esakal | अन्नद्वेष
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नद्वेष

भूक न लागणे किंवा उपासमार करून घेणे या दोन्ही गोष्टी शारीरिक नुकसान करणाऱ्या आहेत. कोणाचीही भूक सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळ कमी झाली असली किंवा त्या व्यक्तीचे वजन दर आठवड्याला दीड ते दोन पौंडाने कमी होत असेल तर तपासण्याकरून शारीरिक आजार नाही ना, याची खात्री करून घेणे आवश्‍यक असते.

अन्नद्वेष

sakal_logo
By
डॉ. ह. वि. सरदेसाई

भूक मंदावणे (अन्नद्वेष) हा त्रास प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी जाणवतोच. या तक्रारींमुळे आजाराचे निदान करण्यात फारशी मदत होत नाही. शारीरिक व्याधी, मानसिक अस्वास्थ्य, तणाव आणि निरामय प्रकृतीतदेखील भूक मंदावण्याचा अनुभव येऊ शकतो. एखादा रुग्ण भूक न लागण्याची तक्रार करणे, तेव्हा महत्त्वाची माहिती रुग्णाच्या वजनासंबंधीची असते. कोणत्याही दखलपात्र शारीरिक अथवा मानसिक विकारात वजन कमी होत असेल, तरच वा भूक न लागण्याच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची जरुरी असते. वजन कमी होत चाललेले नसेल तर दुसऱ्या तपासण्या करणे आवश्‍यक ठरणार नाही.

पचनसंस्थेतील घटक अवयवांचे विकार यांचा विचार प्रथम येणे निसर्गक्रमप्राप्त आहे. नजीकच्या भवितव्यात यकृतात विषाणूजन्य दाहमुळे काविळ होणार असली तर रुग्णाची मुख्य तक्रार अकस्मात उद्‌भवलेला अन्नद्वेष ही असते. अशा व्यक्तीला दिवसाच्या सुरवातीला (पहाटे-सकाळी) अन्न जाऊ शकते; पण जसा दिवस उजाडेल व वाढेल तसा त्रास वाढत जातो. गर्भवती स्त्रीला या उलट, उलट्यांचा त्रास सकाळी जास्त जाणवतो.

भूक न लागण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण जठराच्या आत होत असणारा कर्करोग. सहसा अशा रुग्णाला पोटदुखी, वजनात घट आणि शौच्याला डांबरासारखी काळी होणे असे त्रास होतात व प्राथमिक तपासणीमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे झालेला रक्तक्षय (अनिमिया) anaemia आढळतो. जठराच्या अस्तराला झालेल्या जखमेमुळेदेखील भूक मंदावते. उलट्या होतात. शौच्याला काळी होते. अल्सर आणि कॅन्सर यात नेमका फरक कळण्याकरता एण्डॉस्कोपी ही तपासणी आवश्‍यकतेची असते. या तपासणीच्या वेळेस शंकास्पद भागातून एक छोटासा तुकडा काढला जातो. या तुकड्याच्या तपासणीवरून कॅन्सर आहे किंवा नाही, याचे निदान निश्‍चित करता येते. 

आतड्याच्या आजारात सिलायक डिसीझ नावाच्या विकाराचे एक प्रमुख लक्षण म्हणजे भूक न लागणे हे होय. सिलायक डिसीझमध्ये लहान आतड्याच्या अस्तरावर सूज येते, त्यामुळे पचन होत नाही किंवा पचलेले शोषले जात नाही. ग्लुटेन नावाचे एक प्रथिन गव्हांत असते. काहींना ते पचत नाही, त्यामुळे अपचन होते. दिवसाकाठी तीन-चार वेळाच शौच्याला होते; परंतु त्याचा आकार मोठा असतो व मळ बांधला जात नाही. तोंडात, गालांच्या आत, ओठांच्या आत फोड येत राहतात. फोलिक ॲसिड पाच मिलिग्रॅमस जेवणानंतर घेणे आणि गव्हापासून बनलेले सर्व पदार्थ वर्ज्य करणे या उपचारांचा चांगला फायदा होतो.

दीर्घकाळ चालू असणाऱ्या बऱ्याच आजारांत रुग्णांची भूक मंदावते. विशेषतः कॅन्सरसारख्या आजारांत भूक मंदावणे व परिणामी वजन घटणे ही अनेकदा रुग्णाची (किंवा रुग्णाची काळजी घेणाऱ्यांकडून समजलेली) एकमेव तक्रा असू शकते. जुनाट मद्यपानाचे व्यसन, मूत्रपिंडे अकार्यक्षम होणे, हृदयाचे कार्य नीट न होणे, यकृताचा सिऱ्होसिस आणि फुफ्फुसांचे (क्षयरोग, एम्पीसीया) दीर्घकाळ चालणारे आजार या सर्वांत भूकेवर दखलपात्र परिणाम होतो.

अनेक मानसिक तणाव व आजारांमध्ये भुकेवर विपरीत परिणाम होतो. चिंता, तणाव किंवा खिन्नता अशा स्थित्यांतून जाताना भूक मंदावते. ॲनोरेक्‍सिया नर्व्होझा आणि बुलीमिया या विकारात अन्नसेवनावर मोठाच परिणाम होतो. अशी विकृती ‘सडपातळ बांधा असावा’ अशा तीव्र इच्छेतून निर्माण होते. हा आजार वयाच्या तेरा ते पंधरापासूनच, तरुण मुलींमध्ये सुरू होताना आढळतो. आजारी व्यक्तीचे स्वतःच्या बांध्याबद्दल ‘आपण लठ्ठ आहोत’ असे ठाम मत असते. या मताचा वास्तवाशी संबंध असेलच असे नाही. उपाशी राहणे, जेवणानंतर उलट्या काढणे, जुलाब होण्याकरता औषधे घेणे असे विविध प्रकार या मुली करत राहतात. या रुग्णांच्या शरीरात वजन घटू शकेल असा कोणताही आजार नसतो. रुग्णांची मासिक पाळी येणे थांबपते, हाडे पोकळ होतात, शरीराचे तापमान सुस्थितीत ठेवण्यात अडचणी येतात. हृदयाच्या आकुंचनाची गती संथावते, रक्तदाब कमी राहू लागतो. मूत्रपिंडांचे कार्य खालावते. मूत्रपिंडात खडे होतात. मलावरोध होतो. पावलांवर सूज येते. यकृताचे कार्य दर्शवणाऱ्या रक्ताच्या तपासण्यात दोष दिसू लागतात. या विकारातील काही व्यक्ती अधून-मधून खा-खा सुटल्याप्रमाणे खूप खातात, मग जुलाबाची औषधे घेतात, स्वतःच उलट्या काढतात, एनिमा घेतात. ‘उपासमार करून घेणं’ आणि ‘खा-खा सुटणे’ या दोन टोकांची ही व्यक्ती घड्याळ्याच्या लंबकाप्रमाणे बदलत असते. 

ॲनोरेक्‍सिया नर्व्होझा विकार जडलेली व्यक्ती आपण आजारी आहोत, हे कबूल करीत नाही. या रुग्णांच्या मेंदूत ‘समाधान अनुभवण्याच्या केंद्रात’ दोष होतात. त्यांना भूक लागणे आणि तृप्ती होणे यांच्या अनुभवात गफलत होत राहते. या व्यक्तींमध्ये चिंतातूर होण्याचा दोष अनेकदा आढळतो. हा आजार एक गंभीर दुखणे आहे. याचे पर्यवसान मृत्यू  होण्यात होऊ शकते. या विकाराचा उपचार सोपा नसतो. संपूर्ण कुटुंबाला समुपदेशन आवश्‍यक असते. सोबत होणारी चिंता आणि खिन्नता यांचा उपचार आवश्‍यक असतो. तज्ज्ञ आणि अनुभवी मानसोपचार करणारे डॉक्‍टर आणि कार्यक्षम चिकित्सक यांचे बरोबरीने उपचार आवश्‍यक असतात. अमूक एका विशिष्ट औषधोपचाराने रुग्ण बरा होतो, अशी येथे स्थिती नाही. सतत दीर्घकाळ उपचार आणि समुपदेशन आवश्‍यक असतात.

बुलीमिया नर्व्होझा झालेल्या व्यक्तींमध्ये अतिरेकी व्यायाम करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. दररोज इतके किलोमीटर धावण्याचे ध्येय त्यांच्या पुढे असते. एका एकी खा-खा सुटते तेव्हा दर दोन तासांच्या आत व्यक्ती खूप खातात. मुळात या व्यक्तींचे वजन थोडे जास्तही असू शकते. आपण मधूनच खूप खातो हे चुकीचे आहे, हे त्यांना पटते. त्याची शरमही वाटते. सामाजिक अवहेलना आणि येणारे तणाव (परीक्षा, विवाह, मुलाखतीला जाण्याची वेळ जवळ येणे, डॉक्‍टरांची ठरलेली वेळ येणे इत्यादी) यातून हा ‘भस्म्या रोग’ जागा होतो. सहसा पौगंडावस्थेत या विकाराची सुरवात होते. दहा ते पंधरा टक्के व्यक्तींना ॲनोरेक्‍सिया नर्व्होझाचीपण बाधा होते. वारंवार जुलाब होण्याची औषधे घेण्याने शरीरातील पाणी आणि क्षार यांचे संतुलन बिघडते. याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. तपासताना जबड्याच्या कोनाजवळील पॅरॉटिड लाळ तयार करणारी ग्रंथी आकाराने मोठी झाल्याचे आढळते. सिलेक्‍टिव  सिरॉटॉनिन टी-अपटेक इन्‌हिबीटर्स या प्रकारची खिन्नता निवारके आणि मानसोपचार यांचा फायदा होतो. कोणाचीही भूक सहा आठवड्यांपेक्षा जास्त वेळ कमी झाली असली किंवा त्या व्यक्तीचे वजन दर आठवड्याला दीड ते दोन पौंडाने कमी होत असेल तर तपासण्याकरून शारीरिक आजार नाही ना, याची खात्री करून घेणे आवश्‍यक असते.