तमानकाळात दुखत आहे. दुसरा, ज्यांची पाठ भूतकाळात कधी ना कधी दुखत होती आणि राहिलेल्या व्यक्तींची पाठ भविष्यकाळात केव्हातरी दुखणार आहे. या जागतिक विकाराचे कारण आपल्या उत्क्रांतीत असते. प्राणी चार पायांवर चालत होते. या चतुष्पाद प्राण्यांचे रूपांतर द्विपाद प्राण्यात झाले. पाठीचा कणा उभा झाला. शिवाय पाठीचा कणा पुढे किंवा मागे वाकणे शक्‍य होऊ लागले. उजवीकडून किंवा डावीकडून स्वतःभोवती फिरू लागला. माथा (कवटी) पेलू लागला आणि शरीराच्या वजनाला टेकू देऊ लागला. शिवाय कण्याच्या आतील भागात पंचेचाळीस सेंटिमीटर लांब असणाऱ्या मज्जारज्जूचे संरक्षण करण्याचे काम पूर्वापारपासून चालू राहिलेले होतेच. मज्जारज्जू एक सेंटिमीटर जाडीचा असतो; पण त्या भागाला इजा झाली, तर माणसाला उभे राहणे किंवा चालणे अशक्‍य होऊन बसते. या मज्जारज्जूतून लक्षावधी संदेश मागे-पुढे जात असतात. या मज्जारज्जूच्या कार्यामुळे मानेखालच्या शरीराच्या एकूण एक हालचाली शक्‍य होतात. मज्जारज्जूवर एकावर एक अशा तीन नळ्या असतात. त्यातल्या एका नळीत एक द्रव पदार्थ असतो. या द्रव पदार्थाला सेरेब्रो-स्पायनल-फ्लुइड म्हणतात. या द्रव पदार्थामुळे मज्जारज्जूला बसणाऱ्या धक्‍क्‍यांपासून आतील मज्जासंस्थेचे संरक्षण तर होतेच, शिवाय या भागातील पेशींना योग्य आहारद्रव्यांचा पुरवठा आणि निर्माल्याचा निचरा ही महत्त्वाची चयापचयाची कार्ये होतात. याखेरीज मज्जारज्जूभोवती असणाऱ्या मणक्‍यांमुळे पाठीच्या कण्याने मज्जारज्जूचे संरक्षण होते. मज्जारज्जूतून मज्जातंतूच्या शिरांच्या ३१ जोड्या बाहेर पडतात. प्रत्येक जोडीतील एक शीर शरीराकडून मेंदूकडे संवेदना पोचवत असते, तर दुसरी मेंदूकडून शरीराकडे, स्नायूंकडे. स्नायू कार्यान्वित होण्याकरता संदेश नेत असते. काही वेळा मज्जारज्जूचे कार्य प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे (रिफ्लेक्‍श ॲक्‍शन) होते. उदाहरणार्थ गरम भांड्याला बोट लागताच तो हात चटकण बाजूला नेला जातो. प्रत्यक्ष मज्जारज्जूमुळे माणसाला क्वचितच त्रास होतो. तथापि, मज्जारज्जूच्या बाजूने असणाऱ्या ३३ मणक्‍यांतील दोषांमुळे पाठीच्या कण्याचे अनेकविध त्रास होऊ शकतात. पाठ दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. मूत्रपिंडाचे आजार, प्रॉस्टेट ग्रंथीचे विकार, यकृत किंवा पित्ताशयाचे दोष, संधिवात, विविध प्रकारचे संसर्ग, एवढेच काय पण मेंदूत जाणवणाऱ्या विविध भावनांमुळे पाठ दुखणे शक्‍य असते. हृदयविकार हेदेखील पाठदुखीचे एक कारण असू शकते. चिंता हे पाठदुखीचे महत्त्वाचे कारण असू शकते. चिंता दीर्घकाळ टिकू शकते. चिंतेमुळे पाठीचे स्नायू आकुंचित पावतात. दीर्घकाळ आकुंचित पावलेले स्नायू थकतात. या थकण्यामुळे ते दुखू लागतात. काळजीचे कारण दूर झाल्यावर पाठदुखी थांबते. जेव्हा स्नायू दीर्घकाळ आकुंचित स्थितीत राहतात, तेव्हा त्यात प्राणवायूचा पुरवठा कमी पडू लागतो. प्राणवायूच्या अभावात स्नायूंना आकुंचन पावावे लागले, तर तेथे लॅक्‍टिक ॲसिड जमू लागते, तर लॅक्‍टिक ॲसिडमुळे स्नायू दुखरे होतात.

मानवी कण्यांमध्ये मानेच्या भागात सात मणके असतात. हा मणक्‍याचा भाग आपल्या माथ्याला टेकू देतो. या मणक्‍यातील हालचालीमुळे माणसाला खाली बघून जमिनीवर काय आहे, ते पाहता येते आणि उलटपक्षी आकाशातील तारे न्याहाळता येतात. बसल्या बसल्या (किंवा उभ्या स्थितीत) एका खांद्याकडून दुसऱ्या खांद्यापर्यंत आणि पलीकडे नजर वळवता येते. मानेच्या खालच्या छातीच्या भागातील कण्यात फारशी  हालचाल होत नाही. या भागातील मणक्‍यांना फासळ्या लागून असतात. यांच्या खाली कमरेचा भाग येतो. छातीच्या भागात बारा मणके असतात, तर कमरेत पाच मणके असतात. हे पाच मणके माणसाचे वजन पेलतात. त्यांच्या खाली माकड हाड असते (सेक्रम आणि कॉसिक्‍स). उत्क्रांती होण्यापूर्वी या भागामुळे प्राण्यांना शेपटी होती. हे कमरेचे मणके, विशेषतः कमरेच्या मणक्‍यांपैकी वरून चौथा व पाचवा मणका माणसाच्या अनेक त्रासांचे कारण असू शकतो.

जन्माच्या वेळी माणसाचा कणा सरळ असतो. लहान मूल डोके धरू लागले, की मणक्‍यांच्या होणाऱ्या बदलामुळे मानेतील कणा वाकू लागतो. मूल रांगू लागले, की कमरेच्या भागातील कण्यालादेखील एक अर्धवक्रता येते. या बदलामुळे माणसाच्या कण्याला वेगळा आकार येत जातो. या वक्रतेमुळे पाठीच्या कण्याची चालताना, पळताना, उडी मारताना बसणारे धक्के सहन करण्याची क्षमता वाढत जाते. या वक्रतांबरोबर इतरही काही योजना हे धक्के सहन व्हावेत या दृष्टीने आपल्या कण्यात निसर्गाने योजलेले आहेत. प्रत्येक दोन मणक्‍यांच्या मध्ये उशासारख्या चकत्या असतात. या चकत्या मधल्या भागांत पोकळ असतात. बाहेरच्या बाजूने कूर्चेची चकती असते, तर आत एक चिवट पदार्थ भरलेला असतो. जेव्हा पाठीच्या कण्याला खूप जोरात मार लागतो, (एखादा अपघात होतो) त्या वेळी सभोवतालच्या कूर्चेला जोरात मार बसून कूर्चा फाटू शकते. अशा मोठ्या दुखापतीनंतर शस्त्रक्रिया करून तेथील चकती काढून टाकली जाते आणि खालच्या व वरच्या मणक्‍यांना टायटॅनियम धातूचे स्क्रू वापरून एकमेकांना जखडतात. इतकी मोठी दुखापत झाली नाही, तर चकती विरते, आतील पदार्थ थोड्याफार प्रमाणात बाहेर येतो. हा बाहेर आलेला पदार्थ मणक्‍यातून बाहेर पडणाऱ्या ज्ञानतंतूंच्या शिरांवर दाब आणतो. त्यामुळे कंबर, खुबा, मांडीचा मागचा भाग, गुडघ्यांचा मागचा भाग, घोटा व पाऊल येथे वेदना होऊ लागतात. येथे सायाटिक नावाची शीर असते, म्हणून अशा वेदनेला सायाटिका असे म्हणतात. या दुखण्याचे प्रमुख कारण तेथील स्नायू आकुंचित पावतात हे होत. या स्नायूंच्या आकुंचनामुळे रुग्ण पुढे वाकतो. माणसाच्या पाठीत चारशे स्नायू व एक हजार स्नायूबंध असतात. 

या स्नायूंना कार्यक्षम ठेवण्याकरता नियमाने पाठीचे व्यायाम करणे आवश्‍यक असते. अष्टांग सूर्यनमस्कार नियमाने घालणे हा एक उत्कृष्ट पाठीचा व्यायाम आहे. नेहमी पाठ सरळ ठेवावी. झोपताना सपाट व कडक बिछाना वापरावा. वजन उचलताना खाली बसून, पाठ सरळ ठेवून उचलावे. नियमाने पायी चालावे म्हणजे पाठीच्या स्नायूंना पुरेसा व्यायाम होईल. दीर्घकाळ बसणे (वारंवार प्रवास करणे), वाकून वजने उचलणे, पोट सुटलेले असणे, वारंवार खोकल्यासारखे त्रास होणे या गोष्टी पाठीच्या कण्याचे स्वास्थ्य बिघडवतात. खुर्चीवर बसताना जितके मागे सरकून बसता येईल तेवढे मागे सरकावे. खुर्चीची पाठ सरळ असावी. शक्‍यतो आपल्या शक्तीच्या मानानेच वजने उचलावीत. घट्ट बसलेली खिडकी उघडताना आपण आपल्या पाठीवर मोठा ताण देत असतो, याकडे लक्ष असावे. वाढत्या वयात पाठीच्या कण्याला ताण सहन करण्याची शक्ती कमी होत जाते. कण्याचा ताण टाळावा; परंतु पाठीचे व्यायाम आणि पायी चालणे चालू ठेवावे.

कमरेच्या मणक्‍यापासून होणारे त्रास अनेकांना होतात. त्याखालोखाल मानेचे मणके त्रास देतात. मानेच्या मणक्‍यांतील चकती झिजते, ती फाटते. मानेतून निघणाऱ्या ज्ञानतंतूंच्या शिरांवर दाब येतो. परिणामी खांद्यात किंवा हातात मुंग्या येतात. वेदना होतात. मान अवघडते. मानेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मणक्‍यात जर अपघात झाला, तर जिवावर बेतू शकते. अशी घटना गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देतात तेव्हा बुद्धिपुरस्सर केली जाते. त्यामुळे गुन्हेगाराला मृत्युदंड मिळतो. वाहनाच्या अपघातात पाठीच्या, मानेच्या कण्याला इजा झाली असण्याची शंका आली, तर रुग्णाला उचलताना फार काळजी घ्यावी लागते. क्षुल्लक चूक झाली तरी कायमस्वरूपाचे लुळे-पांगळे होण्याची शक्‍यता असते.

वार्धक्‍याबरोबर सगळीच हाडे कमजोर होतात. त्याचे प्रमुख कारण हाडांतील कॅल्शियम कमी होऊ लागते. मणक्‍यातील चकत्या मऊ होऊ लागतात. परिणामी व्यक्तीला पोंक येते, पुढे वाकले जाते. काही वृद्ध व्यक्ती, विशेषतः स्त्रिया कमरेतून पुढे वाकतात. हे टाळण्यासाठी तरुण वयापासूनच पाठीची काळजी घेणे आवश्‍यक असते. नियमाने पाठीचे व्यायाम करण्याचे महत्त्व आधी सांगितलेले आहेच.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com