श्री गणपती ते श्री ब्रह्मणस्पती

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 25 August 2017

पृथ्वीतत्त्व मेरुदंडाच्या तळाला असलेले मूलाधार चक्र स्थित असते व हेच गणेशांचे स्थान आहे. हे तत्त्व ज्या वेळी ब्रह्मस्वरूपाकडे जाऊ लागते तेव्हा ते प्रथम जलतत्त्वात विसर्जित होते. सृष्टीच्या उत्पत्तीपासून म्हणजे ज्या वेळी पंचीकरणातून सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून घडलेले सर्व काही जलाला माहीत असते. त्यामुळे जलाचा उपयोग सर्व प्रकारचे जीवन वाढविण्यासाठी केला जातो आणि यामुळेच पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते. जल प्रवाहित असते तसे जीवनही प्रवाहित असते. सृष्टीत असलेल्या सर्वांचेच, मनुष्यमात्र, प्राणिमात्र, वृक्ष वगैरे सर्वांचेच विसर्जन शेवटी निसर्गामध्ये करावेच लागते. या सर्वांचा इतिहास जलात सोडून दिलेला असल्यामुळे ही माहिती आवश्‍यकतेनुसार प्रकट व्हायला मदत होते.

प्रत्येक घरात वैयक्‍तिक पातळीवर श्रीगणेशांचे पूजन केले जाते. बहुतेकांच्या देव्हाऱ्यातील पंचायतनात गणपतीचा समावेश असतो. वटपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा, रामनवमी, शिवरात्री असे वर्षभरात एका दिवसांचे असे अनेक उत्सव येतात. परंतु नऊ ते दहा दिवस चालणारे उत्सव फक्‍त दोनच, एक श्री गणेशोत्सव आणि दुसरा श्री देवीचे नवरात्र. भाद्रपद व आश्विन महिन्यात येणाऱ्या या दोन्ही उत्सवांच्या वेळी वृक्षराजी बहरलेली असते, सगळीकडे हिरवेगार झालेले असते. भाद्रपद गणेशोत्सव हा तर भर वर्षाऋतूतीलच उत्सव. नवरात्र शरद ऋतूत येत असला तरी झिमझिम पाऊस चालू असतो, जो रान हिरवेगार ठेवायला मदत करत असतो. गणेशोत्सव, तसेच याच सुमारास येणाऱ्या हरितालिका, मंगळागौरी या उत्सवांच्या वेळी देवतांना पत्री म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने व फुले वाहण्याची पद्धत असते. तसेच नवरात्रीत नामावलीच्या वेळी १०८ फुले वाहण्याची पद्धत आहे. याचे कारण असे, की पंचमहाभूतांच्या आधी असलेल्या अस्तित्वाच्या सूक्ष्म स्वरूपाच्या या देवता आहे. आणि या दोन्ही देवतांवाचून संसार नीट चालत नाही. विघ्नहर्ता किंवा दुर्गा, गौरी, लक्ष्मी या देवता नसतील तर संसारात आवश्‍यक असलेले मांगल्य, समृद्धी, शक्‍ती मिळणार नाही. नेमके याच देवतांची पूजा करण्याच्या वेळी मनुष्याला निसर्गाच्या जवळ आणण्याचे प्रयोजन म्हणून पत्री वा वेगवेगळ्या प्रकारची फुले वाहण्याची पद्धत असल्याचे दिसते. पत्री, फुले वाहत असताना वेगवेगळ्या वृक्षांची माहिती करून घेणे, वृक्ष ओळखणे हे आपसूक होते. फुले-पाने तोडताना त्यांचा बोटांच्या अग्राला रस लागतो व त्याचाही आरोग्यासाठी उपयोग होऊ शकतो. 

गणेशोत्सवातील गणेशाची मूर्ती तर अनायासे निसर्गात त्या वेळी उपलब्ध असलेल्या ओल्या मातीची बनवायची असते. त्यावर फुला-पानांपासून तयार केलेले रंग लावून किंवा खनिज पदार्थांपासून बनविलेले शेंदरासारखे रंग लावून गणेशमूर्ती सजवायची असते. पूजेच्या वेळी पाना-फुलांचा उपयोग केला जातो. दहा दिवसांनंतर श्री गणेशांचे जलात विसर्जन करण्याची पद्धत आहे. पृथ्वीतत्त्व मेरुदंडाच्या तळाला असलेले मूलाधार चक्र स्थित असते व हेच गणेशांचे स्थान आहे. हे तत्त्व ज्या वेळी ब्रह्मस्वरूपाकडे जाऊ लागते तेव्हा ते प्रथम जलतत्त्वात विसर्जित होते. नाभीस्थित असलेला अग्नी असलेल्या पुढच्या मणिपूर चक्रामध्ये नवरात्राच्या रूपाने प्रकट होतो. या वैश्वानर अग्नीच्या आशीर्वादाने अन्नाचे सप्तधातूत रूपांतर होते आणि व्यक्‍तीच्या पराक्रमावर सामर्थ्यावर आकर्षण निर्माण होते. यातून हृदयकमल उमलून त्या ठिकाणी असलेल्या अनाहत चक्रात प्रेमभावनेचा, शांततेचा अनुभव घेता येतो. 

जलात सर्व विचार येऊ शकतात, राहू शकतात. सृष्टीच्या उत्पत्तीपासून म्हणजे ज्या वेळी पंचीकरणातून सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून घडलेले सर्व काही जलाला माहीत असते. त्यामुळे जलाचा उपयोग सर्व प्रकारचे जीवन वाढविण्यासाठी केला जातो आणि यामुळेच पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते. जल प्रवाहित असते तसे जीवनही प्रवाहित असते. सृष्टीत असलेल्या सर्वांचेच, मनुष्यमात्र, प्राणिमात्र, वृक्ष वगैरे सर्वांचेच विसर्जन शेवटी निसर्गामध्ये करावेच लागते. या सर्वांचा इतिहास जलात सोडून दिलेला असल्यामुळे ही माहिती आवश्‍यकतेनुसार प्रकट व्हायला मदत होते. 

पृथ्वीच्या ६७ टक्के पृष्ठभागावर जल आहे. हे सर्व जल एकमेकांत मिसळलेले आहे. एखादा तलाव सुटा आहे असे वाटत असले तरी त्यातील जलाची वाफ होऊन ते आकाशात जाते, त्यातून पाऊस पडतो. कुठल्या देशातील कुठल्या तलावातील पाण्याच्या वाफेपासून तयार झालेला पाणी कुठल्या देशातील कुठे पडेल व ते कोण प्राशन केले याला काहीही नियम नाही. एका अर्थाने आपण सर्व एकाच पाण्याच्या संस्कारावर वाढलेले आहोत. पाऊस अन्नाला कारण ठरतो. पुढे याच अन्नातून शरीराची उत्पत्ती होते म्हणजेच अन्न-धान्य शेतीत वाढत असताना वापरल्या गेलेल्या जलाच्या संकल्पना माणसाच्या शरीरात येतात. अशा प्रकारे आई-वडील, पितामह-मातामह वगैरेंचा इतिहास प्रकट होतो. पितृपक्षातील पंधरा दिवसांमध्ये या सर्वांची आठवण काढली जाते, प्रार्थना करताना विशेष धूपाद्वारा त्यांचे आवाहन करता येते, त्यांचे श्राद्ध केले जाते, त्यांच्या नावे काही तरी दान केले जाते. पितरांचे उतराई व्हावे ही कल्पना.

भाद्रपदातील गणेशाची मूर्ती मातीपासून न बनवता प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सिमेंट वगैरे द्रव्यांपासून बनविलेली असेल तर अशा गणपतीचे जलात विसर्जन होऊ शकणार नाही. अर्थात या दिवसांमध्ये गणपतीचे केलेले पूजन, त्याची उपासना आदी सर्व वाया जाणार. ज्याने उपासना, प्रार्थना केली त्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून या दिवसांत प्रतिष्ठा केला जाणारा गणेश मातीचा, शाडूचा असावा, ज्याचे नंतर पाण्यात विसर्जन करता येईल.  

सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या मातीशिवाय अन्य द्रव्यांपासून बनविलेल्या मोठ्या मूर्ती, देखावे यांचे पाण्यात विसर्जन करू नये. तशी व्यवस्था कायद्याने करणे आवश्‍यक आहे. पूजेच्या गणपतीचे, मग ते वीतभर असेल किंवा हातभर असेल, पाण्यात विसर्जन करता येईल. ज्यांना नदी, समुद्र वगैरेपर्यंत जाण्याची सुविधा नसेल त्यांना घराबाहेर ठेवलेल्या हौदात, घंगाळात विसर्जन करता येईन. मात्र हे पाणी नंतर नदी, समुद्रात सोडावे म्हणजे समाधान होईल. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने समुदायाला एकत्र आणणे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना उत्सवाच्या निमित्ताने बोलावणे, सर्वांनी एकत्र आरत्या म्हणणे, प्रसाद वाटणे होत असते. सार्वजनिक गणपती असला तर जवळच्या-दूरच्या लोकांना बोलावून त्यांच्यापुढे काही कार्यक्रम आयोजित करून ज्ञानदान, विचारांचे आदानप्रदान, कलावर्धनाच्या दृष्टीने संगीत, नृत्य, चित्रकला प्रदर्शन वगैरे कार्यक्रम करणे, काही ज्वलंत प्रश्न असेल तर त्यावर चर्चा घडवून प्रश्नाचे गांभीर्य समाजापर्यंत पोचविणे साधता येते. म्हणजे पृथ्वीच्या बारीक कणापासून, पाण्यापासून ते संपूर्ण जनताजनार्दनापर्यंत सर्वांना समाविष्ट करून घेणारा असा हा श्री गणेशांचा सण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor ganesh