जीवेत शरदः शतम्‌

Health
Health

‘जीवेत शरदः शतम्‌’ अशा प्रकारचा आशीर्वाद अथवा शुभेच्छा आपण हमखास वाढदिवसाच्या अभीष्टचिंतनाला देतो. परंतु ती व्यक्ती खरोखरच १०० वर्षे आरोग्यमय जिवंत राहू शकेल, यासाठी आपण अथवा ती व्यक्ती काही करतो का, याचा विचार आपण केला पाहिजे. आरोग्य आणि वाढदिवस याविषयी विचार व्हावा...

भारतामध्ये असा प्रघात अथवा समज आहे, की फक्त आणि फक्त आजारी पडल्यावरच हॉस्पिटलमध्ये अथवा क्‍लिनिकमध्ये जायचे. खरेतर हे चुकीचे आहे. आजची आपली आयुष्य जगण्याची पद्धती, चंगळवाद आणि खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय चुकीच्या आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत, की त्या आपण वर्षातून एकदा तरी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. या तपासण्या वेळेत झाल्या व त्यात योग्य प्रकारचे निदान झाले, तर पुढील गंभीर आजार आपल्याला निश्‍चितपणे टाळता येण्यासारखे आहेत. मला म्हणून वाटते, आपला वाढदिवस इतरांना काय हवंय, त्यापेक्षा मला काय हवंय, म्हणजे माझ्या शरीराला काय हवंय, मनाला काय हवंय आहे, हे सर्वांत महत्त्वाचे. परंतु, असे वागताना आपण अथवा नवीन पिढी दिसत नाही. मला म्हणूनच सुचवावे वाटते, की आपण आपला वाढदिवस आरोग्यमय असा साजरा करावा.

वाढदिवसाच्या दिवशी आपण काय केले पाहिजे व त्याचे वय, लिंग यानुसार ते किती गरजेचे आहे. यावर सर्वांनी विचार करणे आवश्‍यकच आहे.

साधारणतः आपल्या वयाचे दोन विभागांत विभाजन केले आहे. तरुण आणि उतार वय. तरुण वय हे साधारणपणे ४० वर्षांपर्यंत मानले जाते. उतार वयाची सुरवात ४० वर्षांनंतर मानली जाते. म्हणून ढोबळमानाने ४० वर्षांपूर्वीची आरोग्य तपासणी व ४० वर्षांनंतरची आरोग्य तपासणी अशी विभागणी केली जाते. ४० वर्षांच्या आतील व्यक्तींनी दरवर्षी खालील गोष्टींची तपासणी केली पाहिजे.
१) डॉक्‍टरांकडून (Physician) तपासणी
२) प्रयोगशाळेतील तपासणी (Lab)
आता डॉक्‍टरांकडून तपासणीमध्ये खालील गोष्टी डॉक्‍टर बघतीलच; परंतु आपणही याविषयी जागरूक असले पाहिजे.
अ) सर्वसाधारण तपासणी
ब) रक्तदाब तपासणी
क) हृदयाचे ठोके, गती तपासणी
ड) श्‍वसनाचा वेग
वरील तपासण्यांमध्ये साधारणतः डॉक्‍टर आपल्या प्रकृतीच्या तपासण्या करून काही गोष्टींची कल्पना देतात. एखाद्या व्यक्तीला कमी वयातच रक्तदाबाचा त्रास जाणवत असेल आणि तो लवकरात लवकर डॉक्‍टरांच्या निदर्शनास आल्यास त्यापासून निर्माण होणारे पुढील धोके आपण नक्कीच टाळू शकतो. शिवाय, कोणत्या कारणांमुळे रक्तदाब वाढला आहे, याचेदेखील निदान करून याच्यावर योग्य ते औषध उपचार करून पुढे होणारे मोठे आजार उदा. पक्षाघात (Paralysis) हृदयविकार असे आजार टाळता येऊ शकतात. इतर महत्त्वाच्या तपासण्यांमध्ये हृदयाची गती, ठोके बघितले जातात. यामध्ये काही विकृती जन्मतः अथवा नंतरची असेल, तर त्याचेदेखील निदान करून औषधोपचार करता येऊ शकतात.

श्‍वसनाचा वेग मोजून डॉक्‍टर आपल्या फुफ्फुसाची तपासणी करतात. यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता बघितली जाते. त्यामध्ये कोणाला दमा, ॲलर्जी इ. आजार आहेत का, हे बघितले जाते. ॲलर्जी असेल तर ती कोणत्या कारणांमुळे आहे, याची तपासणी केली जाते. शिवाय, त्यावर उपायदेखील सुचवले जातात. अशा प्रकारे डॉक्‍टर आपल्या सर्वसाधारण तपासण्या करून आपल्या आरोग्याविषयी सत्यता देतात. परंतु, आपण आपले हे रेकॉर्ड लेखी स्वरूपात जतन करणे गरजेचे आहे.

प्रयोगशाळेतील तपासण्या -
प्रयोगशाळेत ४० वर्षांअगोदरच्या तपासण्या पुढीलप्रमाणे :
१) हिमोग्राम (हिमोग्लोबिन व इतर पेशी)चे प्रमाणासाठी
२) रक्तातील साखरेचे प्रमाण (BSL)
३) रक्त गट (Blood group)
४) थायरॉईड तपासणी (TFT)
५) लघवीची तपासणी (Urine (R))
वरील प्रकारच्या तपासण्या कमीत कमी सुचवलेल्या आहेत. यामध्ये प्रत्यक्ष तपासणारे डॉक्‍टर आणखी काही तपासण्या आपल्या आजारानुसार व प्रकृतीनुसार सुचवू शकतात.

चाळिशीनंतरच्या तपासण्या -
मराठीमध्ये एक गाणे फार प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ‘सोळावं वरीस धोक्‍याचं...’ परंतु, आरोग्याच्या दृष्टीने चाळिसावं वरीस धोक्‍याचं म्हणून चाळिसाव्या वर्षी सगळ्यात जास्त आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामध्येदेखील डॉक्‍टरांकडून सर्वसाधारण तपासण्या करून खालील तपासण्या करणे गरजेचे आहे.
१) हिमोग्राम
२) रक्तातील साखरेचे प्रमाण
अ) fasting (जेवणाअगोदर) ब) P.P. (जेवणानंतर)
३) Lipid profile (रक्तातील चरबी)
४) T F T (थायरॉईड तपासणी)
५) KFT (Kidney मूत्रपिंड)
६) LFT (liver function test)
७) Sr. calcium
८) Sr. vit B-१२ level
९) St. Homocystine
१०) Urine R & microscopy
११) E.C.G
१२) X-ray chest
१३) २ Deco, stress test
त्याचबरोबर डॉक्‍टर आवश्‍यकतेनुसार खालील तपासण्या सुचवू शकतात.
१) मणक्‍याची, मेंदूसाठी (C.T brain/M.R.I.)
२) हृदयासाठी (३ D Scan)
या व्यतिरिक्त महिलांसाठी गर्भाशय कर्करोग निदानासाठी (PAP smare), तसेच स्तनांच्या कर्करोग निदानासाठी काही तपासण्या करण्याची गरज आहे. वरील सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्‍टरांना भेटून आपण आपले रिपोर्ट कार्ड (वाढदिवसाचे शुभेच्छापत्र Greeting Card) योग्य आहे किंवा नाही हे बघणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर डॉक्‍टरांनी सुचविलेली औषधे, पथ्य, कुपथ्ये यांचादेखील उपयोग तंतोतंत केला पाहिजे, तरच आपण सांगू शकतो, की पुढचा वाढदिवस सुखाने, आरोग्यमय पद्धतीने, आनंदाने साजरा करता येईल. याचबरोबर वाढदिवसाचे निमित्त साधून आपण आणखी काही चांगल्या गोष्टी करू शकतो, त्या म्हणजे लसीकरण. आपल्याला माहिती आहे, की लसीचा वापर मनुष्य आजारी पडू नये म्हणून असतो किंवा एखाद्या आजाराविरुद्ध आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी लसीचा वापर होतो. म्हणून लसीकरणही वेळेच्या वेळेवर झाले पाहिजे. ढोबळमानाने आपल्याला माहिती असणाऱ्या लसी म्हणजे...
१) धनुर्वात प्रतिबंधक लस
२) रेबीज (श्वानदंश)
३) फ्ल्यूसाठी
यातील धनुर्वात, श्‍वानदंश (रेबीज) इ. हे असे आजार आहेत, की ते झाल्यावर उपचार करणे खूप अवघड असते व त्यातून रुग्ण बरा होणेही अत्यंत अवघड. म्हणून दर वाढदिवशी आपण धनुर्वाताची लस घ्यावी व तद्‌नंतर सहा महिन्यांनी लस घेऊन एवढा मोठा आजार टाळता येतो. परंतु, हा आजार झाल्यावर लाखो रुपये खर्च करूनदेखील फायदा होत नाही. म्हणून आजार होऊच नये म्हणून लसीकरण असते. तो आजार झाल्यावर त्याचा फायदा नाही. तसेच, ज्या व्यक्ती प्राण्यांच्या संपर्कात काम करतात त्यांनी (Anti Rabies vaccine) घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्ती परदेशी दौऱ्यावर असतात, त्यांनीदेखील वेगवेगळे लसीकरण गरजेचे आहे. मला वाटते, आपण आपल्या मित्रांना, नातेवाइकांना, मित्रमंडळींना इतर भेटवस्तू, पार्ट्या देत असतो. त्यातून काही प्रमाणात आरोग्याला अहितकारक अशाच गोष्टी घडत असतात. त्यापेक्षा त्या व्यक्तीला खालील पद्धतीने कार्ड बनविले, तर त्या व्यक्तीवर काही कटू प्रसंग अथवा अपघात घडला, तर उपाय करणे डॉक्‍टरांना अतिशय सोयीचे जाते. म्हणून आपण आपले अथवा आपल्या मित्र-परिवार, नातेवाइकांचे कार्ड तयार करून ते त्यांच्या जवळ कायमस्वरूपी राहावे याची काळजी घ्यावी.
नाव :
पत्ता :
जन्मतारीख :
मधुमेह : आहे/नाही
रक्तगट :
औषध ॲलर्जी : आहे/नाही
इतर ॲलर्जी : आहे/नाही
मागील तपासणी दिनांक -
अशा प्रकारचे कार्ड एखाद्या व्यक्तीकडे असेल आणि ती बेशुद्धावस्थेत अथवा अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आल्यास त्यावर कोणत्या पद्धतीचे उपचार करायचे आहेत, ते डॉक्‍टरांना लगेच समजून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. म्हणूनच आपण अशा प्रकारचे उपाय केले तर निश्‍चित आपले जीवन आरोग्यमय होईल व खऱ्या अर्थाने ‘जीवेत शरदः शतम्‌’चा आनंद मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com