दीपावलीच्या हृदयापासून शुभेच्छा!

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 13 October 2017

दीपावलीच्या निमित्ताने केवळ घराची स्वच्छता पुरेशी नाही. अंतःकरण शुद्धीही सर्वात महत्त्वाची. शारीरिक पातळीवर करायची शरीरशुद्धी, मानसिक पातळीवर करायची कामक्रोधादिक भावनांची शुद्धी आणि आध्यात्मिक पातळीवर करायची शक्तीची, तेजाची उपासना. या उपासनेच्या मदतीने हृदय जेवढी शक्ती, जेवढे ओज शरीराला पुरवेल त्यातून वाढणाऱ्या शारीरिक तेजामुळे किंवा खुलून दिसणाऱ्या सूक्ष्म तेजाच्या औऱ्यामुळे दीपावलीचे सहस्र दीप प्रकट होऊ शकतात.

प्रत्येक गोष्ट मनापासून बोलावी असे आपण म्हणतो, परंतु शपथ घ्यायची वेळ आली की हात हृदयावर ठेवतो. ‘हृदयस्थ परमात्मा’ असे म्हणताना परमेश्वराचे स्थानही हृदयच असते. तू माझ्या हृदयात वसतोस किंवा वसतेस अशा आणाभाकाही घेतल्या जातात. असे हे हृदय महत्त्वाचे! म्हणूनच शरद ऋतुमधे हृदयाला त्रासदायक ठरणाऱ्या पित्ताचे शमन करणे महत्त्वाचे असते असे आयुर्वेदाने सांगून ठेवलेले आहे. हृदयामधे जळजळ जराही चालत नाही. तसेच हृदयाचे आकुंचन, प्रसारण किंवा हृदयाची धडधड थांबूनही चालत नाही. हृदय म्हणजेच प्रेम, हृदय म्हणजे दुसऱ्याबद्दल मनात असलेली आपुलकी ! यातही कधी खंड पडून चालत नाही. 

आपल्याला असे वाटत राहते की, फक्त चुकीच्या जेवणामुळे किंवा मानसिक ताणामुळे, व्यायाम न केल्यामुळे किंवा घरात आनुवंशिकता असल्याने हृदयाचा त्रास होतो. पण जर केवळ एवढ्यानेच हृदयाचा त्रास होत असता तर तो अनेकांना झाला असता. हृदयाला खरा त्रास होतो तो षड्रिपुंचा! अति इच्छा, अति स्पर्धा, अति महत्त्वाकांक्षा ही सुद्धा ताणाला कारणीभूत ठरत असते, यातूनच पुढे उत्पन्न होतो तो क्रोध. इच्छा पूर्ण झाल्या नाही की तयार होतो लोभ. कुठल्यातरी चुकीच्या प्रलोभनांना बळी पाडणारा तो मोह, त्या प्रलोभनात आपण फसलो आहोत हे समजल्यानंतर डोक्‍यात चढणारा तो मद आणि सरतेशेवटी इतरांचा द्वेष आणि ईर्ष्या करण्याने वाढणारा ताण हा हृदयाला खूप जाचक ठरणारा असतो. म्हणूनच शारदीय उत्सवाची सुरुवात शरीरशुद्धीने होत असते. यात सुरुवातीला शरीराची म्हणजे जडत्वाची शुद्धी आणि मेंदूची म्हणजेच संकल्पनेची तयारी करायची असते. जेणे करून पुढे शरीराच्या पलीकडे घडणाऱ्या सर्व घटनांना तोंड देण्याचे सामर्थ्य, मेंदूची शक्ती म्हणजेच श्रीगजानन आपल्याला देत असतो. 

आयुर्वेदात हृदयविकार टाळण्यासाठी म्हणजेच अपमृत्यु येऊ नये, उलट वृद्धावस्था दूर ठेवून शारीरिक, मानसिक तारुण्याचा अनुभव घेता यावा यासाठी ओजाची वृद्धी व्हावी लागते असे सांगितलेले असते. यासाठी शरीरातले दोष दूर करून रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा सुचवलेल्या असतात. हृदय दुसऱ्याला सेवेत म्हणा, प्रेमात म्हणा, अर्पण करण्यासाठी वेळच उरला नाही तरी मानसिक ताण वाढतो, यातून पुढे हृदय अप्रत्यक्षपणे रक्ताच्या दाबात बदल करून किंवा शरीराची साखर पचवण्याची म्हणजेच ताकद मिळवण्याची शक्ती नष्ट करून एक प्रकारे संदेश देऊ पाहते, खरे तर अशा वेळेला हृदयाकडेच जास्ती लक्ष द्यायला हवे. 

येशु ख्रिस्तांचे एक छायाचित्र प्रसिद्ध आहे, ज्यात त्यांच्या छातीवर बदामाच्या आकाराचे, लाल रंगाचे हृदय दाखवलेले असते. याचे कारण मनुष्याने कायम या हृदयाची आठवण ठेवावी. मेंदू अत्यंत उपयोगाचा असला तरी हृदयकमल साक्षात रूद्राचे स्थान आहे आणि रूद्र म्हणजेच महादेव शंकर, ते श्रीगजाननाचे पिताच आहेत. विशिष्ट वयानंतर जबाबदाऱ्या वाढल्या, जराशी निराशा वाटू लागली तर अधिक काम करणे गरजेचे असते आणि यावेळी हृदयाची साथ हवी, धाप नको. यादृष्टीने आयुर्वेदात कायाकल्प विधी सांगितला आहे. यातले एक प्रकरण म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे, योजनापूर्वक शरीराच्या सर्व पेशींना आणि सर्व संस्थांना शुद्ध करण्यासाठी, शरीर ज्यातून तयार झाले त्या पंचमहाभूतांची शुद्धी करण्यासाठीचे पंचकर्म. हृदय शुद्ध झाल्याचा पुरावा म्हणून दसरा सोन्याची फुले वाटून, फूल ना फुलाची पाकळी या न्यायाने आपट्याची पाने वाटून साजरा केला जातो. यातून प्रेमभाव वाढवणे, संवेदना जागृत करणे आणि स्वतःपेक्षा दुसऱ्याची काळजी अधिक आहे हे दर्शवले जाते. 

तसे पाहता श्रीगजाननाच्या आगमनापूर्वीच घर स्वच्छ-शुद्ध करणे गरजेचे असते. ही शुद्धीची योजना केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता ती आसमंत, पर्यावरण, समाज, रस्ते, नदी-नाले यांच्यासाठीही वापरावी लागते. जे कोणी ही घरादाराची आणि शरीराची शुद्धी गणपतीत करू शकत नाहीत, ते मग निदान दसऱ्याला तरी घराची तयारी करतात, तेही जमले नाही तर दीपावलीच्या आधी करतात. कोळिष्टके काढणे, जाळी जळमटे काढणे, कुठे पाणी वगैरै गळत असेल तर दुरुस्त करून घेणे, घरात एखादी नवीन वस्तू घेणे, फर्निचर घेणे, दागदागिने करणे, कपडे घेणे, घराला रंगरंगोटी करणे, भेटवस्तू आणून ठेवणे, जेणे करून पाहुणे आले तर त्यांच्या समोर आपल्या भावना प्रकट करता येतील, अशाप्रकारे एक उत्साहवर्धक वातावरण तयार केले जाते. पण ही सर्व झाली बाह्यतः करायची तयारी! खरे तर अंतःकरण शुद्धी ही सर्वात महत्त्वाची. यात समाविष्ट असते, शारीरिक पातळीवर करायची शरीरशुद्धी, मानसिक पातळीवर करायची कामक्रोधादिक भावनांची शुद्धी आणि आध्यात्मिक पातळीवर करायची शक्तीची, तेजाची उपासना. या उपासनेच्या मदतीने हृदय जेवढी शक्ती, जेवढे ओज शरीराला पुरवेल त्यातून वाढणाऱ्या शारीरिक तेजामुळे किंवा खुलून दिसणाऱ्या सूक्ष्म तेजाच्या औऱ्यामुळे दीपावलीचे सहस्र दीप प्रकट होऊ शकतात, मग आनंदाला काय तोटा? 

गेल्या पन्नास वर्षांपासून भौतिक पातळीवरचा जो प्रत्येकाचा अनुभव असतो, उदाहरणार्थ, साधे पाच मिनिटेही न चालता येणारी व्यक्ती जेव्हा भरभर छान चालू शकते किंवा यावर्षी मी सुट्टीत गिरनार पर्वत चढून सद्‌गुरु श्रीदत्तात्रेयांचे दर्शन करून आलो असे आनंदाने सांगणारे भेटतात. त्यावेळेला चेहऱ्यावर जवळजवळ दीपावलीचेच तेज पाहून आणि आनंदाने भरलेले मन पाहून अतिशय आनंद होतो. या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी भारतीय ऋषी मुनींनी अशा सणांची संपूर्ण वर्षात जी खैरात केलेली आहे, ती पाहून त्यांना मनापासून आभार द्यावेसे वाटतात, भारतात जन्म झाल्याबद्दल धन्यता वाटते आणि मनात दीपावलीतल्या फटाक्‍यांपेक्षाही मोठे फटाके फुटतात. 

एकूणच काय की सर्व दीपावलीचा अनुभव हा हृदयाचा आहे, या ठिकाणी केवळ मनाला स्थान नाही. म्हणूनच त्यात द्वैत विकृती निघून गेलेल्या असतात आणि शुद्ध मनाने पशूची पूजा, जडाची पूजा, संपत्तीची पूजा, पती पत्नीतल्या प्रेमाची पूजा, भाऊबहिणीच्या नात्याची पूजा अशा प्रकारे दीपावलीचा आनंद लुटता येतो. सर्वांना या आनंदाची प्राप्ती होवो ही प्रार्थना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Happy Diwali wishes