अतिआनंदी अकारण आनंदी

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 3 November 2017

आनंद आणि खेद या भावना माणसाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असतात. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात या भावनांचा होणारा उद्रेक हा विकार असतो. अतिआनंदी व अकारण आनंदी स्थिती असेल तर हा विकार आहे, हे जाणून या विकारावर वेळेवरच उपचार करणे इष्ट असते. यामागची कारणे शोधून त्यावरही उपचार करणे योग्य असते. 

आनंद आणि खेद या भावना माणसाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असतात. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात या भावनांचा होणारा उद्रेक हा विकार असतो. अतिआनंदी व अकारण आनंदी स्थिती असेल तर हा विकार आहे, हे जाणून या विकारावर वेळेवरच उपचार करणे इष्ट असते. यामागची कारणे शोधून त्यावरही उपचार करणे योग्य असते. 

परिस्थितीत आनंद वाटण्याजोगे काही घडत नसताना माणसाची मनःस्थिती अकारणच आनंदी असणे याला उन्माद (यू-फोरिया) म्हटले जाते. कधी-कधी वाईट वाटावे अशी परिस्थिती असतानासुद्धा आनंद वाटणे हा तर तीव्र दोष आहे. मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसि आणि स्किझोफ्रेनिया अशा मानसिक विकारांत अशी लक्षणे आढळतात. उदाहरणार्थ, परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला आनंद होणे. काही औषधी रेणूंचादेखील अशा प्रकारचा परिणाम होतो. क्वचित मेंदूच्या आजारामुळेदेखील अशा विपरीत मानसिक प्रतिसाद येऊ शकतो. उन्माद हा या प्रकारातील सर्वात महत्त्वाचा विकार असतो.

सुरवातीच्या काळात आजाराचे स्वरूप तितकेसे स्पष्ट होत नाही. हळूहळू स्वतःच्या खोट्या मोठेपणाच्या बोलण्यावरून आजाराची शंका नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना येऊ लागते. पंतप्रधानांची व माझी चांगली ओळख आहे; मी आजवर सगळ्या परीक्षांत पहिला आलेलो आहे, माझ्या वर्गात मी सर्वात देखणा आणि हुशार आहे. या प्रकारची वक्तव्ये वारंवार होतात. या स्वतःबद्दलच्या खोट्या बढायांच्या जोडीला व्यवहारात निखालस चुकीचे निर्णय घेतले जाऊ लागतात व न परवडणाऱ्या आणि गरज नसणाऱ्या वस्तू सहजासहजी खरेदी केल्या जातात. या स्वतःच्या (खोट्या) मोठेपणाच्या बातांबरोबर स्वभाव चिडचिडा बनू लागतो. ही माणसे त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त जबाबदाऱ्या पत्करतात, अर्थातच त्या जबाबदाऱ्या पार पाडता येत नाहीत, गप्पा (आणि थापा) मारण्यात ही माणसे चतूर असतात.

अमर्याद फायदा होऊ शकेल अशा योजना त्यांच्या ‘सुपीक’ मेंदूतून बाहेर पडत असतात. विषय बदलतात व सतत पूर्वायुष्यातील ‘यशा‘चा बडेजाव सांगून श्रोत्यांना आपल्या मोठेपणाबद्दल चकित करून सोडतात. या मंडळींना कमी झोप पुरते, जेवण-खाणदेखील मर्यादित असते. स्त्री-पुरुष संबंधाबद्दल बोलणे आणि वागणे अनेकदा असभ्यतेच्या मर्यादा ओलांडते. वागण्यातील सामान्य सावधगिरी पाळली जात नाही, उदाहरणार्थ, गरज नसताना वाहने खूप जोरात चालविली जातात. स्वभावात आणि बोलण्यात विनोदाची झालर असते;परंतु मधूनच स्वभावातील चिडकेपणा प्रगट होतो. भावनांतील बदल झपाट्याने बदलताना दिसतो. एखादी हलकी-फुलकी विनोदाचे अंग असणारी गोष्ट सांगता- सांगता एकाएकी रडू कोसळते! ही स्थिती काही मिनिटांत बदलू शकते आणि पुन्हा विनोदी संभाषणाकडे कल झुकू लागतो.

बाय पोलर डिसीज नावाच्या आजारातदेखील उन्माद आणि खिन्नता यांच्या आलटून-पालटून पाळ्या येतात;पण प्रत्येक पाळी सात-आठ दिवस टिकते. याच विकाराची एक छोटी आवृत्ती सायक्‍लोथायमिया नावाने ओळखी जाते. उन्माद आणि खिन्नता या दोन टोकाच्या अवस्थित्यातून ही मंडळी हेलकावे घेत असतात. मधून-मधून त्यांची मनःस्थिती अगदी चांगल्या माणसाची असावी तशी असते. अशा व्यक्तींचा सौम्य प्रमाणात उन्माद किंवा ‘आनंदी स्थिती’ काही आठवडे टिकते. या काळात ही माणसे उत्साही असतात आणि वास्तव्याचा विचार न करता मोठ्या मोठ्या योजना मांडतात. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची विनोदाची झालर असते. थोड्या दिवसांनी हा आनंदी स्वभाव बदलतो आणि कोणतीही गोष्ट करण्याचा उत्साह वाटेनासा होतो.

अशा काळात शरीरसंबंधात, राजकारणात, सामाजिक घडामोडींत किंवा धार्मिक बाबतीत रस कमी होतो किंवा (तात्पुरता) उत्साह अजिबात वाटत नाही. काही स्त्रियांना बाळंतपणावर उन्माद किंवा खिन्नता दखलपात्र पातळीवर येते. या स्थितीला औषधोपचाराची गरज आहे किंवा कसे हे मानसोपचारतज्ज्ञ ठरवू शकतात. खिन्नता सुधारावी या दृष्टीने दिलेल्या औषधांनी किंवा विजेचा सूक्ष्म करंट वापरून ईसीटीचा उपयोग केल्याने काहींना उन्मादाचा झटका येऊ शकतो. स्किझोफ्रेनिया या विकारातदेखील रुग्णाला उन्माद येतो. याचे निदान तज्ज्ञ आणि अनुभवी मानसोपचारतज्ज्ञच करू शकतात. सामान्यपणे स्किझोफ्रेनिया या विकारात रुग्ण अतिउत्साही होतो आणि रुग्णाचे विचार आणि आचार वास्तवाला धरून नसतात.

काही शारीरिक विकारात उन्मादासारखी स्थिती येऊ शकते. आपल्या गळ्यापाशी थॉयरॉईड ग्रंथी असते. या ग्रंथीचा स्राव खूप वाढला; कॉर्टिकोस्टेरॉईड या नावाने ओळखी जाणारी औषधे घेत असताना रुग्ण अकारण आनंदी वृत्तीचा (युफोरिया) असू शकतो. त्यापैकी काही रुग्णांना उन्मादही होतो. इतर काही औषधांतदेखील असे गुणधर्म असतात. रुग्ण घेत असणाऱ्या सगळ्या औषधांच्या यादीवर नजर टाकून पाहणे आवश्‍यक असते.

मेंदूत विविध भाग असतात. आपल्या कपाळाच्या मागच्या बाजूला, (मेंदूचा पुढचा भाग) फ्रॉन्टल लोब्स नावाचा भाग असतो. या फ्रॉन्टल लोब्सना इजा झाली तर रुग्णाला यू-फोरिया होऊ शकतो. रुग्णाच्या बोलण्यात येणाऱ्या विनोदाचा दर्जा खालचा असतो. सभ्य माणसांच्या सान्निध्यात स्त्री- पुरुष संबंधांवर अवलंबून असणारे विनोद सहसा सांगणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जात नाही; परंतु असे विनोद फ्रॉन्टल लॉब्सना इजा झालेली व्यक्ती असे अ-सभ्य विनोद केव्हाही आणि कोठेही सांगते. अशा व्यक्तीचे वागणेसुद्धा ‘अ-सभ्य’ म्हणता येईल इतके अशोभनीय असते. आपल्या बोलण्याने आणि वागण्याने प्रतिष्ठित आणि सभ्य लोकांचे आपल्याबद्दल काय मत होईल, याचा विचार ही मंडळी करत नाहीत. येथे होणाऱ्या गांठी (ब्रेन ट्युमर्स) आणि अल्झायमर्स डिसीज या आजारात असे प्रकार वारंवार आढळतात. कानांच्या आतल्या भागातील मेंदूला टेंपोरल लोब्स म्हणतात. येथे आलेल्या आजारामुळे रुग्णाचे वागणे-बोलणे चमत्कारिक होते, कधी-कधी उन्माद होतो. मेंदूला होणाऱ्या इतर आजारांतसुद्धा अशी मानसिक व्यथा प्रकट होते. जाणून-बुजून ‘आनंदी-वृत्ती’ यावी यासाठी माणसे मद्यपान करतात; परंतु मद्यामधील इथाईल अल्कोहोल सातत्याने नियमाने घेतल्यास संपूर्ण शरीराला काही ना काही अपाय होतो हे ध्यानात ठेवावे लागते.

अशा प्रकारे औषधांनी मन कृत्रिमरीत्या जादा प्रमाणात उल्हसित करता येते, या औषधांची मोठी यादी आहे. वजन कमी व्हावे या करता भूक लागू नये म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांचा या यादीत समावेश आहे. काही माणसे ‘गांजा’ ओढतात त्यामुळे भूक तर कमी होतेच, परंतु तऱ्हेतऱ्हेचे भासही होतात. काही ‘कुत्र्यांच्या छत्र्यां’तून काढलेल्या रसातील रेणूंचा असा परिणाम होतो (सोमरस), मोटारीत वापरले जाणारे पेट्रोल, काही प्रकारचे डिंक आणि भूल देताना वापण्यात येणारी औषधे यांनादेखील असा गुणधर्म आहे.

पेट्रोलचा वास घेण्याची चटक लागण्याची उदाहरणे आहेत. काही खोकल्यावर उपयुक्त औषधात कोडेन नावाचा रेणू असतो, त्याचेदेखील व्यसन लागू शकते.

आनंद आणि खेद या भावना माणसाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असतात. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात अशा उद्रेक हा विकार असतो. या विकारावर वेळेवरच उपचार करणे इष्ट असते. दुर्दैवाने या प्रकारच्या विकारांचे निदान आजाराच्या सुरवातीच्या काळात अनेकदा होत नाही. इतर कोणत्याही आजाराप्रमाणे लवकर निदान आणि योग्य उपचार हे ध्येय दृष्टीने अशा आजारांची जाणीव सर्वांना असणे इष्ट असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Happiness is uncertain