#FamilyDoctor दृष्टी तशी सृष्टी

Eyes
Eyes

डोळ्यांवर अधूनमधून निरशा किंवा मलई काढलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवाव्या. एरंडेलाचे किंवा मधाचे बोट डोळ्यांत फिरवावे, नित्यनियमाने काजळ वापरावे, काजळीयुक्‍त काळे काजळ वापरायला अवघड वाटत असेल, तर रंग नसलेले अंजनही वापरता येते. सकाळी तोंडात पाणी भरून डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणेसुद्धा डोळ्यांना हितकर असते.  

जगाचा सगळा विस्तार डोळ्यांनी दाखवला तसा समजला जातो म्हणून डोळ्यांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे. ‘वाग्भट’ ग्रंथातील हा एक श्‍लोक डोळ्यांचे महत्त्व समजण्यासाठी फार उत्तम आहे.

‘चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैः यत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा।
व्यर्थ्यौ लोकोऽयं तुल्यरात्रिन्दिवानां पुंसामध्यानां विद्यमानेऽपि वित्ते।।’
जोपर्यंत जगण्याची इच्छा व जिवाची काळजी आहे, तोपर्यंत मनुष्याने डोळ्याच्या रक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. डोळे नसलेल्या माणसास रात्र किंवा दिवस, साधे घर किंवा ताजमहाल सारखेच राहणार - म्हणजे काहीच फरक राहणार नाही. डोळ्यांचे काम म्हणजे पाहणे वगैरेसाठी. कितीही धनसंपत्ती असली, तरी त्याचा उपयोग होऊ शकत नाही.

‘तू मला अंतर्यामी पाहा,’ असे भगवंतांनी आणि ‘मला तुमचे चतुर्भुज रूप पाहायचे आहे,’ असे अर्जुनाने श्रीमद्‌ भगवद्‌गीतेत म्हटलेले आहे. याचा अर्थ ‘पाहणे’ व ‘डोळे’ खूप महत्त्वाचे आहेत. अर्जुनाला शारीरिक पातळीवर काम करायचे असल्याने ‘मला तुमचे चतुर्भुज रूप पाहायचे आहे,’ असे तो म्हणतो. हे चतुर्भुज रूप उघड्या डोळ्यांनी पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. डोळे हे जीवनातील अतिशय महत्त्वाचे अंग म्हणायला हरकत नाही.

डोळे महत्त्वाचे असले, तरी पण त्यांची आपण पाहिजे तशी काळजी घेत नाही. म्हणून डोळ्यांचे विकार माणसाला सतावतात. डोळ्यांची जबाबदारी ही डोळे या इंद्रियावर नसते, तर डोळे याबाबतीत परतंत्र असतात. शरीरातसारखे पित्त वाढले, तर डोळ्यांना त्रास होतो व असा त्रास अनेकदा झाला, की त्याचे पर्यवसान रोगात होते. पोटात वा शरीरात कफदोष प्रमाणाबाहेर वाढला, तरी डोळ्यांना रोग होतो. डोळा म्हणजे नुसते आतले भिंग नव्हे. वातामुळे डोळे फडफडणे, डोळे बंद राहणे, पापणी न उघडता येणे, असेही त्रास होऊ शकतात. मधुमेह वाढला की डोळ्यांची वाटचाल अंधत्वाकडे चालू होते. गोडधोड खाल्ले, की डोळ्यांवर झापड किंवा झोप येते. दृश्‍य हे जर चकचकीत असले, तर डोळे ते दृश्‍य विस्फारून पाहण्यासाठी प्रवृत्त होतात. समोरचा प्रकाश कमी-अधिक झाला किंवा समोरची वस्तू कमी अधिक महत्त्वाची झाली, की डोळ्यांत असलेली बाहुली आकुंचन प्रसरण पावून डोळ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करते; पण अचानक आलेला किंवा बराच वेळ असलेला प्रखर प्रकाश डोळ्यांना सुखावह तर नसतोच, पण त्यामुळे डोळ्यांचे विकार होण्याचाही शक्‍यता असते. 

आहार चौरस असणे आवश्‍यक असते. आहारात पालेभाज्या अवश्‍य असाव्यात. आहारावर  पैसे वाचवून गळ्यातील माळेसाठी मोती घेतल्यास डोळ्यांत मोतीबिंदू आला, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. अन्न शुद्ध, सात्त्विक, सेंद्रिय असावे, त्यात भाजीपाला व दुधाचा समावेश अवश्‍य असावा. भाजीपाला म्हणत असताना त्यात पालेभाज्यांचा समावेश ओघानेच येतो. आहारातील दूध ताकद देणारे व अत्यावश्‍यक असते, तसेच आहारातील तूप, लोणी डोळ्याला हितकर असते. 

डोळ्यांत अंजन, काजळ घालणे जसे डोळ्यांना हितकर असते, तसेच डोळ्यांत तुपाचे बोट फिरवणेही हितकर ठरते. घृतपान केल्याने डोळे अधिक तेजस्वी होतात. 

डोळ्यांना सतत ताणाखाली ठेवले, तर डोळ्यांवर तर वाईट परिणाम होतोच, पण त्यामुळे मेंदूवर सतत ताण आल्यामुळे मनुष्य लवकर थकून जातो व त्याला विषाद उत्पन्न होतो. अंध व्यक्‍तीला डोळ्याने दिसत नसल्याने परमेश्वर इतर अवयवात ती शक्‍ती देतो, असे म्हटले जाते. अशा व्यक्‍तीचे कान खूप तीक्ष्ण असतात, असे म्हटले तरी डोळ्यांनी जे दिसते व समजते तसे कानाने ऐकलेल्या दृश्‍याची कल्पना करताना त्यात चुका वा विपर्यास होऊ शकतो. आई-वडिलांच्या प्रकृतीतील दोष, तसेच गर्भधारणा होत असताना असलेली शारीरिक परिस्थिती व उद्भवलेले त्रिदोष हे पण मुलांच्या दृष्टीसाठी कारणीभूत ठरतात. एकूणच दूध-तुपाचे सेवन कमी असल्यामुळे अगदी लहानपणीच मुलांना नंबरचा चष्मा लागलेला दिसतो. वातावरणातील बारीक सारीक बदलांमुळे डोळ्याची आग होणे, डोळे लाल होणे, असे त्रास दिसतात. अलीकडे अनेकांना सतत संगणकासमोर बसावे लागत असल्याने त्यांना डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक असते.

डोळ्यांवर अधूनमधून निरशा किंवा मलई काढलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवाव्या. एरंडेलाचे किंवा मधाचे बोट डोळ्यांत फिरवावे, नित्यनियमाने काजळ वापरावे, काजळीयुक्‍त काळे काजळ वापरायला अवघड वाटत असेल,  तर रंग नसलेले अंजनही वापरता येते. सकाळी तोंडात पाणी भरून डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणेसुद्धा डोळ्यांना हितकर असते.   

महात्मा गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे डोळ्यांवर सतत हात ठेवून न पाहणे जीवनात कुणालाच झेपणारे नाही. पण, गरज नसताना पाहत राहण्यापेक्षा अधूनमधून डोळे मिटून बसण्याने डोळ्यांना हितकर ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com